‘अहो भावोजी, बरे आहात का? विनिता गेल्यापासून फोन करणं झालंच नाही.’ यावर भावोजींच्या उत्तराने मी चकित झाले. ‘सारं व्यवस्थित चाललेय. घरातील सर्वजण माझ्यासह व्यवस्थित आहेत. कामाला बायका लावल्या आहेत. आई- बाबा चारोधाम करायला गेलेत. मुलांची शिक्षणं व्यवस्थित चाललीत. मी सध्या इकडेच आलो बदली करून घेवून.’ मी विचारात पडले. विनिता असताना हे सर्व झालं असतं तर… मी विनिताची मैत्रिण ज्योती. आम्ही दोघी बालमैत्रिणी. लहानपणापासून एकत्रच वाढलो, खेळलो, जीवनातील महत्वपूर्ण धडे घेत गेलो. विनिताला दोन बहिणी होत्या. घरातली परिस्थिती साधारण होती. योग्य वेळ पाहून तिच्या दोन्ही बहिणींचे त्यांच्या आई-वडिलांनी दोनाचे चार हात करून दिले होते. आता नंबर होता विनिताचा. विनिताने लग्नापूर्वी भावोजींना भेटून नौकरी करण्याची इच्छा व्यक्त केली. यावर भावोजींनी आनंदाने मान्यता दिली पण घरातील सर्व पाहून नौकरी करण्याची अट घातली. विनिताने ती मान्य करण्यापूर्वी विचार केला खरं. पण तिच्या विचारापेक्षा खूप वेगळ्या विचारांची आणि मनाची माणसं होती ती. लग्नानंतर नवीन असतानाचे दिवस फुलपाखराप्रमाणे रंगीबिरंगी भासतात अन् हवे असतानाही झटकन निघून जातात.
खरंच विनिता जेव्हा जेव्हा मला भेटायची तेव्हा तेव्हा भावोजी, सासू-सासरे, ननंद, दीर यांच्याविषयी सांगे. एकंदरीत त्यांच्या घरातल्या लोकांचा स्वभाव चांगला होता. आप्तेष्टांचा घरात राबता असायचा. तिच्या सासूबाई आता थकल्या होत्या. आजपर्यंत सासऱ्यांच्या नौकरीतील माणसं, गावकडची ओळखीची माणसं, नातवाईक या साऱ्यांना आग्रहाने ठेवून घ्यायचं, त्यांची व्यवस्थित सोय करायची हा स्वभाव सासऱ्यांचा. सासूबाईंनी संसार, मुला-मुलींचे शिक्षण सारं व्यवस्थित पार पाडलं पण आताशा त्यांना जास्त काम होत नव्हतं. ननंदेचं लग्न झाल्यानं तिच्या विषयीची कर्तव्यही विनितावरच आली होती. एकीकडे विनिताला घरातले सर्व पहावं लागत होतं आणि दुसरीकडे तिचा नौकरी करण्याचा अट्टाहास. तिला मी नौकरी सोडण्याविषयी बोलले होते. तेव्हा तिने स्पष्टीकरण दिलं. माझा नवरा व्यवस्थित कमावून तो पगार स्वतःकडेच ठेवतो. मी घरात सासूबाईची स्थिती पाहिली आहे. साऱ्यांनी नोकरी केली पण सासूबाईंना करू दिली नाही. आज त्यांना कोणतीही गोष्ट घ्यायची म्हणालं की सासऱ्यांकडे नाहीतर यांच्याकडे पैसे मागावे लागतात.
त्यांनीही पैसे दिले तरी ते कशासाठी खर्च करायचेत ते सांगावे लागते. एवढा खर्च कसा काय झाला? ही भावना तर कायमच असते त्यांची. तसंच माझं हावू नये. कधी वेळ आली तर मी सासरीच काय पण माहेरीही मदत करू शकेन, अशा पद्धतीने मी स्वतःला सक्षम ठेवत आहे. विनिताचे म्हणणे मलाही पटलेच. खरे कुठेतरी चार पैसे कमावले यांच्यासारखे चार पैसे आपल्या गाठीला आहेत ही भावनाही खूप महत्वाची असते. विनिताला मी घरात कामाला बायका ठेवण्याविषयी सुचवलं होतं. कारण घरात आणि ऑफिसमध्ये काम करून ती दमून जात होती. तिला नवीन कुठल्या सहलीला, गावाला येण्याविषय विचारले की, ‘नको गं खूप काम असतं घरी. मीच बाहेर पडले तर कोण करणार?’ हा प्रश्न ती मला विचारी. कामाला बायका ठेवण्याच्या विरोधात सासू-सासरे तर होतेच पण नवराही तिला म्हणे, ‘कमावलेल्या पैशामधले निम्मे अधिक पैसे तुझ्यावर खर्च होणार. मग काय उपयोग नौकरी करण्याचा.’ तीपण ऐकून घेत असे. खरंच ती स्वतःची मतं मांडतच नव्हती की तिच्या मताला कोणी किंमत देत नसत. कारण तिचा नवरा म्हणे, ‘नौकरीला जातेस म्हणून तुझा पेट्रोल, गाडी खर्च होतोच. शिवाय चार चौघात व्यवस्थित रहावीस म्हणून नेहमीच कपडे, दागिने यांची खरेदी असतेच.
सोबत भांड्याला, धुण्याला, फरशी, अंगण झाडनं, स्वयंपाकाला बायका ठेवल्यास तर तू काय फक्त लॉजिंग बोडिंग सारखं घरात रहाणार का? घरच्या स्त्रीने केलेलं काम आणि कामवाल्या बाईने केलेले काम यात खूप फरक असतो. अडी अडचणीला त्या पैसे मागत रहातात आणि आपल्या महत्वाच्या प्रसंगाला नेमकं दांड्या मारतात.’ विनिता या सर्व मतापुढे गप्प बसे. आजकाल मात्र जशी त्यांच्या संसाराची वेल बहरली आणि एक मुलगा आणि एक मुलगी झाली. तसे घरातील जबाबदारी आणखी वाढली. सासू-सासरे, थकल्याने बऱ्याच अंशी त्यांच्या हाताखाली कामं करावी लागत. मला एके दिवशी ती भेटली. मी तिला ओळखलंच नाही. भावोजींची बदली परगावी झाल्याने मुलांसह घरातली आणि नौकरीच्या जबाबदारीने ती थकून गेली होती. नव्हे मी लक्षपूर्वक पाहिलं तर ती आजारी असल्याचे मला जाणवलं. मी तिला कॉफी हाऊसमध्ये घेऊन गेले. थोड्या निवांत गप्पा झाल्या. तिला अलिकडे मानसिक तणावाने त्रास होवू लागला होता. अधूनमधून चक्कर येत होती. कामाने दमल्याने झोपल्यावर प्रथम झोप येई पण नंतर मात्र ती जागीच रााही. या सर्वांचा परिणाम तिच्या प्रकृतीवर व दिसण्यावर होत होता. भावोजी परगावी असल्याने त्यांना फोन वर कुठे कुरकुर करायचं. एकतर ते बाहेरगावी रहातात. त्यांना कशाला त्रास म्हणून हिने स्विकारलेला समंजसपणा.
पण मी काही सुचवणार एवढयात, ‘अगं मला मुलांना शाळेतून आणायला जायचंय आणि भाजीही आणायचीय.’ तिच्या वाक्यावर तुझ्या घराशेजारच मिळते असं मी सुचवलं तर, ‘अगं तिकडे खुप महाग आहे ना!’ असं सासुबाई म्हणतात. एवढं म्हणून ती घाईघाईने बाहेर पडली. कॉलेजमधल्या विनितामध्ये आता खुप बदल झाला होता. ती मात्र आमची शेवटचीच भेट ठरली. त्यानंतर पंधरा दिवसांनी गाडीवरून जाताना चक्कर येवून पडल्याने तिचा अपघात झाला आणि ती जागेवरच गेली. लोकं बरंच काही बोलत होते. विनिता वर ताण आल्याने ही घटना घडली. जर तिच्या घरच्यांनी वेळीच योग्य निर्णय घेतला असता तर कदाचित ती आज आपल्या सर्वांबरोबर असली असती. महत्व पैशाला नाही तर माणसाला द्यायला हवे हेच खरं.