वारी पंढरीची

                        महाराष्ट्रातील पंढरपूर हे पुरातन क्षेत्र भारतात सुप्रसिद्ध आहे. दरवर्षी चैत्र, आषाढ, कार्तिक, माघ या महिन्यात मोठ्या यात्रा भरतात. त्यापैकी आषाढ महिन्यातील यात्रा ही सर्वात मोठी असते. 

पंढरीसी जावे ऐसे माझे मनी
विठाई जननी भेट केंव्हा


विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी आसुसलेली वारकरी मंडळी वारीमध्ये पंढरीची वाट धरतात. एखाद्या स्त्रीला माहेरी जाण्यासाठी जशी आतुरता असते तशी आतुरता या भाविकांमध्ये दिसून येते. आपण माणुसकीची नुसती चर्चा करतो. पण माणुसकी शिकायला आणि अनुभवायला मिळते ती वारीत. वारी म्हणजे जीवन या वारीसाठी येणारे श्रद्धावान. या श्रद्धाशील लोकांची सोय व्हावी म्हणून पंढरपुरात अनेक व्यवसाय चालविले जातात. या वारीसाठी शेतकरी राजा आपली पेरणी उरकली की पंढरीची वाट धरतो. या शेतकरी राजाला आपल्या विठूरायाला जणू काही सांगायचे असते. मी माझे काम केले तू मला आता फक्त साथ दे. मला पाठिंबा दे, श्रम करण्याची शक्ती दे. शेतकरीच काय पण अनेक प्रकारचे व्यावसायिक आणि आता तर मोठ मोठ्या क्षेत्रातल्या स्त्री-पुरुष यामध्ये सहभागी होतात.

वारी मध्ये कोणी मोठा नसतो. कोणी लहान नसतो. श्रीमंत, गरीब, परका, आपला असा कोणताच भेदभाव आढळत नाही. या वारीचे वर्णन करणे शब्दांपलीकडचे आहे. वारीमुळे आचारात आणि विचारात बदल होतो. सामाजिक बांधिलकीची जाणीव होते. शिक्षण आणि राजकारण यापेक्षाही वारीमुळे जीवनात सार्थकता येते. मोह, द्वेष, मत्सर हे सारे लोप पावतात ती म्हणजे वारी होय.


हृदय बंदीखाना केला। आत विठ्ठल कोंडीला।
विठ्ठलाच्या पायात भक्तांची तर संत जनाबाईंच्या पायात विठ्ठल भक्तीची बेडी होती. वारीमध्ये सहभागी होणाऱ्या बहुसंख्य महिलांच्या पायात संसाराची बेडी असते. या संसाराच्या बेडीला सोबत घेऊन प्रसंगी बाजूला ठेवून पुरुषांच्या बरोबरीने हजारो महिला लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी पालखी सोहळ्यामध्ये पायी चालत असतात.


वारीमध्ये चालत येऊन तीर्थयात्रा करणे हे महिलांच्या दृष्टीने सुरक्षित होते, आजही आहे. त्यामुळे वर्षांगणिक वारीमध्ये महिलांचा सहभाग वाढत आहे. वारी हा केवळ अध्यात्मिक सोहळा नसून त्यातून मिळणारे आत्मिक सुख विलक्षण असते. वारीत सहभागी झाल्यावर अध्यात्मिक ज्ञान आनंद मिळतो. यासाठी या वारीत युवती, तरुण, वृद्ध, परदेशी नागरिक, लावणी कलावंत वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती सहभागी होतात. भक्ती प्रेमाचा कळस भक्ताने जीवनात गाठला की त्याच्या मनात अद्वैत वाद आपोआप निर्माण होतो. ती एक अवस्था आहे. भक्तांच्या भक्ती प्रवासातली ही थोर अवस्था आहे.

ती पंढरपूरच्या दिशेने दिंडी पालखी सोहळ्यासह टाळमृदुंगाच्या गजरात लाखो भाविक वाटचाल करीत असतात. वारकऱ्यांत जो खरा सच्चा भक्त वारकरी असतो. त्याला अद्वैताच अनुभूती येते. हे विठ्ठल भक्तीचा प्रेमाचे मधुर फलित मानावं लागेल. अद्वैताची अनुभूती येणे म्हणजे भक्ती पुष्पाचे पूर्णपणे विकसन होणे
पंढरपूरच्या माय बापाला भेटण्यासाठी निघालेल्या लाखो वारकऱ्यांसह एक अख्खा गाव पुढे सरकत असतो. वर्षानुवर्ष चालत असलेल्या पालखीला एक अनामिक शिस्त असते कुठलेही निमंत्रण नसते कोणाचाही फोन नसतो. तरीही वारकरी न चुकता वारीला येतो.

लाखोंच्या संख्येने एकाच दिशेने व एकाच ध्येयासाठी निघालेले एक अख्खे गावच जणू. यांच्याबरोबर सोयी पुरवणाऱ्या वारकऱ्यांची एक फळी असते. वारी ज्या गावातून जाते त्या गावातील लोकांमध्ये मोठा उत्साह जाणवतो. त्या गावात जत्रा असल्यासारखी गर्दी असते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वारी ज्या मार्गाने जाते, त्या मार्गाचा विकास होतो. वारी मधली म्हणजेच पालखी घेऊन किंवा वारीसाठी समूहाने पायी चालत जाणाऱ्यांची संख्या असंख्य आहे. या लोकांना सोयी सुविधा पुरविल्या जातात. अनेक गावांमधून या लोकांची सोय व्हावी. म्हणून वारीकरिता दुकानं थाटली जातात. पंढरपुरातील व्यावसायिक मग ते फूल, फळ, हार, तुळशी माळा, बत्तासे, चिरमुरे, पेढे किंवा काही अनेक गरजेच्या वस्तू असतील. अशा प्रकारच्या वस्तूंवर किती तरी हजारांची उलाढाल होते. वारीसाठी आणि वारीवर जगणारे उदरनिर्वाह करणारे खूपजण आहेत.


वारी ही एक शाळा आहे. येथे किती तरी गोष्टी शिकायला मिळतात. मानवी सहवास सहजीवनाचे कंगोरे येथे पाहायला मिळतात. रुसव्या फुगव्यापासून, मीपणाला सुखावणाऱ्या अनेक मानसन्मानाच्या गोष्टी यात आहेत. रंगाचा बेरंग झाला तरी त्या बेरंगाचा उपयुक्त रंग कसा करायचा, ही कलादेखील वारीतच शिकायला मिळते.


एकमेका साहाय्य करू। अवघे सुपंथ।
याचे धडे मिळण्याचे वारीसारखे दुसरे कुठलेच ठिकाण नाही. जाती धर्म पंथ अशा भेदभावाच्या गोष्टी येथे लिलया गळून पडतात. आपण सर्वजन माणूस आहोत आणि माणसासारखे प्रेमाने जगले पाहिजे. याची जाणीव प्रकर्षांने होते. कुठून कुठून लोक येतात. येथे भक्तिभावाची कमी नाही. पांडुरंगाच्या भेटीला प्रबळ आस घेऊन वारकरी येतो. या एका भांडवलावर हा सारा प्रवास पार पडतो. मानवता धर्माची शिकवण आणि आत्मिक समाधान हा वारीचा प्रसाद त्रिखंडात दुसरीकडे मिळणार नाही.


आषाढी एकादशीला पंढरपूरला जावे आणि सगळ्या सांसारिक चिंता विसरून सावळ्या विठुरायाच्या चरणी लीन व्हावे. यासाठी एक अगतिक ओढ अवघ्या वैष्णवांना लागलेली असते. ऊन, वारा पाऊस यांची तमा न बाळगता वैष्णवांची पावले पंढरपूरच्या दिशेने चालत राहतात. या वारीमध्ये पालख्यांचे आगमन होते. तेव्हा हा दुग्धशर्करा योग असतो. थोर संतांच्या नावाने या पालख्या आहेत. या संतांनी समाजाला चांगली शिकवण दिली. त्यांचाच वारसा या पालख्या चालवतात. पालख्यांसोबत पाच वैद्यकीय पथके असतात. पालखी मार्गावर दोन हजार दोनशे आठ पाण्याचे स्रोत असून ते निर्जंतुकीकरण करण्याचे काम सुरू असते. आषाढी वारीसाठी पंढरपुरात आरोग्य यंत्रणा सज्ज असते. पंढरपुरात ज्यावेळेस वारी असते तेव्हा पंधरा दिवस वैद्यकीय सेवा चोवीस तास उपलब्ध असते. पंढरपूर आणि माळशिरस येथे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्यसेवक प्रतिनियुक्तीवर वर्ग करण्यात येतात. ही संख्या कधी कमी होते, तर कधी वाढतेही.


उंच पताका झळकती। टाळ मृदुंग वाजती।
प्रेमे आनंदे पाहती। रिंगण सोहळा।
रिंगण पाहणे, अनुभवणे हा एक स्वर्गीय अनुभव असतो. या सोहळ्यांमध्ये एक चैतन्याचा झरा खळखळत असतो. या चैतन्याच्या झऱ्यात अवघे जग नाहून निघते. अश्व धावले वायू वेगाने रिंगण सोहळ्यात चैतन्य सळसळले. या रिंगण सोहळ्यात परंपरेने चालत आलेल्या महत्त्वपूर्ण प्रथांचे पालन केले जाते. या सोहळ्यात वय, लहानथोर सारे विसरून प्रत्येक जण आनंदी आनंद रंगुनी जातो. रिंगण होण्यासाठी काही गाव खास मानकरी आहेत. तिथेच ही रिंगणे होतात. या रिंगणासाठी खास तयारी केली जाते. बंदोबस्ताची आवश्यकता असतेच पण त्याबरोबरच इतर आवश्यक गोष्टींची जमवाजमव करतात.


विठ्ठल भेटीच्या प्रवासात रोज सकाळी देवाची काकड आरती, पूजा, अभिषेक, मंगल आरती होत असते. सकाळच्या मुक्कामात पूजा, अर्चा, महानैवेद्य, भोजन घेऊन थोडी विश्रांती. दुपारी प्रवचन, सायंकाळी हरिपाठ, रात्री मुक्कामाच्या ठिकाणी महानैवेद्य आरती होते व सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम होतो. विठ्ठलाच्या नामात मृदुंगाच्या नादात वारकरी पंढरीची वाट चालत असतात. पालखीच्या आगमनासाठी सडासंमार्जन करून रांगोळ्यांनी रस्ते सजवतात. रस्त्यावर केळीचे खांब, कागदी पताका, भगवे झेंडे लावतात. वारी जेव्हा पंढरपुरी पोहोचते. तेव्हा भाविक चंद्रभागेमध्ये स्नान करतात, श्री भक्तराज पुंडलिकाचे दर्शन, श्री संत नामदेव पायरी समाधीचे दर्शन घेऊन मग तहान भूक विसरून, उभे राहून श्री पांडुरंगाचे दर्शन घेतात. या दर्शनासाठी तीन तीन दिवसही लागतात. हे दर्शन झाल्यावर त्यांची पायी यात्रा पावन झाल्याची इच्छा पूर्ण होते. त्यांना आत्मिक आनंद वाटतो मिळतो .


वारीमुळे एकविसाव्या शतकात आधुनिकीकरणाच्या नावाखाली विघटीत विखुरलेला समाज एकत्र येतो. यामधून प्रबोधन, जनजागरण, नवीन गोष्टींचे ज्ञान होते. वारीमुळे सहजीवनाचा आनंद, परंपरांचे ज्ञान, अनेक जाती धर्म पंथ एकत्र येतात. त्यांच्यात विचारांची देवघेव होते. संसारापासून एक अध्यात्मिक आनंद, आत्मिक समाधान लाभते. म्हणून तर राजकारणात मोठमोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्ती देखील या वारीत सहभागी होऊन समाधान मिळवतात. आर्थिक, शारीरिक, मानसिक समाधाना बरोबरच आत्मिक समाधानही महत्त्वाचे असते.
सौ आशा पाटील.

(फोटो सौजन्य- नेहा डोंबे)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

WhatsApp
error: Content is protected !!