‘विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहान भूक हरली.’
या मंजूळ रिंगटोनने नताशाची नजर फाईलवरून मोबाइलकडे गेली. नताशाच्या मोबाइलवर सारिकाचा फोन आला होता. सारिका म्हणजे नताशाची शेजारीण. नेहमी फुरसतीच्या वेळी दोघी एकमेकींशी बाल्कनीत उभारून गप्पा मारत. सारिका गृहिणी होती; पण नताशा मात्र ऑफिसमध्ये नोकरीला असल्यामुळे दोघींनाही एकमेकींशी बोलायला वेळ मिळत नसे; पण तरीही कधी का होईना दोघी एकमेकींशी सुसंवाद साधतच. नताशाने फोन उचलून सारिकाचे म्हणणे ऐकले आणि जवळजवळ ती घामाने ओली चिंब झाली. नताशाच्या ऑफिसमधील सहकारी नयनाने तिला हलवतच,
‘काय झाले?’
असे विचारल्यावर तिने सांगितले, गॅसवर दीड लिटर दूध ठेवले होते. गॅस बारीक होता परंतु दूध उकळल्यावर गॅस बंद करायचा बहुतेक विसरला आणि किचनच्या खिडकीतून धूर बाहेर पडत आहे असे सा कारण सकाळी नऊ वाजता घर सोडताना ठेवलेले दूध आता दुपारचे साडेबारा वाजले म्हणजे पुढचे काही न सांगण्यासारखे होते. नताशाने सूरजला फोन करून घरी पाठवून गॅस बंद करण्यास सांगितले आणि पंधरा ते वीस मिनिट घराची दारं खिडक्या उघड्या ठेवण्यास सांगितली. सूरजचे ऑफिस घरापासून जास्त लांब नव्हते. सुरजने घरी जाऊन सर्व केल्यावर, नताशाला सर्व ठीक असल्याचा फोन केला. तेव्हा कुठे नताशाचा जीव भांड्यात पडला. तिच्या डोळ्यासमोरून सकाळचा प्रसंग सहज सरकून गेला. . ‘विठ्ठलनामाची शाळा भरली’ सकाळी कामाच्या गडबडीत फोनची रिंग वाजू लागल्यावर नताशा वैतागली. अजून सूरजचा डबा द्यायचा, तिची दोन बछडी पूनम आणि राजू यांच्या शाळेची व्हॅन थोड्या वेळाने येणारच होती. नताशाला फोन उचलूच नये असे वाटत होते; पण जर एखादा महत्त्वाचा निरोप असेल तर म्हणून तिने फोन उचलला. पलीकडून तिच्या ऑफिसमधल्या क्लार्कचा आवाज ऐकू आला. आज एक महत्त्वाची मीटिंग होती. तशी सूचना चार दिवसांपूर्वीच मिळाली होती, परंतु पुन्हा मिटींग दिवशी आठवण करून द्यायची ऑफिसची पद्धत. निरोप ऐकून नताशाला जवळजवळ गरगरायलाच लागले. एक तर घरात सध्या मदतीला कोणी नाही. पुनम आणि राजू या दोघांना सकाळी आठ वाजताच शाळेत जावे लागते. पुनम अवघी सात वर्षांची तर राजू दहा वर्षांचा. तिला आता प्रथम दोघांना शाळेसाठी पाठविणे महत्त्वाचे होते. सकाळपासून तिची तारेवरची कसरत झाली होती. त्यातून कालच कामवाली मावशी आठ दिवस लग्नकार्याला जाणार आहे असं सांगून गेली होती. राजू व पूनमचा डबा तयार होताच. फक्त ड्रेस, बूट, सॉक्स, वॉटरबॅग एवढेच राहिले होते. इतक्यात नताशाच्या कानावर व्हॅनचा हॉर्न ऐकू आला. आता मात्र नताशा सूरजवर व दोन्ही मुलांवर चिडली. तिला काही कळेना, तरी एवढ्या घाईत सूरजने मुलांना वॉटरबॅग भरून दिल्या. दोन मिनिटे घरामध्ये एक मोठं वादळ आल्या सारख वाटलं आणि थोड्या वेळात शांतही झालं. आठ वाजून गेले होते. सूरज ऑफिससाठी नऊला जात असे. आज मीही तुमच्याबरोबर ऑफिसला येते असे नताशाने सूरजला सांगितल्याने, राहिलेल्या कामात सुरजने थोडी फार मदत केली. सूरजने कामात मदत केल्यास कामाचा ताण जाणवत नसे; पण घरात सासूबाई असल्या अन् जर सूरजने काम केले, तर ते त्यांना पटत नसे. त्याही तशा जास्त काही मदत करत नसत. वयोमानाने हळू काम करावयाच्या सवयीमुळे नताशा स्वतःच कामे पटपट करीत असे; पण त्या घरात असल्या म्हणजे घराला कुलूप लावणे, गॅस बंद केला का? पाहाणे, कामवालीच्या नखरेल वेळा, अचानक येणारे पाहुणे लाईटची बटन बंद करणे आणि मुलांच्या शाळांना ऐनवेळी काही कारणाने मिळणाऱ्या सुट्ट्यांमुळे मुलांची होणारी तारांबळ.हे सर्व जरा सोपे वाटत असे. आज सकाळीही तिनं घरातून बाहेर पडताना सर्व स्वतः पाहिले होते; पण नताशा व सुरज दोघांच्या नादात दुधाचा गॅस मात्र सुरू राहिल्याने, नाही तो प्रसंग ओढवला होता. तरी नताशाने नशिबाचे आभार मानले. दूध उतू जाऊन गॅसच्या ज्वाला विझून नुसता गॅस बाहेर पडून एखादी भयंकर घटना घडली असती म्हणजे नताशाने डोक्यातील सर्व विचार झटकला आणि जवळच्या खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. खिडकीतील हवा व रस्त्यावरची वेगळी दृश्य पाहून मन जरा स्थिर झाल्यावर, मग ती पुन्हा तिच्या सहकाऱ्यांबरोबर टिफिन खाण्यास निघून गेली. ती जेवत असतानाही तिच्या मनात पुन्हा पुन्हा सकाळचा प्रसंग रेंगाळत होता. खरं तर आजकाल होणाऱ्या वाढत्या चोऱ्या व अविश्वासू वातावरण, यामुळे काम वाल्यांकडे चावी द्यावी असा विचारही मनात डोकावत नाही. आज सकाळीही तिने किती तरी घाईघाईतच सारे काम आवरले. स्टाफ मीटिंग सुरू होऊन दहा मिनिट झाल्याचे बाहेरच शिपाई काकांनी सांगितलं. मिटिंगचा विषय खूप महत्त्वाचा व गंभीर असावा, कारण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असे भाव होते, जसे काही सगळ्या जगाचं टेन्शन यांनाच पेलवायचं आहे. त्यातल्या त्यात गंमत म्हणजे नताशा उशिरा आलेली पाहून स्टाफमधील स्त्री सहकाऱ्यांचे चेहरे खूपच गंभीर आणि त्रासिक झाले. बऱ्याच जणींनी तर हातातल्या घडय़ाळावरून नजर फिरवली. नताशा परवानगी घेऊन आत जाऊन बसली. फडके साहेबांनी मीटिंग बोलावली होती. फडके साहेबांचे सीनिअर पठाण साहेब यांनी त्यांना काही कडक सूचना दिल्यामुळे, फडके साहेबांनी आपल्या ज्युनिअर लोकांसाठी ही मीटिंग बोलावली होती. ऑफिसमधल्या कोणा एका व्यक्तीकडून काम करताना मोठी चूक झाली असल्याचे, फडके साहेबांनी सांगितले आणि त्यांनी सर्वांचीच खरडपट्टी काढली होती. त्या व्यक्तीचे नाव न घेता सर्वांनाच व्यवस्थित काम करण्याचा सल्ला दिला. फडके साहेब नेहमी स्वतःच्या स्टाफचे कौतुक करत; पण जर काही चुकले तर मात्र कधी हयगय होत नसे, डायरेक्ट अॅक्शन. मीटिंग संपली तरी मीटिंग विषयी उलट सुलट चर्चा चालूच होती. जेवणाच्या सुटीनंतर पुन्हा सर्वांची कामे जोरदार सुरू झाली. नताशाच्या टेबलावर बऱ्याच फाइल्स होत्या; पण त्यातील आज किती पूर्ण होऊ शकतील, याचा अंदाज घेत तेवढ्यात फाइल्स बाजूला काढून तिने कामाला जोमाने सुरुवात केली. दिवस कसा गेला हे तिलाही कळले नाही. सायंकाळी पाच वाजले आणि ऑफिस सुटण्याची वेळ झाली. सर्वांच्याच चेहऱ्यावर आज ताण जाणवत होता. सर्वजण आपापल्या घराच्या दिशेने पांगले. नताशालाही सूरज नेण्यासाठी आला. नेहमी नताशा बसनेच जाई. सूरजच्या ऑफिसच्या आणखी दोन तीन किलोमीटर पुढे तिचे ऑफिस होते; परंतु आज घरी जातानाच तिला पूनमसाठी शैक्षणिक साहित्य तर राजू साठी बर्थडे गिफ्ट घ्यायचे होते. दुसऱ्याच दिवशी राजूचा वाढदिवस होता. आता जाता-जाता केकची ऑर्डर, राजूच्या मित्रांना बर्थडे कॅप, घर सजविण्यासाठी साहित्य, पार्टीसाठी काही गोड न्यायचं होतं. नताशाची आजकाल तारेवरची कसरत चाले. नताशा ऑफिसमध्ये असली की घरचं सारं काही विसरून जाई आणि घरी गेली की ऑफिसचं सारं विसरून जाई. सर्व खरेदी करून साडेसातला ती दोघं घरी पोहोचली. मुलांनी शाळेतून आल्या आल्याच हात पाय धुवून दिवा लावला होता आणि आता ती अभ्यास करत बसली होती. नताशा व सूरजला पाहताच, राजूने आनंदाने उड्या मारल्या. त्याच्या वाढदिवसाची तयारी पाहून त्याचा आनंद गगनात मावेना पूनमही तिला जे साहित्य हवे होते ते पाहून खूश झाली. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून नताशा सकाळपासूनचा ताण क्षणार्धात विसरून गेली. त्यातच पूनमने राजूच्या वाढदिवसासाठी, आजी काकांकडून आल्याचे सांगितले; परंतु सध्या त्या बाहेर सोसायटीतल्या मैत्रिणींना भेटायला गेल्या होत्या. नताशाने आणलेले सर्व सामान व्यवस्थित ठेवल्यावर ती फ्रेश झाली. दिवसभराच्या दगदगीनंतर तिला कुणी तरी आता चहा करून द्यावा असं वाटत होतं. कुठलं काय नि कसलं काय, कितीही ताण पडला दगदग झाली तरी घरातली कामं तिलाच करावी लागणार होती. नताशाने पूनम व राजूला दूध प्यायला का? विचारल्यावर त्यांनी नकारार्थी मान हलवली. ते पाहून तिला मनातल्या मनात सासूबाईंचा खूप राग आला. तसं तर ती त्यांच्यावर जास्त काम टाकत नसे; पण थोडं फार ही काम मनाने करावे असे त्यांना वाटत नसे. नताशाने कधी रागाने त्रागा केला तर मग त्या उलट नताशालाच म्हणत,
‘ प्रत्येकाला काही ना काही काम असतंच, उगीच कुणी बसून नाही राहत. नताशाला मात्र या वाक्यावर खूप बोलावे वाटले; पण बोलूनही तसा जास्त उपयोग नसे. कारण सासूबाई त्यांच्यासाठी महत्त्वाचं तेवढंच ऐकत. बाकी सगळं सोडून देत, ऐकू न आल्यासारखे करत. नताशाची एकुलती एक नणंद सीमा. सीमाने मात्र नुसता सुस्कारा सोडला तरी तो आईच्या जीवाला जाणवे. सीमा अधूनमधून सणासुदीला माहेरी चक्कर मारत असे. नताशा बरोबर तिचे छान पटत असे. तिच्या आईचे काही चुकतंय, हे ती त्यांना कधी सांगत नसे. ती सरळ म्हणे,
‘तुम्ही सासू सुना आज भांडता अन् उद्या पुन्हा एकत्र. मी पाहुणी तुमच्या मध्ये भाग न घेतलेलाच बरा.’
सीमाही राजूच्या वाढदिवसा दिवशी खास येणार होती. राजूचे काका, काकू, चुलत भाऊ, बहीण, आतेभाऊ. या सर्वांचाचं आगमन वाढदिवसादिवशी होणार होतं. हा दहावा वाढदिवस मोठा करायचा असं सुरजचे म्हणने होते. वाढदिवसादिवशी नताशा व सूरजने रजा घेतली होतीच. घरातीलच नाही म्हटलं तरी चौदा माणसे होती. त्या निमित्ताने सर्व एकत्र येतील हाच उद्देश वाढदिवस साजरा करण्यामागे होता. नताशाचे दिरही इंजिनिअर होते. जाऊबाई घरीच असत. एक मुलगी दोन मुलं, असं छान कुटुंब होतं. नणंदेला दोन मुली, ती गृहिणी. तिचे मिस्टर एसटी खात्यात. एकूणच प्रत्येकाचे व्यवस्थित चाललं होतं. ‘वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच या.’ म्हणून नताशाने जावेला, नणंदेला आग्रह केला होता; परंतु दोघींनीही वाढदिवसाच्या दिवशीच येऊ म्हणून निरोप दिला होता. नताशाला वाढदिवसाचे नियोजन करायचे होते. सकाळपासूनच तारांबळ यामुळे तिची चिडचिड होणे साहजिकच होते. जे काही करायचं ते आपणच हे तिला जरी माहीत होतं, तरीही सासूबाई आल्यात म्हणजे थोडी मदत होईल, ही अपेक्षा. कमीत कमी मुलांना जेवायला वाढून त्यांना अभ्यासाला बसवणे, झोपताना सोबत थांबणे, वाढदिवसाच्या तयारीविषयी सगळ्यांशी चर्चा करणे. एवढे केले तरी खूप होईल; पण हे असे होईल की नाही याबाबत शंका होती. तिने पदर खोचून कामाला सुरूवात केली. एकीकडे चहा ठेवला, एकीकडे दूध गरम करून सर्वांना चचहा दिला. सर्व झाल्यावर, एकीकडे भाजी फोडणीस टाकली. दुसरीकडे कुकर लावला. कणिक भिजवून लगेच भाजी उतरल्यावर चपात्या लाटल्या. वरणाला फोडणी दिली. तेवढ्यात सासूबाई फिरून आल्याच. त्या आल्या तेव्हा सव्वा आठ वाजले होते. कट्ट्यावर पातेल्यात डोकावत त्यांनी
‘मला चहा ठेव.’
अशी ऑर्डर दिली. ऑर्डरच होती ती कारण त्या स्वत: ही वरणाचं पातेलं बाजूला ठेवून चहा करू शकत होत्या; पण नाही. तरी तेवढ्यात नताशा म्हणाली जेवण तयार आहे. तशा सासूबाई शांतपणे म्हणाल्या,
‘ तुमच्या वेळेप्रमाणे तुमचे चालू दे, मी इतक्या लवकर जेवण करत नाही. रात्री मला पुन्हा भूक लागते आणि झोपही येत नाही.’
नताशाने चहा करून दिला, तेवढ्यात पूनम पळतच आली.
‘आई मला भूक लागली’
नताशाने सर्वांना जेवण वाढून आवरून ठेवले. घरामध्ये पुन्हा भांडी, फरशी, दळण या सर्वांसाठी बाई लावली होती. तसं तर घरात जास्त काही काम नसे. सासूबाई मात्र बघेल तेव्हा आवडीच्या मालिका पाहणे, पुस्तक वाचणे, नाही तर रात्री सात वाजले की पाठ दुखते, या बहाण्याखाली अंथरूण टाकून पडायची त्यांना सवय होती. या गोष्टीचा तिला खूप राग येत असे. सूरज हा भावा बहिणीत लहान शेंडेफळ, लाडका. त्यामुळे सासूबाई त्यांच्याकडेच राहणे पसंत करीत. त्यातून त्या सर्वांना सांगतही,
‘मी असल्यामुळे नताशाला बरीच मदत होते.’
तसं तर सासूबाई असल्या म्हणजे सूरजचा ही मूड चांगला असे. नताशाला त्या मूडमध्ये आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी हो म्हणून घेणे सोपे जात होते. आई विषयी कधी काही बोलले तर मग मात्र घरात आई नाहीच असं समजत जा असा सल्ला तो देत असे. राजूच्या वाढदिवसामुळे दिवसभरात माणसांची ये जा सुरू होती. सायंकाळी सहा वाजता सेलिब्रेशन सुरू केलं होतं; कारण नंतर सर्वांना आपापल्या घरी परतायची होती. वाढदिवस खूप छान साजरा झाला. आवडीच्या पदार्थांवर सगळ्यांनी ताव मारला. मुलांनाही खूप आनंद झाला. वाढदिवसाच्या टोप्या घालून, फुगे फोडत, आवडत्या गाण्यांवर ती नाचली. सर्वांची जेवणं हसतखेळत पार पडली. रात्री आठ वाजता जाऊबाई निघाल्या. त्यांच्या बरोबरच घाईघाईने सीमाही निघाली. त्यावेळेस नताशाने दोघींनाही राहण्याविषयी आग्रह केला; परंतु मुलांची शाळा इतर काम या सर्वांमुळे दोघीही राहण्यास तयार नव्हत्या. शेवटी नताशाने दोघींनाही थोडाफार फराळाचं बांधून दिलं. तिने दोघींची ओटी भरली. बाहेर सोडायला निघणार तेवढ्यात सासूबाईंच्या हातात बॅग दिसली. सीमा म्हणाली चार दिवस आईला घेऊन जाते. नताशा काही म्हणणार एवढ्यात सूरजने डोळे मोठे करून तिला गप्प केले. नऊ वाजेपर्यंत सर्व घर रिकामे झाले. दिवसभराचा राडा आवरायचं, भांडी घासायची. गिफ्ट या सर्वांची आवराआवर करून झोपायला, रात्रीचे साडे अकरा वाजले. दुसऱ्या दिवशी मुलांची शाळा, ऑफिस होतेच. नताशाने सहाचा गजर लावला. दिवसभराचा ताण, दगदग यामुळे नताशाला सकाळी काही केल्या जाग आलीच नाही. सहा वाजता मात्र जेव्हा जाग आली, तेव्हा कोणत्या दिशेला पळावे ते कळेना झाले. आज तिने फक्त पोळ्या आणि भाजीच डब्यात दिली. नाश्त्याला वेगळं असं काही केलं नाही. तेवढंच करताना तिला उशीर झाला. आजही तिला सूरजने ऑफिसला सोडले. बघता बघता दोन महिने गेले. मुलांच्या शाळेत क्रीडा सप्ताह असल्यामुळे मध्येच शाळा सुटे, त्यामुळे मुलांना घरात एकट्याला सोडून जायची तिला भीती वाटे असे. तिची अन् कामवालीची वेळ जमेना. शेवटी कामवालीला गोड बोलून थोडी अडचण सांगून वेळ जमून घेतली. अचानक एक प्रश्न निर्माण झाला. सूरजचा आते भाऊ काही कामानिमित्त गावाकडून सूरजकडे येणार होता. बाईमाणूस आला तर कामात मदत होते; पण पुरुष म्हटलं की सगळं हातात द्यावं लागे. कोणीतरी आलं की सूरज तेवढीही मदत बंद होत असे. आतेभाऊ चार दिवस घरात थांबणार मग मुलांची सोय होईल, म्हटलं तर ते दिवसभर बाहेर फिरत आणि रात्री टीव्हीसमोरून हलत नसत. शेवटी ते त्यांच्या कामाला आले होते. सुटीच्या दिवशी गोडधोड स्वयंपाक करून त्यांची चांगली बडदास्त ठेवली. ते आता एक दोन दिवसानी जातील तेव्हा मग आपण घरी नसणार म्हणून तिने यथासांग स्वयंपाक केला. पाहुणचार करूनही चार दिवस झाले; परंतु त्यांची हालचाल दिसेना. म्हणून तुमचे काम झाले नाही का? अशी विचारणा नताशाने केल्यावर, नाही कामासाठी म्हणून घरच्यांना बोलावून घेतलं. असा निरोप ऐकताच नताशाला मात्र चक्कर आली. नोकरी करत हे सर्व सांभाळायचे म्हणजे काही खरं नव्हते आणि त्यांची मुलं म्हणजे कहरचं. सूरजच्या भावाची बायको सातवी शिकली होती. लिफ्ट ने वर खाली करायला घाबरायची. गॅस पेटवायला यायचा नाही. गॅस गिझर सुरू करायला यायचा नाही. हा सर्व अनुभव गेल्या खेपेस आला होता आणि त्यांची पोर तर खूप आवली. घरातील एक वस्तू जागेवर ठेवतील तर शपथ.
सासूबाई जाऊन तीन महिने उलटून गेले होते. त्यातून पाहुण्यांची वर्दळ. नाही म्हटलं तरी आतेभाऊ येऊन आठ दिवस राहून गेला. त्यांचं आणि काम वालीचा पटायचं नाही. ती काम करताना मध्येच लुडबुड करे, तिला सूचना सांगत. त्यामुळे कामवाली वैतागू लागली. नताशाला तर काही कळत नव्हते. तिने रजा काढली या सर्व दगदगीत नताशा चांगलीच आजारी पडली. रजा शिल्लक नसल्यामुळे ती तशीच ऑफिसला जात होती. अचानक दुपारी फोन खणखणला. सूरजचा फोन आलेला पाहून तिला आश्चर्य वाटले कारण प्रकृतीची चौकशी घरात असतानाही कधी करायची त्याच्या लक्षात येत नसे आणि फोन करून करावी, विशेषच. तरीही बघू काय म्हणतो ते म्हणून तिने फोन उचलला.
‘आई चार वाजता येणार आहे. जाताना तिच्या आवडीची भाजी घेऊन घरी जा.’
एवढं सांगून त्याने फोन बंद केला. नताशाला मात्र खूप आनंद झाला होता. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघून तिच्या सहकारी मैत्रिणीने काय म्हणून भुवया उंचावून विचारले. नताशाने लगेच तिला क्षणार्धात सांगितले,
‘अगं गुड न्यूज आहे, सासूबाईंचं आगमन होणार आहे.’
या वाक्यावर तीही खूश झाली. ‘कमीत कमी तुला विश्रांती तर मिळेल. जास्त काही नाही; पण, पण खूप काहीसा आधार होईल, होयना.’ असं म्हणून ती हसली नताशा ही हसली कारण गेल्या तीन महिन्यांत बऱ्याच घटना घडल्या नसत्या, ‘जर सासूबाई असत्या तर’ आणि याच खुशीत पाच केव्हा वाजले ते तिला कळलेच नाही. घरी गेल्यावर बरीच कामं तीच करणार होती. तरीही तिला एक वेगळाच मानसिक आधार जाणवत होता.
आशा अरुण पाटील
सोलापूर