हाऊसवाईफ
आयुष्यात असा अनुभव प्रत्येक स्त्रीला येतोच.
खरंतर आज स्वारी सकाळ पासून शांतच होती. तसे त्यांनी घरामध्ये जाहीरही केलं. आज माझे मौन व्रत आहे. हुश्श वाटलं मला. कारण एकतर घरामध्ये कुठल्या गोष्टीची जबाबदारी घ्यायची नाही. आणि जर काही म्हणायला गेलं तर उलट मलाच चार वाक्य सुनावतील. तुला काय कमी काम आहे. तू घरातच असते. मला नोकरीतल्या वाढत्या जबाबदाऱ्या, महिन्याचं बजेट वाढतंच आहे. त्यासाठी आर्थिक चिंता! कंपनीत जबाबदारीचं स्थान त्याच्यामुळे मला कंपनीची प्रगती कशी होईल यासाठी महत्वपूर्ण भूमिका निभवावी लागते. झालं, प्रश्न तर मिटलाच की. काय म्हणायला जायचं तर धाडसच होत नाही. कारण प्रत्येक वेळी नवीन मुद्दा घेवून जीवाला लागेल असं बोलायचं. काही वर्षापूर्वी मी नोकरी सोडली. मला माझ्या नवांकुराची चाहुल झाली. ही चाहुल मला रोमरोमात जाणवत होती. एक नातं तयार झालं या कोवळ्या जीवाशी. तसंतर ती मला जमेल तोपर्यंत म्हणजे नऊ महिन्यापर्यंत नोकरी केली. त्या जीवाने या पृथ्वीतलावर जन्म घेतला. असं वाटत होतं जणू तो माझ्याच जीवाचा तुकडा आहे. तो हसतो, रडतो, जांभई देतो कसा? या सर्वांकडेही मी कौतुकानं पहात होते. त्या इवलुश्या हातांना आश्वासक आधार देतं होते, रडताना मायेने कुशीत घेतले की तो शांत होई. हे सर्व पहात असताना नकळतच मी निर्णय घेतला मी नोकरी करणार नाही. यावर यांनी प्रश्न उपस्थित केला? मला स्त्री स्वातंत्र्याची थोरवी सांगत माझ्या बबडयाला पाळणाघरात ठेवू असे सुचवले. नसेल तर घरीच एखादी बाई ठेवण्याविषयी सुचवले. पण अहो आज काल एवढे अनुभव ऐकतो, बातम्या पाहतो आणि तरीही आपण होवून विषाची परिक्षा घ्यायची का? मनात विचारांचं काहूर माजलं होतं. मी सरळ स्पष्टपणे सांगितलं. मी मुलाचे संगोपन व्यवस्थित करणार आहे. नोकरी करणार नाही. झालं यावर यांचा आकांडतांडव. मी मात्र शांतच. पुढे पुढे काही झालं की ‘हाऊसवाईफ’ हा यांचा शब्द आणि तो उच्चारताना त्यांचे भाव मला माहित होते पण मी कधी लक्षच दिले नाही!
‘मी माझ्या पद्धतीने माझे कर्तव्य करत राहिले. त्यात मात्र कधी कसूर केली नाही. संसार फुलत गेला. गावी गेल्यावर नातवंडांच्या सानिध्यात आजी-आजोबा सुखावून जात. मी केलेल्या पदार्थाचे, कर्तव्य आणि मुलांना दिलेल्या संस्कारगुणांचे भरभरून कौतुक करत. ऐकून कौतुक वाटे. मी मुलांचा अभ्यास घरात घेते याचं कौतुक करत नाहीत. ऑफिसमधल्या साऱ्यांना मी केलेल्या पदार्थांचे कौतुक पण मनात खंत वाटे यांना का नाही कळत माझं कार्यकर्तृत्व. पण एक क्षणच, पुन्हा मी तो विचार झटकून माझं कर्तव्य करत असे. घरामध्ये सर्व काम करणे हे तर माझंच काम, घरातली माझीच कामं पण सोबत लाईटबील भरणे, किराणा, आल्या गेल्यासाठीची कर्तव्य आणि हे सर्व महिन्यासाठी दिलेल्या पैश्यांमधून. मी सर्वांच्या आवडीनिवडी, वाढदिवस लक्षात ठेवून भेटवस्तूसह छोटेखानी कार्यक्रम करते पण माझा वाढदिवस मात्र कोणाच्याच लक्षात रहात नाही. विशेषतः यांच्याही पण असो. तरीही मी नाराज न होता मीच माझ्या आवडीचा पदार्थ संध्याकाळी जेवताना वाढल्यावर यांच्या लक्षात येतं. अरे आज हिचा वाढदिवस होता. मग बहाणे आता रात्री कुठे भेटवस्तू मिळणार आधीच नाही का सांगायचं आणि बरंच काही.
एके दिवशी मात्र आश्चर्यम्. मी उठण्याआधीच स्वारी उठली होती. आणि मी आवरून येईपर्यंत माझ्यासाठी गरम चहाचा कप आणि तोही कौतुकास्पद नजरेत तयार होता. मला तर काय बोलावे कळेना. खरंच कधीतरी माझ्या कामाची जाणीव यांना झाली. मी निशब्द होते. यावेळीच यांनी उच्चारलेला शब्द मला पुरस्कार देणारा वाटला. ‘हाऊसक्वीन’