
महिला दिन
राष्ट्रपती पंतप्रधान पदही तू भूषवले
स्वतःसाठी वेगळे अस्तित्व निर्मिले
आपलेच सर्व हेच तत्व अंगिकारले
स्वतःसह सर्वांचा विकास तुलाच जमले
म्हणूनच तुला निर्मात्यानेही वंदिले
८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. या महिलादिनाची सुरुवात होण्याचं कारण कामगार चळवळ ठरली. १९०८ झाली न्यूयॉर्क शहरात १५,००० महिलांनी मोर्चा काढला होता. त्यांच्या मोर्चाची कारणंही महत्वपूर्ण होती. कामाचे तास मर्यादित असावेत. योग्य वेतन मिळावं आणि मतदानाचा अधिकार असावा. या त्यातील काही प्रमुख मागण्या होत्या. सोशालिस्ट पार्टी ऑफ अमेरिकेनं त्याच्याच पुढच्या वर्षी हा दिवस राष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला.
हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून ओळखला जावा ही कल्पना क्लारा झेटकिन या महिलेनं मांडली. १९१० साली कोपनहेग इथं भरलेल्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ वर्किंग वुमन मध्ये क्लारा झेटकिन यांनी ही कल्पना मांडली. या कॉन्फरन्सला सतरा देशातल्या १०० महिला उपस्थित होत्या. १९११ साली पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. २०११ साली महिलादिनाची शताब्दी साजरी करण्यात आली. खरंतर आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं हे ११० वर्ष आहे.
८ मार्च हीच तारीख निवडल्या जाण्यामागे महिलांनी पुकारलेला संप होता. १९११ साली पहिल्यांदा महायुद्धाच्या दरम्यान रशियन महिलांनी ब्रेड आणि शांतीची मागणी केली होती. महिलांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला होता. याच वेळी झार यांनी पदाचा त्याग केला आणि त्यानंतर सत्तेवर आलेल्या पर्यायी सरकारनं महिलांना मतदानाचा अधिकार दिला. महिलांनी हा संप पुकारला होता. त्याची तारीख रशियात वापरल्या जाणाऱ्या कॅलेंडर नुसार २३ फेब्रुवारी होती. ग्रेगोरियन कॅलेंडर नुसार ही तारीख ८ मार्च होती. म्हणूनच तेव्हापासून महिला दिन ८ मार्चला साजरा केला जातो.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं प्रतीक म्हणून जांभळा हिरवा आणि पांढरा रंग वापरले जातात. जांभळा रंग हा न्याय आणि सन्मानाचा प्रतीक आहे. हिरवा रंग हा आशेचा रंग आहे. पांढरा रंग पावित्र्याचा समजला जातो. या रंगांची संकल्पना १९०८ साली युनायटेड किंग्डम मध्ये भरविण्यात आलेल्या विमेंस सोशल अँड पॉलिटिकल युनियन मध्ये पहिल्यांदा मांडण्यात आली होती.
आंतरराष्ट्रीय महिलादिनाला अनेक राष्ट्रांमध्ये महिलांना सुट्टी दिली जाते. रशियामध्ये ८ मार्चच्या आसपासच्या तीन-चार दिवसांमध्ये फुलांचा खप मोठ्या प्रमाणात होतो. चीनमध्ये आठ मार्चला महिलांना अर्ध्या दिवसाची सुट्टी देण्याची पद्धत आहे. इटलीमध्येही अनोख्या पद्धतीने हा दिवस साजरा केला जातो. तर अमेरिकेत आंतरराष्ट्रीय महिला दिन हा विमेंस हिस्टरी महिना म्हणून साजरा होतो.
यावर्षी युनायटेड नेशन्सच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम ‘डिजिटॉल: लैंगिक समानतेसाठी नवकल्पना आणि तंत्रज्ञान’ ही आहे. लिंग असमानता तसेच भेदभावाविरोधात आवाज उठवू शकतो. आपण सर्वजण महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करू शकतो. आपण सर्वजण एक सर्वसमावेशक समाज घडवू शकतो. विचार केला तर कोरोनाच्या या संकटात अभ्यासपूर्ण विचारांती सर्वांच्या हे लक्षात आलेच आहे की, सध्या वर्क फ्रॉम होम असेल किंवा आठवड्यातून एकदा जाऊन काम दाखवायचे असेल. या काळात घरातूनच काम करणाऱ्यांची संख्या जास्त प्रमाणात आहे. या सर्वांचा विचार करता स्त्रियांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढला आहे. समानतेचा अवलंब हा पाहिजे तितक्या प्रमाणात होत नसल्याने महिलांवर कामाचा बोजा पडतो आहे. महिलादिन फक्त एक दिवस साजरा करून कर्तव्य पूर्ण होत नाही. तर सर्वांनी महिलांना समानता व आदर दिलाच पाहिजे. ८ मार्च हा दिन प्रातिनिधिक स्वरूपात आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा होतो. त्या मागचा हेतू लक्षात घेऊन स्त्रियांना सन्मान देणे महत्त्वाचे. पूर्वीच्या आणि आताच्या काळात पडत गेलेला फरक लक्षात घेऊन कौटुंबिक तसेच सामाजिक वातावरणात स्त्रीला आदर सन्मान समानता आणि प्रमुखता बहाल केली पाहिजे. पुरूषसत्ताक किंवा स्त्रीसत्ताक पद्धत अपेक्षित नसून दोघांनाही समान महत्व मिळालेच पाहिजे. स्त्रीकडून स्त्रीचा सन्मान आदर समानता ठेवली जातच असते. तशीच अपेक्षा पुरूषांकडूनही आहे. स्त्रीला आपण सर्वजण आदरस्थानी ठेवत कोरोनाच्या या काळात सुरक्षित अंतर, मास्क आणि सॅनिटायजरचा वापर करत हा दिन साजरा करू या. महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा.
सौ.आशा अरूण पाटील