एकटी भाग२

केतकीला सोलापूरला येवून एक-दीड महिना झाला होता. सणाला मी माहेरी जावू शकत नाही, म्हणून खास पुण्याहून सोलापूरला सासरी येई.तिचे मन पुण्यात रमत नसे. लग्न झाल्यावर ती बाबांच्या परस्पर जाऊन आईला भेटून आली होती. तिच्या सासरच्या घरी आई, बहिणी येवून जात. एक बाबांच्या मनातील राग सोडला तर बाकी सर्व खूप छान चालंलं होतं. आई, बहिणी, सासू, सासरे, नणंद या सर्वांना रजनीशच्या वाढदिवसाचे आमंत्रण देऊन केतकी पुण्याला परतली. आठ दिवसांनी वाढदिवस होता. लग्नाला अवघे तीनच महिने झाले होते. वाढदिवसाचे कारण ठरवून राहिलेली लग्नाची पार्टी देण्याचा जोरदार बेत त्या दोघांनी आखला. हॉटेल बुक केले. दोघांनी स्वत:बरोबर घरच्या सर्वांना कपडे घेतले. बाकी सर्व तयारी झाली. वाढदिवसाच्या आधी दोन दिवस सर्वजण पोहोचले. सर्वांनी मिळून राहिलेली सर्व तयारी केली. केतकीने बाबांना धाडसाने फोन लावून येण्याविषयी विनंती केली.

              पण बाबा केतकीला एकही शब्द बोलले नाहीत. तरीही केतकीला वाटत होते बाबांनी आता राग सोडून द्यावा. वाढदिवसादिवशी रजनीशच्या आईने त्याला चोळून अंघोळ घातली,औक्षण केले. त्याच्या आवडीचा स्वयंपाक करून सर्वजण देवाला जाऊन आले. जेवण करून दुपारी थोडी विश्रांती घेतली. संध्याकाळी पाच वाजताच्या कार्यक्रमाला सर्वजण आवरून चारलाच निघाले. रजनीशनकडे फोर व्हिलर व टू व्हिलर होती. त्याला आणखी बर्थ डे केक आणायचा होता म्हणून केतकी आणि रजनीश केक घेवून हॉटेलमध्ये पोहोचणार होते. बाकी सर्वांना फोर व्हिलरमध्ये पाठवून ते दोघे केक आणायला गेले. तसा रजनीश केतकीला हॉटेलमध्ये पोहोचायला उशीर झाला होता. तो गाडी वेगाने चालवू लागल्यावर केतकीने आपण अर्धा तास उशिरा पोहोचू पण घाई करू नको, म्हणून त्याला गाडीचा वेग कमी करायला लावला. केक घ्यायला ती दुकानात गेली. तिने सांगितल्याप्रमाणे फुलाच्या आकाराचा सुंदर केक त्यावर बदाम अन् रजनीशचे नाव लिहीले होते. तिला केकवरील डेकोरेशन खूप आवडले. ती केक पहात असतानाच गाडीच्या ब्रेकचा खूप जोरात आवाज आला. ती दुकानदाराला म्हणालीही,

‘ काय गाड्या चालवतात आजकाल?’

तिने मेणबत्ती आणि स्प्रे कसला घ्यायचा म्हणून रजनीशला विचारण्यासाठी त्याच्या दिशेने तोंड केले. रस्त्यावर गर्दी होती.या सर्व गर्दीतून रजनीश दिसणार नाही म्हणून तिनेच कमळाच्या आकाराची मेणबत्ती, वाढदिवसाचा केक, स्प्रे असे सर्व साहित्य घेऊन तिने पैसे दिले व रस्ता ओलांडून ती पुढे येऊ लागली. रजनीश गाडी इथेच लावून बाजूला उभा होता. या गर्दीत काय झाले ते बघायला गेला असला तरी गाडी कुठे ठेवली का तो तिला विसरून एकटाच हॉटेलकडे गेला? रजनीश खरंच नुसता गडबड करतो. असं मनाशीच म्हणून सामान एका हातात सावरत तिने फोन लावला. तिच्या ओळखीची  रिंगटोन जवळच कुठेतरी वाजतेय असं तिला वाटलं. रजनीश फोन उचलत नव्हता. ती धाडसाने गर्दीत शिरली. ती सर्व उभ्या असलेल्या व्यक्तींच्या तोंडाकडे न्याहाळत होती.   ‘ रजनीश, रजनीश’ म्हणून हाका मारत होती. शेवटी तिच्या पायाला बूट लागला म्हणून तिने खाली पाहिले. एक बूट तिच्या पायाजवळ पडला होता आणि दुसरा रजनीशच्या पायातच होता. तिचे लक्ष गाडी आणि गाडीजवळ पडलेल्या तिच्या प्रियाकडे गेले. अन् मग आसमंतात ‘रजनीश….’ असा किंचाळीचा जोरदार आवाज आला. क्षणभर वीज कडाडल्याचा भास झाला. तिचा रजनीश रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता आणि त्याचे डोळे उघडेच होते. हात पसरून जणू तो तिला बोलावत होता. तिच्या हातातून केक, मेणबत्ती, स्प्रे सगळं अस्ताव्यस्तं पडलं होतं. दोन सेकंद काय होतंय हे कळायच्या आत केतकी चक्कर येऊन त्याच्याच शेजारी पडली. गर्दीला सरकवत पोलिस आले,त्यांनी केतकी व रजनीशला दवाखान्यात पोहोचवले. केतकी थोड्यावेळाने शुध्दीवर आली. तोपर्यंत घरच्या लोकांनी या दोघांना हॉटेलकडे यायला उशिर झाला म्हणून त्यांच्या फोनवर फोन केले.पोलिसांनी त्यांच्या मदतीने सर्वांना हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतले. झाला प्रकार सर्वांच्या लक्षात आला. तोपर्यंत रजनीश सर्वांना सोडून दूर निघून गेला होता. हे सर्व केतकीला सांगायचे कसे? असा प्रश्न सर्वांना पडला होता पण तरीही हे सत्य स्विकारावेच लागणार होते.रजनीश जेव्हा केतकीची वाट पहात रस्त्याच्या कडेला गाडीवर बसला होता तेवढ्यात मागून वेगात येणा-या ट्रकने रस्त्यावर आडव्या आलेल्या म्हाता-या माणसाला वाचवण्यासाठी गाडी एका बाजूला वळविली आणि या सर्व गोंधळात रजनीश गाडीसह उंच उडून लांब फेकला गेला. तो पडताना डोक्यावर मागे पडला. त्यामुळे तो वाचू शकला नव्हता. अपघात पहाणारा प्रत्येकजण हळहळत होता. केतकीला तर इतका जबरदस्त धक्का बसला की, आज तिच्या रजनीशचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस. रजनीशशिवाय जीवन जगायचे ही कल्पना पटेनाशी झाली होती. तिला रडून रडून सारखी चक्कर येऊ लागली. उधवस्त जीवन आणि तेही प्रियाशिवाय? तिच्यासाठी कित्येक वर्ष वाट पहाणारा तिचा रजनीश. जोरजबरदस्ती न करता हळुवारपणे प्रेमाचे नातेसंबंध उलघडून दाखविणारा तिचा सखा, तिच्यासाठी धाडसाने सर्व करणारा तिचा पती. रजनीश एवढा एकच शब्द ती तोंडाला फेस येईपर्यंत म्हणत होती. तिला सावरणे सर्वांनाच अवघड होते.

              महिना उलटून गेला होता पण तरीही केतकीच्या मनावरील जखमा नुकत्याच झालेल्या जखमांप्रमाणे ओल्याच होत्या. तिला अपघातानंतर सासु-सास-यांनी सोलापूरला आणले होते. दहा-पंधरा दिवसांनी आई-वडील, बहिणी आल्या. त्यावेळेस केतकीने ठामपणे बाबांना सांगितले,

‘बाबा, आता रजनीशचे घर म्हणजे माझे घर. मी माहेरी चुकूनही रहाण्यासाठी येणार नाही. माझा रजनीश गेल्यावर तुम्ही मला न्यायला आलात? मी माझ्या घराचा उंबरठा ओलांडणार नाही. मी आलेच असते तर रजनीश असताना जोडीने माहेरी काही वेळासाठी पाहुणचार घेण्यासाठी आले असते.’

ती माहेरी गेलीच नाही. दोन-तीन महिन्यानंतर ती पुण्याला तिच्या घरी परतली. रिनाच्या शिक्षणामुळे तिचे सासू-सासरे पुण्यात राहू शकत नव्हते. तिने या सर्व संकटावर मात करून जीवन जगायचे ठरवले होते. पुण्यामध्ये राहून जॉब करत करत ती शिक्षण घेत होती. तिच्या हुशारीमुळे तिला स्कॉलरशिपही मिळाली. तिचे आता ब-यापैकी चालले होते पण तरीही रजनीशची आठवण आली नाही असा एकही क्षण नव्हता. तिला रजनीशचा वाढदिवस प्रत्येक वर्षी आठवत रहाणार होता. तीन महिन्यातील सहवास तिने अत्तरासारखा मनाच्या कुपीत भरून ठेवला. त्या आठवणींच्या सुगंधावरच जीवन जगायचे तिने ठरवले होते. कोणाचाही आधार न घेता, दुबळे न होता. आज तिला अथक परिश्रमानंतर परदेशी जायची संधी मिळाली होती. पण ती एकटीच जाणार होती. आज रजनीश असता तर…. या आठवणींसरशी तिच्या गालांवरून अश्रू ओघळू लागले.

                  सौ. आशा अरूण पाटील सोलापूर

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

WhatsApp
error: Content is protected !!