हे ही क्षण जातील

              शार्दूल आज खूप निवांत बसला होता. ना कोणत्या प्रकारचे लेखन, ना कोणत्या प्रकारचे वाचन. टीव्हीसुद्धा पाहावा असे त्याला वाटत नव्हते. आईला थोडे नवलच वाटले. ती बऱ्याच वेळापासून त्याचे निरीक्षण करत होती. इतर वेळेस तो काही ना काही उद्योग करत असे. तो अभ्यासात हुशार होता. त्याची मोठी बहीण सध्या महाविद्यालयात शिकत होती. आई शिवणकाम करत असे. बाबा एका खासगी कंपनीत कामाला होते. आई बाबांनी मुलांना खूप शिकविण्याचे स्वप्न पाहिले होते. दोन्ही मुलं हुशार असल्यामुळे ते स्वप्न पूर्णत्वाला जाणारच, असा आत्मविश्वास त्या दोघांना वाटत होता. बघता, बघता शार्दूल नववीत गेला. शार्दूल मन लावून अभ्यास करे. तसेच मन लावून खेळंतही असे. परंतु आज तो एवढा शांत का? याचे कारण त्यांच्या आईला कळेना. तिने विचारले असता प्रथम त्याने काही नाही असेच सांगितले; पण आईने पुन्हा पुन्हा विचारल्यावर शेवटी त्याला सांगावे लागले. आई मला सहलीला जायचे आहे. आमची सहल गणपतीपुळेला जाणार आहे. त्यासाठी २५००रू. खर्च साधारण सांगितला आहे. म्हणजे तेवढे लागणारच नाही. उरले तर परत मिळतील. पुढच्या वर्षी दहावी आहे, मी पुढच्या वर्षी अभ्यासामुळे जाऊ शकणार नाही. म्हणून या वर्षी जाऊ का आई? या प्रश्नावर ती स्तब्ध झाली; पण लगेच सावरत म्हणाली,

‘ मी बाबांना विचारून सांगते.’

 शार्दुलला वाटलेच, आपण विचारलेकी लगेचच काही आई  होय म्हणणार नाही.  पण आई बाबांच्या कानावर घालेल. मग बाबा देतील तो निर्णय मान्य करायचा. असे त्याने ठरवलेच होते. आईही बाबांना विचारून सांगावे असे मनात ठरवत होती. पण ते शक्य होते का? आईही हे जाणत होती; पण तरीही बघू काय होते ते म्हणून ती गप्प बसली.

     बघता बघता सहलीला जाणाऱ्या मुलांची यादी तयार होऊ लागली. पैसे भरण्याची मुदतही दोन दिवस राहिली होती. शार्दुलला एका मनाने जावे वाटत होते; पण दुसऱ्या मनाने उगीच आई बाबांना पैशांच्या गोंधळात कशाला अडकवावे, असेही वाटत होते. त्याचं मन पण अजबच होतं. कधी आई बाबांचा विचार करून मौजमजा करायला नको वाटत होतं. तर कधी कधी आपण सहलीला गेलंच पाहिजे, असं वाटत होतं. त्याच्या डोक्यात होय – नको असा खेळ सुरू असल्यानेच त्यांचं कशातच लक्ष लागत नव्हतं. धड खाण्या पिण्यावर नाही, अन् धड अभ्यासात नाही. चेहरा तर सहा महिने आजारी असल्यासारखा दिसू लागला. आईला आपल्या मनातलं ओळखू येऊ नये म्हणून उसनं हसू चेहऱ्यावर आणत तो घरात वावरत होता. दुसऱ्या दिवशी सहलीसाठी पैसे भरण्याची शेवटची मुदत होती; पण आपण स्वतःहून आईला काही विचारायचे नाही. असं ठरवून तो झोपण्यासाठी खोलीत गेला. आई घरकाम आणि बाबा ऑफिस काम उरकून मग झोपायला आले. त्यांची चाहूल लागताच शार्दुलने डोळे शांतपणे मिटले. त्याला पाहून जणू तो गाढ झोपी गेला आहे, असेच वाटत होते. शार्दूल झोपल्याचा पाहून आईने बाबांना त्याला सहलीस पाठविण्याविषयी विचारले. आईचे बोलणे ऐकून बाबा शांत झाले. खोलीत थोडावेळ भयाण शांतता पसरली. एवढ्यात बाबा बोलले,

‘ मला सुद्धा खूप वाटते की त्याला सहलीला पाठवले पाहिजे; पण पैशांची अडचण आहे. कंपनीमधल्या कामाचीही खात्री वाटेनाशी झालीय. यंत्रांच्या वाढत्या प्रमाणामुळे कामगारांची गरज कमी होवू लागलीय.  एकजण उद्या सकाळी पैसे देतो म्हणाला आहे. पाहू काय होतं ते.’

‘ माझ्या अकाऊंटला असतील ना थोडेफार.’

‘ तुझे पैसे अडी अडचणीला उपयोगी पडतात. राहू दे कधी गरज पडेल काही सांगता येत नाही.’

‘बरं, बघू तुम्ही ज्याला कुणाला मागितले त्यांनी दिले तर ठीकच.’

 बाबा आणि आई झोपून गेले. शार्दूल मात्र खूप वेळ जागाच होता. त्याला आपल्या घरात चाललेली आर्थिक अडचण न कळण्याइतका  तो लहान पण नव्हता. त्याला आपण सहलीला जाणार नाही. असे जाहीर करून टाकावे, असे वाटू लागले. नव्हे  त्याने न जाण्याचा ठाम निश्चय केला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर आपला अंतिम निर्णय आईला सांगायचा असे ठरवून  तो कसाबसा झोपी गेला. सकाळी आईने हाक मारल्यावर तो जागा झाला. सात वाजत आले होते. तो शक्यतो सहा वाजेपर्यंत उठत असे. ज्या दिवशी अभ्यास असेल त्या दिवशी मात्र पहाटे उठून तो पाठांतर करत बसे. इतर दिवशी मात्र निवांत उठत असे. तो उठला तोपर्यंत बाबा बाहेर कुठे तरी गेल्याचं त्याच्या लक्षात आलं. बाबा ऑफिसला जाण्यासाठी  नऊ साडेनऊपर्यंत बाहेर पडत. आईला, बाबा कुठे गेले, असे त्याने विचारल्यावर बाबा त्यांच्या मित्राकडे काही महत्त्वाचे काम आहे म्हणून गेल्याचं आईने त्याला सांगितलं. आपण सहलीला जाणार नाही हा निर्णय सांगण्याकरिता तो बाबांना शोधत होता. मग त्याने आता फक्त आईला त्याचा निर्णय सांगितला. आईला त्याचे कौतुक वाटले; पण दुसऱ्या क्षणाला प्रश्नही पडला. कालपर्यंत मला सहलीला जायचे असा हट्ट धरणारा मुलगा, आज अचानक मला सहलीला जायचे नाही. असे कसे म्हणू शकतो? त्याने रात्रीचे बोलणे ऐकले नसेल ना? अशी शंका आईच्या मनात आली. तीने जेव्हा पाहिले तेव्हा तर तो गाढ झोपी गेला होता. हेही आई मनातल्या मनात आठवून पाहू लागली होती.

             शार्दुल अंघोळ करून आला. तोपर्यंत बाबा बाहेरून आलेले होते. त्यांनी आईजवळ पैसे दिले होते घाईघाईने ऑफिसला जायचे म्हणून ते जेवायला  बसले होते. त्यानेही स्वतःचे पटापट आवरले. कारण त्यालाही शाळेला जायचे होते. शाळेत पैसे व्यवस्थित सरांच्या  ताब्यात दे. असे सांगितल्यावर तो चमकला. आपण आपला निर्णय आईला सांगितला. मग आईने तो बाबांना सांगितला नाही का? त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून बाबा बोलले,

‘ अरे बाळा, थोडी अडचण होती म्हणून, नाही तर पहिल्याच दिवशी पैसे भरले असते सहलीचे.’ 

‘नाही पण बाबा मला जायचे नाही सहलीला.’

‘अरे कालपर्यंत सहलीला जायचे म्हणून हट्ट धरणारा तू आज अचानक?’

‘नाही बाबा, मला नको वाटतंय.’ 

‘का? काय झाले.’

‘नाही तसं नाही.’

 ‘काहीही कारण सांगू नकोस. तुझे पैसे आईकडे दिले आहेत. व्यवस्थित सरांकडे दे. हरवू नकोस.’

त्याला या वाक्यावर काहीच बोलता येईना. मला जायचे नव्हते असं म्हणण्याने त्याचा खोटेपणा उघडा पडत होता. तर रात्रीचे बोलणे ऐकून आपण असं म्हणतोय. असं म्हणंणही  चुकीचंच होतं. नाइलाजाने त्याने त्या दिवशी शाळेत सहलीसाठीचे पैसे भरले. त्याला अपराधीपणाची भावना मनात जाणून लागली; पण शेवटी काही उपाय नव्हता.

      तो सहलीला निघाला. तो जाणार म्हणून आईने सगळी तयारी व्यवस्थित केली होती. त्याला लागणारे कपडे, इतर सामान, कपडे स्वच्छ करून घड्या घालून बॅग भरून ठेवली होती. त्याला आवडतं म्हणून चिवडा, चकल्या, खारे शंकरपाळे, तिळाच्या पोळ्याही केल्या होत्या. हे सर्व पाहून खरं तर त्याला खूप खूप आनंद झाला; पण  दुसऱ्याच क्षणी मनात विचार आला, आपल्यामुळे केवढा खर्च होतोय; पण आता तो या वस्तू मला नको असंही म्हणू शकणार नव्हता. त्यानेही स्वतःची थोडी फार तयारी केली आणि तो सहलीला गेला. सहलींमध्ये तो प्रत्येक पर्यटनस्थळ खूप मन लावून पाहात होता. तेथील प्राचीन स्थळांची माहिती घेत होता. समुद्रावरही त्याचे मन खूप रमले. अथांग समुद्राच्या कुशीत लपलेले शंख, शिंपले, मासे अनेक जीव, अनेक वनस्पती, निळाशार पसरलेल्या समुद्राला  पाहिल्यावर सागराची विशालता खूपचं आवडली. एक एक क्षणाचा आनंद तो खूप मन लावून घेत होता. सहलीमुळे घरापासून आपण आवडीने लांब आलो; पण आता मात्र घराची ओढ जाणवत होती. हे प्रांजळपणे त्याच्या मनाने मान्य केले. सहलीमुळे मात्र सहजीवनाचा आनंद प्राप्त होतो. निसर्ग सानिध्य अनुभवण्यास मिळते. जीवनात मिळते जुळते घेणे, आलेल्या परिस्थितिशी जुळवून घेणे, सहकार्य भावना, निसर्ग प्रेम या सर्व भावनांना खूप महत्वं असते आणि ते  या निमीत्ताने वृध्दींगत होतात, तेही लक्षात आले. बघता बघता सहा दिवस कधी संपले कळलेच नाही. ते सर्वजणच आता परतीच्या प्रवासाला लागले होते. कधी एकदा घरी पोहोचतो आणि सहलीत अनुभवलेले क्षण आई बाबांना सांगतो असं प्रत्येकाला  झालं होतं. घरी पोचल्यावर त्याचा उत्साह ओसंडून वाहात होता. किती सांगू नि किती नको असं झालं होतं. त्याच्या एकट्याची बडबड सुरू होती. बऱ्याच वेळानंतर त्याच्या लक्षात आले. त्याने बाबा बाहेर गेल्यावर, बाबा असे शांत शांत का? असा प्रश्न आईला केला; पण अरे काही नाही जीवनात अनेक वेळा उतर चढ  असतेच, पण हेही क्षण जातील. एवढेच बोलून ती तिच्या कामाला निघून गेली. आपण आताच हट्ट करून विचारून घ्यायला हवं. असं त्याला वाटत होतं; पण  जरा वेळ जाऊ द्यावा. थोडसं वातावरण बदलेल मग विचारू आईला सविस्तर म्हणून तो झोपी गेला. दमल्यामुळे त्याला पटकन झोप लागली. मध्येच केव्हातरी जाग आली. किती वाजले कळत नव्हते; पण आईच्या मुसमुसण्याचा  आवाज त्याला आला. बाबा तिला काही तरी बोलत होते. त्याला बाबांचा नाही पण आईचा आवाज येत होता.

‘ अहो, संकटे देणारा तो आहे ना! मग मार्गही तोच दाखवेल. आल्या परिस्थितीला तोंड देणं हाच मानवधर्म बरोबर आहे ना माझं. आपण काही ना काही मार्ग काढू. तुम्ही खचून जाऊ नका. हेही दिवस जातील.’

    शार्दुलचे मन चलबिचल झाले. नक्की काय झाले असेल पण आता विचार करून उपयोग नाही. उद्या सकाळी आईलाच विचारू असा विचार करत, त्याला  केव्हा झोप लागली कळलंच  नाही.

      सकाळी त्याने आईला विचारल्यावर, तिने सांगितलेली माहिती ऐकून तो एकदम शांत झाला. कारण त्याच्या बाबांचे कंपनीतले काम सुटले होते. 

‘आता पुढे काय?’ 

हा यक्षप्रश्न त्याची आईच नाही तर बाबांनाही पडला होता. स्वतःच्या कर्तृत्वावर कुठे ना कुठे काम मिळेल असं त्यांना वाटत होतं. तरी काम मिळणं तितकं सोपं नाही, हेही ते जाणत होते. शेवटी असा निर्णय  झाला की, दुसऱ्या कंपनीत काम मिळेपर्यंत, हाताला मिळेल ते काम करायचे. “हेही दिवस जातील.”  ही आकांक्षा मनी ठेवून प्रत्येक जण चालला होता. शार्दुल सहलीवरून आल्यावर एकदम फ्रेश मूडमध्ये अभ्यासाला लागणार होता; पण बाबांच्या नोकरीचं कळाल्यापासून त्याचा मुड गेला. आईने मात्र त्याला, तू अभ्यासावर लक्ष केंद्रित कर असे सांगितले.  शेजारच्या काकांच्याही  लक्षात आले. त्यांनी विचारल्यावर प्रथम नाही होय करत शार्दुलने घरात अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीचे वर्णन केले.  आपल्या परीने काही मदत करायला जमते का? ते पहातो असे म्हणून  त्यांनी भजीचा गाडा घालण्याविषयी सुचवले.  शार्दूलचे बाबा आता सकाळी पेपर टाकू लागले. दिवसभर भजी  आणि चहाचा गाडा लावत. शार्दूलला प्रथम या सर्व गोष्टींची लाज वाटू लागली; पण त्याच्या आईचे प्रामाणिक मत होते, ‘कोणतेही काम हे, हलके किंवा भारी नसते. काम करणाऱ्यांवर ते अवलंबून असते. कोणत्याही कामाची लाज बाळगू नये. देवाने आपल्याला धडधाकट शरीर दिलं आहे. हेच मोठे वरदान आहे. या देहरूपी वरदानाच्या सहाय्याने आपण कष्ट करून खाणं  महत्त्वाचं.  सर्व व्यवस्थित असताना भीक मागणे, दुसऱ्याच्या मदतीची अपेक्षा करणं चुकीचंच आहे.’

 शार्दुलला आईचे मत पटत होते. देवाचे आभार मानायचे तो कोणत्याही परिस्थितीत विसरत नव्हता. शार्दूल ही बाबांच्या कामात मदत करण्यासाठी जात होता. बाबांना त्याचे मदत करणे आवडत नव्हते. कारण लहानपणी त्याला या सर्व गोष्टींचा अनुभव   आला म्हणून त्यांना वाईट वाटत होते. आई मात्र त्याला शाळा  अभ्यास यातून वेळ मिळाला की आग्रहाने बाबांच्या मदतीला जा म्हणून सांगत होती. जीवनामध्ये वाट्याला येणाऱ्या अनुभवातून खूप काही शिकण्यासारखे असते. हे आईला पटत होते. तसे बाबांनाही वाटत होते; पण शार्दुलला आपल्या बळकट पंखाखाली हे अनुभव नको  यायला असे बाबांना वाटत असे. त्यांच्या गाडयावरची भजी थोड्याच दिवसांत खूप प्रसिद्ध झाली. त्यांनी झालेल्या कमाईतून छोटसं हॉटेल घातलं. कंपनीत यंत्रांची संख्या वाढल्याने कामगारांची संख्या कमी केल्याने त्यांचं काम गेलं होतं; पण जिद्दीने त्यांनी आपली भाकरी आपण शोधली. आज त्या छोट्याच हॉटेलमध्येही त्यांच्या हाताखाली कामगार होते.

      शार्दूल चिकाटीने अभ्यास करत होता. काटकसरीचे जीवन काय असते, याचा अनुभव त्याला पूर्वी आला नव्हता. परंतु त्याला कोणी न सांगताही तो अनुभव बरंच काही शिकवून गेला. आपण मन लावून शिकायचे. सरकारी नोकरीत जायचे. ही जिद्द मनाशी बाळगून तो अभ्यास करत होता. आता त्याला ना आईने सांगण्याची, ना बाबांनी सांगण्याची गरज उरली. अनुभव हाच खरा मोठा गुरू असतो. त्याने तर शार्दुलला शिकविले होते हेही क्षण जातील. 

             आशा अरुण पाटील सोलापूर

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

WhatsApp
error: Content is protected !!