बदल

                                       बदल

                       सकाळपासून यांची स्थिती पाहून माझ्या तोंडचं पाणीच पळालं. यांना मी लग्नापासून पहाते. आयुष्यात अनेक जबाबदाऱ्या अंगावर पडल्या आणि त्यांनी त्या लीलया पार पाडल्या. पण तरीही काळजी करणे हा स्वभावधर्म कधी सोडलाच नाही. संसार सुरु झाल्यापासून आम्ही दोघांनी एकमेकांची साथ दिली. आयुष्यात बऱ्याच चांगल्या वाईट प्रसंगांना सामोरे गेलो. पण अलिकडे पन्नाशी पार केल्यापासून हळूहळू यांच्या स्वभावात फरक पडत असल्याचे मला जाणवत होते.  साध्या साध्या गोष्टींचा ताण घ्यायचा आणि विचार करत बसायचे. कोणत्याही कामात मग यांचं लक्ष लागत नाही. खरंतर जे प्रश्न समोर उभे राहतील त्यांची उत्तरं ही सापडणारच आणि ती शोधण्याचा प्रयत्न आम्ही दोघंच करणार होतो. मुलं, घर, गाडी रहाता राहिले जगातले वाढते प्रदूषण, लोकांचे बदलते स्वभाव, एक नाही तर अनेक प्रश्न त्यांना सतावत आणि त्यामुळे ते सतत नैराश्याने ग्रस्त असत. म्हणून तर मनोवैज्ञानिकांची वेळ घेतली. डॉक्टरांकडे सतत गर्दी असे. यशस्वी डॉक्टर मीन चिकित्सकाची असल्यामुळेच तर मी त्यांच्याचकडे दाखवू म्हणून आणले होते, डॉक्टरांनी माझ्यासमोर बरेच प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही बाहेर बसा म्हणून यांच्याशी बराच वेळ निवांतपणे बोलत होते. डॉक्टरांच्या उपाय योजनेतून ते यांना सहज नैराश्यातून बाहेर काढणारच असा विश्वास मला होता. त्यांच्या नजरेतून मला बराच आधार मिळाला.

डॉक्टरांनी यांना शाळेतून त्यांच्या वेळची दहावीच्या मुलांची यादी आणायला सांगितली. यांनी प्रथम कशाला यादी म्हणून चीडचीड केली. समजावून सांगितल्यावर प्रयत्न सुरू केले. यांना रजिस्टर मिळालेही. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यातील मित्रांचा शोध घेण्याचा चंग  यांनी बांधलाच होता. हळूहळू एक एकाची माहिती यांना मिळाली. त्यांच्या बरोबरच्या सर्वांच्या माहितीचे यांनी संकलन केले. त्या यादीपैकी वीस मित्रांचा मृत्यू झाला होता. त्यातील सात मित्र-मैत्रीणी विधुर- विधवा झाले होते. तेरा जणांचा घटस्फोट झाला होता. काही खूपच श्रीमंत होते. काहींचा तर ठावठिकाणाही नव्हता, काही कॅन्सरने पिडीत तर काहींना अर्धांगवायू, कुणाला दमा तर कुणाला साखर.

   कुणाचे हात पाय मोडून कुणी अंथरूणावर होते. काहींची मुले व्यसनी तर काहींची वेडी, एकाचा तर मुलगा कारागृहात होता. हे सारं यांनी पाहिलं आणि क्षणभर डोक्यात मुंग्या आल्या. यांना मी पटकन पाणी दिलं. बरं वाटू लागल्यावर मी विचारल्यावर त्यांनी शाळेतील मित्रांची माहिती दिली. एक मित्र आता बोहल्यावर चढणार होता तर दुसरा मित्र दुसऱ्या पत्नीला घटस्फोट देवून तिसरे लग्न करण्याच्या विचारात होता. डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टरांनी दहावीच्या रजिस्टर बाबत विचारले. तेव्हा मात्र या व्यक्ती मध्ये त्यांना सकारात्मकता वाटली. सर्वांची स्थिती पाहता आपण नशीबवान आहोत असे त्यांना वाटत होते. यांना कुठलाही आजार नव्हता. त्यांच्यावर भुकेने मरण्याची वेळ नव्हती घरात पत्नी-मुलं व्यवस्थित होती. मुलं आमच्याजवळच राहत होती. आपण सर्वांपेक्षा भाग्यवान आहोत. हे त्यांच्या लक्षात आले. तेव्हापासून त्यांनी मनाशी एक निश्चय केला, कधीही दुसऱ्याच्या ताटात डोकावायचे नाही. स्वत:च्या ताटातले आवडीने, प्रेमाने खायचे. तुलनात्मक विचार करायचे  नाही, या त्यांच्या निश्चयामुळे त्यांना आयुष्य म्हणजे सजा नव्हे तर आनंदक्षण लुटण्याची एक सुवर्णसंधी वाटू लागली. मी डॉक्टरांचे मनापासून आभार मानले.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

WhatsApp
error: Content is protected !!