आकांक्षा

नोकरी, घरकाम, पै पाहुणे आणि स्वतःविषयी जागरूकता. तसं पहाता पहिल्या तीन गोष्टी मन लावून होतात किंवा मला त्या कराव्या लागतात. पण चौथी गोष्ट म्हणजे स्व-जागरूकता. ती काही होत नाही. खरंतर नोकरी करणाऱ्या मला दोन हातही दररोजच्या कामात कमीच पडतात असं वाटतं. कारण एका वेळेस बऱ्याच कामांचा फडशा पाडण्याची माझी पद्धत. सुपर वुमन बनू पाहणारी मी. या सर्व दुष्टचक्रात स्वतःचे आरोग्य मनःस्वास्थ आणि कधी कधी स्वातंत्र्य ही हरवून बसते. मी बऱ्याच वेळा तारेवरची कसरत करत लीलया जबाबदाऱ्या पेलण्याचा प्रयत्न करते आणि अगदी एखादं दुसरी वेळ सोडली तर मी यशस्वीही होते. माझा आत्मविश्वास, सर्वांसह पुढे जाण्याची जिद्द, स्वअस्तित्वाची धडपड मला बऱ्याच गोष्टींमध्ये यशस्विनी बनवते. माझ्यामुळे घरातली बाजू व्यवस्थित सांभाळली जाते. सोबत बाहेरील कामात गरज नसतानाही कधी न विचारता दिलेल्या सल्ल्याने व्यवस्थित पार पडलेली कामे. हे सर्व पहाता मला अभिमानापेक्षा, अहंकारच असायला हवा. पण मी असे काहीच समजत नाही. कारण अनुभवाने आलेले शहाणपण.
एवढ्या धावपळीत आपण जर एखादा वेगळा पदार्थ केला तर साहजिकच तो कसा झाला. हे समोरच्याने सांगायला हवे असे वाटत असताना बऱ्याच वेळा जेवण होवून सगळी उठली तरी कुणी काहीच बोलत नाही. या उलट अनुभव बिघडलेल्या पदार्थांचा येतो. जेवणात सगळं चांगलं झालेलं असतं. फक्त एखादया भाजीत मीठ किंचीत जास्त झालेलं असतं. पण लगेच आपल्याकडे इतर चांगले झालेल्या पदार्थांची नावे न सांगता बिघडलेला पदार्थ केंद्रस्थानी मानून बिघडलेल्या पदार्थाची चर्चा सुरु होते. एवढेच काय पण एखाद्या पदार्थाची चव नेहमीसारखी झाली नाही यावर चर्चा. हो पण ती नेहमीच कशी होईल. पण घरात प्रत्येकाला तो पदार्थ आधीच्या वेळी किती छान झाला होता. हे सांगुन आता कसा तो वेगळाच लागतोय हे सांगण्याची घाई असते. आधी तो पदार्थ चांगला झाला तरीही त्यावेळी कुणीच सांगितलेले नसते हे विशेषच.

चांगल्या कामाचे कौतूक करण्याने माझं मन प्रसन्न राहिल. मला चांगल्या कार्यकतृत्वाची पावती मिळून उत्साह दुणावेल ही गोष्ट लक्षात घेतलीच जात नाही. मी तर विचार करते. मला चांगलं म्हणल्याने एकतर मी फाजील आत्मविश्वासी होइन किंवा आनंदाने मला हर्षवायू होईल असंच बहुतेक माझ्या सभोवतालच्या लोकांना वाटते. हीच गोष्ट स्वयंपाकघर सोडून इतर बाबींच्या बाबतीतही लागू होते. मी काही वस्त्रे परिधान केली किंवा एखादी रांगोळी, मेहंदीची छान नशी काढली. अशावेळी मला छान म्हटलं तर.. त्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करायचे. ही सगळ्यांची नेहमीची पद्धत. हे असे का? ही मानसिकता कधी बदलणार. नेहमी माझ्यापुढे दुसऱ्याच्या बायकोचं मात्र भरभरून कौतुक केलं जातं. जसे की वहिनींनी ऑफिस मधल्या सर्वासाठी आज ढोकळा पाठवला होता. अप्रतीम झाला होता. एवढया कामाच्या रगाड्यातून कसं मॅनेज करतात कोण जाणे? किंवा मग उन्हाळा सुरु झाला की वहिनी उन्हाळं सामान करतात, केवढे किचकड काम असतं. वहिनींच्या हाताला खूप चांगली चव आहे. हे सर्व सांगत असताना आपण चुकूनही आपल्या माणसाचं म्हणजेच माझे कौतुक करत नाही ही गोष्ट सोईस्करपणे विसरलेली असते.

कौतुक नेहमी दुसऱ्याचंच वाटत असतं कारण पिकतं तिथं विकत नसतं. हे जरी खरे असले तरी त्यांच्या बाबतीत भावना अनुभव काही वेगळंच सांगून जातो. यांनी कोणत्या कार्यक्रमाला कोणते कपडे घालायचे हे मी ठरखायचे. मी यांना कोणत्या प्रकारचे कपडे, कोणता रंग चांगला दिसतो याचे भान ठेवत खरेदी करायची ती ही मीच, यांनी काय घातलं पाहिजे यासोबतच यांनी छान दिसले पाहिजे, ही जबाबदारीही माझीच. तसे नौकरी आम्ही दोघेही करतो. पण घरची जबाबदारी माझी. अन् जमलं तर बाहेरची ही माझीच. हा अलिखीत नियम ठरलेलाच असतो जणू. ऑफिसला जाण्यापूर्वी स्वतःचं आवरण्यातून यांना वेळ मिळत नाही. शेवटी मीच आठवण करकरून यांना मोबाइल, रुमाल, चावी, डबा, पाण्याची बाटली देणार. पण मी ऑफिसला निघताना त्यांचे काही देणं न घेणे. आवरून निघालेल्या मला मी घातलेला ड्रेस, साडी किंवा केशरचनेचे कौतुक केले तर प्रसन्न मनाने दिवस जाईल. कामावरून गेल्यावर आयता एक कप चहा आणि कधी उत्तरलाच असेल चेहरा तर मायेने पाठीवरून मायेने हात फिरवून दमलीस का तू आज? एवढे वाक्य ऐकायला मिळालं तर दिवसभराचा ताण दूर होवून माझ्यासारखी गृहलक्ष्मी प्रसन्न मनाने कामासाठी पदर खोचेल. आपल्याकडे मायेने कुणीतरी लक्ष द्यावे एवढीच तर आकांक्षा.

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Don`t copy text!