आटपाट नगरातील धावपळीची नागपंचमी
रेवाला आज राहून राहून माहेरची आठवण येवू लागली. आई-बाबा देवाघरी जावून एक-दीड वर्ष झाली होती. खरंतर रेवा आणि शिरीष दोघंच बहिण-भाऊ. दोघांनाही एकमेकांची खूप सवय. लग्न होईपर्यंत दोघांचं एकमेकांशिवाय पानही हलायचं नाही. शहरात वाढणारी अपार्टमेंट पद्धत यामुळे दुरावणारी माणूसकी काय कमी होती. त्यातच या कोरोनाचे गेल्या दीड-दोन वर्षापासून वाढलेले संकट. माणसापासून माणसं शहरीकरणाच्या नावाखाली जरी दुरावली, तरी सोशल मिडियाच्या माध्यमातून थोडी तरी जवळ आली. तसं पहाता रेवाच्या आई-वडिलांना कोरोना झाला होता आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. यावेळेस शिरीषची बायको म्हणजेच उर्वीने आई बांबांची योग्य ती काळजी घेतली खरं पण इतर आजारांपेक्षा हा आजार भयानक. त्यामुळेच की काय साध्या बोलण्यावरून ही एकमेकांत गैरसमज झाले होते. रेवाला आई-बाबांना कोरोना झाला तरी बरेच दिवस कळवले नव्हते. यातही शिरीष – उर्वीचं म्हणणं होतं. त्या घाबरून जातील आणि त्यांनी इथं येवून काहीच उपयोग नव्हता. जेव्हा कोरोना आटोक्यात येइना व बाकीच्याही बऱ्याच आजारांनी शरीरात तोंड वर काढले. तेव्हा मात्र रेवाच काय पण शिरीष-उर्वीही घाबरले. शरीरात एक आजार कमी होईपर्यंत दुसरा आढळत होता. खरंतर शरीरातील प्रतिकार शक्ती कमी होत गेल्याने होणारे दुष्परिणाम होते ते. रेवा माहेरी आली. तेव्हा आई-बाबा विलगीकरणात होते. घरात शिरीष उर्वी आणि भाचा रॉनी. तिला घरात माणसे होती, तरीही तिला घर रिकामे तर वाटलंच पण माहेर परकं जाणवलं. उर्वीनं तिला इतिवृत्तांत दिला पण तिच्या मनात एक प्रश्न कायम गोंधळ घालत होता. कोरोना झाला तेव्हा का नाही सांगितलं ? खरंतर शिरीष उर्वीने आपल्या परीने खूप प्रयत्न केलेच होते. पण…
गेले काही दिवसांतच आई बाबा गेले आणि रेवा नकळत माहेरपासून दुरावली. पहिले वर्ष तर घरात सण करायचे नव्हते. त्यामुळे आठवण येईल तेव्हा शिरीष उर्वी रेवाला फोन करत. रेवा मात्र फोन आल्यावर फोनवर तुटकपणे बोले. राॉनीशी गप्पा मारे. रॉनी आणि रेवाची लेक डॉली पक्के दोस्त. लहानगीच ती त्यांना मोठ्यांची धोरण माहिती नव्हती आणि कळतही नव्हती. रेवा मात्र स्वतः कधीही फोन करत नसे. शिरीष-उर्वीच्या लक्षात ही गोष्ट आलीच होती. श्राद्धाच्या वेळीपण दोन दिवस आधी ये म्हणून सांगितल्यावरही कारणं देत तिनं तेही टाळलं. श्रादाला कोरोनाकाळामुळंही कमीच माणसं होती. त्याही वेळी रेवा शांतच होती. तिच्या चेह-यावर उदासी जाणवत होती.
वर्ष झाले आणि उर्वीने पुन्हा घरातील सण साजरे करायला सुरुवात केली. यावर्षीच्या पंचमीला वन्संना तुम्ही बोलवा, असं तिने आग्रहाने सांगितलं. त्याप्रमाणे शिरीषने फोन केला. पण रेवाने टाळाटाळ केली. मात्र अचानक दारात शिरीषला पाहून रेवा एकक्षण सगळं विसरली आणि सहजच त्याच्या गळ्यात जावून पडली. साखर-दुधात विरघळावी अगदी तशी. शिरीषलाही आई- बाबा गेल्यापासून रेवाला समजून सांगण्याची संधी मिळालीच नव्हती. खरंतर रेवाची ही सातवी पंचमी पण आई-बाबा गेल्यानंतरची पहिली पंचमी. तिला आज शिरीष च्या कुशीत बाबांचे प्रेम जाणवले. त्याने तिला शांत केलं. तिच्या सासू-सासऱ्यांची व भावोजींची परवानगी घेवून रेवा व डॉली म्हणजेच भाचीला घेवून घरी आला. आई-बाबा नसताना ही तिचे पहिल्याइतकेच नव्हे त्याहीपेक्षा जास्त लाड पुरवले गेले. खरंच काही गोष्टींचा किंतू परंतू मनात ठेवून तिने गैरसमज करूने घेतला होता. तोही उर्वी ने दुपारी निवांत बसल्यावर सहज दूर केला. उर्वीने हक्क आणि अधिकारानं तिला समजावून सांगितलं,
‘वन्स, मी तुमची वहिणी तर आहेच पण आजपासून तुमचं माहेरपण जपणारी आईही आहे.’
या तिच्या वाक्यावर रेवा मनातली बरीच किल्मिश दूर सारीत तिच्या गळ्यात पडली.
आजच्या धकाधकीच्या जीवनात, बोटांबर मोजावी एवढी नाती असतात. तीच जपणं खूप महत्वाचे असत. कमी बोलण्याने आणि अति बोलण्याने होणारे गैरसमज वेळीच दूर केले तर ठीक. नाहीतर गैरसमजाचा वेल नात्यांना गिळून टाकतो. या तिच्या वाक्यासरशी रेवाला आपली चूक लक्षात आली. आपण वेळीच गैरसमज दूर करणं आवश्यक होतं हे जाणवलं. तिने शिरीष आणि उर्वीची माफी मागितली. नाहीतरी तिचे आई-बाबा तिला नेहमी म्हणत.
‘चुक मान्य करण्याने माणूस लहान होत नाही.’
आज फोटोत हार घातलेल्या आई-बाबांच्या प्रतिमा समाधानाने गालातल्या गालात हसत असल्याचा भास होत होता. तिचं मन माहेरच्या मायेच्या झोक्यावर झुलू लागलं.
Nice👍👏😊
छान
धन्यवाद सर
धन्यवाद सर