अहंम्

‘आई मी चार दिवसांसाठी माहेरी  जावून येते,’
असं रिताने म्हणजे सुनेने म्हणलं असतं तरी मला बरं वाटलं असतं पण  रितानं आपल्या नवऱ्याजवळ म्हणजेच राजू जवळ हा मेसेज मला दिला. राजूने हा निरोप मला सांगितलाच  नाही. रिता ज्यादिवशी माहेरी जाणार होती त्यादिवशी तिची चाललेली कामाची गड़बड पाहून मीच विचारले.
‘रिता ऑफिस दहा वाजता असते. मग आज एवढी धावपळ. काही कार्यक्रम आहे का?’
माझ्या या वाक्यावर तिला काय बोलावे सुचेचना असे भाव तिच्या चेहऱ्यावर होते. तिने गडबडीबद्दल खुलासा केला.
‘मी चार दिवस माहेरी जाणार आहे.’
या वाक्यावर काय बोलणार. कारण माझ्या मनात विचारांचा गोंधळ आणि भावनांचा गुंता माजला होता.  चेहऱ्यावर उठलेलं वादळ  स्पष्ट दिसत होतं. रिताला मनातून खूप वाईट वाटलं. ती  चार दिवस माहेरी जायचं म्हणलं की  झालं यांच्या चेहऱ्यावर वाजलेच बारा. असे तिचे भाव पाहून आजपर्यंत मी समजून घेतलं ते गेलं का पाण्यात अशी माझी भावना होतीच. मला फक्त एवढंच वाटत होतं. फक्त कल्पना तरी द्यायची ना!

यावर राजू तिच्या बाजूने वकीलपत्र घेवून उभा होताच.

‘आई तिने माझ्या जवळ तुझ्यासाठी निरोप दिला होता पण मी विसरलोच.’

अरे व्वा! आता मी एवढी परकी वाटू लागले की मला ती थेट बोलू शकत नाही. मला वाईट वाटले. ती सासरी आल्यापासून मी तिला लेकीप्रमाणे वागवले मग…

आज तिला मला बोलू वाटत नाही असा अहंम् पणा आडवा यावा म्हणजे…
मी फक्त सासूच नव्हते तर महत्वाचं म्हणजे मी दोन मुलांची आई, दोन भावांची बहिण, चार पुतण्यांची आत्या, तीन जावांची ताई, एका ननंदेची वहिनी, सौभाग्यवती सुनिता सुपर्णे. नात्यांची समृद्धता असली तरी आजकाल जपण्यासाठी तिला भावनांचे खत आणि त्यागाचे पाणी असायला पाहिजे. त्याशिवाय नात्यांचा हिरवेपणा आणि समृद्धता होत नाही. मी या घरात येवून तशी बत्तीस वर्षे झाली. या बत्तीस वर्षात मी माझ्या परीने  नात्याला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करते. पण शेवटी प्रत्येक नातं हे समाधानी होतंच असं नाही. मी तसं तीन पिढ्यांशी जुळवून घेतलं. जुळवून घेतलं म्हणण्याचा अर्थच असा की, नवीन पिढीमधील विचारांमधील अंतर. आता हेच पहा ना, माझ्या  घरात जेव्हा मी लग्न होवून आले तेव्हा आज्जेसासूबाई आणि सासूबाई होत्या. आमच्या यांची नात्यातली लांबची आत्याही होती. या दोघींच्या मताशी जुळवून घेत घेत संसाराची गणितं समजून घेत गेले. संसाराची सुरेख रांगोळी रेखाटत नवऱ्याच्या साथीने  मी रंग भरले. माझा संसार बहरला. काहीच दिवसात संसारवेलीवर पुष्प उमलले. त्याचे नाव राजू ठेवले. त्याच्या कोडकौतुकात वेळ फुलपाखराप्रमाणे उडत होता. काही वर्षाने त्याच्या साथीला सोबती म्हणून की काय काही दिवसाने संसारात  राजेशच्या सोबतीला शितलचा जन्म झाला.  संसार छान बहरला होता. कधी कधी तर रात्र रात्र जागून अन् दिवस दिवस बाळाला मांडीवर घेवून बसणं होई. त्या साऱ्या गोंधळात जेवणही बनवायला जमत नसे. अपुरी झोप, ताण, बाहेरचं खाणं यामुळे बाळानंतर आपणच आजारी पडू अशी भिती वाटत असे. कधी कधी तर लहान असताना  काही कारणाने  राजू रडून खूप आक्रस्ताळेपणा करत असे. या सर्वाचा विचार करता बाळापेक्षा आपल्याला त्याच्या वाटणीचे आजार झाले तरी चालेल. पण बाळाला नको असं वाटत असे. या सर्वांमध्ये माहेरी जाणं म्हणजे अगदी एक-दोन दिवसांचंच.  मुलं मोठी होवू लागली तसं त्यांच्या शाळा, वेगवेगळ्या प्रकारचे क्लास, स्पर्धा, उपक्रम, या साऱ्यांमुळे पुन्हा पुन्हा माहेर हा विषय माझ्याकरिता बंद झालाच. अगदीच कोणाचे लग्न, साखरपुडा असेल तर कसंतरी वेळ काढून जावे लागत असे. तेवढंच ते माहेरपण. हळूहळू मुले मोठी झाली. आपापल्या शाळा कॉलेजच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमुळे राजेश अन् शीतल काही तासच दिवसा घरात असत. नाहीतर मित्र-मैत्रिणी, क्लास आणि अभ्यास. आता मात्र शितल संसारात गुरफटली तर राजेशच्या संसारात तो. पण मला तर आई म्हणून कर्तव्य करत असताना हळूहळू प्रथम सासू आणि नंतर आजी म्हणून कार्य सुरु झाले होते. या साऱ्यांमध्ये व्यस्ततेत माहेरं कुठंतरी मागेच हरवलं होते.
क्षण हा अनमोल भासे जीवास
  हवा माहेरचा क्षण विसावण्यास.
  पण पण हे भाग्य नशीबात नव्हतेच जणू. रिता म्हणजेच माझी सून. या घरात आल्यापासून ती माझी मैत्रीण, लेक भेटल्याचा भास होत होता. मी  पहिल्या काही महिन्यातच बऱ्याच गोष्टी तिला शिकवल्या. नंतर मग ती नोकरीला लागली आणि मग आमच्यात थोडेसे अंतर पडू लागलं. तसे होण्याचं कारण म्हणजे माझी शिस्त. खरंतर या शिस्तीमुळेच मी सारा संसार सुरळीत पार पाडला होता पण काय करायचं. आता तीच शिस्त सुनेला आवडत नव्हती.
  ‘ माझं मला कळतं ते. तूम्ही सांगायची आवश्यकता नाही.’
  तुम्ही ना जास्तच ताण घेता.’
या आणि अशा अनेक वाक्यांनी ती मला असं दाखवून देई की तुम्ही उगाचच काळजी करता,
त्यात काय एवढं टेन्शन घेण्यासारखं. अलीकडे हल्ली तर
थेट माझ्याशी संवाद कमी होवू लागल्याने आमच्या दोघींमध्ये बरेच गैरसमज होतात. तसं मी जास्तीत जास्त पुढाकार घेऊन गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करते. पण ती मात्र वेगळाच अर्थ घेते. मी मात्र आमच्यात पडणारे अंतर, होणारी विचारांची दरी दूर करण्यासाठी प्रयत्न करतेय. कारण मी वयाने मोठी आहे. अनुभव मिळवण्यासाठी जीवनाचं विद्यापीठ खुप महत्वाची भूमिका बजावत असतं. या विद्यापीठाची मी जुनी विद्यार्थ्यीनी होते. मी एकेदिवशी तिच्याशी व्यवस्थित शांतपणे बोलून सर्व गैरसमज दूर करण्याचं ठरवलं होतं. खरंतर या सर्वांमध्ये तीचाच काय पण माझाही  अहंम् पणा आडवा येत होता. पण संसारातच काय पण जीवनात ग ची बाधा हानीकारक ठरते. ही बाधा भल्या भल्याभल्यांच्या सुखी घराला उद्ध्वस्त करणे. म्हणूनच मी सर्व बाजूला सारुन समजून घेण्यासाठी आणि समजून देण्यासाठी पुढाकार घेतला.

6 Replies to “अहंम्”

  1. खरंय माहेर हा सासरी नावडता विषय बनतोच पण तिला घरं होतं कुटुंब होतं याचा सहज विसर पडतो वास्तवदर्शी लिखाण खूप सुंदर🙏💐

Comments are closed.

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Don`t copy text!