अनोखी भेट


             सरला आज कामाच्या ओढीने सकाळीच जागी झाली. आज ऑफिसमध्ये महत्त्वाचं काम होतंच पण घरात पाहुणेही येणार होते. खरंच तिची धावपळ होते. तिचे काम  तीच करो जाणे. मला ऑफिसला दहा वाजता जायचं होतं. मात्र तिला आज गाडीवर सोडायचं म्हणून नऊलाच निघावं लागणार होते. पहाता पहाता वेळ निघून जईल अन् मग ऐनवेळी घाई, मग चिडचिड, रागाने काहीतरी सांडलवंड. नकोच हे सारे म्हणून पहाटे पाचच्या गजरच्याही आधीच उठून कामाला लागली होती ती. माझी झोपमोड नको म्हणून जाताना तिच्या मोबाईलचा  गजरही बंद केला तिने.  पण माझ्या मोबाईलमध्ये मीही गजर लावलाच होता. ५.३० ला गजर झाला तरी उठूच वाटेना. ऑफिसमधील काम पाहता सरळ दोन दिवस रजा टाकावे आणि निवांत लोळत पडावं असं वाटत होतं. सरला मात्र घरकाम, ऑफिसकाम आणि आले गेलेल्यांचं  व्यवस्थित करत होती. तिला काही मदत करावी असे मी मनात ठरवत असे पण तसे कधी होत नव्हते. मी नुसता विचारच करतो. ती मात्र निरपेक्ष वृत्तीने काम करत राहते. कोणी मदत केली किंवा नाही केली. तरीही ती करत रहाते. पाहता पाहता ऑफिसची वेळ झाली. तिचं वेळेपर्यंत कसं होतं आवरून ? हा मला पडणारा नेहमीचा प्रश्न. मी तयार झालो. माझा टिफिन, नाश्ता, दूध, रुमाल, मोबाईल आणि बाकीचे सारे तिनेच आठवणीने हातात दिले.  आम्ही बाहेर पडलो. आज अगदी पाच-दहा मिनिटांचा उशीर झाला होता. उशीर झाला की मग रस्त्याने जाताना गाडीचा वेग वाढतो आणि वाढलेल्या वेगवान गाडीमुळे काही तरी वेगळेच घडतं की काय अशीही भीती वाटत राहते.  तारेवरची कसरत तिलाच जमते. मी मात्र वेळेपूर्वी अर्धा तास निघावे या मताचा म्हणजेच निवांत माणूस. ऑफिस जवळ आलो. तिला सोडलं वळणार एवढ्यात तिच्याकडे माझं सहजच लक्ष गेलं. आज एवढ्या घाईतही तिने छान आवरलं होतं. तिचं दिसणं आणि असणं मला दोन्हीही लुभावत होतं. तिच्या अंगावर गुलाबी रंगाची साडी छान उठून दिसत होती. कुरळ्या केसांची लांब अशी वेणी, काही कुरळ्या बटांनी गोल अशा चेहर्‍याभोवती छानसा महिरप घातला होता जणू. मी घाईतच असलो तरी सहजच जवळ जाऊन आज तू खूप छान दिसतेस असं म्हणावं, म्हणून गाडीतून उतरणार. एवढ्यात बॉसचा फोन आला आणि माझे विचार हवेतच विरले.
             संध्याकाळी घरी जाताना बाजारातून हे घ्यायचं आणि ते घ्यायचं.  सामानाच्या यादीत  दीड तास सहज गेला. तिच्यासाठी म्हणून मी तिला आवडणारा मोगर्‍याचा दाटसर, हातभर गजरा तिच्या नकळत घेतला. गजरा पाहिला की तिचा चेहरा मोगऱ्याच्या फुलाप्रमाणे टवटवीत आणि प्रसन्न वाटतो. पण हा गजरा मी तिला आता देणार नव्हतो. आम्ही दोघं घरी पोहोचलो. पाहुणे आले होते. चहा पाणी इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. पाहुणे म्हणजे मेहुणा आणि मेव्हुण्याची बायको. दोघंही कुणा नातेवाईकाच्या लग्नासाठी आले होते. त्यांनी सरलासाठी साडी आणली होती. मला वाटलं लाडक्या बहिणीसाठी आणली असेल. तसं यावर्षी राखी पौर्णिमेला ही जाऊ शकली नाही आणि तोही येऊ शकला नाही. पण थोड्या वेळातच साडी मागचं रहस्य कळलं.  सरलाने  छानपैकी आवरले. मेव्हुण्याची बायको आणि माझी आई दोघींनी मिळून हॉल सजवला. मी तरी आईला कारण विचारण्यासाठी एक-दोनदा जवळ गेलोही. पण कधी सरला, तर कधी माझे बाबा यांनी कामानिमित्त मारलेल्या हाकेने विचारूच शकलो नाही. आईही काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. पण ती काय म्हणत होती मला कळेचना! शेवटी मी सरलालाच जावून विचारलं.
              ‘कशासाठी हॉल आवरत आहेत?’
             यावेळी नेमकं मेहुणा पाणी प्यायला स्वयंपाक घरात आला. त्याच्या कानावर हा प्रश्न पडला आणि तो आश्चर्यचकित झाला.
             ‘म्हणजे भावोजी तुम्हाला माहितच नाही का? अहो आज सरलाचा वाढदिवस. तुम्ही विसरलात  काय ?’
            
मला काहीतरी मोठा अपराध केल्यासारखे वाटले. मी काही बोलणार एवढ्यात सर्वांना हॉलमध्ये येण्यासाठी आई  हाका मारत असल्याने, आम्ही सारे हॉलमध्ये आलो. मी खरंतर काहीतरी तिच्या आवडीचे तिच्या पसंतीने आणायला हवे होते. पण मी नेहमीप्रमाणेच वाढदिवस विसरलो होतो. तसं मी विसरलो तरी ती माझ्या लक्षात आणून देते. भले त्याबदल्यात एखादी मागणी जास्त होते. पण आज तिच्या माहेरच्यांपुढे मी… मी विचारात असतानाच सगळे टेबलच्या जवळ उभे राहिले. मलाही मेव्हुण्याने

‘या भावोजी.’

  म्हणून केक कापण्यासाठी बोलवले. सरला मात्र जरी प्रसन्न चेहऱ्याने सर्वांसमोर वावरत असली तरीही मनात कुठेतरी नाराज असणारच. याची मला कल्पना होती. सरला नेहमीच मला अगदी छोटया छोटया गोष्टींच्या मागण्या करत असे. पण भले मी बाकी सर्व करेन पण तिच्या मागण्या कितीही लक्षात ठेवायच्या म्हणले तरी विसरतच होत्या. तिने आवरले की ती कशी दिसते हे सांगावं, कोणता रंग, कोणत्या प्रकारची साडी, ड्रेस छान दिसतो. साडी छान दिसते की ड्रेस ते सांगावे. कोणताही पदार्थ खाल्यावर छान झाला असेल तर सांगावे. तिच्यासाठी मनाने माझ्या आवडीने ड्रेस, साडी, फुलांचा गजरा, गुलाबाचे फुल आणावं. बऱ्याच वेळा तर ती मला म्हणेही,
  ‘ तुम्ही मला छान दिसतेस. असं म्हणालात किंवा एखादा पदार्थ
छान झाला असं म्हणल्यावर मला हर्षवायू होईल असे वाटते का?’

  तिच्या विरुद्ध माझा स्वभाव. तिने मी कसा दिसतो ते सांगायचं. सोबत तिने कोणता ड्रेस घ्यायचा कोणता कधी घालायचा हे ही सांगायचं. मला वाटे  तू नेहमीच छान दिसतेस मग काय सांगायचं, तू साडी घाल किंवा ड्रेस घाल. काहीही घाल छानच दिसतेस. तुझी निवड चांगलीच आहे, म्हणून तर तू मला निवडलेस. या आणि अशा कारणांना पुढं करत प्रतिक्रिया देणे मी टाळत आलो. खरंच का करतो मी असं. हे माझ्या मलाच कळत नाही पण नाही. आजपासून मी एक निर्णय घेतला. तिला अनोखी भेट देईन. तिचं, तिच्या कामाचं कौतुक करीन, तिला मी दररोज केसात माळण्यासाठी फुलं आणून देईन. भले ते एक फूल किवा गजरा असेल. या विचारात असतानाच बाजारात घेतलेल्या गजऱ्याची आठवण झाली. सर्वांनी मला तिला केक कापून भरवण्यासाठी जवळ जाण्यास सांगितलं. आलोच दोन मिनिटात म्हणून मी लगेच बेडरूममध्ये जावून आलो. तिला केक भरवला अन् खिशातून छान असा सुगंधित मोगऱ्याचा गजरा मी स्वतः तिच्या लांबसडक केसात माळला. सर्वापुढं माझी कृती पाहून ती आश्चर्यचकित तर झालीच पण छान अशी लाजलीही. मी तिच्या गालावरील खळी माझ्या नजरेने टिपली अन् हळू जवळ जात कुणालाही कळणार नाही अशा आवाजात,
 
‘जानू, आज तू खूप सुंदर दिसतेस.’
असे म्हणालो.  तिच्या नयनांमधून आनंदाश्रू पाहून सर्वांना ती का रडते असे वाटलं, पण काही नाही. डोळ्यात केसांची बट गेली असं तिने सांगितले. मी डोळ्यात फुंकण्याचा बहाणा करत परत जवळ जात,
‘आता माझ्या बोलण्याने डोळ्यात आनंदाश्रु आणायचे नाहीत. कारण आजपासून योग्य ठिकाणी तूझं कौतुक न विसरता करायचंच असं ठरवलंय मी. आज पासून सुरवात केलीय. होय
वाढदिवसाची अनोखी भेट आहे ही.’
माझं बोलणं ऐकून ती जास्तच लाजली. सर्वांसमोर नको असं डोळ्यानं खुणावत दूर झाली. एवढ्यात हॅपी बर्थडे टू यू डिअर सरला….. या आवाजाने मी प्रेमाने गंधाळलेल्या वातावरणातून बाहेर येत, मी पण सर्वांच्या सुरात सूर मिसळला.

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Don`t copy text!