अनपेक्षित

                                                                                               
          सकाळचे सात वाजले. आज खूपच  निवांत वाटत होते. कारण मी माझ्या परगावी असलेल्या बहिणीच्या घरी होते. आज माझ्या डोळ्यावरची झापडच जाईना. दररोज पहाटे पाचला उठण्याची सवय असली तरी, रात्री मात्र एक- दीडला अचानक मला जाग आली. जाग येण्याचे कारणच नव्हते. तरीही असे का झाले असावे, याचा मी पुन्हा पुन्हा विचार करतच पहाटे झोपी गेले. सात वाजले तरी जाग आली नव्हती. आम्ही सर्वजण काल दुपारी चार वाजता, माझ्या बहिणीच्या ऑफिसच्या उद्घाटनासाठी आलो होतो. बहिणीने शनिवारी दुपारी कार्यक्रम ठेवल्याने, सर्वांनाच कार्यक्रमाला येणे सोयीचे झाले होते. यांनाही सेकंड सैटरडे असल्यामुळे ऑफिसला सुट्टी होती. मुलांनाही शनिवार असल्यामुळे अर्धी शाळा. त्यामुळे त्यांनीही शाळा करून मगच सुटी घेतली होती. माझे काय मी घरी असल्यामुळे
‘ बिनपगारी फुल अधिकारी.’
या सर्वांच्या शाळा, ऑफिस, गावाकडून येणाऱ्या माणसांची वर्दळ, या सर्वांमध्ये स्वतःला द्यायला जास्त वेळच मिळत नसे. तेवढाच एक दिवस आराम म्हणून आम्ही शनिवारी दुपारी बहिणीकडे आलो आणि रविवार दुपारी तीन वाजता परत निघणार होतो. आल्यापासून ऑफिसच्या उद्घाटनाची तयारी व उद्घाटन कार्यक्रम. हे सर्व व्यवस्थित पार पडले. रात्री उद्घाटनानंतर अल्पोपहार झाला. घरी आल्यानंतर सर्वांसाठी म्हणून शाही जेवणाची तयारी करण्यात आली होती.  
         दिवसभराच्या दगदगीनंतर आणि पुन्हाच्या गोड जेवणानंतर सर्वजन बसून गप्पा मारून झाल्यावर, जो तो झोपेच्या अधीन केव्हा झाला कळलंच नाही. रात्री दोन -चार तासांच्या जागरणा नंतर मलाही सात वाजेपर्यंत झोप लागली. रविवारी बहिणीच्या जावेच्या घरी नाश्त्याला जायचे, म्हणून मी आवरत होते. सर्वांच्या आंघोळी आवरून नंतर लगेच निघायचे होते. सुमारे आठ- साडेआठला त्यांचा फोन खणखणला. सुटी दिवशी कोणाचा फोन म्हणून यांनी नाईलाजानेच फोन उचलला. पलीकडचा आवाज तितकासा स्पष्ट वाटेना. यामुळे यांचा आवाज वाढू लागला. पलीकडून घाबरल्यामुळे काही शब्द  गाळूनच बोलले जाऊ लागले. मी हातानेच खूनावून कोण आहे म्हणून विचारले. त्यासरशी त्यांनी फोन लाऊड स्पीकरवर केला.
‘ हॅलो, हॅलो सुरेश व्यवहारे का?’
‘ हो मीच बोलतो, बोला काय काम होतं.’
‘ मी राधिका लांबतुरे.’
मी मनातल्या मनात म्हणाले,
‘अगंबाई ही तर आमची भाडेकरू. हिचा का म्हणून फोन आला?’
‘सुरेश सर, मी काल रात्री झोपले आणि आज सकाळी उठले.’
यावर मी गालातल्या गालात हसत बडबडले.
‘ काय बोलते ही काल झोपले, आज उठले. एवढं सांगण्यासाठीच फोन केला की काय?’
‘ आणि म्हणजे, मी काल उशिरा झोपले आणि आज रविवार असल्यामुळे शाळेला सुट्टी असते म्हणून निवांत उठले.’
अरे बापरे ती पुढे काही बोलेना. एवढ्यात फोनवरून पुरुषी आवाज येऊ लागला.
   ‘ व्यवहारे सर, मी निलंगेकर बोलतोय. तुमच्या घराचा दरवाजा उघडा आहे. कडी कोयंडा तोडलेला दिसतोय.’
निलंगेकर, आमचे शेजारी. त्यांचं बोलणं ऐकून आम्ही सर्वजन स्वप्नात आहोत की  भास झाला, मला मीच चिमटा घेऊन पहिला. अरे बापरे माझ्या अंगावर सरसरून काटा आला. यांचा चेहरा लाल भडक झाला. पाय थरथर कापू लागले. ‘पुढे……… पुढे काय?’
   यावर निलंगेकर म्हणाले,
‘ सर आम्ही काही आत गेलो नाही. फक्त दरवाजा पुढे ओढून कडी लावून घेतली.’
           हे तर पटकन खुर्चीवर बसले. मला काहीच सुचेना. बहीण आणि भावोजी समोर असल्यामुळे त्याच त्या गोष्टी परत सांगाव्या लागल्या नाही. मुलं अजून बहिणीच्या मुलांसोबत खेळत बसली होती. आम्ही दोघांनी पटकन आवरून आपलं गाव गाठायचे ठरवले. तासा -दीड तासाचा रस्ता होता. आणखी चहाही घेतला नव्हता; पण आता तीही इच्छा  उरली नव्हती. आमच्या बरोबर भाऊजी निघाले.
‘ तुम्ही आणि ताई दोघही मुलांना घेऊन  मागून या,’
म्हणून सांगून आम्ही पुढं निघालो. योगायोगाने स्टॅंडवर आल्यावर गाडीत  जागाही मिळाली. एक- दीड तास म्हणजे आमच्यासाठी एक मोठे पर्व वाटू लागले. केव्हा एकदा घरी पोहोचतो असं झालं होतं. बसमध्ये बसल्यावर दोघंही शांतच बसलो होतो.
                   मी विचार करता करता मला एकदम आठवले, काल आपण उद्घाटनासाठी म्हणून एकटेच येणार होतो. मुलं आणि हे प्रवास नको म्हणून येणार नाही म्हणाले होते. सर्वजन आपापल्या कामात असताना, मी घरातील सर्व कामे पटपट उरकली आणि सर्वांच्या नावचा स्वयंपाक करून ठेवला. माझी घरातील सर्व कामे करून बॅग भरून घेतली. सकाळचे अकरा- साडेअकरा झाले असतील. पुन्हा एकदा छोटी मुलगी तनिष्का हिला
‘ चल येणार का?’
विचारल्यावर तिने नकारार्थी मान हलवली. ती पहिलीत गेली होती. आम्ही स्वतः पाच रूम वापरत होतो आणि राहिलेल्या दोन खोल्या भाड्याने दिल्या होत्या. राधिका लांबतुरे  आणि तिचा चौथीतला मुलगा सोहम, अशी दोघेच राहत होती. सोहमचे बाबा एका कंपनीत सर्व्हिसला होते. आठ- पंधरा दिवसातून एकदा गावाकडे येतं. गेल्याच आठवड्यात आले होते आणि सध्याही काही कामानिमित्ताने सोमवारी येणार होते. कारण शुक्रवारी तसा त्यांचा फोन आला होता. मी सर्वांना घाईने जेवायला बोलावले. मला एकच्या गाडीने जायचं होतं. एवढ्यात तनिष्का आणि सागर यांच्या भांडणाचा आवाज आला. राधिकाकडे कॉम्प्युटर असल्यामुळे सोहम बरोबर तनिष्का आणि सागर खेळण्यास जात.  कॉम्प्युटर खेळण्यास बसण्यावरून तनिष्का आणि सागरचे भांडण झाले होते. इतका वेळ सर्वजण शांतपणे खेळत होते;  पण आता त्यांचं एकमेकांशी पटेना. राधिका शाळेला गेली होती. शनिवारी दुपारी तिची मीटिंग होती. त्यामुळे घरात फक्त मुलंच होती. शेवटी मीच जाऊन भांडण सोडवले आणि सर्वांना जेवायला घेऊन आले. सोहम मात्र नको म्हणून पळाला. घरापासून पाच मिनिटांच्या अंतरावरच, त्याची मावशी राहात होती. तिच्याकडे जावून येतो म्हणून तो गेला. शेवटी आम्ही सर्वजन जेवायला बसलो. नुकत्याच झालेल्या भांडणामुळे तनिष्का मॅडमने,
‘ती गावाला येणार आहे.’
असे जाहीर केले. मला प्रथम राग आला. कालपासून चल म्हणून गोड बोलून समजावले, तर ऐकत नव्हती आणि आज अचानक. मी किंचित रागावताच तिला बोलले,
     ‘ बॅग भरून झाली. कितीवेळा विचारले होते?’
पण शेवटी तिचा हिरमुसला चेहरा बघून, 
‘बरं चल,’
म्हटल्यावर बाईसाहेबांनी सागरकडे पाहून गालातल्या गालात हसून घेतले आणि मग जेवण सुरू केले. मी एकटीच जाणार म्हणून मी छोटीशी बॅग घेतली होती. दागिनेही घेतले नव्हते, गळ्यात काळ्या मण्यांचे साधे मंगळसूत्र आणि कानात रिंगा. जास्त सोन्याचे दागिने घालून एकटीने प्रवास करणे म्हणजे धोकाच. म्हणून सर्व दागिने घरातच ठेवले होते. जेवणं उरकल्यानंतर राहिलेले सर्व पदार्थ काढून फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी फ्रीज उघडला. एवढ्यात सागर माझ्या साडीचा पदर धरून, काही तरी बडबडू लागला.
‘ आई, मी पण येतो ना!’
अरे बापरे मी मनातल्या मनात विचार केला. नको, नको म्हणता सर्वच जण तयार होतात की काय? मी त्याला गावावरून येताना खेळणी आणते, खाऊ आणते. अशी बरीच आमिषं  दाखवली; परंतु तो काही केल्या मानेना. शेवटी मी माळ्यावरची बॅग काढून त्यात तिघांचेही कपडे भरले.
               आता घरात एकटे बाबाच राहणार, मग एवढा मोठा दोन वेळेला पुरेल असा केलेला स्वयंपाक, वायाच जाणार. म्हणून मी थोडा घरात ठेवून बाकीचा बरोबर बांधून घेतला. मी मुलांचे ड्रेस इतर सर्व आवरून, माझे आवरू लागले. तोपर्यंत यांनीही यांचा एक ड्रेस व इतर कपडे आणून बॅगेमध्ये ठेवं असे सांगितले. आता मात्र मला या सर्वांचाच राग आला.  प्रत्येकाला चला, चला म्हणून जेव्हा मी मागे लागले होते. तेव्हा कोणीही तयार नव्हते. आता मात्र सगळेच तयार झाले. नंतर मी सोहम मावशीकडून आला का बघायला सागरला पाठविले तर सोहम कुलूप लावून चावी घेऊन तिकडे गेलेला अजून आलाच नव्हता. सोहमच्या मावशीकडे सागर आणि तनिष्काला पाठविले, तर सोहम मावशीसोबत नुकताच बाहेर गेला होता. घराला कुलूप होते. मला तर काहीच सुचेना. शेवटी सगळी आवराआवर करून आम्ही सोहमची वाट बघतच, घराला व गेटला कुलूप लावून बाहेर पडलो. सोहम कडे त्याच्या घराची व गेटची चावी होतीच. भाडेकरू व आम्ही नसताना ज्या मुलाला घराची राखण म्हणून झोपायला सांगत होतो. तो मुलगाही आज सकाळीच गावाला गेला होता. त्याच्याकडे तरी चावी ठेवली असती; पण शेवटी नाइलाज झाला. सर्व आवरून  कुलूप लावून आम्ही निघालो. घराची चावी मात्र नेहमी भाडेकरूंच्या घरात ठेवत असू, ती आज ठेवली नाही. शेजारीही कुठे ठेवावी असं वाटलं नाही. आजपर्यंत सोसायटीत कधीच चोरीचा प्रकार झाला नव्हता. त्यामुळे आम्ही बिनधास्त निघालो. गाडीवर स्टॅण्ड पर्यंत जाऊन नंतर एसटीचा प्रवास. गाडीवर सर्वजण बसून ह्यांनी किक मारणार, एवढ्यात ननवरे सरांचा फोन आला.
‘ जरा माझं काम होतं येऊ का?’
यांनी लगेच,
‘आम्ही गावाला निघालोय. दोन दिवसांनी आल्यावर या.’
असा निरोप दिला. मला यांचा नेहमीच राग येतो. फोनवर बोलत असताना जणू पुढचा माणूस बहिरा आहे, असे समजून मोठ मोठ्याने बोलायची यांची सवय काही केल्या कमी होत नव्हती. यांच्या फोनवरचे संभाषण शेजारील व पुढील घरात हमखास ऐकू जाते. माझ्या चेहऱ्यावरचे भाव यांच्या लक्षात आलेच. की लगेच त्यांनी स्पष्टीकरण दिले.
‘ हळू बोलणे तत्त्वात बसत नाही.’
शेवटी आमची गाडी स्टॅण्डच्या दिशेने निघाली. रस्त्यात पुन्हा अनुष्का, माझी मैत्रीण तिच्या गाडीला ओव्हरटेक करून   आम्ही तिच्या पुढे निघालो. तिचे आमच्याकडे किंवा आमचे तिच्याकडे लक्षच नव्हते; पण तनिष्काने
‘अनु मावशी.’
म्हणून जोरात हाक मारली. सिग्नलजवळ तिची गाडी थांबली आणि आम्हीही थांबलो.
‘ काय, एवढी मोठी बॅग घेऊन कोठे निघाला?’
तिचा तिच्या या वाक्यावर, आम्ही कोणी बोलण्याआधीच तनिष्काने एवढ्या गर्दीत प्रचार सभा घेतल्या सारखे सर्व सांगितले. तिच्या सांगण्याच्या शैलीवर खूश होऊन आसपासच्या चार -पाच गाड्यांवरील लोकांनी वळून, वळून पाहिले आणि कौतुकाने भुवया उंचावल्या. एवढ्यात सिग्नल सुटला आणि आम्ही निघालो. स्टँडवर आलो, एवढ्यात गाडी लागलेली होती. गाडीमध्ये व्यवस्थित जागाही मिळाली. या सर्व गोंधळात बरोबर दागिने घ्यावे, कमीत कमी ते कार्यक्रमाला उपयोगी पडतील. एवढेही माझ्या लक्षात आले नाही. मी या सर्व विचारचक्रात असतानाच, ह्यांना एकदम उचकी लागली आणि मी विचारातून जागी झाले. पर्समधून पाण्याची बाटली काढून त्यांच्या हातात दिली. पाणी पिल्यावर त्यांनी मला ‘काय विचार करते?’
असा प्रश्न केल्यावर, काय विचार करून नि काय सांगू. मी शांत बसले.
‘ ते दागिने कुठे ठेवले होते? काही दागिने बरोबर घेतले होतेस?’
या वाक्यावर तिजोरीत आणि कपड्यांच्या कपाटात, दिवाणमध्ये. एवढं उत्तर दिल्यावर आणि मी बरोबर काहीच आणलं नव्हतं, हे सांगितल्यावर यांनी बसच्या खिडकीतून बाहेर पाहायला सुरुवात केली. काय काय गेले होते, याचा फक्त अंदाज करणेच आमच्या हातात होते. बसमध्ये बसल्या बसल्या यांनी यांच्या दोन- चार मित्रांना फोन केले. एका मित्राला घरी जाऊन एकंदरीत परिस्थिती पाहायला सांगितली. आमच्या दोघांचंही मन स्थिर नव्हतं. आम्हाला काहीच कळत नव्हतं. शेवटी एकदशी आम्ही यांच्या गावाला आलो. बसस्थानकावरून गाडी घेऊन घराकडे गेलो. घराच्या अलिकडच्या चौकात शेजारचे साठे काका भेटले.
‘ काय सुरेश कुठे गेला होता?’
‘ काही नाही काका. कार्यक्रमासाठी गावाला गेलो होतो.’
माझ्या मनात आलं बहुतेक यांना माहित नसेल चोरी झालेली.  एवढ्यात काका म्हणालेच. 
‘ अरे, गावाला जाताना सांगायला नको. आम्ही लक्ष दिलं असतं ना. चोरी व्हायचा प्रश्नच नव्हता.’
यावर हे गप्पच राहिले. साठे  काकांनी अफरातफर केली, म्हणून कंपनीने त्यांना काढून टाकले होते. तो माणूस इमाने इतबारे घर राखण करू शकला असता ? पुढे निघालो, सोसायटीत प्रवेश केला तो पर्यंत जाधवांनी अडवलेच.
‘काय व्यवहारे? साधी कल्पना दिली असती तर मुलांना तुमच्या घरी झोपायला पाठवले असते.’
हे काही बोलणार तेवढय़ात मी हळूच डोळ्याने गप्प राहा, म्हणून खुणावले. कारण गेल्या वेळेस आम्ही पुण्याला जाताना जाधवांना, दोन दिवस मुलांना पाठवा म्हटल्यावर,
‘ अहो आजकालची मुलं, कुठं ऐकतात हो आई बापाचं?’
म्हणून त्यांनी पाठवण्यास नकार दिला होता. आम्ही घराजवळ पोहचलो. घराच्या आसपास गर्दी वाढलेली होती. प्रत्येक जण आम्हाला असं पाहत होता, जसं आम्ही काही तरी जगावेगळं केलंय. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव माझ्याच्याने बघवेना. एकतर बसमधून येताना, मी माझ्या नवऱ्याला किती सांभाळून आणलं होतं. एखाद्या लहान मुलांचं खेळणं हरवलं किव्हा तुटल्यावर आपण जेवढ्या हिकमतीने त्याला शांत करून समजावून सांगतो, त्या पद्धतीने मी त्यांना समजावत होते. मागे एकदा प्लॉट घेण्यासाठी पैसे हवे होते. त्या वेळेस माझे सर्व दागिने विका. म्हणून मी मन मोठं केलं होत; पण यांनीच कधी मनावर घेतलं नाही. आज मी स्वतः त्यांना परत परत एवढंच सांगत होते की, मला दागिने नकोच होते. सोन्यासारख्या माझा संसार तुम्ही व मुलं हेच माझ्यासाठी खूप आहे. एवढं सगळं सांगितलं होतं. मला इथून पुढे सोन्याचे अलंकार नको. इतके सारे सांगून मी समजूत घातली होती. आम्हा दोघांना त्या गर्दीतून वाट काढत पुढे जावे लागले. आम्हाला यायला दीड- दोन तास लागले होते. ह्यांनी लगेच पोलिस चौकीत फोन केला. स्वतः जाऊन कम्प्लेंट नोंदवली. अवघ्या अर्ध्या पाऊण तासात पोलिस आलेच. पोलिस येईपर्यंत आम्ही दार उघडलेच नव्हते. शेवटी आम्ही त्यांची सर्व प्रक्रिया होईपर्यंत, आत जाऊ शकलो नाही. आम्ही घरात जेवढ्या भागात परवानी होती, तेवढेच जाऊन आलो. चोरट्यांनी घरात बराच धुमाकूळ घातला होता. शेजाऱ्यांच्या सांगण्यावरून तर, रात्री दीड ते तीनच्या सुमारास चोरीचा प्रकार घडला होता, हे लक्षात येत होते. पोलीस पुन्हा पुन्हा,
‘ तुम्ही घरात किती दागिने ठेवले होते?  कुठे ठेवले होते?’
म्हणून विचारात होते. कपाटावर दागिन्यांच्या डब्यात व इतरत्र हातांचे ठसे शोधत होते. पोलिसांचा श्वानही येऊन गेला. तो घरात फिरून पुन्हा घरापासून लांब असणाऱ्या मैदानावर जाऊन तेथेच रेंगाळू लागला. पुन्हा घराकडे परत आला. मुळात घाबरल्यामुळे कोण कोणते दागिने होते हेही सांगणे अवघड जात होते. चोरट्यांनी घरांची व्यवस्थित सफाई केली होती. बेडरूम मधल्या कपाटातून, पुस्तकाच्या कपाटातून आणि धान्याच्या कोठ्या, पिठाचे डबे. माळ्यावरच्या मोठ्या पत्र्याच्या पेटय़ा, सर्व वस्तूंची उलथापालथ करून पाहिजे तो ऐवज घेऊन ते पळाले होते. घरातील डीव्हीडी प्लेअर, कॅमेरा, रेडिओ, बॅटरी सर्व घेऊन गेले होते. जणू ते या घरचे जावई होते. पोलिसांची चौकशी व पंचनामा याला तीन ते चार तास गेले. सकाळी साडेआठला सुरू झालेले भयनाट्य, आता कुठं रंगात आले होते. शेवटी आम्ही चार- साडेचारला शरीर धर्म म्हणून जेवायला बसलो, तर चौकशी करण्यासाठी येणाऱ्या लोकांचा ओघ सुरू झाला. स्वयंपाक करायलाच खूप अडचणी आल्या होत्या. शेवटी शारीरिकच काय मानसिक स्थितीही राहिली नव्हती. भूक तहान सर्वच कुठल्या कुठे गायब झालं होतं. एवढ्या अगतिकतेने प्रेमाने आलेल्या लोकांना भेटायला हवेच. सकाळपासून चाललेल्या घडामोडींमुळे डोकं दुखू लागलं होतं. आलेल्या प्रत्येकाला पुन्हा, पुन्हा शनिवार दुपारपासून रविवार दुपारपर्यंत सर्व सांगायचं म्हणजे सोपं नव्हतं. राधिका सर्वजन येण्याचा ओघ कमी झाल्यावर सायंकाळी सहा साडेसहाला आली.
‘ निशा मॅडम, मी रात्री तुम्ही कोणीच नसल्यामुळे सोहमला घेऊन खूप जागी राहून सिनेमा पाहिला आणि नंतर बारा साडेबाराला झोपी गेले.’
खरं तर तिनेही मगाशीच पोलिसांना सांगितलं होतं आमच्या सर्वांपेक्षा तीच जास्त घाबरली होती. राधिकाचा नवराही आला होताच, तिला आधार देण्यासाठी. तिचे आईवडीलही आले होते. हे सर्वजन येऊन गेल्यावर, मी यांना प्रश्न केला. ‘नेमकी चोरी कुणाकडं झाली?’
पण असो शेवटी बिचारी ती तरी काय करणार. चोरांनी तिला आत ठेवून  बाहेरून कडी लावून व्यवस्थित कार्यक्रम उरकला. राधिकालाच काय; पण शेजारी चोर येऊन गेल्याचं कोणालाच माहीत नव्हतं. रविवारी सकाळी शाळेला सुट्टी असल्यामुळे ती निवांत उठली. जेव्हा बाहेर दूधवाल्याच्या गाडीचा आवाज आला, तेव्हा ती उठून बाहेर निघाली; पण दार उघडेच ना. म्हणून तीने खिडकीतून ओरडून दूधवाल्याला दार उघडण्यास सांगितले. गेटवरून उडी मारून आत येऊन त्याने दार उघडले. शेजारी आमच्या घराकडे पाहताच तिला तिच्या दाराला कडी  असण्याचे रहस्य उलगडले. घरात कोणीतरी असावे, त्याप्रमाणे दार उघडले होते. दूधवाला आल्यामुळे चोरी झाल्याचे माहीत झाले. रो हाऊसमध्ये राहाणारे आम्ही सर्वजण एकमेकांना वेळप्रसंगी मदत करून राहात होतो. आज चौकशीला येणाऱ्या जाणाऱ्यांची रांग एवढी लागली होती की, उठून दिवा लावावा की फ्रेश व्हावं, एवढही करावंसं वाटेना. आमच्या सोसायटीत मात्र सर्वांनीच आजपर्यंत कोणाच्याच घरी चोरी झाली नाही; पण तुमच्यामुळे सुरुवात झाली. या भावनेने बोलायला सुरुवात केली होती. आम्ही घरात दागिने ठेवून गेलो, ही आम्ही केलेली चूक पुन्हा पुन्हा ते लक्षात आणून देत होते. रात्री अकरा- साडेअकरापर्यंत लोक येतच होते. जेवण झाल्यावर शतपावली करत करत, आमचं घर हे भेट देण्यासाठी. रात्री बारा वाजता दूध पिऊन आम्ही सगळे झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी दारावरच्या बेलने जाग आली. राधिका वृत्तपत्र घेऊन आली. यांच्या नावासह चोरीची बातमी आली होती. घरमालकाने कोणता तरी मोठा पराक्रम केल्यासारखे नाव वृत्तपत्रात आलेले पाहून, तिला आनंद झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आल्यावर वृत्तपत्र देऊन ती शाळेला जायचं म्हणून निघून गेली. माझ्याही घरात सर्वांनाच जायचं होतं. मुलांची शाळा, यांचं ऑफिस होतंच. मी पटपट आवरून स्वयंपाकाला सुरुवात केली. मुलांची रिक्षा आल्यावर त्यांना रिक्षापर्यंत सोडवायला गेले; तर रिक्षावाल्या काकांनी
‘काय भानगड?’
म्हणून विचारले. मुलांना सोडून गेटमधून आत जाताना पाहिले, बायका घोळक्याने चर्चा करताना  दिसल्या. माझ्या मनात विचार आला. एवढ्या सकाळी यांना काही कामधंदा आहे की नाही; पण त्या सर्वजणी निवांत वाटत होत्या. मी मात्र माझं राहिलेलं काम करण्यासाठी घरात आले, यांनीही आवरले. ऑफिसला निघणार एवढ्यात फोन खणखणला.  ह्यांच्या ऑफिसमधले साहेब, त्यांचा स्टाफ भेटायला येणार होता. वृत्तपत्रातील बातमी वाचून सांत्वनपर फोन येऊ लागले. फोन केला तरीही ते सर्वजन परिस्थितीची पाहणी व विचारपूस करायला येणार होतेच. यांना नाइलाजाने रजा घ्यावी लागली. येणाऱ्यांची रांग पुन्हा सुरू झाली. हळूहळू येणारे जाणारे वाढू लागले. एकाला गेटपर्यंत जाऊन सोडून येईपर्यंत, दुसरा येतचं असे. दुपारपर्यंतच्या भेटीमधून लोकांनी आम्हाला एवढंच सांगितलं,
‘ सर तुम्ही आणि वहिनी एवढ्या हुशार असताना, तुमच्या कडून अशी चुक व्हावी म्हणजे गहाळपणाचे लक्षण आहे.’
शेवटी काय तर तुमच्यासारख गहाळ कोणी शोधूनही सापडणार नाही. आता आम्हा दोघांना आपण पोलिसांमध्ये तक्रार का नोंदविली? याचा पश्चाताप झाला. कारण पोलिसांनीच वृत्तपत्रात बातमी दिली आणि चोरीचा होऊ नये एवढा प्रचार झाला. चोरी झाल्यावर भेटायला येणारे पाहुणे तर दोन- चार दिवस मुक्काम केल्याशिवाय जातच नव्हते. चोरीला पाच- सहा दिवस झाल्यावर पोलिसांचे फोन येऊ लागले. पहिलेच त्यांची चार- पाच दिवस रजा झाली होती. पुन्हा पोलिस स्टेशनच्या फेऱ्या. चोरी झाल्यावर सहा- सात दिवसांनी गावाकडून सासूबाई -सासरे येऊन गेले. देवाचं बघा, शुभ- अशुभ  अमुकतमुक. बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या. एकंदरीत त्यांनी त्यांच्या लेकाच्या म्हणजे सुरेशच्या एवढंच  डोक्यात घातलं की, सुरेश तुझी बायको नुसती बोलण्यात हुशार आहे. झालं प्रत्येकाचं काम झाल्यावर सल्ले ऐकून डोकं किटलं होतं. मला आणि ह्यांना या वातावरणाचा कंटाळा आला होता. मुलांना मात्र मजा वाटत होती,कारण दररोज नवीन लोक घरात येत होते. त्यांच्याशी बोलण्यात आमचा वेळ जात होता. या वेळात बाहेर खेळायला जाणे. टी. व्ही. पाहणे, दंगा मस्ती करणे या सर्व गोष्टी त्या दोघांनी मनसोक्त करून घेतल्या. यांचं तर चोरी झाल्यामुळे जेवढं डोकं दुखत नव्हते, तेवढे लोकांच्या सल्ल्यामुळे दुखू लागले. हा सर्व भेटायला येण्याचा कार्यक्रम एक- दीड महिना चालू होता. यांनी पाच- सहा दिवस रजा काढली होती. मात्र पुन्हा पुन्हा ऑफिसला जाण्यापूर्वी आणि नंतर लोक भेटायला येत.
                 एके दिवशी दोघं निवांत बसल्या बसल्या चोरीचा सहज विषय निघाला. खरंच माझे सर्व दागिने घरात असावेत, हे चोरांना कसे कळले असावे. शेवटी दोघांच्या चर्चेतून आमच्या लक्षात आले की, आपण गावाला जाताना घरातून बाहेर पडल्यावर स्टँडपर्यंत जाईपर्यंत ज्या एक दोन व्यक्ती भेटल्या व त्यांच्याशी जो आपला संवाद झाला. त्यातून लक्ष ठेवून झालेली ही घटना असावी. असा आमच्या दोघांचा अंदाज होता.
             पोलिसांचे फोन येणे कमी झाले. तसंच भेटायला येणाऱ्यांचे प्रमाणही कमी झाले. मीही हळूहळू दागिने विसरण्याचा प्रयत्न करत होते. सण आल्यावर मात्र मनात चलबिचल होत असे; पण जाऊ दे. आपल्या नशिबातच नव्हते म्हणून मी सोडून देई. शेवटी काय
‘कोल्ह्याला द्राक्ष आंबट’
म्हणतात. तसंच गेल्या दीड- दोन ममहिन्यात एवढे समजले.
न मागता सल्ला फुकट मिळतो. मनात नसले तरी ऐकणे मात्र भागच असते. हे चांगलेच कळाले; कारण दिवसामागून महिने, महिन्या मागून वर्ष गेली. तरीही चोरीचा पत्ता लागलाच नाही आणि त्या केसचा पाठपुरावा  करण्या इतका वेळ ही आमच्याकडे नव्हता. नाहीतरी सामान्य माणसाला न्याय मिळणे कठीणच असते.                 
 
सौ. आशा अरुण पाटील      
             सोलापूर

One Reply to “अनपेक्षित”

Comments are closed.

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Don`t copy text!