अंश

                               ‘दोन दिवसात किराणा संपेल सायली, यादी करून दिली होती. तेवढं आठवणीने ऑफिसमधून येताना घेऊन ये सामान.’
आईचा फोन ऐकून हो.. हो.. म्हणून मी फोन ठेवला. मला खरं तर आईचा राग येत होता. आई सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर सोपवून रिकामी होत होती. घरात मी सोडून कोणी नव्हतंच का? मान्य होतं मला बाबांचं प्रकृतीमुळे नाईलाजाने घरात बसणं. राजू घरात होताच की. पूजा आणि लीना माझ्यापेक्षा छोट्या बहिणी. लग्न झाल्याने दिल्या घरी सुखात संसार करत होत्या. मी कमवती असल्याने मी स्वतः लग्नाला नको म्हणाले. बनारसी, चंदेरी, पटियाला, पैठणी अशा साड्यांचे वेड पूजाला. तर लीनाला टीशर्ट-पॅन्ट, थ्री फोर्थ, बॉयकट, बॉबकटचं वेड. राजू तर पहावं तेव्हा घराच्या अंगणात भिंतीवर बॅटने बॉल टोलवत राहायचा. या सर्वांचा विचार करत करतच मी दुकानात पोहोचले.
‘या मॅडम, यादी आणली ना! पंधरा-वीस मिनिटात सामान काढून देतो तोपर्यंत बसा.’
            मी फक्त पहात आणि ऐकत होते. बोलत काहीच नव्हते. मी फक्त ‘हो’ म्हणून बाजूला ठेवलेल्या खुर्चीवर बसले. सामान घेतल्यावर घरी जाण्यासाठी रिक्षा मिळेल ना म्हणून माझी नजर रिक्षेचा शोध घेत होती. तेवढ्यात’ मॅडम सामान’ म्हणून दुकानदाराने हाक मारली. मी एक एक बॅगा बाहेर आणून ठेवल्या. ‘रिक्षा…’ म्हणून रिक्षा दिसताच हाक मारली. पण एकही रिक्षा रिकामी नव्हती. आज सकाळपासून ऑफिसमध्येही  कामाचा ताण होता आणि परत आईचा फोन. कधी एकदा घरी पोहोचते असं झालं होतं. पण मध्यमवर्गीय असणं चुकीचंच असं मी मनाशी पुटपुटले. एवढ्यात कोणीतरी बोलल्याचा आवाज आला.
     ‘ मला काही म्हणालात?’
मी जवळ जवळ दचकलेच. माझ्या शेजारी साधारण तीस-एकतीस वयाची व्यक्ती उभी होती. मी त्याच्यापासून दूर सरकत उभी राहिले. मला जरा त्याचा रागच आला. ओळखपाळख नसताना का बरं बोलतोय हा माणूस माझ्याशी? असं मनातल्या मनात मी विचार करतच होते. तेवढ्यात जसं काही माझ्या चेहर्‍यावरचे भाव त्याला कळले असावे.
‘मॅडम, मी तुमच्या शेजारीच राहतो.’
‘काय.. तुम्ही.’
‘हो ना…’
‘यापूर्वी नाही पाहिलं.’
‘एक वर्ष झालं असेल.’
‘हो का?’
‘हो.’
एवढ्यावर संभाषण मीच संपवलं. एक तर कामाचा ताण, दिवसभराचा कंटाळा, जबाबदाऱ्यांचे ओझे याने मी शक्ती नसलेल्या रुग्णासारखी झाली होते. असं माझं मलाच वाटत होतं. रिक्षा दिसली म्हणून मी हाक मारली. एकाच वेळी दोघांच्या तोंडून शब्द बाहेर पडले. रिक्षा… मी रागाने त्याच्याकडे पाहिले आणि तो मात्र माझ्याकडे हसत पहात होता.  मी रागातच होते.
‘मिस्टर, रिक्षेला प्रथम मी हात केला. मी हाक मारली मीच जाणार.’
पण माझ्या या बोलण्यावर तो लगेच म्हणाला,
‘अंश, अंश नाव आहे माझं. मला मित्र आशु पण म्हणतात. तुम्ही आवडेल त्या नावाने हाक मारा.’
मी आता खूप चिडले होते.
‘मिस्टर मला तुम्हाला हाका मारत बसायला वेळ नाही. मला जायचं आहे.’
माझं बोलणं होण्याच्या आत तर ती व्यक्ती माझी एक बॅग घेऊन रिक्षात बसली देखील होती. मी चिडून रिक्षावाल्याला म्हणाले,
‘एक तर याला ने नाहीतर मला.’
  यावर रिक्षावाला हसत म्हणाला,
  ‘दोघेही चला. मला काय?’
   मला त्याचं खोचक बोलणं आणि हसणं लक्षात आलं. मनातल्या मनात मला येत होत्या नव्हत्या तेवढ्या सगळ्या शिव्या देऊन झाल्या. मी माझी बॅग उतरवणार तेवढ्यात दुकानदार मध्ये पडला.
  ‘ मॅडम, आता शाळा कॉलेज सुटल्याने तुम्हाला स्पेशल रिक्षा मिळणे कठीणच. रिक्षा शेअरच करावी लागेल. या साहेबांना तुम्ही ओळखत असाल तर रिक्षा शेअर करायला काय हरकत नाही.’
कसल्याही परिस्थितीत मला हे मान्य नव्हते. पण जीवनात बऱ्याच वेळा काही निर्णय वेळ प्रसंग पाहून त्यानुरूप घ्यावे लागतात. काही तत्वांच्या बलिदानाची वेळ येतच असते. मी रिक्षात चढायला वळले, तशी अंशने माझ्या हातातली बॅग घ्यायला हात पुढे केला.
‘ काही गरज नाही, मी समर्थ आहे.’
असं रागाने म्हणाले आणि झटकन सीटवर बसले. पण रागात आणि गडबडीत असल्यामुळे रिक्षा डोक्याला खटकन लागली. मी लागलं तरी तसंच सहन करून शांत बसले.
‘लागलं ना!’
यावर मला त्याला चार वाक्य तरी ऐकवावी वाटली पण दुसर्‍याच क्षणी मी विचार केला. मी माझी कार्यक्षमता वाया का घालवतेय.’
मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून बाहेर पहात बसले. तसा तो माझ्याशी काही ना काही बोलण्याचा प्रयत्न करतच होता. मी पण दुर्लक्ष करत होते. तरीही तो काही हार मानत नव्हता. त्याची बडबड सुरूच होती. घराजवळ पाच मिनीटाच्या अंतरावरच बाबा दिसले. मी बाबा म्हणून हाक मारून त्यांना रिक्षात घेण्यासाठी रिक्षा थांबवून त्यांना रिक्षात घेतलं. आता बाबा आमच्या दोघांमध्ये होते. बाबांची आणि अंशची चांगलीच ओळख होती. आमच्या शेजारच्या पाटील काकांच्या घरीच तो भाड्याने राहत होता. त्या दोघांच्या छान गप्पा सुरू झाल्या. खरं तर बाबांनी त्याच्याशी बोलणं चुकीचं आहे, असं मला वाटत होतं. पण बाबांना मी तिथे काहीच म्हणू शकले नाही. पाच मिनिटात घर आले. रिक्षांचे पैसे देऊन काही बॅगा घेऊन मी घरात गेले. तर माझ्या मागे काही वेळाने तो बॅगा घेऊन आला. मी रागानेच बाबा बाबा… म्हणून हाका मारल्या. तसं अहो असू द्या काकांना कशाला त्रास म्हणून मीच घेतल्या. हे त्याचे उत्तर ऐकून मला रागच आला. तेवढ्याच बहाण्याने तो घरात घुसला होता. ही माझी भावना माझ्या नजरेतून त्याला जाणवली असावी. बाबांनी त्याला चहा घेऊन जा म्हणून आग्रह केल्यावर ही तो काही थांबला नाही. नाही, नको पुन्हा कधीतरी म्हणून तो निघून गेला.
               हळूहळू ऑफिसला जाता येता आमची भेट होऊ लागली. तो काही ना काही कारण काढून बोलत असे. खरं तर प्रथम मला त्याने बोलायचा प्रयत्न केला तरी राग येई. पण हळूहळू त्याच्या अस्तित्वाची जणू सवयच झाली. पाटील काका आणि आमच्या घरात एक भिंत सामायिक होती. पाटील काकू आमच्या घरी आईकडे येत जात असत. भाजी, चटण्या, लोणची यांची देवघेव होत होतीच. पण हे त्या दोघींच चाले. आता अलीकडे मी ही भाजीची वाटी घेऊन जाई. त्या निमित्ताने मला अंशला बघितलं की मनाला समाधान वाटे. अंशची ही स्थिती माझ्या सारखीच होती.  त्याच्या घरचे गावाकडे राहत होते. त्यांची गावी थोडीफार शेती होती. त्याचा मोठा भाऊ शेती करत होता. दोन नंबरला बहिण होती. मोठ्या भावाचे आणि बहिणीचे लग्न झालं होतं. अंशला नोकरीला लागून दोन- तीन वर्ष होत आली होती. त्याच्या ही लग्नाच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. हे सारं त्याच्या बडबड्या स्वभावामुळे मला त्याच्याकडून कळलं होतं. तशी राजूबरोबर त्याची छान गट्टी जमली होती. राजू, बाबा आणि आई साऱ्यांशीच त्याचे छान पटायचे. एकंदरीत आनंदी आनंद गडे असेच वातावरण तयार झाले होते.
               एके दिवशी पाहुणे येणार म्हणून घरात सर्वांचीच  गडबड सुरू होती. मलाही पाहुणे येण्यापुर्वी एक दिवसंच आधी सांगण्यात आलं. मुलगा इंजिनियर होता. घरची परिस्थिती चांगली होती. मुलाला एक बहीण होती. तिचे  लग्न झाले होते. मुलाला नोकरी करणारी मुलगी हवी होती. खरंतर मला हा मुलगी बघण्याचा कार्यक्रम अजिबात आवडत नव्हता. मी बऱ्याच वेळा आई- बाबांजवळ याविषयी नाराजी व्यक्त केली. पण जनरीत या नावाखाली ते मला गप्प बसवत. सगळी तयारी झाली होती. आज ऐनवेळेस राजूकडून दूध सांडल्याने आई नाराज झाली. मी कमवती असल्याने लग्न हा विषय माझ्यासहित कुणीच डोक्यात घेत नव्हते. वेळ निघून गेली असं वाटत असल्याने माझंही लग्न करण्याचं मन नव्हतं. कसंतरी आज मी तयार झाले होते अन् राजू कडून दुध सांडले. हा तिला अपशकून वाटत होता. मी तिला समजावलंही होतं. आई असं काही नसतं. आई पाहुणे येतीलच. त्याच्यावर रागावण्यापेक्षा त्याला पटकन दुधाची पिशवी आणायला सांग. हा माझा सल्ला तिला आवडला. एवढ्यात पाहुणे आल्याचा फोन आला आणि राजू आणि बाबा त्यांना आणायला गेले. आता दूध कोण आणणार? आईने मी काही बोलायच्या आत आशुला हाक मारली देखील. अंशला दूध आणण्याविषयी सांगितल्यावर, पाहिले तर तो दुध आणायला निघाला. जाताना मी साडी घालून आवरल्याचं  त्याला दिसले. त्याने आईला कुठे बाहेर निघालात का? म्हणून विचारले. त्यावर आईने सविस्तर खुलासा केला. तो ऐकून त्याचा चेहरा एकदम पडला. तो काकू, मला कसतरी होतंय. म्हणून पहिल्यांदा खुर्चीवर बसला. मी शेजारच्या खोलीत होते. मी ही पटकन गेले. आई पाणी आणायला गेली. राजू आणि बाबा थोड्यावेळापूर्वी पाहुण्यांना आणायला गेल्यामुळे ते सोसायटीच्या बाहेर होते. तेवढी संधी साधून त्याने मला पटकन सांगून टाकले.
‘तू मला खूप आवडतेस माझं तुझ्यावर प्रेम आहे. माझ्याशी लग्न करशील.’
               घाईघाईत बोललेली त्याची वाक्य माझ्यासाठी अनपेक्षित होती. माझ्या चेहऱ्याचा रंगच उडाला. माझ्या मनात ही भीती होती की आईने ऐकले तर नाही ना! पण आई आल्यावर तिच्या चेहऱ्यावर त्याच्यासाठीचे काळजीचे भाव पाहून. तिने ऐकले नाही याची माझी खात्री झाली. त्याने पाणी घेतलं आणि आलोच काकू म्हणून तो झटकन उठला. तू नको धावपळ करू राजू आणेल. असं आईचे वाक्य पूर्ण व्हायच्या आत तर तो माझ्याकडे पहात मला उत्तर हवं आहे असं म्हणत बाहेर पडला. आईच्या हे लक्षात आले नाही नशिबच.
               मी झालेल्या प्रसंगाने गांगरून जरी गेले तरी त्याच्या प्रेमाने मोहरले होते. माझ्या चेहऱ्यावरची गुलाबी छटा, नकळत माझ्याही मनाने दिलेला होकार. यामुळे एक वेगळे तेज आणि आत्मानंद  चेहर्‍यावर झळकू लागला. दुधाची पिशवी देऊन तो निघाला. एवढ्यात पाहुणे त्याला दारातच गाठ पडले. बाबांनी त्याला घरात येण्याचा, बसण्याचा आग्रह केला. पण नाही नको मला काम आहे असा बहाणा करून तो सटकला.
               पाहुणे चार दिवसापूर्वी येऊन गेले. ऑफिस आणि दररोजच्या कामात मी सर्व विसरून गेले होते पण पाहुण्यांचा होकार आला. घरात गडबड सुरू झाली. अंशला  राजू कडून कळाले, तो नाराज झाला. त्याने वेळ साधून
‘मला उत्तर हवं आहे.’
असं म्हणून हट्ट सुरू केला. त्याचं सारखा माझ्यामागे असणं  खरंच कुणाच्या लक्षात येत नसेल का? मला तर काहीच कळत नव्हते. छोट्या दोन बहिणींची लग्न झाली. वडिलांचे काम अचानक अॅटॅक आल्याने गेले. डॉक्टरांनी त्यांना हालचाल करु नका असे सांगितले होते. त्यांना काम नसल्याने घराची आर्थिक धुरा माझ्याच खांद्यावर. यासाठीच मी कधी स्वतःहून लग्नाला तयार झाले नाही आणि घरच्यांनी आग्रह केला नाही. आजकाल मात्र मैत्रिणींचे फुललेले संसार पाहून माझ्या मनात आपल्यालाही साथीदार हवा असं वाटू लागलंय. एका मनाने आईला सांगावं असं वाटत होतं. तर दुसरं मन आशंकित होत होतं. पाहता पाहता मी त्याच्या प्रेमात पडले, हे माझ्या लक्षातही आले नाही.
                एके दिवशी अचानक अंशने मला गच्चीवर बोलावून घेतले. मी घरातल्यांची नजर चुकवून वर गेले खरी पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून घाबरले. त्याला माझे उत्तर हवे होते. मी काहीच उत्तर न दिल्याने तो नाराज होता.
‘तुझ्या मनात नसेल तर राहू दे. पण एकदा मनापासून सांग, तू माझ्याशी लग्न करशील.’
मी त्याच्या या वाक्यावर फक्त, ‘लग्न.’
म्हटल्यावर त्याने आपल्या भावना माझ्यापुढे बोलून दाखवल्या.
‘मी इतर मुलांसारखा नाही. मला चार दिवस प्रेम करून फायदा घेऊन पुन्हा नामानिराळा राहायचं नाही.  तू होकार दिलास तर लगेच माझ्या घरच्यांची परवानगी घेऊन तुझ्या घरच्यांकडे तुझी मागणी घालणार आहे. तशी मी माझ्या घरच्यांना थोडी कल्पना दिली आहे.’
मी काहीच सुचत नसल्याने,
‘ अंश… म्हणजे मी घरात आईला..’
माझ्या तोंडातून पटापट शब्दही फुटत नव्हते. शेवटी मी बोलताना अडकलेलं पाहून तोच माझ्या शेजारी येऊन माझा हात हातात घेत बोलू लागला.
‘ माझे तुझ्यावर प्रेम आहे. मी घरची परवानगी घेऊन लगेच तुला मागणी घालतो. आज मी गावाकडे चाललो आहे.’

मी त्याला पाहतच होते. तेवढ्यात शेजारच्या कुंडीतील गुलाबाचे फुल तोडून एक पाय दुमडून बसत, त्याने माझ्या हातात गुलाबाचे फुल देऊन,
‘तू माझ्याशी लग्न करशील.’
असं विचारल्यावर पहिलं तर मी लाजले पण दुसऱ्याच क्षणी त्याने दिलेल्या मुलाचा स्वीकार केला.  त्याच्या प्रेमात मी दुधात साखर विरघळावी तशी विरघळले. त्याने हलकेच माझ्या हाताचे आणि कपाळाचे चुंबन घेतले. एवढ्यात कोणीतरी वर येत आहे, याची चाहूल दोघांना लागली.  मी त्याच्यापासून दूर सरकले. घाबरल्यामुळे घाई गडबडीत माझ्या हातातले फुल केव्हा खाली पडले, लक्षातच आले नाही. आई माझ्यासमोर येऊन उभारली खरं. माझी तर बोबडीच वळली. अंशही तसा कावराबावरा झाला. मी मनातल्या मनात काय सांगायचे हे ठरवत होते. तेवढ्यात आईने वाकून फुल उचलले आणि अरे तुम्ही दोघे इथे काय करताय? असा प्रश्न चेहर्‍यावर भाबडे भाव आणत विचारला.
‘मी… मी…’
‘नुसतंच मी मी करणार आहेस की, पुढे काही सांगणारेस.’

‘मी सांगतो, माझं प्रेम आहे.’
‘कोणावर?’
‘ म्हणजे सायलीवर.’
‘मग नुसती मजा मारायची अन्…’
‘मी तसा नाहीये. मी लग्न करणार आहे तिच्याशी.’
‘केव्हा, तिचं लग्न दुसर्‍याशी झाल्यावर. पाहुणे येऊन गेले पसंतीही झाली.  तुला माहीतच असेल हो ना!’
‘ हो पण सायली… काकू प्लीज मी खरंच तिच्यावर प्रेम करतो. तिला सुखात ठेवीन. माझ्या भावना समजून घ्या.’
आईने माझ्याकडे पाहिले. भीतीने माझं तर पाणी पाणी झाले, असं वाटू लागलं. एकतर काहीतरी चमत्कार व्हावा आणि जमिनीत पटकन मी गडप व्हावे. नाहीतर आकाशात तरी. पण कसलं काय. आई माझ्या जवळ येऊ लागली तशी मी थरथर कापू लागले. आता पुढच्या क्षणी काय होणार हे कुणालाच माहीत नव्हते. मी तर गच्च डोळे मिटून घेतले. दुसर्‍याच क्षणी आईने मला जवळ ओढले. मी तिच्या कुशीत होते.
‘वेडाबाई तुला माहित आहे का? मांजराला वाटतं मी डोळे झाकून दुध पीतो म्हणजे माझी कृती जगाला दिसत नाही. पण स्वतः डोळे झाकले म्हणजे जगानेही डोळे बंद केले, ही चुकीची धारणा त्याची असते. तशीच तुमचीही झाली.’

आईने तिला आमच्या दोघांची लक्षात आलेली जवळीकता, तिच्या केव्हापासून आणि कशी लक्षात आली ती आम्हा दोघांनाही सांगितले. खरंतर तसं पाहता प्रेम व्यक्त हे आजच झालं होतं. जरी इतके दिवस नजरेनी नजरेशी नेत्र संवाद सुरू होते, तरी तोंडाने काहीच बोललं गेलं नव्हतं. पण आईला मानलं पाहिजे. खरंच ती महान असते. न सांगताही लेकरांच्या मनातले भाव ती सहज जाणते. मी असा काही विचार करत असतानाच आईने अंशने दिलेले फुल माझ्यासमोर धरले.
‘ एवढ्या प्रेमाने दिलेले अनमोल फुल असंच पाडलं खाली.’
असं म्हणत गालातल्या गालात ती हसली. माझ्या प्रश्नार्थक नजरेला लगेच तिने उत्तर दिले. मी गच्चीवर आल्याआल्याच तीही माझ्या मागोमाग आली होती. आपलं कोकरू काही चुकीचं तर करत नाही ना! चुकीच्या भावनांमध्ये वाहून तरी जाणार नाही ना! ही काळजी होतीच की तिला. अंश तिला जावई म्हणून पसंत होता. हे वेगळं सांगायची गरज उरली नव्हती. अंशला तिने घरच्यांना सायलीला पहायला घेऊन ये, असं सांगितलं. आणि माझ्याकडे पाहून ये लवकर खाली. असं सांगूनही गेली. मला तर सारं स्वप्नवत वाटत होतं. तसं पाहता इतक्या दिवस माझ्या लग्नाच्या बाबतीत उदासीन असलेली माझी आई. इतक्या लवकर सगळं मान्य करेल असं मलाच काय पण आणि अंशलाही वाटलं नसेल. आई गेली तसं अंश माझ्या जवळ येऊन मला मिठीत ओढत,
‘चला तर मग राणीसाहेब! असा जातो आणि असा घरच्यांना घेऊन येतो.’
असं म्हणाला. मी पण मग
‘बाकी सगळं लग्नानंतर हं लाडके जावईबापू.’
असं म्हणून त्याला दूर सरकवत खाली पळाले.
‘ हळूहळू पडशील! आता तू फक्त स्वतःचीच नाहीस तर माझा जीव की प्राण आहेस, हे विसरू नकोस.’
हे त्याचं वाक्य माझ्या कानात पुन्हा पुन्हा गुंजत होतं.
              
      

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Don`t copy text!