अट्टाहास तीचा

मन माझे वेडे घेई उंच भरारी,
अवचित काही क्षणी थरथर होई,
अंकुरलेल्या जीवाच्या जाणीवेने
मनाचे सोहळे तन साजरे करी

आज मी सासूबाईंना घेवून दवाखान्यात गेले. खरंतर मी माझ्यात अंश अंकुरित होण्याच्या जाणिवेने आतून बाहेरून मोहरले होते. दवाखान्यात डॉक्टरांनी सांगितले. मी आणि सासूबाई घरी परतलो. घरामध्ये आनंदाची लकेर उमटत गेली, लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच बातमी मिळाली. लीना माझी ननंद तीने तर दादा मला पार्टीला पैसे हवेत म्हणून आत्या होण्याच्या आनंदात अत्यानंद साजरा केला. मला आता एक वेगळीच मनवेडी सवय लागली होती. आपल्या मधील जीवाची अनुभूती डोळे बंद करून घ्यायची. माझे तन मन पुलकित होत होते. मला स्वर्ग दोन बोटंच उरल्यासारखा वाटत होता. मात्र यांच्या म्हणजेच सुरेशरावांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ताण जाणवत होता. खरंतर लग्नानंतर अवघ्या काही महिन्यात बाळ होण्याचा निर्णय आम्हा दोघांचा होता. मग… मी एकेदिवशी यांना विचारलेच पण यांचे विचार ऐकले आणि मी अक्षरशः कोसळले. काही नाही म्हणत म्हणत यांनी मला मुलगाच हवा. हा निर्धार माझ्यापुढे मांडला. पण आपल्या हातात काही असते का? शेवटी मुलगा मुलगी समानच मानायला हवे. बरेच सांगून झाले. पण सुरेशराव आपल्या मतावर अढळ होते. मी आमच्या दोघांमध्ये सुरु झालेल्या तणावाचे कारण घरात सर्वासमोर जाहीर केले. तसं घरामध्ये फक्त सासूबाईच यांच्या बाजूने होत्या. तसे तर यापूर्वी यांचे हे मत नव्हते, पण महिन्यातल्या तिसऱ्या रविवारी यांचे सर्व मित्र गावातच असल्याने एकमेकांना एकत्र एका ठिकाणी भेटतात. तेव्हा त्यांनी आमची गोड बातमी सांगितली. आणि त्यांचा हा अट्टाहास नंतरच सुरु झाला होता. पहाता पहाता दिवस जात होते. एकवेळ आनंदाचा अत्युच्य शिखर गाठले असे वाटणाऱ्या मला आता एक वेगळाच ताण मनावर जाणवत होता. तरीही मी मात्र माझ्या मतावर ठाम होते. यांनी मात्र नामी युक्ती काढली. जेवताना ताटावर चिडचिड करायची. अचानक ताटावरून उठून जायचं. या आणि अशा बऱ्याच गोष्टींमुळे घरातले वातावरण बदलायला लागले होते. सोनोग्राफी करून गर्भलिंग परिक्षण करायचं आणि मुलगी असेल तर… यांच्या हट्टाला मी धाडसाने उत्तर देणार होते. पण एका क्षणी जेव्हा त्यांनी जेवणंच सोडले. त्यावेळेस मी फक्त सोनोग्राफी करण्यास तयार झाले. खरंतर मीही मग अट ठेवली. मी सोनोग्राफी केल्यावर मुलगा मुलगी हे समजले तरी पुढे जो निर्णय घ्यायचा तो मीच घेणार. हो नाही करत यांनी कसेतरी तयार झाले, डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी आमचा विचार सरळ धुडकावून लावला. माझ्या नवऱ्याचे मत ऐकून त्यांच्या अज्ञानाची कीव करावी असेच त्यांना वाटत असणार. त्यांनी सोनोग्राफी करण्याचे मूळ प्रयोजन समजून सांगितले. सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, जिजाबाई, झाशीची राणी, गार्गी, मैत्रेयी, इंदिरा गांधी, प्रतिभा पाटील, सुनिता विल्यम्स, कल्पना चावला या सर्व महिलांचा आदर्श समोर ठेवलाच. पुरुषांइतकेच स्त्रीचेही शेवटी जगाच्या चिरकाल टिकण्याच्या कार्यातले महत्व सांगितले. जीवनात आई, मुलगी, सून, बहिण, आत्या, मावशी, काकू, मुलगी या सर्वजणींमुळे नाती टिकली आहेत. स्त्रीया प्रत्येक क्षेत्रात खांदयाला खांदा लावून कार्य करतात. डॉक्टर ‘जिव्हाळा’ नावाचा वृध्दाश्रम चालवत होते. तिथेही त्यांनी आम्हा दोघांना, आमंत्रित केलं. तो दिवस होता त्रैमासिक मिटिंगचा. या दिवशी आपल्या वृद्ध माता- पित्यांना भेटण्यासाठी मुले येत, पण या दिवशी अवघी बोटांवर मोजण्याइतकी मुलं हजर होती. कारणं आणि अडचणी यांची न येणाऱ्याकडे काही कमीच नव्हती. एकंदरीत चाळीस वृद्ध येथे राहत होते. एका वृद्ध जोडप्याचा एक मुलगा अमेरिकेत, एक चेन्नई, एक दिल्लीत तर एक कॅलिफोर्नियाला होता. मुलगी भारतात कोल्हापूरला. मुलांना आई-वडिलांसाठी वेळ नव्हता. मात्र मुलगी आठवणीने आणि आनंदाने येत होती. ती स्वतःकडे आई बाबांना ठेवायला तयार होती. पण आई-बाबांना मुलीकडे रहाणे पसंत नव्हते. यांनी हे सारं पाहून शांत झाले खरे. पण मनात विचारांचं वादळ उठलं होतं. यांनी सारासार विचार केला व आपण आपला निर्णय बदलल्याचं जाहीर केलं. मला, तर कोण आनंद झाला काय सांगू ? मातृत्वासारखं मोठ्ठं दान देव मला देत असताना मुलगा – मुलगी असल्या अटीतटी का ठेवायच्या? नाहीच ठेवायच्या.
आज आपण साऱ्यांनीय हा विचार केला तरच समानता अंगिकारली असे होईल. आपले प्रगतीच्या दिशेने यशस्वी पाऊल पडणारच. यात काही वाद नाही.

One Reply to “अट्टाहास तीचा”

Comments are closed.

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Don`t copy text!