ध्येय

                   वर्तमानपत्रातील पहिल्याच पानावरील फोटो पाहिला अन् मिनाक्षीला आनंदाने काही बोलताच येईना.
“आई, आई पाहिलंस का? श्यामचा फोटो आलाय बघं ना!” काकूही धावतच आल्या. खरंच त्याचा जिल्ह्यात पहिला क्रमांक आला होता. त्याचा फोटो पेपरमध्ये पाहिला अन् त्याच्या आईला जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले. लेकराने कधी म्हणून कशाचा हट्ट केला नाही. मिळेल ते खाल्ले अन् आपले काम आपण प्रामाणिकपणे केले. कधी हे पुस्तक, तसली वही, असली सायकल, अन् तसला बूट हट्ट म्हणून केला नाही. एक एक गोष्ट सांगून माय माऊली डोळ्यातून अश्रू गाळत होती. मिनाक्षीने आईला, श्यामला फोन करून कळवू म्हणून घाईघाईने तयार केले. त्या दोघी फोन करण्यासाठी गेल्या. श्यामला किती आनंद होईल. त्यांचं स्वप्न होतं.  बाबांच्या माघारी मी बाबांसारखाच शिकून खूप मोठा होईन.
                      तो त्याच्या मावशीकडे मुंबईला गेला होता. आई अन् बहिणीला सोडून सुटीला जायचे त्याच्या खूप जीवावर आले होते. पण मावशीचा आग्रह आणि आईचे मत यापुढे त्याचे काही चालले नाही. त्याला आई नेहमीच सांगे, ‘जगात जरा तरी वावरावे. जगाचा अनुभव मिळतो. माणूस अनुभवाने शहाणा होतो. आपले घर म्हणजेच आपले विश्व मानू नये.’
तसा श्यामचा स्वभाव जास्त अबोलही नव्हता अन् जास्त बोलकाही नव्हता. तो जिथे जाईल तिथली माणसे आपली करून घेत होता. एकंदरीत त्याचे व्यक्तिमत्त्व उठावदार होते. चार चौघात तो उठून दिसत होता. दहावीत असतानाच तो बारावीला असल्यासारखा वाटत होता. गौरवर्ण, कुरळे केस, हसरा चेहरा अन् विनम्र वागणं. त्याचा चेहरा पाहिला की, नेहमीच प्रसन्न वाटे. श्याम चौथीत अन् मिनाक्षी दुसरीत असतानाच अचानक त्यांच्या बाबांना हार्ट अ‍ॅटॅक आला.  काकांना बरे करण्यासाठी काकू, आजी, आजोबा, मावशी या साऱ्यांनी आर्थिक, मानसिक, शारीरिक खूप खूप प्रयत्न केले. खरंतर त्यांचे वय आता कुठे ४०-४२ असेल. पण कामाचा प्रचंड ताण अन् घराच्या कर्जाचे ओझे या साऱ्यामुळे की काय त्यांनी जगाचा लवकर निरोप घेतला. देवही त्याला केलेली उपासना, उपास-तातास सारं सारं विसरला होता. काहीही न ऐकता त्याने श्यामच्या बाबांना नेले होते. त्यांच्या अचानक जाण्याने श्यामचे आजोबाही त्या धक्क्यातून सावरू शकले नाहीत. अन् त्यांनीही साऱ्यांचा निरोप घेतला. अचानक साठे कुटुंबावर आघात झाला. आभाळ फुटलं नाही तर फाटलंच होतं त्यांच्यासाठी. काकूंना तर आता अंधार जाणवत होता. धड शिक्षण पूर्ण करू न देता त्यांच्या आईबाबांनी त्यांचे लग्न केले होते.  त्यांच्यापुढे आता घर कसे चालवायचे हा यक्षप्रश्न आ वासून उभा राहिला होता. काका सरकारी नोकरीत असते तर त्यांच्यानंतर काकूंना साधी का होईना नोकरी मिळून आधार झाला असता. पण खासगी नोकरीत काही खरे नव्हते. उलट काकांनी शेठजींकडून काही रुपये व्याजाने उचलले होते तेच आता देणं  अशक्य होतं. घराचा तेवढा आधार होता. पण त्याचे हप्ते काकू कशा फेडणार होत्या?  आजी स्वतःचं सौभाग्य, पोटचा गोळा गेला या दुःखाने जणू निराधार झाल्या. त्यांना आता जगण्यात काही अर्थच नाही असे वाटू लागले.  पण काकूंनी त्यांना लहान मुलांना समजून सांगावे तसे खूप गोड बोलून समजून सांगितले.
“आई मला कळतंय तुम्हाला केवढं दुःख झालंय. तुमचं लेकरू अन् माझं सौभाग्य देवाने हिरावून घेतलं. पण … पण आता आपल्याला धीर धरून हातपाय न गाळता या दोन बछड्यांना मोठं करायचंय. यांच्या माघारी मलाही जगण्यात काही अर्थ वाटत नाही. पण आपण आपल्यापुरतं बघणं हे स्वार्थीपणाचं होईल ना. त्या जीवांनी माझ्या पोटी आपल्या घराण्यात जन्म घेतला ही त्यांची चूक म्हणता येईल का? मग त्यांना वाढवणे, जीवनात यशस्वी करणे हे आपलेच कर्तव्य नाही का?”
काकूंच्या बोलण्यानंतर आजी खूप रडल्या. त्यांचं मन मोकळं झाल्यावर त्यांना हलकं वाटू लागलं.
“खरंच तू म्हणतेस ते खरं आहे. आपण दोघी मिळून या दोघांना मोठं करू. त्याचे बाबा अन् आजोबा यांची कमी जाणवणार नाही, याचा प्रयत्न करू.”
काकूंचंही मन भरून आलं होतं. त्याही आजीच्या गळ्यात पडून खूप रडल्या. त्यांचं रडणं पाहून श्याम, मिनाक्षी खूप रडले. मी मिनाक्षी सोबत खेळायला जात असे. जास्त काही समज नसली तरी काकूंच्या डोळ्यात पाणी पाहिलं की, मला वाईट वाटे. श्याम अन् मिनाक्षी दररोज देवानंतर काका आणि आजोबांच्या पाया पडत. दोघांच्या आशीर्वादानेच त्यांच्या दिवसाची सुरुवात होत असे.
                       हळूहळू काकू अन् आजीमध्ये मायलेकीचं नातं तयार झालं होतं. खरंतर सासू-सुनांची काका आणि आजोबा असताना थोडीफार कुरबूर होत असे. पण अलीकडे मात्र त्यांच्यातलं वातावरण एकदम बदललं होते घरात चौघच जण होती पण एकमेकांना सोडून ते कोणतीच गोझ करत नसत. बघता बघता आम्ही मोठे होत होतो. मिनाक्षी अन् श्याम आहे त्या परिस्थितीतही खूप जिद्दीने, परिश्रमपूर्वक यश मिळवत होते. मिनाक्षी तर प्रत्येक इयत्तेत प्रथम क्रमांक सोडतच नसे. श्याम काही कमी नव्हता. तोही खूप अभ्यास करे आणि वर्गात नेहमी अव्वल राहण्याचा प्रयत्न करे. श्याम या वर्षी दहावीला गेला होता.  शाळेमध्ये सगळेच शिक्षक त्याला मनापासून मार्गदर्शन करत होते. श्यामने शाळेमध्ये काय पण राज्यात नंबर मिळवून शाळेचे नाव चमकवायचेच ठरवले होते. तो शाळा शिकत शिकत इतर कामे करत असे. कधी कधी आईला मदत तर कधी शेजाऱ्यांना मदत. त्याने एक दोन वर्षे घरोघरी वृत्तपत्रेही टाकली. दहावीला आल्यापासून मात्र काकुंनी त्याला बजावले होते तू कोणत्याही कामात लक्ष देऊ नकोस. फक्त अभ्यास एके अभ्यास. त्यानेही  काकूंच ऐकलं होतं. काकू आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी शिलाई काम करत असत. त्यांना दुसऱ्याच्या घरी जाऊन इतर काम करण्यापेक्षा आपण आपल्या घरात बसून हे काम करायला त्यांना सुरक्षित वाटत होतं. प्रथम त्यांनी खूप ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना दुसऱ्याच्या दुकानात काय किंवा घरी काय कामच नकोसे वाटत होते. शेवटी आजीनेच त्यांना शिलाईकामाचा पर्याय सुचविला.  घरात बसून कामही होत होते अन् आजी, श्याम अन मिनाक्षी यांना काय हवं काय नको हेही बघणं होत होतं. मी आणि मिनाक्षीही श्यामच्या बरोबरीने अभ्यासाला बसत असू. आमच्या तिघांमध्ये चुरस लागे. येणाऱ्या परीक्षेत कोणाचा नंबर असेल? शेवटी काय नेहमीच श्याम जास्त गुण घेत असे. श्याम अन् मिनाक्षीला परिस्थितीने शहाणं केलं होतं. जी गोष्ट शिकविण्यासाठी धडपडतात तो समंजसपणा त्यांना परिस्थितीने शिकविला होता. माझे बाबा अन् आई दोघंही  नोकरी करत होते. त्यामुळे मला मिनाक्षीच्या घरी आईबाबा घरात नसताना बसायला चांगले वाटत होते. माझ्या आईला मी एकुलती एकच होते. त्यामुळे घरात माझे खूप लाड होत होते. पाहिजे ती वस्तू मागितली की मिळे. कधी कधी तर मागण्याआधीही मिळे. कमतरता, उणीव याची जाणीव जरी मला नव्हती तरी मिनाक्षी अन् श्याम या दोघांना पाहून मला बरंच काही शिकायला मिळालं. त्यांना मदत करण्यासाठी माझेच काय पण आमच्या आईबाबांचेही हात पुढे सरसावत. पण काकू, आजीचं काय पण मिनाक्षी अन् श्यामही खूप स्वाभिमानी होते. त्यांना ते आवडत नसे. त्यांना अभिमान होता,  अहंकार नव्हता. ते परिस्थितीपुढे झुकले नव्हते तर परिस्थितीशी दोन हात करत होते.  त्याने दहावीत मिळविलेल्या यशाबद्दल श्यामचा शाळेत सत्कार होता. म्हणून खास त्याला बोलावून घेतले होते. शाळेत, घरीदारी सगळीकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता. आजपर्यंत तो फक्त गल्ली अन् शाळा येथेच माहीत होता. पण आज तो साऱ्या जिल्ह्याला माहीत झाला. परिस्थिती असणारे अन् सारं काही देऊ शकणारे पालकही आपल्या पाल्याला त्याचे उदाहरण देऊन त्याच्यापासून प्रेरणा देत होते. श्यामला त्याच्या सत्कारानंतर यशाचे रहस्य, अभ्यासाची पद्धत विचारली जात होती. ‘एकच ध्यास सतत अभ्यास’ या पंक्तीची पुनरावृत्ती त्याने पुन्हा पुन्हा केली. तो पुढे काय करेल याची सर्वांना खूप उत्सुकता लागली होती. पण त्याच्यापुढे मोठे प्रश्नचिन्ह होते.  पुढे काय? श्यामच्या आईला काही कळेनासे झाले होते. आता जरी सत्कार, बक्षीस यांचा पाऊस पडत होता तरी त्यातून पुढील वर्षांचा खर्च भागणार नव्हता.
                       एके दिवशी काकू आमच्या घरी आमच्या आईबाबांकडे आल्या. सकाळी सकाळीच काकूंचं आगमन यामुळे आई बाबा चक्रावले. कारण घरात एक एक वेळेस त्यांनी परिस्थितीमुळे उपाशी दिवस रात्र काढले. पण कधी मदत मागण्यासाठी हात पुढे केला नाही. काकूंनी एकंदरीत सारी परिस्थिती बाबांना सांगितली. बाबाही ऐकत होते. आता यापुढे काय करावे? शेवटी बाबांनी काकूंना एक महत्त्वाचा सल्ला दिला. विज्ञान शाखेच अन् पुढे भविष्यात डॉक्टर किंवा इंजिनिअर करण्याचा खर्च तम्हाला पेलवणार नाही. त्यापेक्षा त्याला सरळ कला शाखेत अॅडमिशन घेऊन पदवीधर होऊ द्या. पदवी घेत घेतच तो सरकारी परीक्षांची तयारी करेल. एमपीएससी किंवा पोलीस भरती यापैकी कोणतीही परीक्षा दिली तरी तो यशस्वी होईल याची खात्री माझ्या बाबांना वाटत होती. कला शाखेची पदवी घेणंच त्यांना परिस्थितीमुळे शक्य झालं.  शाळेत किंवा इतर ठिकाणी आजपर्यंत सत्कार झाले. त्या सत्कारानंतर त्याला पुढच्या दिशेबद्दल विचारल्यावर डॉक्टर, इंजिनिअर न म्हणता सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न सांगू लागला. तसं त्याला बऱ्याचजणांनी शास्त्र शाखा घेऊन डॉक्टर किंवा इंजिनिअर हो म्हणून सल्ला दिला होता. पण फक्त सल्ल्यानं काम होत नाही. तसं त्याला आर्थिक मदत करण्यासाठी खूप जणांनी हात पुढेही केला. पण त्याने तो नाकारला. कोणाकडूनही काही घेणे त्याच्या तत्त्वात बसत नव्हते.  काकूंनाही आवडत नव्हते. कोणी कितीही मदत केली तरी तिचा किती दिवस उपयोग होणार किंवा किती दिवस ती पुरवणार असाही विचार त्या करत होत्या. त्यांना आता पुढे काय हे निश्चित करून मगच त्या दिशेने पाऊल उचलणं योग्य वाटत होतं. कोणीतरी म्हणतंय म्हणून विज्ञान शाखा घ्यायची. नाही खर्च पेलवला तर कॉमर्स, त्यात रस वाटत नाही. म्हणून मग शेवटी कला शाखा घ्यायची. त्यापेक्षा कला शाखेत प्रवेश घेऊनच श्याम नाव कमावणार होता. तसं जिल्ह्यातल्या सर्वांना हे वेडेपणाचे वाटत होते. एवढा हुशार विद्यार्थी आणि कला शाखेला पण या शाखेतूनही यशाच्या खूप संधी असतात हे कुणी जाणून घेतच नाही. श्यामने शहरातल्या नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापेक्षा आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च पेलवेल म्हणजे कॉलेजला जाणे येणे परवडेल अशा कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतले. अन् बाकी काही बघण्यापेक्षा कॉलेजमधल्या प्राध्यापकांच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवून त्याने निरज परमानंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. काही बडे लोक हे कॉलेज चालवत होते. त्यांच्या कॉलेजमध्ये श्यामने प्रवेश घेतल्याने त्यांची मान अभिमानाने ताठ झाली. कॉलेजचे प्रमुख संतोष परमानंदी यांच्या वडिलांच्या नावे हे कॉलेज होते. त्यांनी श्यामला अॅडमिशन घेतल्यानंतर दोन दिवसांनी कॉलेजमध्ये बोलावून घेतले होते. त्याला कोणत्याही गोष्टीची मदत लागली तर त्याने बिनधास्त मागावी आपण ती जरूर पूर्ण करू असेही वचन दिले होते. श्याम आता प्रयत्नांची शिकस्त करून ध्येयापर्यंत पोहोचणार होता. बघता बघता तो अनेक अडचणींवर मात करत करत पदवीच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा देणार होता. अकरावीपासून आतापर्यंत त्याने फक्त गुण घेण्यावर भर देण्यापेक्षा जास्तीत जास्त वाचन कसे होईल याला महत्त्व दिले. सर्व विषयांचे सखोल ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला. त्याने एमपीएससी परीक्षेची तयारी पहिल्यापासूनच केली होती. जीवनाचे ध्येय ठरवून त्या दिशेने प्रयत्न केले तर आपोआपच ध्येयप्राप्ती होते. यावर त्याचा विश्वास होता. म्हणूनच त्याने प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. राज्यसेवा भरती पूर्व परीक्षेची जाहिरात केव्हा निघेल याची वाट पाहात होता. तोपर्यंत घरच्यांची मदत करावी, त्यांना थोडाफार हातभार लावावा म्हणून तो घराजवळच्या एका रिटायर्ड कर्नल यांच्याकडे त्यांची मदत करण्यासाठी जाऊ लागला. काका रिटायर्ड होऊनही सात आठ वर्षे झाली होती. आता त्यांच्याजवळ कोणीच राहात नव्हते. त्यांना आता वयोमानाने घराबाहेर जाऊन कामे होत नव्हती. काका श्यामकडून फुकट कामही करून घेऊ इच्छित नव्हते. श्यामच्या कामाचा थोडाफार मोबदला ते देऊ लागले. श्यामने त्यांची बाहेरची कामे पटापट करून दिलेली पाहून सर्वांनाच आता श्यामने आपल्यालाही मदत करावी असे वाटू लागलं.  श्यामने सरळ घरच्या घरी एक मदतकेंद्र काढले. घरापासून बाजारपेठ लांब असल्यामुळे बऱ्याचजणांची महिन्याची वीज बिल, किराणा बाजार, भाजीपाला, बँकेची कामे, महानगरपालिकेची कामे ही सर्व कामे तो व्यवस्थित करून देई. या बदल्यात योग्य मोबदला घेई. त्यामुळे वरचेवर कामे वाढू लागली. श्यामने आई आणि मिनाक्षी दोघींनाही यामध्ये उत्तम तयार केले. 
                    मिनाक्षीने आता कला शाखेची पदवी घेतली होती. श्यामने बघता बघता आईला चांगला आर्थिक हातभार लावला होता. तो सर्व कामे हाताळत असल्यामुळे अनेक ऑफिसमध्ये जाऊन तिथे ओळखी तर वाढवल्याच होत्या पण तेथील कामकाज कसे चालते, कुठे कामाला दिरंगाई होते, का होते?   दिरंगाईची कारणे, भ्रष्टाचाराला खतपाणी कशाप्रकारे मिळते या सर्वांचा अभ्यास व्यवस्थित झाला होता. तो एकटा या सर्वांना मुळापासून खोडून काढू शकत नव्हता. पण आपण स्वतः तरी भ्रष्टाचार करू द्यायचा नाही किंवा स्वतः त्यात सहभागी व्हायचे नाही. एवढे तत्त्व अवलंबले तरी खूप झाले. सूर्य होऊन प्रकाश देता येणार नाही. परंतु पणती होऊन थोडा तरी अंधार दूर करू शकतो, हे तत्त्व त्याने डोक्यात ठासून भरले होते. थोड्या थोड्या गोष्टींमुळेच बराच मोठा कार्यभाग साध्य होतो. हे त्याला माहीत होते.
                        एके दिवशी पेपर वाचत असताना त्याने वृत्तपत्रात राज्य सेवा भरतीपूर्व परीक्षेची जाहिरात पाहिली. आपणाला हवी ती संधी मिळणार म्हणून त्याला खूप आनंद झाला. त्याने आतापर्यंत जोमाने प्रयत्न केलेच होते. आता तो लेखी परीक्षेचा फॉर्म भरून त्या परीक्षेच्या तयारीला लागला. त्याच्या बरोबरच्या अनेक मित्रांनी मोठमोठे क्लास लावले होते. पण श्यामसाठी ते शक्य नव्हते. शेवटी आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून पुढे जाणे भाग होते. परीक्षेचा दिवस जवळ येऊ लागला. यादरम्यान नीरज परमानंद कॉलेजच्या संस्थापकांच्या मुलाने म्हणजेच संतोष परमानंदीने आर्थिक मदतीसाठी विचारणा केली. पण ती त्याने नाकारली. त्याला उपकाराच्या ओझ्याखाली दबायचे नव्हते. म्हणूनच जिद्दीने बाबा गेल्यापासूनचे शिक्षण स्वप्रयत्नावर पूर्ण केले. परीक्षा झाली. पेपर छान गेला. त्यात त्याला यश मिळाले. त्याने तोंडी परीक्षेची तयारी सुरू केली. आपले जीवनउद्दीष्ट पूर्णत्वाच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे हे पाहून त्यालाही मानसिक समाधान मिळत होते. तो लेखी परीक्षा पास होऊन तोंडी परीक्षेसाठी सराव करू लागला. त्याने आता आपल्या अभ्यासाचा वेळ वाढवला होता. आता तो ध्येयाच्या खूप जवळ आला होता. तरी ध्येय गाठलेच आहे असे मानणे चुकीचे होते. त्याने लवकरच सर्व तयारीनिशी ठरलेल्या दिवशी तोंडी परीक्षा दिली. त्याचे पाच ते सहा भाषांवरील प्रभुत्व, चाणाक्ष बुद्धी, हजरजबाबीपणा आणि एखाद्या कठीण प्रसंगामध्ये काय करावे, याची मार्ग काढण्याची हातोटी हे सर्व आणि इतर अभ्यासावरील प्रश्नांनाही तो योग्य उत्तरे देत होता. त्याच्या मधला  आत्मविश्वास आणि आपल्या ध्येयासाठी त्याने केलेली तयारी पाहता तो या पदासाठी योग्य आहे, असे सर्वांना वाटले. काही दिवसांनी त्याच्या लेखी आणि तोंडी दोन्ही परीक्षा मिळून मार्क्स एकत्रितपणे लावण्यात आले. तो राज्यात तेरावा तर जिल्ह्यात प्रथम आला होता.  त्या दिवशी त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. काकू, आजी, मिनाक्षी, अन् मी पण खूप आनंदात होतो. खरंच एवढ्या दिवसापासून केलेल्या कष्टाचे फळ आज त्याला मिळत होते. आज त्याच्या घरी येऊन अभिनंदन करणाऱ्यांची रांग लागली होती. वृत्तपत्र, खाजगी चॅनलवाले या साऱ्यांनी त्याला डोक्यावर घेतले होते.  गल्लीतल्यांनी तर त्याची मिरवणूक वाजत गाजत काढली होती.  आतापर्यंत त्यांच्या घरातल्या प्रत्येकाने काका गेल्यापासून जे कष्ट उपसले होते त्या सर्व त्रासाला, कष्टाला आज न्याय मिळाला होता. 
                     आपली आर्थिक परिस्थिती नाही मग आपणाला डॉक्टर, इंजिनिअर होता येणार नाही. म्हणून त्यापेक्षा त्याने सरळ आपण आपला मार्ग योग्य निवडून त्या मार्गाने यशाच्या पायऱ्या गाठत जिद्दीने ध्येय  गाठले. वृत्तवाहिनीवर त्याची मुलाखत पाहताना त्याच्यासकट साऱ्यांचे डोळे पाणावले. त्या पाणावलेल्या डोळ्यांत उद्याच्या सुखाची स्वप्न तरळत होती. म्हटले तर ते दुःखाश्रू होते आणि म्हटले तर सुखाश्र होते. तर इतर कोणत्याही मार्गाने पैसे न मिळवता भ्रष्टाचाराला मुळापासून खोडून काढणार होता. सगळा कारभार पारदर्शी असावा, अशा मताचा श्याम आज जेव्हा एखाद्या ठिकाणचा कारभार पाहील तेव्हा स्वर्गातही त्याच्या बाबांना किती आनंद होईल. असेच अनेक श्याम तयार झाले अन् जिद्दीने कार्य करू लागले तर भारत देश प्रगतीच्या आणि आर्थिक सुबत्तेच्या बाबतीत इतर देशांना मागे टाकेल यात शंका नाही.

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Follow by Email
Don`t copy text!