इच्छा २

जगाच्या अनुभवाने असेल कदाचित पण तो खूप समजदारपणे बोलत होता. मित्रांच्या मदतीने त्याने गाव सोडून मुंबई गाठली होती. मुंबईला जाण्यासाठी म्हणून त्याने पैसे खर्च केले नाही तर रेल्वेतून विनातिकीट प्रवास केला. त्याला त्याच्या राजापुरातल्याच मित्राने थोड्या फार पैशांची मदत केली. तो लहानपणी खोडकर होता पण खूप ज्ञानी होता. अभ्यासाची  झिकझिक सोडून बाकी सारं त्याला आवडे. तो मुंबईला एका मित्राच्या चुलतभावाकडे  गेला. मित्राच्या त्या चुलतभावाने म्हणजे नागेशने कामाला लावण्याचे आश्वासन दिले पण रहाण्याची सोय तुझ्या तू बघ म्हणून सांगितले. चंदू पुढे मोठा यक्ष प्रश्न उभा राहिला. त्याने आसपास भाड्याने रूमचा शोध घेतला पण एकट्या मुलाला आणि तेही ओळख नसताना कोणी रूम देईना. लॉजमध्ये राहणं त्याला परवडणारं नव्हतं. शेवटी एका दुकानाच्या आसऱ्यालाच त्याने कसेबसे काही दिवस काढले. सार्वजनिक बाथरुमचा वापर करायचा अन् रात्री आकाशाचे पांघरूण घ्यायचं, तो दिवसभर काम करायचा. सुरुवातीला हे सारं खूप जड गेलं पण पुन्हा सारं अंगवळणी पडलं. हळूहळू त्याच्या ओळखी वाढल्या दोन-चार मित्रांनी मिळून एक खोली केली. अन् आता कुठे त्याला हक्काची खोली मिळाली. दादा हे सारं सांगत असताना आम्ही सारे कानात जीव आणून सारं लक्षपूर्वक ऐकत होतो. दादाने सांगताना त्याला घर सोडल्याचा पश्चात्ताप झाल्याचंही कबूल गेलं. दादाला एका चांगल्या हॉटेलमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. कमी शिक्षण असूनही दादाने मात्र वेगवेगळ्या कला अंगी जोपासल्या होत्या. त्याचा उपयोग त्याला इथे झाला. दुपारी ४ ते रात्री १२ पर्यंत हॉटेलची नोकरी अन् बाकीच्या वेळी आराम, इतर काम. चंदूदादा सकाळीही एका दुकानात आठ ते बारा पर्यंत काम करत होता. जगात वावरताना अनुभवाने आलेल्या शहाणपणाने त्याला आपण केलेल्या चुका लक्षात आल्या. त्याने मुंबईला असताना बऱ्याच वेळा घरी येण्याचा विचार केला. पण, पण पुन्हा आपल्या आईच्या वेड्या मायेचे पाश आपल्या पायात साखळदंड बनून आपल्याला त्या श्रीमंत छत्रछायेत, बंधनात अडकवून ठेवणार, श्रीमंती अन् विश्वासपूर्ण सावलीमुळे आपल्या प्रगतीला खीळ बसेल याचा अंतर्मुख होऊन त्याने विचार केला अन् मुंबईत रहाण्याचाच विचार पक्का केला. घरातल्यांच्या आठवणी येत असताना ही मनावर दगड ठेवून तो रहात होता. आताचा दादा, अन् पूर्वीचा दादा यात जमीन असमानाचा फरक जाणवत होता. दादा घरातून गेला तेव्हा सोळा वर्षाचा असेल. आता तो वयाच्या मानाने चांगलाच मोठा वाटू लागला होता. त्याचे कथन आई लक्षपूर्वक ऐकत होती. आपल्या बछड्याने तिथे एक एक क्षण कसा आणि किती त्रासात काढला असेल याचा विचार ती माय माऊली करत होती. हे तिच्या चेहऱ्यावरून दिसतच होते. बाबा ही मन लावून ऐकत होतेच. गेल्या काही वर्षात आपला मुलगा खरंच किती बदलला याची प्रचिती त्यांनाही आली होती. दादा बोलत असताना काही क्षणी उदास तर काही क्षणी आनंदीत होत होता. त्याच्या हुशारीने तो मुंबईत टिकला हे विशेष होते.

दुपारची जेवण होऊन साऱ्यांची विश्रांती झाली होती. दादा बाहेर जावून येतो म्हणून बाहेर गेला होता. दादाने आणलेल्या खाऊचा आम्ही सारेजण आस्वाद घेत होतो. एवढ्यात दादा बाहेरून आला. नेहमीप्रमाणे आपले संपवून दुसऱ्याचे ओढण्याची त्याची वृत्ती संपली होती. त्यामुळे त्याने खाऊची प्लेट पुढे केल्यावर, ‘मला नको, तुम्ही खा’ असे सांगितले.
‘तुम्ही खाल्लं काय अन् मी खाल्लं काय?”
  या त्याच्या वाक्यावर मी एकदम आश्चर्यचकित झाले. हाच तो दादा जो स्वतःच्या वस्तू किंवा खाऊ संपवून दुसऱ्याच्या हिसकावून घेत होता. आम्ही सर्वांनी आग्रह केल्यावर फक्त थोडा खाऊ त्याने उचलला. थोड्या वेळाने बाबा बाहेरून आले. त्यांच्या पाठोपाठ राघव आलाच. चंदूदादाचा खास मित्र होता तो. दादाने त्याचे झाल्यावर, त्याच्या हातात काही शंभर रुपयांच्या नोटा दिल्या. राघव मात्र पैसे घेण्यास तयार नव्हता. आई बाबा समोर असल्यामुळे तो जास्त काही बोलत नव्हता. कारण त्यानेच दादाला गाव सोडून जाण्यास मदत केली होती. आपण चंदूच्या आई-बाबांचे अपराधी आहोत असं त्याला वाटत असल्याने तो पैसे परत घेण्यास तयार नव्हता. त्याने
   ‘काका काकू माझं चुकलं, माफ करा!’
म्हणून हात जोडून माफी मागितली. चंद्रकांतला पैसे दिले नसते तर तो आणखी कोणाकडे तरी गेला असता म्हणून मी मदत केली होती. अशी कबुली त्याने दिली. त्याच्यावर आईने त्याला जवळ घेतले. “राघवा, तू मदत केलीस हे तसं तुझ्यापरीने बरोबरच आहे, फक्त तू आम्हाला येऊन सांगायला हवं होतं, पण…पण झालं ते ठीक झाले, चंदूमध्ये त्यामुळे बराच चांगला बदल झाला. असू दे तू वाईट वाटून घेऊ नकोस.”
राघवला आता बरंच हलकं हलकं वाटत असावं. कारण त्याच्या चेहऱ्यावरून ते स्पष्ट दिसत होतं. दादा गेल्यापासून तो घराकडे फिरकलाच नव्हता. नाष्टा, चहा झाल्यावर त्याने सगळ्यांचा निरोप घेतला. त्या आधी त्याने चंदूला परत मुंबईला जाण्याविषयी विचारले, तसे साऱ्यांच्या चेहऱ्यावर उदासी पसरली. खरंतर दादा परत जावा, असं कोणालाच वाटत नव्हतं आणि मान्यही नव्हते. राघव गेला अन् घरात एक छोटं वादळ उठलं. आईने तर डोळ्याला पदरच लावला. बाबाही घाई घाईने घरात येरझाऱ्या घालू लागले. आम्ही चौघीही बावरलो. आत्ता दादा आला तो न जाण्यासाठी अशी आमची कल्पना होती. राघवला काही तरी सांगून त्याला घराबाहेर सोडून चंदूदादा आला. आमच्या साऱ्यांच्या प्रश्नार्थक नजरांचा रोख त्याने ओळखला आणि आपला निर्णय जाहीर केला.

“आई- बाबा, मी मुंबईला जाणार आहे.”

“अरे बाळा, तू तुझ्या बाबांचा, चार बहिणींचा आणि माझा विचार केलास का?”

“हो, परंतु आई आता मी माझ्या पायावर उभा आहे, अन् तसच रहावं अशी माझी इच्छा आहे.”

“अरे चंदू, तुझ्या आईने वाटेला डोळे लावले होते. माझं सोड पण तिचा, तुझ्या बहिणींचा विचार कर. ही मालमत्ता कोणाची आहे?” “बाबा प्रश्न मालमत्तेचा नाही तर अस्तित्वाचा आहे. कृपया मला

अडवू नका.’ आईने बराच आकांडतांडव केला पण दादा त्याच्या निर्णयावर ठाम

होता. शेवटी एके दिवशी तो मुंबईला निघाला. “चंदू, तुझा पत्ता तर दे. मी आणि तुझी आई कधीतरी येऊन भेटू.”

“बाबा, मी नवीन खोली बघणार आहे. त्याच्यानंतर मी स्वतः पत्र पाठवून पत्ता पाठवेन. मी तुम्हाला गेल्यावर मोबाईल पाठवतो. म्हणजे मला पाहिजे तेव्हा फोन करता येईल.”

“मग तुझा नंबर दे.”

“नाही. माझ्याकडे फोन नाही. मी स्वतःच्या कमाईतूनच तुम्हाला मोबाईल घेऊन देणार आहे. मी काय कुठल्याही लोकल फोनवरून बोलू शकतो.”

फोन काय बाबांनी सहज घेऊन दिला असता पण चंदूला ते मान्य नव्हते. तो गावी थोडेच दिवस राहिला म्हणून साऱ्यांनाच वाईट वाटले. पण चंदू गावी आला, साऱ्यांना भेटला हीच साऱ्यांसाठीच आनंदाची आणि समाधानाची गोष्ट होती.

बाबा काही दिवसांनी म्हणून मुंबईला जाऊन आले. दादाने सांगितलेल्या हॉटेलमध्ये चौकशी केली पण काही दिवसांपूर्वीच त्याने ती नोकरी सोडून दिली होती. त्यामुळे काहीच पत्ता लागला नाही. तो जाऊनही बरेच दिवस झाले, पण दादाचे पत्र नाही की फोन नाही. बघता बघता सुजाता अन् सारिकाचं लग्न ठरलं. दोघींनाही चांगली स्थळ मिळाली होती. बाबांना एक कर्तव्य पूर्ण होतंय याचच समाधान होतं. पण आईला मात्र चंदू लग्नाला येईल ना! याचीच चिंता पडली होती. पाहुण्यांना नवरीचा भाऊ कुठं असतो म्हणून सांगायचं हा प्रश्न पडला होता. कर्तव्य म्हणून साऱ्या गोष्टी कालमानपरत्वे घडतच असतात, तशाच त्या घडत होत्या. लग्नाचा दिवस जवळ येऊन ठेपला अन् दादा येणार असल्याची खबर दादाने पाठवलेल्या फोनवर आली. दादाने फोन पाठवून पाच- सहा दिवस झाले होते. आम्हाला दादा येऊन भेटून जाऊनही दोन- अडीच वर्षे झाली होती. पण तो गेला तिकडचाच झाला होता. फोन आल्यापासून आई त्याची चातकासारखी वाट पहात होती. दादाला लग्नाचे सांगितलेच होते. दादा लग्नासाठी येणार याची खात्री सर्वांनाच झाली होती.
क्रमशः

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Don`t copy text!