इच्छा ३

लग्नाला चार दिवस बाकी होते. दादा आज येईल की उद्या येईल म्हणून त्याची वाट बघत बघतच घरात लग्नाची धांदल सुरू होती. दादा लग्नाच्या आदल्या दिवशी आला. त्याच्याशी बसून निवांत बोलावे एवढाही वेळ नव्हता. तोही आल्यापासून पडेल ते काम करत होता. तरीही सुजाता अन् सारिका दोघीही वेळ काढून त्याच्याशी बोलत बसल्या. कारण दोघी सासरी जाणार होत्या. पुन्हा त्यांची भेट दादाशी केव्हा होईल सांगता येत नव्हते. त्याने आई-बाबांसाठी संपूर्ण कपडे, तर सुजाता अन् सारिका ताईसाठी भारी साड्या आणल्या होता. मला अन् समीक्षाला दोघींनाही भारी ड्रेस, नेकलेस, बांगड्या अशा खूप वस्तू आणल्या होत्या. खरं तर ही सारी खरेदी त्याने केली असं वाटत नव्हतं. म्हणूनच सुजाताताईने सहज विचारलेही,
‘कोणाची मदत घेतलीस?’
दादानेही तिला हळूच कानाशी जात,
‘तुझ्या वहिनीची!’
असं म्हणताच सुजाता,
  ‘काय?’
   म्हणून ओरडलीच. पण दादाने गप्प रहाण्याची खूण केली.
आम्ही चौघी आनंदी झालो तेवढ्याच दुःखीही. दादाने न सांगताच लग्न केले, सांगितले असते तर. सुजाता अन् सारिकाच्या लग्नाआधीच आई बाबांच्या कानावर घालायला हवं होतं. कमीत कमी लग्नाला वहिनीला घेऊन यायचं ना! या अशा अनेक प्रश्नांवर दादाची उत्तरं काय असतील खरं. तो बहुतेक ताईचं लग्न झाल्यावर सारं काही सांगणार असेल.

लग्न धामधुमीत पार पडलं. लग्न होऊन चार दिवस झाले. अन् दादाची जाण्याची घाई सुरू झाली. त्याने आई बाबांना एक दिवशी विश्वासात घेऊन सारं सांगितलं. आईला तर आश्चर्याचा जबरदस्त धक्का बसला. आई-बाबा दोघही नाराजच होते. पण शेवटी काय दादाने मात्र हे लग्न खूप घाईत अन् अचानक झाल्याचं सांगितलं. कारण वहिनीच्या बाबांच्या हॉटेलमध्येच दादा कामाला होता. दादाचा कष्टाळू, प्रामाणिक स्वभाव पाहून वहिनीच्या बाबांनी लग्नाविषयी विचारल्यावर,
‘पाहू आई बाबांना विचारतो. मी बहिणींच्या लग्नानंतरच लग्न करणार आहे. सध्या काही विचार नाही.’ या त्याच्या उत्तरावर ते काळजीत पडले कारण वहिनींच्या आईला दोन हार्ट अटॅक येऊन गेले होते. दादालाही हे पटत होतं. पण आपणच आपल्या लग्नाची घाई करणे योग्य नाही. पण नियतीचा खेळ काही औरच होता. एके दिवशी वहिनीच्या आईला अचानक त्रास झाला म्हणून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. दादाला दवाखान्यात बोलवून घेतलं होतंच. त्याचवेळेस वहिनीच्या आईने लग्नाचे वचन घेतले.
‘मी काही जास्त दिवसाची सोबती नाही. तेव्हा लवकरात लवकर लग्न करा. माझ्या समोर तुमचे दोनाचे चार हात व्हावेत हीच इच्छा!’
झालं, दुसऱ्याच दिवशी त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला. अन् नाईलाजाने दादाला साध्या पद्धतीने लग्न करावे लागले. लग्न झाल्याच्या तिसऱ्या दिवशी त्याच्या सासूबाई स्वर्गवासी झाल्या.

दादाने लग्न केले हा आई-बाबांना विश्वासघात वाटला. पण, पण सर्व ऐकल्यावर झाले ते योग्यच असे वाटले. दादाला मात्र आपलं चुकलं असं वाटत होतं. म्हणूनच तो वहिनीला घेऊन गावी आला नव्हता. आईने सारी स्थिती समजून घेतली पण बाबांच्या चेहऱ्यावरून ते नाराज असल्याचं लक्षात येत होतं. पण आईने त्यांना बाजूला नेत त्यांची समजून काढली.

‘हाताशी आलेलं पोर, पुन्हा गमावून बसताल.’

‘मग काय त्याने त्याचंच सगळं खरं करायचं. कमीतकमी कुणाकडूनही निरोप दिला असता तर तू आणि मी तरी लग्नाला गेलो असतो.’

‘जाऊ द्या हो, त्याची मर्जी तुम्ही जास्त काही बोलू नका, तुम्हाला माझी शपथ.’

आईच्या या वाक्यामुळे बाबा शांत झाले. आई-बाबा पुन्हा दादाकडे आले.

‘कुणाशी लग्न केलं तिचा फोटो तरी दाखवायला आणलास का? कोणत्या घराण्यातली आहे.’

‘रिंकू नाव आहे तिचं. ती आता माझ्याबरोबर येणारच होती पण ती लवकर तुम्हाला आजी आजोबा करणार आहे. तिला डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितली आहे.’
त्याचं सारं ऐकून डोकं सुन्नं झालं होतं. “दादा, वहिनींना घेऊन ये. बाळ इकडच होईल ना गावाकडं.”
समीक्षाच्या वाक्यावर दादाने फक्त मान डोलावली. आई-बाबांची समजूत दादाने काढलीच म्हणायची. आई तर नेहमीच म्हणायची ‘सुख हे वाळू सारखं असतं. कितीही हातात घट्ट धरून ठेवलं तरी ते हातातून निसटूनच जातं. ‘
आम्ही आता दादाचा फोन नंबर, पत्ता सारं हट्टाने मागूनच घेतलं होतं. दादाच बाळ बघायला तरी आम्हाला मुंबईला जावं लागेल ना! तसं तर आईने वहिनींना आई नाही. म्हणताना तिचं सारं इकडंच करावं म्हणून दादापुढे विचार मांडला. पण वहिनीला बेडरेस्ट सांगितल्याने सर्व घोळ झाला. असो कुठे का होईना सर्व व्यवस्थित होवो ही प्रार्थना आईने केली. त्याला मुंबईला जाताना निरोप देण्यासाठी सारेजण स्टँडला सोडवायला गेलो.

‘दादा पुन्हा येशील तेव्हा वहिनी अन् बाळाला घेऊनच ये!’ माझ्या या वाक्यावर दादाने,
‘हो, नक्की नक्की’ म्हणतच सर्वांचा निरोप घेतला. साऱ्यांनी साश्रुपूर्ण नयनांनी त्याचा निरोप घेतला.
दादा पोहचल्यावर त्याचा फोन आला. तेव्हापासून तो बऱ्याचवेळा फोनवरं बोले. पण वहिनींना मात्र फोनवर बोलायला वेळच नसे.

खरंतर दादाला मनातून भीती वाटत असेल. आई किंवा बहिणींकडून तिचे कोणत्या गोष्टीसाठी मन दुखावले गेले तर… पण म्हणून त्याने वहिनींना कधी फोन दिलाच नाही. वहिनी आता आठवड्यानंतर प्रसूत होणार होती. डॉक्टरांनी दिलेली तारीख आलीच होती. आईने ‘मी येऊ का?’ म्हणून विचारणा केल्यावर ‘आत्ताच नको, तुला मुंबईत अवघडल्यासारखं होईल. इथं आहेत बरेच जण. बाळ झाल्यावर नक्की ये.’
आम्ही सारेजण येणाऱ्या पाहुण्याची स्वप्न पहाण्यात गुंतून जात होतो.
एके दिवशी अचानक फोन आला. चंदूदादाचा मित्र रोहित बोलत होता. ताबडतोब सर्वांनाच मुंबईला येण्याविषयी सांगत होता. वहिनीला

बाळ झालं असेल म्हणून तर तातडीने बोलावलं. तसं साऱ्यांनी बाळाला पहायला जाणे योग्य वाटत नव्हते पण सर्वांनाच बाळ पहाण्याची उत्सुकता  होती. म्हणून आम्ही सारे लगबगीने आवरून मिळेल त्या गाडीने मुंबईला  रवाना झालो. रोहित न्यायला आलाच होता. आम्ही सारे टॅक्सीत बसलो. बाळासाठी म्हणून एवढ्या घाईत काहीही घेणं झालच नव्हतं. प्रवास व्यवस्थित झाला. रोहित गाडी घेऊन न्यायला आलाच होता. गाडी एका घराजवळ थांबली.

“वहिनी घरात डिलेव्हरी झाल्या की काय?” असा प्रश्न आईने रोहितला केला.

त्याने नकारार्थी मान हलवली.

“मग कुठे आहे ती?”

“दवाखान्यात.

रोहितच्या या उत्तरासरशी मी त्याच्याकडे बघतच राहिले, काय वेडा माणूस आहे हा! वहिनी दवाखान्यात मग घरी काय काम? तो उतरला मागून आम्ही सारे उतरलोच. घराच्या आसपास गर्दी वाटत होती.

“कशासाठी, एवढी गर्दी?” समीक्षाने रोहितला प्रश्न केला.

‘मुंबईत गर्दी २४ तास असतेच, ‘असं म्हणत बाबा साऱ्यांकडे पाहून हसले, पण रोहित हसला नाही. गंभीर वाटत होता. त्याने आता सर्वांना घराकडे चलण्याची खूण केली. तेथले वातावरण गर्दी पाहून मला वेगळंच वाटत होतं. आमच्याकडे पाहून कुजबुज सुरू झाली होती. काहीतरी वेगळं घडलंय हे आई- बाबांच्या अनुभवी दृष्टीला कळलं असावं.’

‘बिचारा चंद्रकांत! मुलाचा जन्म झाला अन् त्याच्या जीवनाचा सूर्यास्त.’
माझ्या कानावर हे वाक्य पडलं आणि मी गर्भगळीत होऊन गेले. नक्की काय झाले म्हणून मी घाई घाईने घरात प्रवेश केला. अन् जोराची किंकाळी माझ्या तोंडातून निघाली. ‘दादा- दादा’ आई- बाबा अन् समीक्षा पळतच आले. पुढचा नजारा पाहिला अन् आई तर जागच्या जागी कोसळली. पांढऱ्या शुभ्र वस्त्राने दादाचे शरीर गळ्यापर्यंत झाकले होते.

कुंकवाचा टिळा कपाळावर ओढला होता, जणू काही तो गाढ झोपी गेला होता. तो शांत, हसरा, समाधानी भासत होता. बाबांनी रोहितला हे काय झाले? कसे झाले? अशा अनेक प्रश्नांची त्याच्यावर सरबत्ती केली. रोहितने जे सांगितले ते ऐकून आम्ही सारे थंड पडलो. दादा दवाखान्यात वहिनीला ऍडमिट करण्यासाठी गेला होता. त्यावेळी अपघात झाला होता. वहिनी दवाखान्यात जाऊनही एक दिवस झाला. पण काही कारणांमुळे वहिनीचे सिझर करण्याचा निर्णय घेतला. वहिनी दवाखान्यातच होत्या. सगळे सोपस्कार पूर्ण झाले अन् वहिनीला ऑपरेशन थिएटरमध्ये नेले. दादा, रोहित आणखी काही मित्र दवाखान्यात जमा होते. बाळाच्या जन्माची बातमी सांगतच नर्स आली. पण वहिनीला खूप त्रास झाला होता. त्या आणखीनही बेशुद्ध अवस्थेतच होत्या. बाळाला पाहून मग तो त्यांची औषध, इंजेक्शन व पेढे आणण्यासाठी हॉस्पिटलबाहेर पडला. तो आपल्याच विचारात, आनंदात मग्न होता. त्याला आपण चालत असताना वाहन अंगावर येताहेत बाजूला सरकावं एवढंही भान नव्हतं. बघता बघता एका गाडीने त्याला उडवले. दादा जागच्या जागीच गेला. कोणाला काही कळायच्या आत सारं उद्ध्वस्त झालं होतं. वहिनी पाच सहा तासाने शुद्धीवर आली. दादाला जिथे ठेवले तेथे त्यांनाही आणलं होतं. पण त्या हे सारे दृश्य पाहून पुन्हा बेशुद्ध झाल्या. आम्ही येण्यापूर्वीच त्यांना पुन्हा दवाखान्यात नेलं होतं. त्यांच्याजवळ रोहितची बायको थांबली होती. डॉक्टरांनी त्यांना दादाचा अपघात न सांगण्याची विनंती केली होती पण, पण शेवटचे तरी दर्शन व्हावे म्हणून त्यांना तशा अवघड अवस्थेतही दादाचे दर्शन घडविले. परंतु… परंतु काही दिवसापूर्वी आई आणि आता साता जन्माचा साथीदार असा आनंदाच्या क्षणी मुलाला न घेता, तिच्यापासून दूर दूर निघून गेला होता. ती बिचारी दुःखाच्या खोल गर्तेत पडली होती.

दादाचे सारे क्रियाकर्म करण्यासाठी वहिनींना सोबत न घेताच आम्ही गावी आलो. सारे क्रियाकर्म येथेच शहरात करावे, असे रोहितला वाटत होते पण आपल्या गावाकडेच सारं झालं पाहिजे. या बाबांच्या आग्रहाखातर डेड बॉडीसह आम्ही त्याच्या मित्रांसह सारेजण खाजगी वाहनातून गावी

घरी परतलो. दोन दिवसातच सारं संपल्याचा भास झाला. वहिनी बऱ्याच पराकाष्ठेने एक दिवसानी शुद्धीवर आली. परंतु गावाकडेच सर्व झाल्याने अन् डॉक्टरांनी तिला दवाखान्यातून आताच हलवता येणार नाही असं सांगितल्याने तिला येता आले नाही. म्हणून ती बरीच नाराज झाली होती.

दादा गेल्यानंतर थोड्या दिवसांनी तिचा फोन आला. “नारायणकरच ना!” बऱ्याच प्रयत्नानंतर फोन ऐकू येऊ लागला. आवाज भरून आला होता. मला पुढचे शब्द फुटेच ना.
‘आकांक्षा, आकांक्षा ताईच ना!’
‘हो वहिनी, बोला ना!’

‘मला तिकडे यायचं होतं. शेवटचं सारं पहायचं होतं. यांना डोळ्यात साठवून ठेवायचं होतं.’
तिचा आवाज खूपच भरून आला होता. आता तर फोनवर स्पष्ट हुंदके देऊन रडल्याचा आवाज येऊ लागला.

‘वहिनी, प्लीज स्वतःला सावरा.’

‘होय, ताई मी सध्या काही गावाकडे येऊ शकत नाही. पण तरीही मी थोड्याच दिवसात येणार आहे.’

‘नका वहिनी दगदग करून घेऊ.’

‘नाही, यांची इच्छा होती, की आपण सारे मिळून या गावाकडच्या घरात एकत्र रहायचं, मग ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तुम्हा साऱ्यांबरोबर रहायला येणार आहे. त्यांची इच्छा आपण साऱ्यांनी पूर्ण करायची ना!’

माझ्या तोंडातून नकळत ‘हो’ हा शब्द गेला अन् ती खूप खूप रडली, साऱ्यांनीच गावामध्ये राहून दादाची इच्छा पूर्ण करायचे ठरवले.

समाप्त

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Don`t copy text!