इच्छा

इच्छा

“हॅलो, हॅलो!”

“हॅलो, होय मी नारायणकरच, आपण कोण?”

अन् पलीकडून बोलता बोलता दोनदा फोन कट झाला अन् आवाजही व्यवस्थित येत नव्हता. पुढची व्यक्ती घाबरल्यासारखी वाटत होती. तिला नक्की कोण हवं होतं ते मात्र माझ्या थोडं लक्षात आलं अन् माझ्या अंगातून असंख्य मुंग्या येत असल्याचा मला भास झाला. त्या व्यक्तीने दुसऱ्यांदा चंद्रकांत असं काही तरी नाव उच्चारलं होतं. पहिल्यांदा मात्र फक्त ती तुम्ही नारायणकरच ना! म्हणून पुन्हा पुन्हा विचारत होती. मला हळूहळू सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. अन् मीच स्वतः त्या नंबरवर फोन केला. फोनची एक रिंगही पूर्ण झाली नसेल तेवढ्यात पलीकडल्या व्यक्तीने पटकन् फोन उचलला.

“हॅलो, मी नारायणकर बोलतेय.”

यावर “हो नारायणकरच ना!”

“हो, काय काम ते बोला.”

यावर त्या व्यक्तीने जो खुलासा केला त्याने मी चकित झाले. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून, मी न पाहिलेली माझी भावजय होती. ‘चंद्रकांत रामजी नारायणकर’ यांच्या त्या सौभाग्यवती. खरंतर आम्ही चंद्रकांतला पूर्ण नावाने कधी हाक मारत नसू. चंदू दादा किंवा फक्त दादा. दादा आम्हा चार बहिणीत एकुलता एक त्यामुळे खूपच लाडका. वडील इंजिनिअर असल्यामुळे घरात कोणत्याही गोष्टीची कमी नसे. घरी नेहमीच पाहुण्यांचा राबता असे. दोन बहिणींच्या पाठीवर चंद्रकांत होता. त्याच्यानंतर पुन्हा दोन बहिणी. लहानपणापासून एकुलता एक म्हणून लाडाने नुसता लडदु झाला होता. खोडकर स्वभावामुळे बाबांकडून अधून मधून त्याला धम्मक लाडू मिळत असे. परंतु आईला मात्र त्याला कोणीही दुखावले की वाईट वाटे. सर्वांना सणासाठी कपडे, खेळणी किंवा नवीन काही घेतलं असेल तर चंदूदादा मात्र स्वतःच्या वस्तू खेळणी स्वतः खेळून मोडेच पण आमच्याही तोच वापरे. वडील घरात नसले की आम्ही त्याचा त्रास सहन करत असू कारण त्याचेच राज्य घरात चालत असे. आम्हीही त्याला मुद्दाम काहीतरी त्रास देतच असू. सोसायटीत पण तो आपली मनमानी चालवे. घरात आम्ही साऱ्याजणी त्याची अरेरावी सहन करू पण बाहेर मात्र कोणीही सहन करत नसे. त्याच्याविषयी बऱ्याचवेळा तक्रारी येत असत. बघता बघता वर्ष सरत होती. आता तो अकरावीला गेला. इतर गोष्टींची त्याला खूप आवड पण अभ्यासात मात्र त्याचे मनच लागत नसे. म्हणून शेवटी बाबांनी त्याला खडसावले होते. “अभ्यास व्यवस्थित करून चांगल्या मार्कांनी पास हो, मला तुला इंजिनिअर करायचंय.”

यावर तो थोडा नाराज झाला. त्याला डोक्याला त्रास होईल असं काहीही करायला आवडत नसे. खरंतर घरात बाबांचा पगार अन् गावाकडील शेतीचे उत्पन्न, यामुळे कोणत्याही गोष्टीची कमी म्हणून जाणवत नव्हती. यामुळेच की काय त्याच्या वागण्यात श्रीमंतीची मगरुरी जाणवत होती. त्याला कॉलेजमधील शिक्षकही बोललेले पटत नसे. या साऱ्या मालमत्तेचा आपणच वारसदार या गुर्मीतच तो वावरे. एके दिवशी कॉलेजमध्ये मॅडमने त्यांच्या तासातून तो सारखा निघून जात असे, त्याविषयी विचारणा केली. चंदू दादाला खूप मोठा अपमान झाल्यासारखे वाटले. मॅडमची परवानगी न घेताच तो वर्गातून बाहेर जात असे अन् आजही गेला. यावर मॅडम नाराज झाल्या. या घटनेची तक्रार प्राचार्यापर्यंत गेली. मग चंद्रकांतला प्राचार्यांनी बोलावून घेतले. आई-वडिलांना कॉलेजमध्ये घेऊन आल्याशिवाय वर्गात बसण्यास परवानगी मिळणार नाही, असेही सांगितले. यावर चंदूदादा दोन-चार दिवस कॉलेजला म्हणून घरातून जात असे, पण इतरत्र भटकून पुन्हा कॉलेज सुटण्याच्या वेळेस घरी परतत असे. तीन-चार दिवस तो का आला नाही याची चौकशी करण्यासाठी प्राचार्यांनी बाबांना फोन केला. अन् मग काय घरामध्ये एक प्रचंड वादळ निर्माण झालं. बाबांच्या समोर मान वर करण्याचीही आम्हा मुलांची हिंमत होत नसे. परंतु चंदूने मात्र बाबांच्या काही प्रश्नांना उलटसुलट उत्तरे दिली. या सर्व गोंधळात आईची वेडी माया मात्र चंदूला साथ देत होती. चंदूला बाबांचा हा रूद्रावतार मान्य झालाच नाही. तो बाबांसमोर गप्प बसला तरी त्याच्या डोक्यात काही वेगळीच कल्पना शिजत होती. सर्व गोंधळानंतर सर्वांनाच समजून सांगत आईने बाबांना व चंदूला गोड बोलून शांत केले. तिने सर्वांनाच जेवणासाठी बोलावले. जेवणाची वेळ केव्हाच टळून गेली होती. पण ‘चार घास खावे, भरल्या घरात उपाशी राहू नये!’ या तिच्या समजूतीच्या वाक्यावर कसेबसे सर्वजण जेवायला तयार झाले. चंदू मात्र बहाणा करून बाहेर निघाला. ‘आई मी दहा मिनिटात मित्राकडे जाऊन येतो.’  तरी आईने ‘आता काय काम आहे दुपारी?’  म्हणून विचारल्यावरही तो तसाच  ‘जरा महत्त्वाचे काम आहे!’ म्हणून घरातून निसटलाच. त्याची वाट पहाता पहाता दहा, वीस, तीस मिनिटच काय पण एक-दीड तास सहज झाला. पण साहेबांचा काहीच पत्ता नव्हता. जो तो मनातल्या मनात काहीतरी विचार करत होता, मात्र बोलत काहीच नव्हता. आईने मात्र एवढा वेळ गप्प रहाण्यात विजय मिळविला होता. तो संयम आता बांध फोडून दोन्ही नयनचक्षूतून वाहू लागला. गंगा यमुनांचे अखंड वाहणे सुरू झाल्यामुळे बाबांना तर काही सुचेचना. खरंतर बाबांचा स्वभाव वरून जरी कडक वाटत असला तरीही आतून फणसासारखा होता. वरून काटेरीपणा परंतु आतून मऊ मधाळ होता. आपण बोलण्याच्या भरात रागाने खूपच बोललो की काय असे त्यांना वाटू लागले. तशा भावना त्यांनी आईजवळ व्यक्त केल्या. चंदूदादा कुठे गेला हे जाणण्यासाठी घरातला प्रत्येकजण प्रयत्न करत होता. आधी त्याच्या मित्रांना फोन झाले. तो तिथे नव्ज्हता.  तो जिथे जिथे जाण्याची शक्यता आहे तिथे तिथे बाबा अन् आम्ही तिघी-चौघी जाऊन आलो. सुजाता, सारिका, चंद्रकांत, समीक्षा अन् (मी) आकांक्षा सोबत आई-बाबा असं सात जणांचं आमचं आनंदी कुटुंब. दादाशी मात्र आमचं म्हणजे बहिणींच पटत नसे. सुजाता अन् सारिका ताई यांच्या वाटे तो जात नसे पण समीक्षा अन् माझ्या मात्र मागे हात धुवून लागे.

तो अकरावीला होता. तेव्हा मी सहावीला होते. आमच्या प्रत्येकात दोन-तीन वर्षाचा फरक होता. जरी तो आम्हाला त्रास देत होता तरी तो घरातून गेल्यावर आम्हालाही खूप वाईट वाटले. खूप शोधा-शोध झाली पण काहीच शोध लागेना. म्हणून शेवटी पोलीस कंप्लेंट करायचे ठरले. पण असं करण्याने गावात अन् सगळीकडे पाहुणे राऊळ्यात आपली बदनामी होईल. म्हणून बाबांनी कंप्लेट न करण्याचा निर्णय घेतला. चंद्रकांतच्या एका मित्राकडून चार दिवसांनी तो मुंबईला गेल्याचं कळलं. पण तो कसा गेला, सोबत कोण होतं की नाही. त्याच्याजवळ तिकिटासाठी पैसे होते का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे निरुत्तरीत राहिली. ज्या दिवशी तो घरातून गेला त्या दिवसापासून आई तर भ्रमिष्टासारखी वागत होती. गेल्या चार दिवसापासून ती आजारी पडली म्हणून आम्ही सर्वजण तिची काळजी घेत होतो. तिला हरतऱ्हेने समजून सांगण्याचा प्रयत्न करत होतो. पण त्या हरिणीचे पाडस तिला सोडून लांब लांब गेलं होतं. ते तिला कसल्याही परिस्थितीत हवे होते. ती खूप प्रयत्न करत होती की चंदूदादा परत यावा. उपास- तापास, बुवा-बाजी ह्या सर्वांसोबतच तिने देवांनाही पाण्यात ठेवलं होतं रात्री झोपेतही,
‘ चंदू बाळा आलास मला वाटलंच होतं तू मला सोडून राहून राहू शकणार नाहीस. ये जेवलास की उपाशी आहेस माझ्या बाळा…..’
असं काहीसं बडबडत दचकून उठे. रात्र-रात्र तिचे डोळे टक्क उघडे असत. तिला चंदू गेल्यापासून घरात कशातच मन लागत नसे. ती आम्हा प्रत्येकाला चंदू केव्हा येईल म्हणून सारखे प्रश्न विचारत असे. तसे तर बाबा सुद्धा खूप दुःखी झाले होते. पण ते तरी पण त्यांचा खंबीरपणा दाखवतच होते. ते त्यांच्या मनातले दु:ख बोलून दाखवू शकत नव्हते. चंद्रकांत जाऊन सात आठ महिने झाले. आतापर्यंत आई-बाबांनी चंदू दादाला शोधण्याचा हरतऱ्हेने प्रयत्न केला. परंतु त्यांना यश आलं नाही. एवढे महिने झाले तरी आईच्या डोळ्यातले पाणी आटले नव्हते. दिवसातून एकदा तरी ती दादाची आठवण काढेच. आता ती आला दिवस ढकलत होती. आम्ही सारेजण देवाला विनंती करत होतोच.
‘दादा, लवकर घरी परत यावा.’ आईला आम्ही हरतऱ्हेने समजून सांगत होतो. आमच्या राजापूर गावात आता सर्वांनाच चंदू घर सोडून गेल्याचं कळालंच होतं. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले आई-बाबांना मिळत. शेवटी नशिबापुढे कुणाचे काही चालत नाही, काळ कोणासाठी थांबत नाही. दोन अडीच वर्षांनी मात्र एक चमत्कार झाला. चमत्कारच म्हणायचा, कारण मुंबईला चंदू असेल या शक्यतेमुळे बाबा त्यांच्या मित्राबरोबर थोडी फार शोधाशोध करून आले. पण मुंबई म्हणजे काय आमचं राजापूर नव्हे, लगेच शोध लागायला. मुंबई महानगरात, महामोहात गुंतून जातात माणसं. एवढ्या मोठ्या महानगरात शोध घेणे सोपे नव्हते. आज मात्र सकाळपासून वातावरणात प्रसन्नता जाणवत होती. आईचाही डावा डोळा सारखा फडफडत होता. आज काहीतरी शुभ घडणार असं प्रत्येकालाच वाटत होतं, घडलंही तसंच. चंदू दादा दारात उभा होता. कोणालाच डोळ्यावर विश्वास बसेना. आपण स्वप्न पाहतोय किंवा आपल्याला तसा भास होतोय, असं प्रत्येकालाच वाटत होतं, अंगात टी शर्ट, जीन पॅन्ट, पायात बूट अन् हातात सोन्याची अंगठी, दादाची प्रकृतीही बऱ्यापैकी सुधारली होती. आईने दादाला पाहिल्या पाहिल्या प्रथम त्याला पळत जाऊन मिठी मारली. तिच्या नयन अश्रुंनी दादा पुरता ओला झाला. दादानेही अश्रुंना वाट मोकळी करून दिली. बाबा मात्र स्तब्ध उभे होते. बाबांना आनंद झाला होता, तेवढेच दुःखही. आपल्या मुलाने घर सोडून जाण्याचा निर्णय कितपत योग्य होता. योग्य की अयोग्य यांचे द्वंद्व मनात घेऊन बाबा, दादा अन् आईपासून बऱ्याच अंतरावर उभे होते. आई-दादाची गळाभेट झाली दादाच बाबांकडे गेला अन् बाबांच्या पाया पडला. खरंतर खूप काही बोलायचं ठरवूनही बाबांनी स्वतःला आवरतं घेतलं. त्याआधीच दादा बाबांसमोर मान खाली घालून उभारला.
  ‘खरंच, तुम्हाला न सांगता घर सोडून जाणे हा माझा निर्णय चुकीचाच होता. बाबा, माझं चुकलं, मला क्षमा करा.’
  असं म्हणून तो बाबांसमोर उभा होता. जे झालं ते झालं, चंदूदादा आज तरी, ‘माझं चुकलं’ म्हणून बाबांसमोर क्षमा मागत होता. त्यांनी त्याला क्षमा करायलाच हवी, असं आमच्या साऱ्यांच्याच मनात आलं आणि झालंही तसेच. बाबांनी त्याला पटकन् आपल्याजवळ ओढून घेतलं. कधी नव्हे ते आज बाबा त्याच्या पाठीवरून एवढ्या प्रेमाने हात फिरवताना आम्ही पाहिलं.  बाबांनी आपल्या अश्रुंना वाट मोकळी करून दिली. बाबा नंतर आम्ही चौघीही त्याच्या गळ्यात पडलो. तो असताना खोड्या करायचा त्यामुळे त्याचा राग यायचा पण आज मात्र गोष्ट वेगळीच होती. दादा आल्यानंतर तो राग कुठे गेला कळलंच नाही. दादाने प्रत्येकासाठी काही ना काही आणले होते. दादा आपल्यासाठी एवढं सारं घेऊन आला. आम्ही बहिणी तर हरखून गेलो. खरंच कितीतरी प्रकारचे ड्रेस, बांगड्या, कानातले, सँण्डल, रुमाल, स्कार्फ, बो पिना आणि खाण्यासाठी भरपूर सारी मिठाई. आईला त्याने खूप छान साडी तर बाबांना ड्रेसचा कपडा. या साऱ्यांपेक्षाही दादा आला म्हणून घराचा कोपरा न् कोपरा आनंदित अन् पुलकित झाला होता. तो कसा गेला, कुठे राहिला, काय काम केले हे व असे अनेक प्रश्न आम्ही त्याला विचारू लागलो. मात्र आईने लगेच सर्वांना, त्याला त्रास न देण्याचे फर्मान सोडले. गरम पाण्याने दीपावली सारखे त्याला आईने अभ्यंगस्नान घातले. नंतर नास्ता अन् विश्रांती, विश्रांतीनंतर दादा खूपच ताजातवाना वाटला. त्याला घर सोडून गेल्यावर वाईट वाटले. पण घराबाहेर पडून आपल्या पायावर उभे राहून दाखवायचे असे त्याने ठरवले होते. आम्हाला मात्र त्याने आतापर्यंत काय काम केले, कोणाकडे राहिला, हे सारं जाणून घेण्याची साऱ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती. आम्ही सारे त्याच्या भोवती जमा झाला. पहिल्यापेक्षा तो बराच शांत वाटला.

क्रमशः

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Don`t copy text!