फ्रॉड

                              माझा मोबाईल खणखणत होता. माझ्या हातातले काम सोडून फोन घेईपर्यंत त्याची रिंग वाजतच होती. मी फोन घेतला तेव्हा पलीकडून अनोळखी व्यक्ती बोलत असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यांनी प्रथम मला,

“नमस्कार, सुनीता परांडकर का? मी मराठवाडा विद्यापीठाचा उपकुलगुरू बोलतोय.’

एवढं वाक्य म्हटल्यावर मला येणारा फोन हा खूप महत्त्वाच्या व्यक्तीचा आहे, हे लक्षात आले. त्यांचे नाव होते पवार एन. एम. त्यांनी एका दिवाळी अंकात माझी कविता वाचली होती. त्यांना ती आवडल्याचंही मला फोनवर सांगितलं. मी लिहिलेली कविता त्यांनी आवडल्याचं सांगितल्याबरोबर मला खूप आनंद झाला. कोणीतरी मला खास फोन करून तुमचं लेखन आवडल्याचं सांगणं ही गोष्ट मला खूप महत्त्वाची आणि आनंद देणारी होती. त्यापुढे त्यांनी मला आणखी एक सुखद धक्का दिला. तो म्हणजे माझ्या कवितेची निवड पदवी अभ्यासक्रमासाठी करण्यात आली होती. आता मात्र मला मी स्वप्नात असल्यासारखं वाटू लागलं. मी काय ऐकतेय यावर माझा विश्वासच बसेना आणि मला आता काय बोललं पाहिजे, हेही माझ्या लक्षात येईना. पण तेवढ्यातही मी त्यांचे आभार मानले आणि तुमचा फोन नंबर द्या असं सांगितलं. पण पवार सरांनी मला तुमच्या फोनवर आलेला नंबर माझ्या नावावर फीड करा, असं सांगून पत्रव्यवहारासाठी माझा पत्ता विचारून घेतला. मी पटकन् माझा पत्ता दिला. त्याबरोबर तुमच्या कविता निवडीचे पत्र लवकरच पाठवू असे सांगून त्यांनी फोन ठेवला. माझा आनंद गगनात मावेसाना झाला होता. मी लगेचच ह्यांना ऑफिसमध्ये फोन करून माझी कविता मराठवाडा विद्यापीठातील अभ्यासक्रमात निवडल्याचं सांगितलं. ह्यांनी माझं अभिनंदन केलं आणि घरी आल्यावर बाकीचं बोलू, असं सांगून ते जरा कामात आहेत, असं सांगून फोन ठेवला. मी लगेच माझी मैत्रीण सरिता, रिमा, हिना यांना फोन करून ही बातमी दिली. त्यांनी अभिनंदन करून लगेच पार्टीची मागणी केली. तू आता मोठी साहित्यिका होणार आणि बरंच काही माझ्या गौरवादाखल बोलून येत्या रविवारी पार्टी दे असं सांगून फोन ठेवले. सासूबाईंना सांगावे म्हणून मी उत्साहाने त्यांच्या खोलीकडे वळले. त्यांचं टीव्ही पाहाणं सुरू होतं. दुपारच्या मालिका पाहायला त्यांना आवडते. मी काय म्हणते हे त्यांना जास्त काही लक्षात आलं नाही. पण माझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्या ‘असं का बरं बरं’ म्हणून टीव्ही पाहाण्यात गुंतल्या. मी मात्र खूप आनंदात होते.

माझं शिक्षण पदवीपर्यंत झालं होतं. पुढे शिकण्याची इच्छा असूनही घरातल्यांच्या म्हणण्यापलीकडे म्हणजेच थोडक्यात त्यांच्या शब्दाबाहेर मी नव्हते. लग्न झाल्यानंतर मी, माझं घर, माझी माणसं, मैत्रिणी व थोडंफार वाचन-लेखन एवढंच माझं विश्व होतं. घरात सासु-सासरे आणि आम्ही दोघं आणि आमची दोन मुलं.मुलगा स्वरित सहावीत व मुलगी स्वराली दुसरीत. संसाराबरोबरच माझी वाचन, लेखनाची आवड मी जोपासली होती. दररोज वृत्तपत्रात येणाऱ्या बातम्या, सोबत महिलांसाठीची वेगवेगळी सदरं मी मन लावून वाचत असे. दर रविवारी वेगवेगळ्या वृत्तपत्रांच्या पुरवण्या वाचणे म्हणजे माझ्यासाठी बौद्धिक मेजवानीच वाटे. या सर्व वाचनाबरोबरच मोठ्या तथाकथित लेखकांची आणि कवयित्रींची पुस्तके वाचणे हा माझा छंद होता. या वाचनामुळे माझ्या ज्ञानात भर पडतच होती. पण मला नवनवीन विषयही लेखनासाठी मिळत होते. आमच्या मैत्रिणी-मैत्रिणींचा मिळून एक सखी ग्रुप होता. आम्ही महिन्यातून तिसऱ्या रविवारी एकत्र येऊन महिन्यात नवीन केलेलं लेखन एकमेकींना वाचून दाखवून त्यातील त्रुटी, चांगल्या गोष्टी एकमेकींना दाखवत होतो. वेगाने नसले तरी हळूहळू का होईना माझं लेखनकार्य मी सुरू ठेवलं होतं. सासुबाईंचा स्वभाव तसा जास्त बोलका नव्हता. त्यांना टीव्हीमध्येच जास्त आवड होती. त्यांचं शिक्षण जुनी दुसरी वगैरे झालेलं होतं. तरीही त्यांना चांगल्यापैकी व्यावहारिक ज्ञान होतं. घरात स्वयंपाकाबरोबरच इतरही म्हणजेच बाजारहाट करणे, हिशेब लावणे हे आर्थिक व्यवहार त्या सराईतपणे हाताळीत. माझ्या लेखनाविषयी त्यांना आवड नव्हती. पण रागही नव्हता. घरातील कामं उरकली की, टीव्ही पाहाणे हा एकमेव आवडता उद्योग त्या करीत.

प्राध्यापकांचा पवारांचा पंधरा-वीस दिवसांनी मला पुन्हा  फोन आला. प्रा. पवार बोलतोय. तुम्ही घरी आहात का? कोठे बाहेर जाणार नाही ना? मी नमस्कार करून हो नाही म्हणताच व इतर काही बोलण्याच्या आत त्यांनी फोन ठेवलाही. एवढ्या सकाळी प्राध्यापकांनी असा प्रश्न का केला असेल? ते कोठून बोलत होते? मी मोबाईलवर नंबर पाहिला तर तो माझ्या गावातला म्हणजेच कोल्हापूरचाच लैंडलाईन नंबर होता. मला काही कळेना. आज सकाळीच हे (म्हणजेच सुदेश परांडकर) काही काम आहे असे सांगून सात वाजताच घराबाहेर पडले होते. नऊ वाजता येऊन टिफीन घेऊन जातो, असंही त्यांनी सांगितलं होतं. स्वरित, स्वराली घरातच होती. दहा वाजता रिक्षा येते. त्यांची तयारी आठपासूनच सुरू करावी लागे. सासूबाई व मी, दोघीही स्वयंपाकघरातच होतो. प्राध्यापकांचा फोन आल्यापासून मला काही कळेचना. एवढी मोठी व्यक्ती आपल्या शहरातूनच आपल्याशी बोलते म्हणजे ती घरी येणारच. मग आपण त्यांच्या स्वागतासाठी काय करावं, याचा विचार डोक्यात आला. पण दुसऱ्याच क्षणी हे घरात नाहीत, आपल्याला त्यांचा पाहुणचार जमेल का? असाही विचार आला. त्यापेक्षा माझ्या मैत्रिणींना फोन करून परिस्थिती सांगून मदतीला येण्यासाठी विचारलं. सरिता, रिमा, हिना यापैकी रिमा व हिना यांच्याकडे पाहुणे आल्यामुळे त्या काही येऊ शकणार नाहीत, हे कळाले. सरिताने मात्र घरातील कामे आटोपून लगेच येते असं सांगितलं. मी सर्वांना फोन करून झाल्यावर ह्यांना फोन लावला. पण म्हणतात ना, भरवश्याच्या म्हशीला टोणगा! त्यांचा मोबाईल हॉलमध्येच वाजू लागला. अरे बापरे ! ह्यांना सांगून प्राध्यापकांना नाश्त्यासाठी काहीतरी मागवलं तरी असतं. पण त्याचा काही उपयोग नव्हता. शेवटी मी स्वयंपाकघरात थोडंफार काम करून आठ सव्वाआठला हॉल आवरून घेऊ लागले. एवढ्यात दारावरची बेल वाजली.
‘सुदेश परांडकर आहेत का?’
  मला हेच प्राध्यापक असतील असं वाटलं. परंतु दुसराच माणूस होता. दुसऱ्याच क्षणी त्यांनी लगेच एक कॅरीबॅग हातात देऊन ही फाईल परांडकर साहेबांना द्या व मेहता साहेबांना फोन करायला सांगा, असे बोलून तो निघून गेला. बहुतेक तो घाईत असावा. त्याची गाडी घरापासून लांब लावल्यामुळे आवाज आलाच नाही. मेहता साहेबांचा सेक्रेटरी होता तो. त्यानंतर मी माझ्या घरातल्या तयारीला लागले. मुलं लहान असल्यामुळे घरभर राडा करायला ते नेहमी सज्ज असत. मीच आवरून आवरून कंटाळून जाई.

सासूबाईंचाही स्वयंपाक होत आला. माझं आवरून झालंच होतं. मी स्वयंपाकघर आवरायला लागले. तेवढ्यात पुन्हा फोन वाजला.

‘मिसेस सुनीता परांडकर मी प्रा. पवार बोलतोय. मी तुमच्या सोसायटीच्या बाहेर उभा आहे. कृपया कोणालातरी पाठवा. मला घर लक्षात येईना.’

मी पत्ता दिलाच होता. मग सुशिक्षित माणसाला सहज सापडावा असा आमचा बंगला होता. पण तरीही शेवटी पाहुण्यांची मागणी पूर्ण केलीच पाहिजे. म्हणून मी स्वरितला पाठविले. स्वरित सरांना घेऊन आला. सरांची राहाणी तशी साधीच होती. सफारी, हातात बॅग, गळ्यात मोबाईल. साधारण ४०- ४२ वय असावं. मी नमस्कार करून आत या, असं म्हणायच्या आत सर आत येऊन सोफ्यावर आसनस्थ झाले होते. स्वरितने त्यांना पाणी दिले. मी चहा आणते म्हणून वळणार त्याबरोबर मला आताच चहा नको, मी आंघोळ-नाश्ता करून मगच चहा घेईन, असे सांगितल्यावर मी आश्चर्यचकित झाले. मी मात्र सुदेश आता अर्ध्या तासात येईल मगच दोघांना चहा करावा, या बेतात होते. पण आता… मी स्वरितलाच गिझरचे पाणी सोडून दे, पाणी, टॉवेल, साबण, पेस्ट ही सर्व तयारी कर असं सांगून स्वयंपाकघराकडे नाश्त्याच्या तयारीला वळले. सरांचं बोलणं व वागणं थोडंसं वेगळं वाटलं. पण शेवटी आपल्याला काय अर्ध्या तासात जातील प्राध्यापक, असा विचार मी केला.

प्राध्यापकांची आंघोळ, नाश्ता, चहा झाला. बोलता बोलता त्यांनी मला हेही सांगितलं, की विद्यापीठातल्या लोकांची सोय रेस्ट हाऊसवर केली जाते. मी रात्रीच कोल्हापूरला आलो. रात्री रेस्ट हाऊसवरच होतो. तेथे सगळी सोय होती. सकाळी आंघोळीला गरम पाणीही होते. परंतु एवढ्या लवकर आंघोळ नको म्हणून मीच टाळले. म्हटलं चला, परांडकर मॅडमकडेच जाऊ. त्यांना माझी कविता खूप आवडल्याचे त्यांनी सांगितले. आणखी काही लेखन असेल तर दाखवा अशी मागणी त्यांनी केली आणि त्याबरोबरच दोन पासपोर्ट साईज फोटोही मागितले. ते कशाला असं विचारताच अभ्यासक्रमात कविता घेताना तुमच्या सर्व माहितीची आवश्यकता असते असेही सांगितले. परंतु योगायोगाने माझ्याजवळ फोटो नव्हते. मी माझे साहित्य वाचायला दिलं. मला त्यांच्याबरोबर बोलताना अवघडल्यासारखं वाटत होतं. त्यांच्या बोलण्याचा हेल, भाषा आणि आविर्भाव वेगळाच होता. मी सारखी सुदेशची वाट पाहात होते. साडेनऊ होऊन गेले होते. मुलांनी शाळेसाठी आवरलं. त्यांचा टिफीन, दप्तर सर्व आवरून मुलं हॉलमध्ये येऊन थांबली. थोड्या वेळात त्यांची रिक्षा येणार होतीच. शेवटी सरांनी ‘मॅडम इथे बसा’ म्हणून खुर्चीकडे हात केला. मी गृहिणी असल्यामुळे इतर वेळेसही दुसऱ्या कुणाशी म्हणण्यापेक्षा मोठ्या व्यक्तींशी बोलण्याचा संबंध आतापर्यंत कधी आलाच नव्हता, त्यामुळे मला अवघडल्यासारखं वाटत होतं. शेवटी मी खुर्चीवर बसले. सरांनी लेखनासंदर्भात मार्गदर्शन सुरू केलं. मीही मन लावून ऐकत होतेच. कधी कविता तर कधी कथा,  कधी ललित लेख. मला त्यांच्या हुशारीचं कौतुक वाटत होतं. एवढी हुशार व्यक्ती म्हणून ते आज मोठ्या पदावर होते. या सर्वात मुलांची रिक्षा आली. मुलं शाळेला गेली. नंतर सुदेशचा फोन आला. त्यांना घरी यायला जमणार नाही म्हणून टिफीन ऑफिसमध्ये पाठवून देण्याविषयी सांगत होते. मी त्यांना त्यांच्या फोन विसरण्याबाबत समाचार घेतला. नंतर परिस्थितीचा आढावा सांगितला. ते घरापासून बरेच लांब होते. पण तरीही ऑफिसमध्ये जाऊन साडेदहा वाजता सही करून साहेबांना विचारून येऊन जातो. नाहीतर त्यांनाच इकडे पाठव, असाही निरोप त्यांनी दिला. शेवटी मला काहीच कळेना.

सासूबाई हॉलमध्ये येऊन प्राध्यापकांशी गप्पा मारत बसल्या होत्या. साडेदहा वाजत आलेच होते. प्राध्यापकांना मी सुदेशच्या ऑफिसच्या कामाविषयी सांगितलेच होते. परंतु आता सुदेश घरी येणार नाहीत हे ऐकून प्राध्यापक नाराज झाले. मला निघालयाच हवं. त्यांनी घाई सुरू केली. मला मात्र काहीच कळेना. माझं बरंसचं नवीन लेखन साहित्य त्यांनी बरोबर घेतलं. मग तुमचा बायोडेटा व फोटो द्या असंही सांगितलं. मी बायोडेटा दिला. पण फोटो पुन्हा पाठवून देईन असं सांगितलं. तुमचा पत्ता, घरची काही माहिती विचारली. त्यासरशी माझं कार्ड देतो व माझ्या घरच्यांचा फोटो दाखवतो म्हणून त्यांनी खिशात हात घातला. पॉकेट काही केल्या प्राध्यापकांना सापडेना. त्यांनी सर्व खिसे तपासले. बरोबर आणलेल्या सुटकेसमध्येही पाहिलं. पण मलाही कसंतरी वाटू लागलं. आपल्या घरात हरवलं की, बाहेर. मनाला एक चुटपूट वाटू लागली. शेवटी मी बाथरूममध्येही पाहिलं. कुठंच सापडेना. प्राध्यापकांनी रिक्षावाल्याला पैसे देताना पडलं असणार असं मला वाटलं. पण त्यांनी असंही सांगितलं, त्यांना सोडायला सरकारी गाडी आली होती. म्हणून तर ते घर शोधत होते. नाहीतर रिक्षावाले घरापर्यंत आणून सोडतातच ना! आता पुढे प्राध्यापक सोफ्यावर मटकन् बसले. मॅडम खूप मोठा प्रॉब्लेम झाला. माझी बरोबर आणलेली रक्कम त्यातच होती. मला सरांना (सुदेश) फोन लावून द्या. मी त्यांच्याशी बोलून त्यांच्याकडून काही रक्कम घेतो, असं त्यांनी सांगितलं. प्राध्यापक नांदेडला गेले की, रक्कम लगेच पाठवून देतो असंही सांगत होते. किती हवे आहेत पैसे? असं विचारल्यावर त्यांनी दोन हजारांची मागणी केली. मला प्रश्नच पडला, एवढं तिकीट आहे नांदेडला? पण तरीही एवढे? असं म्हणताच त्यांनी विश्लेषण दिलं. मी एवढ्या लांब कोल्हापूरला आलो. मग देवीचं दर्शन, पन्हाळा, रंकाळा पाहूनच जाईन. इथला प्रसाद घेऊन जाईन. पुन्हा पुन्हा येणं होत नाही. परांडकर मॅडम मी खास तुमच्यासाठी आलोय.
‘मला तुमच्यासाठी आलोय मी.’
या वाक्यावर जोर वाटला. कोणी व्यक्ती माझ्यासाठी एवढी धडपडते आणि आपण काहीच करायचे नाही. हे योग्य नाही. म्हणून मी माझ्याकडचे पैसे आणण्यासाठी बेडरूममध्ये गेले. माझ्याकडे दीड हजार होते. मी पैसे बघायला जाऊन येईपर्यंत आई प्राध्यापकांशी गप्पा मारत होत्या. आई, आई करून त्यांच्याजवळ बसत त्यांनी गप्पा सुरू केल्या होत्या. मला आईचा शांत स्वभाव माहीत होता. आज मात्र त्या प्राध्यापकांशी छान गप्पा मारत होत्या. मी प्राध्यापकांसमोर दीड हजार रुपये असल्याचं सांगितलं व सुदेश ऑफिसमध्ये नाहीत. काही कामासाठी बाहेर गेल्याचं मला फोनवर कळलं होतं, हेही सांगितलं. प्राध्यापक शेवटी मला आता देवीचे दर्शन न करताच नांदेड गाठावं लागणार असो. असं म्हणताच आईंना वाईट वाटलं. त्या लगेच उठल्या व आत जाऊन सातशे रुपये घेऊन आल्या.

‘हे घे बाबा. पण आईचे दर्शन घेऊन जा.’
त्यांचं वाक्य व सढळ हाताने मदत मी अवाक् झाले. कारण घरात काय चाललंय किंवा आर्थिक स्थिती त्याबद्दल त्यांचं कधीच काही देणंघेणं नसतं. तशा त्या व्यवहारकुशल आहेत. पण तरीही त्यांनी एवढी उत्सुकता याबाबतीत दाखवली विशेष वाटलं. तशा हिशेबात त्या हुशार होत्या. या सर्वांमध्ये वेळ कसा गेला कळलंच नाही. ऑफिसमधून डबा नेण्यासाठी शिपाई आला. त्याला डबा दिला. भांडेवाल्या मावशीला भांडी दिली व मी हॉलमध्ये आले. तोच माझी मैत्रीण आली. सरिता इतका उशीर, असं मी म्हणताच, प्राध्यापक
  ‘देर आये दुरुस्त आये’
  असं म्हणत गप्पा मारण्यासाठी तिच्याकडे वळले. तीही लेखन करीत होती. मग त्यांच्या छान गप्पा व प्राध्यापकांचं अनमोल मागदर्शन, बारा कधी  वाजले कळलेच नाही.  आईंच्या जेवणाची वेळ झाली होती. माझ्याबरोबर दोन घास खाऊन जा, असा आग्रह त्यांनी प्राध्यापकांना केला. नाश्ता मी एकट्यानेच केला. परांडकर सरांची भेट झाली नाही. पण असू दे.  आईंबरोबर चार घास खाण्याचं माझे भाग्य आहेच म्हणायचं. असं म्हणत प्राध्यापक जेवायला तयार झाले.

सरिता, मी, आई व प्राध्यापक चौघांनी जेवण केले. प्राध्यापक जाणार तेवढ्यात सरिताने त्यांना गिफ्ट म्हणून आणलेला पेन दिला. पेन बराच भारी वाटत होता. प्राध्यापकांनी त्याचा स्वीकार केला आणि आभार मानले. सरिताने स्वतः लेखन साहित्य आणलं होतं ते त्यांना वाचायला दिलं. प्राध्यापकांनी हे साहित्य माझ्याकडे राहू दे, नांदेडलाच वाचतो, मला उशीर होतोय असं सांगून तिचा पासपोर्ट साईज फोटो मागितला. सरिताला आधीच फोटोची आवड. तिच्या पर्समध्ये फोटो होतेच. लगेच तिने फोटो काढून दिला. सरिताला तिचा फोटो व साहित्य घेतल्यामुळे खूप आनंद झाला होता. मी तुम्हाला पत्रव्यवहार करून साहित्य अभ्यासक्रमात घेण्याविषयी सांगेन असं सांगून पत्रव्यवहारासाठी पत्ता, पोस्ट पाकीट यांची मागणी केली. आता सध्या पोस्ट पाकिट कुठे मिळणार? खूप लांब जावे लागेल. त्यापेक्षा तुम्हीच घ्या विकत. म्हणून तिने पर्समध्ये हात घातला. सरिताबाईंच्या पर्समध्ये सुटे पाच-दहा रुपये नव्हते. शंभर रुपये प्राध्यापकांनी घेतले. राहू दे मी सुटे करून घेतो. शेवटी आम्ही त्यांना निरोप दिला. ‘येईन पुन्हा’ असं जाताना प्राध्यापक म्हणाले. सरिता व मी आनंदात होतो. आज आम्ही एवढ्या मोठ्या व्यक्तीला भेटलो. काही दिवसात आमचं साहित्य अभ्यासक्रमात येणार म्हणजे आम्ही मोठे कोणीतरी असल्याचा आभास आम्हाला होऊ लागला.

दोन महिने होऊन गेले तरी प्राध्यापकांचा फोन नाही आला. म्हणून सरितानेच मला फोन केल्यावर मलाही नवल वाटले. खरंच आपण विसरूनच गेलो. सुदेशला मी याबद्दल बोलल्यावर त्यांच्या फोनवर फोन लावण्यासाठी त्यांचा फोन नंबर मागितल्यावर मी नंबर दिला. प्रथम तो फोन लागतच नव्हता. पण शेवटी चार-पाच वेळा प्रयत्न केल्यावर लागला. पलीकडून डॉ. गांधी बोलत होते. सुदेशनी हा फोन नंबर प्रा. पवारांचाच ना? असं विचारताच सॉरी राँग नंबर असं म्हणून ते फोन ठेवणार, एवढ्यात सुदेशनेच बोलणं पुढं वाढवलं.

‘सर या फोनवरून तीन-चार महिन्यांपूर्वी प्रा. पवारांचा आम्हाला फोन आला होता.’
  यावर गांधी म्हणाले,
   ‘हो असं का? प्रा. पवार का? बरोबर आहे. ते मला भेटायला आले होते तेव्हा माझ्या क्लिनिकमधून त्यांनी दोन-चार जणांना फोन केले होते.’
   ‘त्यांचा फोन नंबर देता का?’
   असं म्हणताच डॉ. गांधींनी प्राध्यापकांचा नंबर दिला आणि हेही सांगितलं की, या नंबरवर फोन लागत नाही. सुदेशने थोडक्यात एकंदर परिस्थितीचा आढावा डॉ. गांधींना सांगितला. तर डॉ. गांधी लेखन करतात व त्यांचेही लेखन दिपावली अंकात छापलं जातं. हे लेखन पाहून प्रा. पवारांनी त्यांना फोन करून भेट घेतली. फोटो, साहित्य घेऊन दोन हजार रुपये घेऊन पुन्हा फोन करतो आणि पैसे परत करतो असं सांगितलं होतं. सर्व परिस्थिती अनुभवल्यानंतर मला तर काहीच सुचेना. मी सरिताला फोन करून घरी बोलावून घेतले. सर्व परिस्थिती सांगितल्यावर तीही नाराज झाली. मी आणि सरिताने मिळून सर्व मैत्रिणींना पार्टी दिली होती. थोडा का होईना अभिमान आम्हा दोघींना वाटू लागला होता. आम्ही साहित्यिक झाल्यासारखे वाटत होते. सुदेशने गेल्या महिन्यातच नेकलेस प्रेझेंट दिले होते. मला तर काय करावे कळेच ना? सरिताला दिलेल्या कार्डवर प्रा. पवारांचा फोन नंबर, नांदेडच्या मराठा विद्यापीठाचाही नंबर होता. त्या फोनवर फोन केला तर तो अस्तित्वातच नसल्याचं कळलं. विद्यापीठात फोन लावल्यावर अशा नावाची कोणी व्यक्ती विद्यापीठात कार्यरत नसल्याचं कळलं आणि उपकुलगुरू ही पोस्टच नसते हेही कळले. सुदेशला पण कसंतरी वाटू लागलं. खरंच काय करावं? या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आमच्याकडे काही पुरावाही नव्हता. आम्हालाही खूप वाईट वाटले. मला तर त्या दिवसापासून कोणा व्यक्तीवर विश्वासच बसत नाही. आजकालच्या जगात अंतरा-अंतरावर फसविणारेच खूप भेटतात.
माणुसकी हरवली आहे असेच वाटत रहाते.

आशा अरुण पाटील

सोलापूर.

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Don`t copy text!