हरवलेलं माहेरपण

दिव्या खिडकीतून बाहेर पहात होती. सरिता तिची मैत्रिण. माहेरी निघाली होती. तिने दिव्याला हात हलवून निरोप दिला. दिव्याला ती चालली म्हणून वाईट वाटतच होते पण त्यापेक्षाही आपण असं माहेरी कधी गेल्याचं तिला आठवतच नव्हते. लग्न होवूनही चांगली आठ- दहा वर्षे झाली होती. पहिलं एक वर्षे पहिले सण म्हणून माहेरी जाण्यात अन् सासरी येण्यात कसे गेले कळालेच नाही. अन् दुसऱ्या वर्षात पहिले बाळंतपण. तिसऱ्या वर्षात मुलगा लहान आहे. तूझ्या माहेरी उन्हाळा जास्त असतो. या सबबीखाली जायला मिळाले नाही. बाळ मोठं झालं. अन् मग सुरु झाला खऱ्या अर्थाने संसार. दिव्याला एक बहिण अन् एक भाऊ . भाऊ मुंबईला तर बहिण पुण्याला आणि ती स्वतः साताऱ्याला. सोलापूरला तिचे माहेर. अर्थातच गावाकडे म्हणजेच सोलापूरला सुट्टी लागण्यापूर्वीच त्यांचे नियोजन होत असे. कोण कधी निघणार, किती दिवस रहाणार. गाडी कोण कोण आणणार, कोण कोण सुट्टीला येणार असे तिच्या बहिण भावाचे नियोजन तिच्या लग्नापूर्वी होतं होतं. पण आता लग्न झाल्यामुळे या सर्व कार्यक्रमात तिला सामील होता येत नव्हतं. दिव्याला जेवढी ओढ सोलापूरला जाण्याची वाटे, त्यापेक्षाही जास्त तिच्या माहेरच्यांना वाटे.

साताऱ्या मध्ये ते फ्लॅट सिस्टिम मध्ये रहात. आसपासच्या दोन-चार घरातल्या कुटूंबांशीच तिची ओळख होती. त्या इमारतीत ऋत्विकच्या वयाचं जास्त कोणी नव्हते. एकतर एकदम मोठे किंवा लहान. त्यामुळे ऋत्विकला खेळायला कोणीही सोबत नसे. शाळा घरापासून दूर. त्यामुळे शाळेतले मित्र-मैत्रिणी शाळेपुरतेच. ऋत्विकने बऱ्याच वेळा दिव्याकडे हट्टही केला होता. मला खेळण्यासाठी, शाळेत जाण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी भाऊ किंवा बहिण हवी. आपण मेडिकलमधून घेवून येवू. पण दिव्याचा नवरा ‘हम दो हमारा एक’ वर ठाम होता. हळूहळू ऋत्विक शाळेला जावू लागला तसा शाळेत रमू लागला. घरातील माणसांसोबतही रमू लागला. आत्या, आत्याची मुलं त्याला आवडत. त्यामुळे तो सुट्टीला आत्याकडे जाई पण सोलापूरला आजोळी नको म्हणत असे. पेपर झाले की लगेच त्याने बॅग भरली. त्याला त्याच्या आत्याच्या घरी सुट्टीला जायचे होते. त्याची आत्या तो सुट्टीला येणार म्हणून तयारीतच होती. कारण ऋत्विक आठ दहा दिवस त्याच्या आत्याच्या घरी आज्जी सोबत जाणार होता. आजोबा अन् बाबा मात्र घरीच असणार होते. आणि या दोघांच करायचं म्हणून आईलाही साताऱ्यालाच रहावं लागणार होते. ऋत्विक आठ दहा दिवसांनी परत घरी साताऱ्याला येणार होता. येताना आत्या, मामा, आत्याची मुलं सोबत येणार होते. त्यांची सुट्टी एकदम मजेत जाणार होती. त्याच्या आईला म्हणजेच दिव्याला पण दोन दिवस माहेरी जावं वाटत होते पण शक्यच नव्हते ते. ती आता फक्त सासू-सासरे, मुलगा, ननंद-ननंदावा, पती यांचाच विचार करत होती. स्वत:च असं विश्व असतं. हे तिच्या बाबतीत कोणालाच मान्य नव्हते. स्वतःला नव्याने तरो ताजा करायला तिची वेगळी जागा हवी होती. ती तिला मनाने मिळणार नाही. तर ती भांडून, हक्काने मिळवावी लागणार होती. असं तिला कधीकधी वाटायचं. दिव्या तुमच्या आमच्या सारखीच एक सखी. सासू-सासरे, आई-वडिल, बहिण- भावंडे, मुलगा यात रमत असतानाचा स्वत्व सिद्ध करण्यासाठी स्वकमाई करणारी. दररोजच्या धकाधकीच्या, धावपळीच्या आयुष्यात स्वतःला सिद्ध करणारी ती विसाव्यासाठी, माहेरपणाच्या आई- वडिलांच्या दाट छायेत निवांत क्षण अनुभवण्यास आतुरलेली. दिवसानंतर रात्र अन् अंधारानंतर उजेड ही गणितं तोडपाठ असलेली. कष्टानंतर विसावणं विसरूनच गेली. कर्तव्य करताना कुठे कसुर होऊ नये म्हणून धास्तावलेली ती निर्धास्तपणा मला हवा हे सांगायला विसरली होती. तिने शिक्षकी पेशा निवडल्याने मे महिना जणू विसावण्याचाच. वर्षभर चाललेली शैक्षणिक आणि सांसारिक कामं यातून विरंगुळा काय तो मे महिन्यातच. यावर्षी मात्र तिने माहेरी जायचंच म्हणून ठरवलं होतं. पण ऋत्विक काही करता तयार होणारच नव्हता. माहेरी चार दिवस गेलं तरी एक प्रकारचा उत्साह निर्माण होणार होता. वर्षभराचे काम करण्याची उर्जा मिळणार होती. ज्या घरात ती लहानाची मोठी झाली त्या व्यक्तिंच्या सानिध्यात तिचं व्यक्तिमत्व बहरत गेलं. त्या घरात तीचं सर्वस्व असणारे आई बाबा रहात. सुट्टीला बहिण भाऊ येत. त्या माहेरच्या पंखाखाली दोन दिवस विसावले तरी छान वाटते. पुन्हा एकदा कामाचे चक्र सुरु झालं की मग पुन्हा आरशात तोंड पाहायला अन् दहा मिनिटं शांत बसून विचार करायलाही वेळ तिला मिळणार नाही. यावेळी तीने मुलाला समजून सांगण्यापेक्षा ती स्वतः ननंदबाईंनाच विनंतीवजा बोलली.

‘ताई ऋत्विक तुमच्याकडून इकडे येताना तुम्ही इकडे आलात की मी चार पाच दिवसाने एक-दोन दिवसासाठी ऋत्विकला घेवून माहेरी जावून येते.’ बोलताना जरी ती धाडसाने बोलत होती. तरी मनात धाकधूक होतीच. पण काय करायचं? परंतु ननंदबाईनी कदाचित या गोष्टीचा विचार यापुर्वीच केला असावा. लगेच त्यांनी परवानगी दिली.

‘अगं चालेल ना! मी आई -बाबांसोबत दादाचीही काळजी घेईन बरं. तू खुशाल चार दिवस जावून ये माहेरी.’ त्यांच्या या परवानगीने ती मनोमन सुखावली. शेवटी एक स्त्रीच स्त्रीचं मन समजून घेवू शकते हे खरंच. ती मात्र एवढे वर्ष मनातच कुढत बसली. त्यांना यापुर्वीच का विचारले नाही. याचेच तिला वाईट वाटले. त्यांच्या आई वडिलांचा नकार होता म्हणजे यांचाही आहे असंच मानून ती एवढे वर्ष विचार करतच राहिली.पण शेवटी काय? “देर आये दुरुस्त आये।‘

6 Replies to “हरवलेलं माहेरपण”

  1. संसार व मनातील इच्छा यातील ओढाओढाताणअनुभवायला मिळाली

Comments are closed.

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Don`t copy text!