जिद्दी                       सारिका गेल्या दोन दिवसांपासून कोणाशीच बोलत नव्हती. घरात एकत्र कुटुंब. त्यामुळं प्रत्येकाचा एकमेकावर खूप जीव. तिनं मात्र गेल्या दोन दिवसापासून सर्वांबरोबर अबोला धरला होता. सारिका आता बारावीला होती. एकंदरीत अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणाऱ्या सारिकाची सर्वांनाच आवड होती. तिलाही सर्वांशी मिळून मिसळून राहणे आवडत असे. सारिकाचे दिसणे सौंदर्याची सर्वोत्तम सीमा गाठणारे होते. सारिकाने लहानपणापासून सर्वांचे प्रेम मिळविले होते. परंतु अवघी दहा वर्षाची असतानाच ती मातृप्रेमापासून पारखी झाली होती. तिच्या पाठीवर आठ वर्षाचा एक भाऊ होता आणि नंतर तिसऱ्या बाळंतपणात मात्र सर्व काही व्यवस्थित झाले असतानाही बाळंतपणातच तिच्या भावाला जन्म दिल्यानंतर अल्पशा  आजारामुळे एका महिन्यातच तिच्या आईवर काळाने झडप घातली.  मोठा आघात झाला. एकत्र कुटुंब असल्यामुळे एकमेकांना जपले जात होते. कमी-जास्त पाहिले जात होते. पण तरीही मातृत्वाला पारख्या झालेल्या या तीन बहीण-भावंडांना मातृप्रेमाची उणीव भासतच होती.  सारिकाच्या काकूने लहान बाळाला तळहातावरील फोडाप्रमाणे जपले. मोठ्यांकडून संस्कार, प्रेम, आशीर्वाद भरभरून मिळाले. बाळ वर्षाचे झाले अन् एकाएकी तापामुळे आजारी पडले. काकूने लहानपणापासून आईची भूमिका निभावली होती. आताही निभावत होती. पण कुठेतरी  हक्काचं माणूस मुलांसाठी असावे असे सारिकाच्या वडिलांना वाटू लागले. त्यांच्या अंतर्मनातील द्वंद्व त्यांनी आपल्या मोठ्या भावापुढे मांडले. मनातले विचार मांडल्यामुळे त्यांना हलके वाटतच होते. सर्वांच्या विचारमंथनातून शेवटी त्यांनी पुनर्विवाहाचा निर्णय घेतला होता. यातून सर्वांनाच मुलांसाठी हा निर्णय योग्य चांगला आहे असे वाटत होते. मुलांनाही आपल्याला आई मिळणार म्हणून आनंद झाला होता. बघता बघता दिवस जात होते. लग्नाचा निर्णय घेऊनही बरीच वर्ष झाली होती. छोटा सौमित्र आता कुठे सात वर्षाचा होता. सौरभ पंधरा वर्षाचा अन् सारिका सतरा वर्षाची.  सारिकाला मात्र कसेतरी वाटत होते. परंतु ती तिची नाराजी सर्वांसमोर व्यक्त करू शकत नव्हती. घरामध्ये आम्हा तिन्ही भावंडांना सर्वजण जपतात मग आणखी एका व्यक्तीची घरात खरंच गरज आहे का? येणारी व्यक्ती कशी असेल? ती आम्हाला आपलं मानेल का? आम्ही तिच्याशी अन् ती आमच्याशी जुळवून घेईल का? एक ना दोन अनेक प्रश्नांचं काहूर तिच्या मनात घोंगावत होतं. अशातच सावत्रपणाबद्दल म्हणजे सावत्र आई, सावत्र भाऊ-बहीण यांच्याविषयीचे अनेक किस्से तिच्या ऐकिवात होते. आपली नवीन आई जर आपल्याला जपणारी, समजून घेणारी असेल तर सौरभपेक्षा सौमित्रची चांगली सोय होईल. ती द्विधा मनस्थितीत होती. अनेक गोष्टींमुळेच आज तिला उदास वाटत होते.
                       बघता बघता सारिकाच्या बाबांचे लग्न झाले. एक वर्ष कसं सरलं कोणाच्याही लक्षात आलं नाही. सरिता घरात आली अन् तिच्या रूपाने  मुलांवर ममतेचा वर्षाव झाला. तिच्या पोटी पुन्हा जणू शालिनीनेच जन्म घेतला. लीनाचा जन्म झाला आणि घरात पुन्हा किलबिलाट सुरू झाला. सारिकाने आता एमबीबीएसला प्रवेश घेतला होता. तशी तिच्या आईसह (सारितासह) सर्वांचीच इच्छा होती. सारिकाला स्वतःच्या कुटुंबात भरभरून प्रेम मिळतच होतं पण आईने तिला कसे वागावे, कसा नियोजनबद्ध अभ्यास करावा, या आणि अशा अनेक गोष्टींचे मनापासून ज्ञान दिले होते. बघता बघता सावत्र हा शब्द केव्हाच विसरून गेला होता. कारण आई या घरात नवीन आली तेव्हा सारिका, सौरभ दोघांच्याही मनात तेढ होती. परंतु सौरभ मात्र सरिताशी मिळून मिसळून वागे. सारिकाला जास्त कळत होते म्हणून मनात गैरसमज होता. तर सौमित्र एकदम लहान जरी असला तरी पहिल्यापासून ही स्त्री घरात नसल्यामुळे तो तिच्याकडे जाण्यास, तिच्याकडून खाण्यास नकार देत असे. पण आईनेही प्रेम, माया, सहानुभूती यांचा अखंड झरा वाहत ठेवला अन् सगळ्या कुटुंबाला आपलं केलं. सरिताच्या आगमनामुळे मात्र परस्परांमधले प्रेम चांगलेच दृढ झाले. सारिकाच्या बाबांनाही खूप मोठा आधार वाटत होता. याआधी घरात माणसं आहेत म्हणून जरी टेन्शन नसल.  तरी आपल्या मुलांना आईचं प्रेम खूप काळ मिळाले नाही म्हणून वाईट वाटत होते. आता मात्र ते निश्चिंत झाले. सारिकाच्या लग्नाचा विचार मनात घोळत होता. घरातून तसा तर सर्वांचाच होकार होता. परंतु सारिकाला तर शिकायचे होते. तिने तिच्या मनातलं गुपित आईजवळ उलगडलं. अन् आईनेही तिला दुजोरा दिला. खरंतर एका जबाबदारीतून रिकामं झालं तर बरं झालं असतं हा विचार सर्वांच्याच मनात घोळत होता. सारिकाच्या स्वप्नांचा विचार करणारी एकच व्यक्ती घरात होती, ती म्हणजे आई. सारिकाने आपल्या मनातील विचार सांगितल्यापासून तर आईला तिच्याविषयी अभिमान वाटू लागला. सारिका एमबीबीएस पूर्ण करून एमडी करणार होती. आपली आई शालिनीवर बाळंतपणात जसा दैवाने घाला घातला, तशी वेळ कोणावर ती येवूच देणार नाही. या जिद्दीने ती स्त्रीरोगतज्ज्ञ होणार होती. आपल्या आईच्या नावाने दवाखाना उघडणार होती. तिचे हे विचार जसे नवीन आईला पटले तसे हळूहळू सर्वांना योग्य वाटू लागले.
                 नवीन आईने मुलांच्या संगोपनात आयुष्य वेचलं होतं. सौरभ इंजिनिअर तर सौमित्र वकील झाला होता. तिने संसार आपलाच आहे असे मानून संसारवेल व्यवस्थित वाढविली होती. तिने काळजीने सर्व गोष्टी केल्याने ती वेल बहरली होती. सारिकाचे यश पाहून तिला आकाश ठेंगणे वाटत होते. सरिताला एक नव्हे तर चार मुले होती. सारिकाच्या यशाने तिला तिने केलेल्या निरपेक्ष प्रेमाचीच पोचपावती मिळाली होती. सारिकाच्या दवाखान्यासाठी तिने शालिनी प्रसूतिगृह हे नाव ठेवायचे आताच ठरवले.   हे स्वप्न तिने सारिकाला सांगितले. सारिकानेही त्या दिशेने प्रयत्नरूपी पाऊल उचलले. ती आईचे नाव देऊन दवाखाना उभा करणार हीच तिच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरेल, याची तिला खात्री होती.
                                      सौ.आशा अरूण पाटील
                                                   ९४२२४३३६८६

2 Replies to “जिद्दी”

  1. खुपच छान आणि हृदयस्पर्शी

Comments are closed.

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Don`t copy text!