काही क्षण

लीनाने साधारण पाच दिवसांच्या सुट्टीचे नियोजन केले होते. खरंतर तिलाही माहित होते. आपण घरातून बाहेर गेल्यानंतर जास्त काही नाही पण थोडीतरी अडचण होईल. कोरोनानंतर या सुट्टीमध्ये तिने सर्व बहिणींनी एकत्रित यावं म्हणून आग्रह केला होता. नुसता आग्रह नाही तर नियोजनाची कार्यवाही करण्यात तिचा हात जास्त होता. लीनाच्या सासूबाईंना मात्र ताण जाणवत होता म्हणजे कामाला ठेवलेल्या बाईमाणसांनी सुट्टी घेतली तर काय करायचं, तसं लीनाने हुशारीने घरातला कारभार हाती घेतला, याचे त्यांना कौतुक तर वाटायचे पण कधी कधी आमच्या वेळी नव्हते बाई असे, अशी भावना असायचीच. शेवटी काय प्रत्येक पिढीमध्ये अंतर हे राहणारच ना! घर तसं चांगले ऐसपैस एकूण सहा-सात खोल्यांचं, समोर मोठं मैदान, मैदानामध्ये झाडं होती. सारं पाहून लीना स्वतःच्या नवऱ्याच्या व्यवसायातही मदत करत होती. नवरा म्हणजेच रॉनीही हे जाणून होताच. सासू-सासरे, ननंद आणि दोन मुलं यांच्यासाठी ती महत्वाची होती. पण चित्र असं न दिसता लीनासाठी हे सारे महत्वाचे आहेत असे दिसत होते. मात्र लीना जशी पस्तीशीकडे झुकू लागली तशी स्वत:साठी जगले पाहिजे हे लक्षात घेवून वागू लागली. सासूबाई म्हणतही,
‘अगं खूप कमी आयुष्य पाहिले आहे. अजून खूप आयुष्य आणि अनुभव घ्यायचे आहेत तुला.’
खरंच हे जरी खरं होतं तरी लीना मात्र आयुष्य हे क्षणभंगुर मानून, आहे त्या वेळेचा सदुपयोग करून स्वतःसह सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होती. ‘नाहीतरी आयुष्य किती जगला यापेक्षा कसं जगला हे महत्वाचंच ना!’
तीच्या नजरेतून.

दोन दिवसानंतर निघायचं आहे मला लोणावळ्याला. तयारी तर होत आलीच आहे. कमीत कमी तीन दिवस आणि जास्तीत जास्त पाच दिवस असं नियोजन केलं आहे मी सहलीचं. या सहलीत आम्ही सगळ्या बहिणी असणार आहोत. आम्ही सख्ख्या तीन बहिणी मावस, चुलत आत्ये बहिणी आणि रहाता राहिल्या आई, काकू, आत्या. सर्व मिळून अठरा जणी आहोत. तुम्ही म्हणाल एवढा गोधळ काय उपयोगाचा. पण आमची ट्रिप म्हणजे नात्यांचं गेट टू गेदर. आता आई,काकू,आत्या यांचं माहेरपण आम्ही लेकींनीच करायचं. चार दिवस निवांत रहाणं म्हणजेच थोडक्यात माहेरपण. आमच्यापैकी एक दोघीला आई नसल्याने त्यांना माहेरी जायला जमत नाही. मग त्यांना इतरांच्या माहेरी बोलवतोच खरं पण त्यापेक्षा सर्वांनी मिळून वर्षातून दोन चार दिवस मनमोकळपणाने एकत्र यायचं असं ठरवून त्याप्रमाणे एकत्र येण्याचं हे चौथं वर्ष आहे. या तीन चार दिवसात मनासह तनाला मिळालेली विश्रांती खूप महत्वाची असते. यामुळे वर्षभर कामाला, कर्तव्याला लागणारा उत्साह जणू भरभरून मिळतो. या दिवसाचं नियोजन अगदी मस्तपैकी केलेलं असतं. यावर्षीचं लोणावळ्याचे नियोजन माझ्याकडे आहे. तेथील प्रेक्षणीय स्थळांचा आस्वाद आम्ही घेणारच. सोबत आमच्या सकारात्मक विचारांची देवघेव पण होणारच. दिवसभराच्या नियोजनात सकाळी ज्यांना फिरण्याची आवड असेल त्यांनी पायी पायी निसर्गसानिध्यात फिरत निसर्गाचा आस्वाद घ्यायचा. ज्याला सकाळी उठणं म्हणजे दगदग वाटतेय. त्यांनी मग निवांत उठायचे. त्यानंतर आवडीप्रमाणे नास्ता, नंतर एखादे ठिकाण पाहून तिकडेच जेवणं. साधारणतः आठ वाजेपर्यंत परतल्यानंतर संध्याकाळच्या गप्पांमध्ये काही नियम आम्ही स्वतः आखून घेतले आहेत. सासू, नवरा, ननंद, लेकरं, बॉस हे विषय न काढता अन्य विषयांवर बोलायचं. मनाला शांत वाटावे समाधान मिळावे आणि उत्साह द्विगुणीत व्हावा यासाठी तर अशा एकत्रित येण्याच्या सहलींचे आयोजन केले जाते. मग यामध्ये आपण वर्षभरात नवीन काही केलं असेल तर त्याची माहिती आणि आमच्यापैकी ज्यांचं वैशिष्टयपूर्ण काम झालं आहे त्यांची मुलाखत. त्याला प्रोत्साहन आणि शाबासकीची थाप मिळावी म्हणून ‘माहेरचा आहेर’. आमच्यापैकी तीन- चार जणी सोडलं तर बाकी सगळ्या नोकरी करतात. घरात बसणाऱ्या म्हणून त्या साध्या- सुध्या समजायचं कारणच नाही तर त्यांच्या संसाराचं गणितही वाखाणण्यासारखं आहे. नोकरी करणाऱ्याला किंवा स्वतःचा व्यापार करणाऱ्यांकडेही अनुभवांची पोतडीच असते. या अनुभवांचा दुसऱ्याला ही छान उपयोग होतो. प्रत्येकाचं आयुष्य, संसार याबाबतचं गणित वेगळं असतं. त्या गणिताची सूत्रं इतरांनाही नक्कीच उपयोगी पडतात. फक्त आमचा एकच नियम होता, नकारात्मक चर्चा करायच्या नाहीत. जो माणूस म्हणजेच घरातल्या व्यक्ती किंवा बहिणी प्रत्यक्ष समोर नसतील तर त्यांच्याबाबत बोलायचं नाही. यामुळे नकारात्मकतेला थाराच मिळत नाही. वर्षभरातील चांगलं काम सांगून इतरांना प्रेरणा अन् स्वतःला प्रोत्साहन मिळत होते. या तीन चार दिवसात घरच्यांपासून लांब असल्यामुळे आपल्यालाही त्यांची अन् त्यांनाही आपली आठवण तर येणारच पण जेव्हा आपण एकमेकांपासून दूर असतो, तेव्हा जास्त आदर, प्रेम जाणवतं. नात्यांची किंमत अन् नात्यातला ओलावा वाढतो. या तीन चार दिवसात स्वतःसाठी जगणं म्हणजे काय हे जवळजवळ आम्ही साऱ्याजणींनीच जाणलं हातं. समोर येणाऱ्या अनंत अडचणींवर एकमेकांच्या सहाय्याने तोडगा निघत होता, प्रत्येकीला माहेरी जाणं शक्य नाही आणि माहेरी प्रत्येकजण आपल्यासाठी रिकामा असेलच असेही नाही. इतर वेळेस जाणं, येणं, भेटणं होतंच. पण सध्याच्या दिवसात असे तीन-चार दिवस म्हणजे सामूहिक माहेरपणासारखेच. गप्पा, खेळ, मनोरंजन, नवनवीन पदार्थ आणि निसर्गरम्य ठिकाणं हे सारं अनुभवण्यात घराची आठवण येतच नाही असं नाही. अगदीच महत्वाचं काम असेल तरच आम्ही जिथं उतरलो तिथला नंबर दिलेला असतो. या तीन चार दिवसात मोबाईलचा उपवास केला जातो. फक्त आणि फक्त एकमेकांसोबत आनंदाने वेळ व्यतीत करणं. यामुळेच की काय या दिवसांची ओढ आतुरतेने पुन्हा पुन्हा लागते. अनुभवांची पोतडी केव्हा गोळा करायची असते तर केव्हा रिती करायची असते. या साऱ्यांमध्ये मनाला आवडणारे काम, आवश्यक आराम, मानसिक आधार मिळून मन अंत:प्रेरणेने नव्या उत्साहाने पुढच्या काळात येणाऱ्या अनेक गोष्टींना सकारात्मकतेने सामोरे जाते. काही क्षण स्वतः साठीही जगलेच पाहिजेत.

2 Replies to “काही क्षण”

  1. अतिशय छान, इतरांच्या विषयी नकारात्मक बोलायचं नाही, जे समोर नाहीत त्यांचा विषय काढायचा नाही

Comments are closed.

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Don`t copy text!