कन्या

संसारवेलीवर एक पुष्प उमललं. हम दो हमारा एक असा आमचा तयार झाला त्रिकोण. या त्यांच्या विचाराला संसारामध्ये मान्यता द्यावी लागणार होती. ऋत्विक मी आणि यांनी मिळून आयुष्यात असे खूप सारे क्षण एकत्र घालवले होते.

ऋत्‍विक म्हणजे माझा श्वास. तो झाल्यापासून त्याच्या लग्नापर्यंत नात्यांमधील इंद्रधनुषी रंग मी अनुभवले होते. आई, आई आणि आई. याशिवाय वेळप्रसंगी इतरांना हाक मारणारा तो, आईजवळ भावनांची रांगोळी अलगद रेखाटणारा तो, तरुण वयात परीची स्वप्न पाहू लागला. तो आणि त्याचे बाबा यांच्यामध्ये काही प्रसंगावरून कधी तरी भावनिक स्तरावर युद्ध होई. पण तह करायला माझ्यासारखा माणूस असल्यावर युद्ध दीर्घकाळ टिकेल कसे?

यांनी बराच तक्रार केली होती. तो झाल्यापासून या घरात मी आहे. हे तू सोयीस्कररित्या विसरतेस. पण खरं तर असं काहीही नव्हतं. कारण ज्या व्यक्तीसोबत मी सोनेरी स्वप्न संसाराच्या पटलावर रेखाटली त्यात त्यांचा सहभाग महत्वाचा होताच. मी चित्रकार होते पण त्यांनी माझ्या संसाररुपी चित्रात रंग भरले होते हेही खरेच. तसं ऋषी वयात आल्यावर यांच्यापासून थोडा दुरावला नाहीतर आम्ही तिघं एक विचाराने प्रेमाच्या त्रिकोणात तीन शिरोबिंदू बनून होतो. सध्या मी वेगळ्या भूमिकेत प्रवेश करणार होते. जीवनाच्या रंगमंचावर नात्यांचा उत्सव साजरा करत असताना कधी मी कन्या, सखी, पत्नी, आत्या, काकू, मामी या वेगवेगळ्या भूमिका लीलया पेलल्या. कधी भावनांचा गुंता होऊन रेशमी नात्यांना गाठ बसणार नाही याची काळजी घेत होते.

आता मी जगाने वाईटच मांडलेल्या भुमिकेत प्रवेश करणार होते. वेगवेगळे अनुभव अनुषंगाने मिळणारे सल्ले मला विचारात पाडणारे असले, तरी मी ही भुमिका सकारात्मकरीत्या सादर करायची असे ठरवले होते. ऋषीचे लग्न झाले आणि निशाने सोनपावलांनी घरात प्रवेश केला. खरं तर आमच्यासाठी जगाच्या दृष्टिकोनातून ती नात्याने सून असली तरी आमच्या घरात एका कन्येने प्रवेश केला, असे आम्हा दोघांचे मत होते. मुलीच्या मनात सासरी जाताना अनेक प्रश्नांचे काहूर माजलेले असते. ही भावना जगमान्य आहे पण सोबतच सासू या भूमिकेतून विचार केला तर आपल्या मुलाला मिळणारी पत्नी त्याच्या आयुष्यात कसे रंग भरेल? त्याचे आयुष्य कसे व्यतीत होईल? माझ्या मुलाला ती सहचारिणी म्हणून कशी असेल? हे आणि असे अनेक प्रश्न जर माझ्या मनात उभे ठाकत असतील तर आपल्या काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या घरात सून म्हणून पाठवताना मुलीच्या आईवडिलांच्या मनाचाही विचार माझ्यापुढे होताच आणि म्हणूनच ती मुलीप्रमाणेच होती.

तिच्या आईचा वाढदिवस होता. काहीही झालं तरी आईची जागा कोणी घेऊ शकत नसते पण तरीही आईप्रमाणे वाटणारी मी तिला सरप्राईज द्यायचं ठरवलं.ती या घरात आल्यापासून एक वेगळाच रसरशीतपणा मला जाणवत होता. स्वतःचे घर सोडून देऊन आलेल्या घरात स्वर्ग निर्माण करणं सोपं नसतं याची अनुभूती काही वर्षांपूर्वी मी घेतली होती ना! माझं विहीणबाईंशी छान पटायचं. मी त्यांच्या ठिकाणी स्वतःला ठेवून प्रत्येक स्थितीचा विचार पहिल्यापासून केला. त्याही स्वभावाने खूपच छान. म्हणून तर मुलीला सुसंस्कार देताना त्यांनी हातचं काही राखलं नव्हतं. पाहता पाहता आम्ही दोघी मैत्रिणी झालो होतो. त्यांचा वाढदिवस माझ्या घरात होणार ही माझी कल्पना निशा सोडून सर्वांना माहीत होती. निशाला मात्र आईचा वाढदिवस आहे, मग माहेरी जावे असे वाटत होते. तिच्या वागण्यावरून लक्षात येणाऱ्या गोष्टी दुर्लक्षित करत माझ्या मैत्रिणीच्या वाढदिवसाचे नियोजन तिला ऐकवलं होतं. लेकरू गप्पच बसले. मला मनातल्या मनात हसू येत होते पण सरप्राईज… सर्व जय्यत तयारी केली यात नाविलाजाने का होईना निशा सामील झाली. वाढदिवसाच्या दिवशी माझी मैत्रीण आल्यावर स्वागतासाठी मी हिलाच पाठवले. मनातली नाराजी लपवत आनंदाने ती गेली आणि सरप्राईज पाहून चकित झाली.

तिने माझ्या मैत्रिणीला म्हणजे तिच्या आईला मिठीत घेतलं पण सोबत माझ्या जवळ येऊन माझ्या हातांशी गुंफण करत माझ्या कुशीत अलगद शिरली. स्वतःला महत्त्व मिळेल याकडे लक्ष देण्यापेक्षा दुसऱ्यांना महत्व कसं देता येईल हा महत्त्वाचा संस्कार दोघींनीही दिला होता. आज दिवस आनंदात जाणार होता पण सोबत माझी कन्या आनंदाने सामील होणार हे स्वर्गसुख होतेच.

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Don`t copy text!