कुतूहल
तन्वीने आईला प्रश्न विचारण्यासाठी तोंड उघडले पण, आई उलट तिच्यावरच रागावली. आईला ऑफिसला जायचे होते. जाण्याआधीच तन्वीला तिची सर्व तयारी करून तिला पाठवायचे होतेच पण; शिरीषलाही ऑफिससाठी तयारी करून द्यायची होती. शिरीषला ऑफिसमध्ये जाण्यासाठी सर्व तयारी करून द्यायचा तिला कंटाळा येई. पेन, हातरुमाल, चावी, मोबाइल, टिफीन, आवश्यक कागदपत्रं. हे सर्व व्यवस्थित दिले तर बरे; नाहीतर स्वारी ऑफिसवरून आली की, जाम वैतागे, त्यांचे नवीन लग्न झाले, तेव्हा ही कामे ती आवडीने आणि आठवणीने करी; परंतु आजकाल वाढत्या जबाबदाऱ्या अन् कमी होऊ लागलेला उत्साह यांमुळे तिची चिडचिड होत असे. भरीस भर, तन्वीचे कुतूहलापोटी विचारले जाणारे प्रश्न. आई सिलिंडरमध्ये गॅस असतो, मग गॅस म्हणजे हवेचं रूप, मग ते एवढं जड का लागतं? उत्तर सोपंच असे. सिलिंडरमध्ये गॅसचं लिक्विड रूप असतं. ते वापराच्या वेळी गॅस रूप धारण करतं पण; एवढं सगळं सांगत बसायला कामाच्या घाईत स्वरूपाला जमत नसे. शिरीषही यात जास्त भाग घेत नसे. त्यामुळे मग तन्वीला आपल्याकडे कोणाचेच लक्ष नसते असेच वाटे.
बघता बघता तिचा आता सातवा वाढदिवस आला होता. वयाच्या मानाने तन्वी भयंकर हुशार होती. घरातील वस्तूंचा वापर अगदी सराईत माणसासारखा करे. ती वस्तू बिघडेल किंवा आणखी काही विचार न करता तिचा वापर करे पण; आजपर्यंत वस्तू कधी बिघडल्या नव्हत्या. मात्र, तन्वीला एक वाईट सवय होती. ती म्हणजे एखादी नवीन खेळणी बाजारात आली की, ती तिला पाहिजेच आणि आणल्यानंतर चार-आठ दिवसांत तर तिचं ब्लॅक बोर्ड ऑपरेशन होई. ती चालते कशी, तिच्यामधली रचना पाहाण्यासाठी तन्वी खोलून पाही. एकदा तर शिरीषने ऑफिसच्या कामासाठी म्हणून परदेश दौरा केला होता. तेव्हा त्याने खास तिला यूएसए वरून उडणारं हेलिकॉप्टर आणलं. बाईसाहेबांनी दोन दिवस छान वापरलं. आपल्या मित्र-मैत्रिणींना दाखवलं अन् शेवटी तिसऱ्या दिवशी ते कसं काय उडतं, याचा शोध घेण्यासाठी त्याचं ऑपरेशन झालं. शिरीषला हे जेव्हा कळलं, तेव्हा तो तन्वीवर खूप चिडला. स्वरूपालाही खूप वाईट वाटले. एवढ्या कौतुकाने आणलेलं महागाचं खेळणं आपल्या मुलीनं असं तोडलं, हे काही योग्य नव्हतं पण, तन्वीची जिज्ञासा, कुतूहल यापुढे पैसा महत्त्वाचा नव्हता. तिची चिकित्सा तिला गप्प बसू देत नसे. आई, बाबा रागावलेले पाहून ती ही रागाने रुसून बसली. गोबरे गोबरे गाल फुगवून रुसूबाई कोपरा धरून बसल्या पण; आईने लाडे लाडे बोलून समजूत घातल्यावर तन्वीची कळी खुलली.
तन्वीला वाचनाचीही खूप आवड होती. तसेच टीव्ही पाहायला पण आवडे. तिच्या जिज्ञासेला खतपाणी घालणारे अनेक चॅनेल्स उपलब्ध होतेच. डिस्कव्हरी, अॅनिमल प्लॅनेट, हिस्ट्री आणि बरेच चॅनेल तिला खूप आवडत. कार्टुनमध्येही ती रमत असे पण; जास्त नाही. कार्टुन कसे हलत असेल, हे पाहण्यासाठी तिने दहा – बारा शंभर पानी वह्यांचा वापर केला होता आणि ती यशस्वीही झाली होती. वहीच्या शेवटच्या पानावर पानाच्या तळाशी पक्षी बसलेला काढे. शेवटच्या पानापासून ते पहिल्या पानापर्यंत पक्ष्याच्या हालचालीत थोडा थोडा बदल दाखवत वहीच्या पहिल्या पानावर पानाच्या अगदी वरच्या टोकाशी पक्षी उडत असलेला काढे अन् मग वहीची सर्व पानं एकदम हातातून धरून हळूहळू सोडली की, जणू पक्षीच वहीमधून उडत उडत पानाच्या तळावरून वर येत आहे, असा भास होई. तिच्या शाळेमध्ये ती एक हुशार, आदर्श विद्यार्थिनी होती. तिला नेहमी वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घ्यायला आवडे. तन्वीचे आई बाबा जरी तिच्या कुतूहलामुळे वैतागत, तरी त्यांना आपल्या मुलीचे कौतुक होतेच.
बघता बघता तन्वी सहावीत गेली अन् दर वर्षीप्रमाणे तिने याही वर्षी शाळा शाळांमधून होणाऱ्या विज्ञान प्रदर्शनात भाग घेतला. या वेळेस वेगळं असं काहीतरी करायचं तिनं ठरवलं. आतापर्यंत तिला तिच्या वर्गशिक्षक आणि विषय शिक्षकांनी खूप प्रोत्साहन दिलं होतंच आणि आताही ते नवीन काहीतरी प्रयोग कर, असे प्रोत्साहन देतच होते. तिचे वर्गशिक्षक चेतन देसाई यांना विश्वास होता, ‘या वेळेस ती प्रदर्शनात जी वस्तू तयार केली जाईल, ती तालुका, जिल्हा, राज्यस्तरापर्यंत यशस्वीपणे मजल मारेल.’ कारण, तन्वीने तयार केलेल्या गेल्या वर्षीच्या यंत्राचा शोध जिल्हास्तरापर्यंत यशस्वी झाला होता. त्यावेळेस तिने ‘भूकंपाची पूर्वसूचना देणारे यंत्र’ बनवले होते. आता या वर्षीही ती वेगळं काहीतरी करणार होती आणि बघता बघता तिने विषय शोधला. मोबाइलला चार्जिंग करण्यासाठी लाइटची गरज नसून, बॅटरीला कांद्यापासून चार्जिंग होते. खरंच हे शोधून काढण्यासाठी घरातले मोबाइल तिने बिनधास्तपणे वापरले होते पण; शेवटी शोध लावलाच. तिची कल्पना देसाई सरांनाही आवडली. तिचा चिकित्सक, जिज्ञासू, धडपडा स्वभाव त्यांना नेहमीच आवडे. वर्गामध्ये शक्यतो ते तिच्या प्रश्नांना नेहमीच उत्तरे देण्याचा प्रयत्न करत; परंतु काही वेळा ते शक्य होत नसले, तरी ते तिला नाराज करत नसत. एखाद्या प्रश्नाचे उत्तर आले नाही, तर ‘तुला उद्या सांगतो, मलाही याबाबत सखोल माहिती नाही.’ असे सांगत. म्हटलेली गोष्ट ते करून दाखवत. देसाई सरांनी तन्वीच्या आई-बाबांनाही तन्वी एक आदर्श विद्यार्थिनी असल्याचं सांगितलं होतंच पण; तिच्या जिज्ञासू वृत्तीला आपण प्रोत्साहन दिले, तर ती पुढे काहीतरी नक्की करेल, याची खात्री त्यांनी दिली. तन्वीच्या आई-बाबांनाही याविषयी विश्वास होता. तिचे मनोबल वाढवण्यासाठी ते तिला आत्मविश्वास देत; परंतु तरीही त्यांच्या कामाच्या घाईत तिची प्रश्नांची सरबत्ती त्यांना हैराण करे.
तन्वी आज खूप घाईत होती. तिने तयार केलेल्या विज्ञानाच्या प्रयोगाची निवड तालुका, जिल्हास्तरावर यशस्वी होऊन राज्यस्तरापर्यंत पोहोचली होती. अन् तिथेही तिचा पहिला नंबर आला होता. आज तिचा आई-बाबा आणि सर यांच्यासोबत राष्ट्रपती भवनात सत्कार होणार होता. या कार्यक्रमासाठी म्हणून ते सर्वजण सोलापूरहून दिल्लीला आले होते. आपल्या मुलीचे यश पाहून आतापर्यंत तिने अनेक वस्तूंची जिज्ञासेपोटी केलेली मोडतोडही तिचे आई-बाबा विसरले. सरांनाही खूप अभिमान वाटला. ‘आपण आता यापुढे वस्तूंची मोडतोड कमी करू,’ असं सांगितल्याने सर्वांचाच आनंद द्विगुणित झाला.