कुटुंब


“हे विश्वची माझे घर”
असं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या पसायदानात म्हटले आहे. विश्वाला कुटूंब मानणाऱ्या आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये समाजाचा पाया पूर्वी एकत्र कुटुंबाच्या सक्षम संस्कारांवर भक्कमपणे उभारलेला होता. आपण प्रगती केली  हे जितके खरे तितकेच आपण आपल्याच पायावर धोंडा मारून घेत आहोत, हे ही खरे. खेडेगावात बऱ्याच ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धती थोडयाफार प्रमाणात अस्तित्वात आहे, टिकून आहे. पण शहरात मात्र ती नामशेष होण्याच्या  मार्गावर आहे. शहरातच असे का होते? याचा विचार केला तर शहरात वाढणारी गर्दी, रहाण्याचे अपुरे ठिकाण, अन पैशासाठी माणूसकी गमावलेला माणूस आपल्याला आढळतो. दहा बाय दहाच्या खोलीत, आपल्या बजेटमध्ये संसार करायचा म्हणजे हे वेळेकाळानुसार असंच होणार.

                 एकत्र कुटुंब पद्धती ही जास्त प्रमाणात कोठे आढळते ? याला काही उत्तर नाही का? ती जास्त माझ्या भारत या देशातच आढळते. म्हणून तर अशा या महान संस्कृतीचा अभ्यास देश-परदेशातील लोकंही करतात. या विषयावर संशोधन करून डॉक्टरेट मिळवतात. एकत्र कुटुंबाचे फायदे लक्षात घेता, पुन्हा एकदा ही पद्धत आपल्या २१ व्या शतकातील विज्ञानयुगाची प्रगतीशील देशात काळाची गरज उरली आहे. एकत्र कुटुंबात रहाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे घराला टाळे लागत नाही. खरं हे वाक्य बऱ्याच अर्थाने अर्थगर्भित आहे. वास्तूला, संस्कारांना माणुसकीला, विचारांनाही टाळं लागत नाही. एकत्र कुटुंबात कोणी एक व्यक्ती घरात असतेच, त्यामुळे आपोआपच घराचे संरक्षण होते. अशा घरामध्ये कामाची विभागणी केलेली असते. त्यामुळे आपोआपच सहकार्य भावना वाढीस लागते. लहान मुलांना ना पाळणाघराची आवश्यकता भासते, ना वृध्दांना वृद्धाश्रमाची गरज पडते. एकमेकांसाठी जगणं काय असते हे इथेच कळते.
                 मी माझे या पलीकडे पाहू
                 सर्वजण आपण गुण्या गोविंदानं राहू
               
असे म्हणत एकमेकांच्या सुख-दुःखात साथ देणारे एकत्र कुटुंबात स्नेहबंधनात रहातात. एकत्र कुटुंबात आजारपण, आर्थिक संकट, मानसिक तणाव, शारीरिक ताण या गोष्टी जाणवण्याचे प्रमाण कमी असते. आजकाल अशी पद्धत निद्याली आहे की मुलांनी मुलींना लग्नाच्या वेळी अटी घालण्याएवजी मुलीच अटी घालतात. त्यातलीच एक महत्वपूर्ण अट म्हणजे मला लग्न झाल्या झाल्या स्वतंत्र घर हवं. हे नव्याच्या नऊ दिवसात चांगलं वाटतं ही पण दहाव्या दिवशी दोघांमध्ये शाब्दिक युद्ध सुरु होतं. या भांडणाची कारणं पण अगदी शुल्लक असतात. ‘तुम्ही इतक्यावेळ बाहेर मला एकटीला घरात ठेवून कसे काय थांबलात? किंवा भागत नव्हते तुमच्या पगारात, तर कशाला लग्न केलंत? घरामध्ये स्वयंपाक करायला मला आवडत नाही किंवा तुमचें सारखं आवरत रहाण्यासाठी मी तुमची केअर टेकर नाही.

              खरंच विचार केला तर एकत्र कुटुंबाचे जिवंत उदाहरण मी स्वतः पाहिले आहे. पक्षीतज्ञ डॉ. बी. एस  यांना सहा भाऊ आहेत. ते मिळून सातजणं झाले. हे सर्वजण एकत्र रहातात. सर्वांची लग्नं होवून सुना, जावई, नातवंड आली आहेत. अजुनही कारभार पक्षी तज्ञांच्या हाती म्हणजेच सरांच्याच हाती आहे. ते सर्वांची आर्थिक, मानसिक गरज व्यवस्थित भागवतात. घरामधील अर्थाजनाचे नियोजन जसे एक साथी हाती आहे. तसेच कामाचेही नियोजन आहे. प्रत्येकाला कामाच्या वाटणीत घेतल्याने हेवा दावा होत नाही. कुणी आजारी पडले तर दवाखान्यात कोण थांबयचं? घरून कोण डबा दयायचा? असले प्रश्न पडत नाही. पैसा संपला आता काय करू? असा यक्षप्रश्न उभारत नाही. कोणतीही गोष्ट एकमेकांना वाटून तिचा आनंद घ्यायचा असतो, याची अनुभूती एकत्र कुटुंबातच घेण्यामध्ये सुख-दुःख, ताणतणाव, अपत्याकडून होणारा मानसिक त्रास या सर्वांचा समावेश होतो. थोडक्यात म्हणजे एकत्र कुटुंब म्हणजे सहजीवनाचा स्नेहपूर्ण अनुभव देणारी घर ही संस्था असते. एकत्र कुटुंबात मुला-मुलींना मोठ्यांच्याविषयी भितीयुक्त आदर वाटण्यापेक्षा त्यांना आदरयुक्त भिती वाटते. आपल्याच आई बाबांना फक्त मान दयायचा आणि रस्त्यावरून एखादे काका गाडी समोर चालवू लागले की त्यांना ए म्हाताऱ्या बाजूला घे ना गाडी! असं म्हणणाऱ्या आजकालच्या पिढीला मी माझा यापलीकडे काहीच माहीत नाही. शालेय जीवनात घेतलेल्या प्रतिज्ञेचे स्मरण होत नाही.
  ‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.’

              अवघ्या विश्वाला एकत्र मानून  “हे विश्वची माझे घर” म्हणणारे ज्ञानेश्वर ते ही लहान वयाचेच होते ना! मग विचारांची क्रांती ती ही वाईट दिशेने का होतेय. या प्रश्नाचे उत्तर विभक्त कुटुंब असा आहे. मी पणा अंगात शिरून, स्वार्थीवृत्ती जोपासली जाते. मान-सम्मान फक्त घराच्या चार भिंतीतल्या लोकांनाच दयायचा असतो. असं मानणारे हे त्रिकोणी किंवा चौकोनी कुटूंबातले युवक-युवती, कधी  राष्ट्राच्या सामाजिकतेचा घातपात करतात हे कुणाच्याही लक्षात येत नाही. आई वडिल मुलगा मुलगी अशा या कुटुंबात स्वत: वर लक्ष केंद्रित होते. विभक्त घर चालवण्यासाठी या महागाईच्या जमान्यात दोघांना नौकरी करावी लागते. लहानपणी बाळांना पाळणाघरात ठेवून वेळेचे नियोजन साधले जाते. संस्कार केंद्रांना पाठवून संस्कार केले जातात. वेळ पडली तर हॉटेलचं खाल्लं जातं. गरजेपोटी आजारपणात सेवेसाठी पैसे देवून नर्स ठेवली जाते. सांगा या सगळ्यांमध्ये एकमेकांसाठी खूप करायचे असते. हे त्या नवयुवक व नवयुवतीला माहीतच होत नाही मग आपोआपच म्हातारपणी आईबापाला सांभाळण्याची जबाबदारी आपली नसते. असे मानले जाते.

              शेवटी मला आपणा सर्वांना एकच सांगायचे आहे, एकत्र कुटुंबातही जसे फायदे तसे काही तोटे असूही शकतात. पण त्या तोट्यांचं प्रमाण अल्प असतं. म्हणूनच कमीत कमी फायदा अन् उज्वल भवितव्यासाठी आपण एकत्र कुटुंब पद्धती स्विकारायला हवी, हे अगदी खरं आहे.

6 Replies to “कुटुंब”

Comments are closed.

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Don`t copy text!