मालकिण


  माझं नाव रमा. मी माहेरी लाडाकोडात वाढलेली आणि सासरी जबाबदारी आणि कर्तव्यात मुरलेली. या पाटलांच्या वाड्यात प्रवेश केल्यावर प्रथम तर मी गांगारून गेले नंतर मात्र हळूहळू सासूबाईंच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या प्रेमळ छायेत सावली बनून सारं सारं अवगत केलं. मला त्यांचा भारी अभिमान वाटायचा. यांनी बऱ्याच वर्षापासून सरपंच म्हणून गावचा कारभार पाहिला. त्यांच्या कामाची पद्धत मी पहातच होते. पण कधी कधी काही गोष्टी मला खटकत ही होत्या. पण यांच्यापुढे बोलायचे म्हणजे… त्यांच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीनंतर मात्र त्यांनी महिला राखीव जागेवर मला उभा केले. आजपर्यंत यांनी राजकारणात होते हे मी पाहिले पण आता मात्र माझ्या सहाय्याने त्यांनी पुन्हा एकदा सरपंच पदासाठी अर्ज भरला. म्हणजे थोडक्यात माझा रबर स्टॅम्प होणार होता. मला हे खरंतर मान्य नव्हते पण… शेवटी सासूबाई गेल्यापासून एकटी पडलेल्या मी आई आणि बहिणीशी सल्लामसलत केली. त्यांचा निर्णय शिरसांवदय मानून स्विकारला आणि मी जिंकले. मी सरपंच झाले. घरातल्या जबाबदाऱ्यांसह बाहेरच्याही वाढल्या. पण अंतिम निर्णय यांचाच. सर्व महत्त्वाच्या कामातील तपासण्या देखरेख होकार, नकार सारे निर्णय यांचेच.  शेवटी असेल ते असेल पण आपण स्त्रियांना शक्य तेथे मदत करायची अन् न्याय मिळवून दयायचा यासाठी मी प्रयत्नांची शिकस्त सुरुच ठेवली होती. यांच्या निर्णयापुढे नाहीच जाता आलं कधी पण स्वतःच असं थोडंतरी मांडण्याचा प्रयत्न मी केलाच. गावातील स्त्रियांचे प्रश्न मी पहात होते आणि समजूनही घेत होते.  आजही स्त्रियांच्या नजरेतून समाज कसा आहे. स्त्रियांना कसे नियमांच्या चौकटीत बसवले जाते यांचा अनुभव घेत होते. तरीही माझी जिद्द, चिकाटी मी सोडली नाही. मात्र  एके दिवशी मिटिंगमधील तणावामुळे याचा अपघात झाला. अन् मी मनातून कोलमडले. यांची झालेली स्थिती पाहिली आणि खूप वाईट वाटले. यांचा पाय गेला पण मला खऱ्या अर्थाने मलाच अधू झाल्या सारखे वाटले. पर येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीवर मात करायचीच असा मनाचा निर्धार करून मी जिद्दीने काम एकटीने सुरू केले. बरेच निर्णय घेताना अस्वस्थता जाणवत होती, कुठेतरी चुकतं की काय असंही वाटत होतं. पण साऱ्यांवर मात करत मी जिद्दीने प्रगतीचे पंख लावून यशस्वी भरारी घेतली आणि खऱ्या अर्थाने मालकिण झाले.

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Don`t copy text!