माणुसकी


काय या कोरोनाने जगाचं नवं रूपच दाखवलं आपल्याला. अहो मी पल्लवी. काही वर्षापूर्वी मी सुगंध सोसायटीत रहायला आले. तसे तर सोसायटीत म्हणलं की तिथे सगळे स्वतःमध्ये गूंतून जाणारी आणि राहणारीच लोकं असतात. असंच माझं मत होतं. सासूसासरे असताना आम्ही चाळीत राहत होतो. तशी बऱ्याच गोष्टींची गैरसोय व्हायची. बऱ्याच गोष्टींची सोयपण होत असे. सासू-सासरे असेपर्यंत म्हणजे एक चार-पाच वर्षे आम्ही तिथेच राहिलो. सासू-सासरे वारले. आम्ही सोसायटीत आलो आणि पहाता पहाता या वातावरणात संसारात सुखावून गेलो. ऑफिस, आणि घर आणि कधीतरी सोसायटीतले कार्यक्रम यात माझा वेळ कसा जात होता कळतच नव्हते. अंकुरच्या जन्माच्या वेळेस मात्र मी रजेवर होते. तेव्हा मला हळूहळू माझ्या सगळ्या सोसायटीची नव्याने ओळख झाली. प्रत्येकजण मला जमेल तशी मदत करत होता. मी आता प्रत्येकाचा स्वभाव, त्यांचे व्यवसाय, स्त्रियांचे माहेर-सासर याविषयी गप्पांतून माहित करून घेतलं होतं. माझ्या पलिकडे दोन ब्लॉक सोडून शर्मिला राहत होती. शर्मिला बऱ्याचवेळा घरीच दिसे. ती कसलातरी ऑनलाईन बिझनेस करत होती. आमच्या सोसायटीत बाहेरच्या फेरीवाल्यांना विनापरवानगी प्रवेश नव्हता. तसे एक दोन भाजीवाले, गॅसवाला, पेपरवाला, दूधवाला, फुलवाला या लोकांना परवानगी दिली होती. मात्र पहाता पहाता कोरोना आला आणि वातावरणच बदललं. बागेत खेळणारी मुलं मुली, बागेत फिरणारी वयस्कर मंडळी, गाड्या घेवून इकडून तिकडे करणारी तरुण मंडळी भाजीसाठी जाणारा महिला वर्ग, खरेदीसाठी फिरणाऱ्या मैत्रिणी सारं हळूहळू कमी होत होतं. अगदी बंदच झालं. जो तो संशयाने पाहू लागला. सगळ्यांनी स्वतःला चार भिंतीच्या आत कोंडून घेतले. सगळं खरं पण भाजी आणायला किंवा कमीत कमी सोसायटीत गेटपाशी आलेली भाजी घ्यायला खाली उतरावंच लागणार होते. कोरोनामुळे बऱ्याचजणांची कामं घरून सुरू होती. दुकानं असणाऱ्यांना ठराविक वेळीच दुकान उघडण्याची परवानगी होती. गृहिणीचे काम मात्र दुपटी तिपटीने वाढले होते. एकतर काही ना काही कामाने घराबाहेर जाणारी मंडळी दिवस-रात्र घरातच, दुसरं धुणे- भांडेवाली, फरशीवाली नाही. तिसरं म्हणजे नवनवीन खाद्यपदार्थांची फर्माइश. त्यामुळेच तर कोरोनाचे सर्व नियम पाळून त्यांनी भाजीवाल्याला सोसायटीत येण्याची परवानगी दिली होती; भाजीवाला प्रत्येकाने सांगितल्याप्रमाणे फळ भाज्या, पालेभाज्या आठवनीने आणे. खरंतर मध्यंतरी त्यालाही विक्रीसाठी भाजी मिळाली नव्हती पण पुन्हा त्याची अडचण दूर झाली. एके दिवशी आम्ही साऱ्याजणी योग्य ती काळजी घेत भाजी घेत होतो. आम्ही सर्वांनी भाज्या घेवून पैसे दिले. शर्मिला मात्र काहीतरी घेण्यासाठी थांबली. मी तिला घरातून पहात होते.तिने पैसे दिले. एवढयात तिच्या चेह-यावर आश्चर्य काळजी, भिती यांचे मिश्र भाव मला दिसले. कारण सखाला त्रास होत होता हे मलाही दुरुनच जाणवले. शर्मिलाला त्याने पाणी असे हाताने खुणावले. तीही चटकन घरात गेली. पण आलीच नाही. तिने दार लावून घेतल्याचा मला आवाज आला. मला जरा वेगळेच वाटले. जरी कारोना असला तरी माणूसकी सोडून कसे चालेल. मी पाणी घेऊन गेले. पाणी पिल्यावर सखारामला आराम वाटला.
काही दिवसापासून रुग्ण संख्या वाढू लागल्याने कडक लॉकडाऊन जाहीर झाले. सकाळी दोन तासाची मुभा होती. त्या वेळात माणसं वारूळातून मुंग्या बाहेर पडाव्या तशी बाहेर पडत, बाकी वेळेस चिडीचूप. एके दिवशी सकाळी सखाचा ‘भाजी घ्या भाजीssss’ आवाज आला. मी बाहेर डोकावले. सखा दिसला पण सोबत शर्मिलाच्या दारात गर्दी दिसली. ती आणि तिची मुलगी प्रिया आनंदला म्हणजे तिच्या पप्पांना उठवण्याचा प्रयत्न करत होत्या.जशी माझ्या तशीच सखाच्याही ही गोष्ट लक्षात आली. क्षणार्धात आम्ही दोघंही पोहोचलो. शर्मिला सर्वांना मदत मागत होती. बाहेर वाहतूक बंद होती. लोकांना पेट्रोलही मिळत नसल्याने गाडीचाही उपयोग नव्हता. शेवटी सखाने सर्व भाज्या काढून टाकल्या अनू अगदी कमी वेळात त्याने हातगाडीवरून आनंदला वेळेवर दवाखान्यात पोहोचवले. डॉक्टरांनी तत्परतेने इलाज केल्याने कोणताही अनर्थ घडला नाही. माईल्ड ॲटक आला होता. वेळेवर औषधोपचार मिळाल्याने आज शर्मिलाचे सौभाग्य तिला मिळाले होते. शामिलाने डॉक्टरांचे आभार मानलेच सोबत सखाचेही आभार मानले. तिला मनातून स्वतःच्या वागण्याचा पश्चाताप झाला असावा कारण तसे भाव, तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते.

नमस्कार वाचकहो. माझ्या दै दामाजी एक्सप्रेस मंगळवेढा या वृत्तपत्रातील “कथा विश्व” या सदरात सौ संध्या श्रीमंत बनसोडे सरवदे यांच्या माणुसकी कथेवर मी ‘तिच्या नजरेतून’ लिहिलेली नवीन कथा. कोणत्याही कथेतील स्त्री पात्रांच्या नजरेतून ते कथानक कसे असेल. हे मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न.

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Don`t copy text!