मराठी राजभाषा दिन

मराठी भाषा संवर्धनाची जबाबदारी कुटूंबाची की समाजाची हा खरंतर सर्वांनी विचार करावा असा मुद्दा आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.मराठी ही इंडो  युरोपीय भाषाकुलातील एक भाषा आहे. भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी भाषा एक आहे. २७ फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन आहे. त्यानिमित्ताने सदयस्थितीची चर्चा होणे गरजेचे.  इंग्रजी भाषेला अवास्तव महत्व आणि जागतिकीकरणाचा झंझावात यामध्ये मराठी भाषा आणि संस्कृती नष्ट होण्याची भीती साऱ्यांनाच लागून राहिली आहे. तसे मराठी भाषिकांचे प्रमाण जास्त आहे. परंतू काळाच्या ओघात काळाची गरज म्हणून इतर भाषांचा वापर केला जात आहे. खरंतर अनेक बँका, राष्ट्रीय कार्यालयांमध्ये मराठी भाषेत कागदपत्र उपलब्ध होतात; पण आजकाल अशी स्थिती आहे की, मराठी भाषेतले अनेक शब्द आपल्याला अनोळखी वाटतात. इथे गरज आहे, मराठी भाषेचा वापर आग्रहाने करायची. आपल्या भाषेविषयी अभिमान बाळगण्याची.

माझा मराठाचि बोलू कौतुकें ।
परि अमृतातेही पैजा जिंके।
ऐसी अक्षरे रसिकें| मेळवीन ।।

मूलतः भाषा हे माणसाच्या जीवनात वावरताना परस्पर संवाद साधून व्यक्तींचे समाजात अस्तित्व टिकविण्याचे साधून आहे. व्यवहार वाढला की भाषा हळूहळू व्यावहारिक बुद्धीचे आणि संस्कृतिक प्रगतीचे साधन बनते. कोणत्याही राज्याचा नागरिक हा ज्या राज्यात वर्षानुवर्षे राहतो त्याला त्या राज्याची मातृभाषा शिकणे-बोलणे अनिवार्य असायलाच पाहिजे. कारण प्रत्येक राज्याचा कारभार हा त्या त्या राज्याच्या भाषेत चालतो. परंतू महाराष्ट्रात या गोष्टीचे प्रमाण कमी आढळून येते.

साडे पाच दशकांपूर्वी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मराठी भाषेची स्थिती बदलणे शक्य होते परंतु तेवढे समज असलेले नेतृत्व महाराष्ट्राला लाभले नाही, मराठी भाषेविषयी मराठी माणसाची अनास्थाच याचे कारण दिसून येते. पं. बंगाल, तामीळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशासारख्या राज्यांनी आग्रही भूमिका घेऊन तेथील स्थानिक मातृभाषा व तिथल्या संस्कृतीला प्रोत्साहन दिले. इतके की दाक्षिणात्य राज्यांत इंग्रजी शाळांना तेथील मातृभाषेतच शिक्षण दयावे लागते. आपल्या देशात अनेक भाषा बोलल्या जातात, परंतु मराठी भाषा एक समृद्ध, पारंपारिक संचित बाळगुन असलेली भक्कम अशी भाषा आहे. मराठी भाषेचे अनन्यसाधारण महत्त्व कायम आहे. महत्त्वपूर्ण तत्वज्ञान समाजातील सर्वांपर्यंत पोहचवावे या हेतूने ज्ञानेश्वरांच्या काळात मराठी भाषेचा वापर केला गेला.  तरी देखील या भाषेची उपेक्षा होत आहे, याला नक्की जबाबदार कोण?

मराठी भाषा वापरत असताना जागतिक ज्ञानभाषा ठरलेल्या इंग्रजीचा वापर करू नये असे अजिबात नाही. परंतू जेवणात जितके महत्व चटणी कोशिंबीर किंवा पापड याला असते, तेवढेच महत्त्व इंग्रजीला द्यायला हवे. जेवणात वरील पदार्थांचा तोंडी लावणे एवढाच वापर केला जातो. नुसत्या पापडावर किंवा लोणच्यावर, चटणीवर कुणी जेवण करत नाही. त्याप्रमाणे आपल्या दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे. ‘मराठी भाषेचे भवितव्य काय?’ या विषयावर फक्त लेख लिहिणे,  व्याख्याने देणे, चर्चा करणे. एवढेच सीमित न ठेवता, मराठी भाषिक प्रत्येकाने मराठी भाषा संवर्धनाचे उपाय केले पाहिजेत. मराठी भाषा टिकली पाहिजे तिचा विकास झाला पाहिजे म्हणजे नक्की काय, तर संभाषण, वाचन, लेखन या तीन गोष्टी महत्वाच्या  आहेत. मराठी भाषेच्या अनेक बोलीभाषा आहेत. आगरी, कुणबी, मालवणी, नागपुरी अशा अनेक बोली भाषी आहेत. मराठीचे संवर्धन करायचे असेल तर या प्रत्येक बोलीभाषेचा विकास झाला पाहिजे. प्रथम सरकारी सर्व व्यवहार मराठी भाषेत झाले पाहिजेत, केवळ कागदोपत्री उपयोग नाही तर मराठी भाषा व्यवहार झाला पाहिजे. कोणीही मराठी भाषिकांना कमी लेखता कामा नये. आपल्या भाषेचा विकास आपण करणे, हे आपले आदयकर्तव्य आहे. असे प्रत्येक मराठी भाषिकाने मानणे महत्वाचे. प्रत्येक मराठी माणसाला मराठी भाषेचा अभिमान वाटलाच पाहिजे. व्यवहारात किंवा वापरात नसलेली गोष्ट कालांतराने नष्ट होते, त्याप्रमाणे भाषेचेही होवू शकेल. म्हणून मराठी भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाने स्विकारली पाहिजे.

मराठी शाळा टिकल्या तर मराठी भाषा टिकेल हे सूर्य प्रकाशाइतके सत्य आहे. मराठी माध्यमातूनही शिकून चांगले इंग्रजी येवू शकते, असा आत्मविश्वास पालक व पाल्यांमध्ये असणे अनुषंगाने येणे गरजेचे अआहे.  इंग्रजी शिकणे आणि इंग्रजी माध्यमातून शिकणे याविषयी निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी जनजागृती करायला हवी. संगणकाशी जोडणारे तंत्रज्ञान मराठी भाषेत उपलब्ध व्हायला हवे. मराठी भाषेचा उपयोग किती प्रमाणात मराठी माणूस करतो हे तपासणे महत्वाचे आहे. मराठी शाळेत शिक्षक, शिपाई, शिक्षकेतर कर्मचारी एवढेच काय मराठी शाळेच्या संस्थापकाची मुले इंग्रजी भाषेत शिकत असतात. या साऱ्यांना मातृभाषेतून शिक्षणाचे बंधन घातले पाहिजे. मराठीला भाकरीची भाषा बनविण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी नोकरीसाठी मराठीचे ज्ञान अनिवार्य करणे गरजेचे आहे. मराठी भाषा संवर्धनासाठी प्रत्येक व्यक्ति ने स्वत: पासून, स्वतःच्या कुटुंबापासून सुरुवात केली पाहिजे. फक्त मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या म्हणून भांडण्यात अर्थ नाही.

मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Don`t copy text!