नातं

                       वर्गाच्या बाहेर कोणीतरी घुटमळत होते. कोण असेल बरे! मी ऑफिसमधून पहात होते. बेल वाजवून शिपायाला बोलावलं आणि ते पालक वर्गापर्यंत कसे गेले म्हणून चौकशी केली. पालकांना वर्गशिक्षिकनेच काही महत्वाचं काम असल्याने बोलावल्याचं कळालं. तसे आमच्या शाळेत पालकांनी शिक्षकांना भेटण्यासाठी शनिवारी शाळा सुटल्यानंतरची वेळ ठेवलेली आहे. खूपच महत्वाचे कामं असेल तरच अधेमध्ये भेटणे शक्य असे. मी त्या पालकांना शिपायाकरवी बोलावून घेतले.

                  नमस्कार मॅडम मी सरिता पाटील. माझा मुलगा आपल्या शाळेत तिसरीत शिकतो. तो अधूनमधून शाळेत येईना म्हणून बाई खूप दिवसापासून बोलवत आहेत. पण जमेच ना! घरातही कुणी रिकामे नसते. त्यांचं सगळं बोलणं एका दमात.
‘ घरी कोण कोण रहातं?’ मी म्हणाले.
‘मी माझी दोन मुलं, नवरा आणि सासू-सासरे.’
‘मिस्टर काय करतात ?’
‘आम्ही दोघं मिळून बागेच्या बाहेर भेळ आणि इतर पदार्थ विकतो.’
पाटील बाईंनी केलेल्या घरच्या स्थितीचे वर्णन ऐकून मला कसेतरीच वाटले. तसेतर शाळेमध्ये बरेच पालक हे हातावरचे पोट कसेतरी भागवतच मुलांना शिकवत होते. पण आम्ही आमच्या शाळेत गुणवत्तेवर अॅडमिशन देत असू. आम्ही नाममात्र फी घेत होतो. त्यामुळे मुलं श्रीमंताघरची की गरिबाघरची, याच्याशी शिक्षकांना काही देणं घेणं नसे. शाळेत आर्थिक परिस्थितीपेक्षा बौद्धिक स्थितीला महत्त्व असल्यामुळेच आतापर्यंत अनेक विदयार्थी त्यांच्या जीवनात यशस्वी झाले होते. डॉक्टर इंजिनिअर, शिक्षक, व्यापारी, यशस्वी उद्योजक असे वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झाले होते. आपल्या गुणवतेच्या जोरावर ते देश-परदेशातही महत्वाच्या पदांवर कार्यरत होते. आपल्या ही मुलाने जीवनात यशस्वी व्हावे ही आशा मनात बाळगूनच पाटील बाईंनी अॅडमिशन आमच्या शाळेत घेतलं होतं.  पण घरची स्थिती खूपच विचार करायला लावणारी होती. ही दोघे भेळ विकायला गेल्यावर घरात मागे आजी-आजोबा रहात. छोटा मुलगा स्वरित तीन वर्षाचा होता. त्याला घेवून भेळ विकायला ते जावू शकत नव्हते. आजीही खुप थकल्या होत्या. आजोबांच्या पेंशनवर दोघांचं औषधपाणी भागत असे. बाकी वाढती महागाई अन गरजा यांचा जमाखर्च करता बाकी शून्य. कुणी आजारी पडले तर मग अजून पंचाईत, मुलाला सांभळण्यासाठी बाहेर कुठे ठेवणे त्यांना परवडणारे नव्हते. आजी- आजोबांची तब्बेत अशी तशीच असे. सगळ्याच बाजूने कोडे होते. यावर उपाय म्हणून मुलगा मोहीत काही दिवस शाळेत येई आणि ज्यादिवशी आजी जास्तच आजारी असे त्यादिवशी शाळा बुडवत असे.

              या सर्व परिस्थितीपुढे माझेही काही डोके चालेना. मी सहजच आवारात नजर फिरवली अन् लांब झाडाखाली बसलेली सखूआत्या दिसली. त्या चार दिवसांपूर्वीच ऑफिसमध्ये येवून भेटून गेल्या होत्या. त्यांची मुलं-मुली मुंबईला रहात. महिन्याला कामापुरती मनिऑर्डर येई. एक वर्षापूर्वीच सखुआत्याचा नवरा अपघातात वारल्याने आता गावाकडे सध्या त्या एकट्याच होत्या. मुलगा कामानिमित्ताने मुंबईला रहात असला तरी त्यांच्याकडे जावून रहाणं यांना आवडत नव्हते. शहरात जीव घुसमटतो. दहा बाय दहाच्या खोलीत इकडून तिकडं हलायलाही येत नाही. त्यातून सून नौकरी करणारी. नातवं असती तर मन तरी रमलं असतं. पण आम्ही आताच कुटुंब वाढवायच्या विचारात नाही. या त्यांच्या निर्णयापुढे आत्याचा नाविलाज झाला. ती दोघं कामावर गेली की आत्या घरी एकट्याच असतं. घरात काही काम करावं म्हटलं तर जमत नसे. बेसीनला उभा राहून भांडी घासायची, मशिनला कपडे धुवायची, उभा राहून स्वयंपाक करायचा. यातलं एकही काम त्यांना जमत नसे. एकंदरीत असून अडचण होती पण  नसून खोळंबा मात्र होणार नव्हता. नवरा गेल्यावर कसंतरी तीन-चार महिने राहून त्या कारण काढून गावाकडे निघून आल्या. शेतात मन गुंतेल. रहायला घर तर होतंच पण वडिलांमागे आईला भावकी जमू देणार नाही म्हणून मुलाने सल्लामसलत करून शेत विकून टाकले. काम केलेल्या शरीराला आयतं बसून खायचे म्हणजे खूपच अवघड. बरं स्वतः शेताची मालकीण म्हणून मिरवलेल्या सखूआत्याला दुसऱ्याच्या शेतात काम करणं कदाचित पटलंही असतं.  पण लेकाला आवडत नव्हते. तुला आम्ही पैसे पाठवतोय ना ! मग तर झालं! सखू, आत्या शाळेच्या आवारात येवून बसत असे. भरपूर झाडी होती. शाळेत, थंडगार सावलीत बसून मुला मुलींची प्रार्थना, गाणी खेळ बघण्यात त्या थोडा वेळ घालवत असत.
              मला कुठेतरी असं वाटलं की, सखुआत्याला मोहितच्या आईने बाळ सांभाळण्यासाठी विचारलं तर. कारण सखू आत्या मला मध्यंतरी भेटल्यावर म्हणाल्या होत्या की,
   ‘काही काम असलं तर सांगा! बसून वेळ जात नाही.’ म्हणून त्यांना बागेत नवीन रोपं लावण्याविषयी शिपायाला मदत करा असं सांगितलंही होतं. पहाता पहाना त्यांनी शाळेशेजारी बरीच झाडं लावली होती. त्यांची जोपासना करण्याविषयी त्या मनापासून शिपायाला मार्गदर्शन आणि मदतही करत असत. हे काम करतील का? विचारायला काय हरकत आहे. असं समजून मी मोहितच्या आईला तशी कल्पना दिली. पहिलं तर त्या त्यांना विचारायचं म्हणजे अपराधीपणा वाटत होता. त्यांनी गैरसमज करून गोंधळ केला तर. पण शेवटी काय होईल ते पहाता येईल या विचाराअंती विचारायचे ठरवले. सखू आत्याने आयुष्यभर कष्ट केले. तरी एक सन्मान ठेवून वागल्याने हे विचारणं चुकीचंच असं मनात सारखं येत होतंच पण तरीही धाडस करून विचारलेही. सखू आत्याला नात-नातू असावेत असं  वाटतच होते. म्हणून तर त्या शाळेच्या आवारात छान रमायच्या. त्यामुळे त्यांनी एक- दोन क्षण विचार केला आणि लगेच होकार दिला. पैश्याचं विचारल्यावर मात्र भडकल्या. सगळी कामं ही पैशासाठी करावयाची नसतात. पोटापुरता पैसा मला लेक पाठवतोय. मला वेळ जावा म्हणून मी बाळाला सांभाळायला तयार झाले. जादा पैसे कमवून काय….. मी शांतच राहिले. त्या थोड्या वेळाने शांत झाल्यावर मी त्यांना थोडे पाणी प्यायला देवून व्यवहाराचं बोलल्याबदल क्षमा मागितली.
                  पहाता पहाता स्वरितला सखूआत्याचा छान लळा लागला होता. स्वरित सखू आत्याला आज्जी म्हणून हाक मारत असे. त्याही त्याला मन लावून सांभाळत. मोहित-स्वरित हे दोघंही आई-बाबा नसले की सखू आज्जीकडे छान रहात. सखुआत्याला आता दिवस कसा येई अन् कसा जाई कळत नसे. अडी-अडीचणीला मोहितची आई मदत करे. मोहित-स्वरित दोघांची सोय व्यवस्थित झाल्याने घरात आजी-आजोबांची प्रकृती छान. सुधारली. सखू आत्याही आनंदात समाधानान रहात होती. “एकमका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ!”
असेच काहीसे झाले होते.
                 ऑफिसमध्ये बसल्या बसल्या मधल्यासुट्टीत
कधी कधी सखुआत्या स्वरितला घेवून झाडाखाली बसलेली दिसे. मनात विचार येई, जगात अशी कितीतरी माणसं असतात. ज्यांची नड ही पैसा, श्रीमंती  नसून माणुसकी, आपलेपण ही असतात. प्रत्येकाने दुसऱ्याला सहकार्य केले तर.. अशीच नाती फुलत जातील अन् ‘हे विश्वची माझं घरं’ ही संकल्पना पूर्णत्वाला गेल्याशिवाय रहाणार नाही.

2 Replies to “नातं”

  1. खुपच सुंदर आजच्या परिस्थितीचे अगदी हुबेहूब प्रासंगीक वर्णन सुंदर लिखाण🙏💐

Comments are closed.

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Don`t copy text!