नाविन्य

अचानक सासूबाईंचा फोन आला.
‘वनिता, तू गुरूवारीच सणासाठी म्हणून ये.’
खरंतर मला तर काहीच कळेना! असं अचानक का बरं बोलावलं असेल लवकर पण पुन्हा एका मनाने वाटलं. आतींना वाटलं असेल थोरल्या सूनबाईंनाच सांगावे म्हणजे आपोआपच तिला मोठेपणा दिला असे वाटेल आणि धाकटीला सराव होईल. तशी धाकटी, म्हणजेच लीना भलतीच हुशार, मात्र सणवार म्हटलं की छुपी धुसफुस सुरू होई.
‘मला नाही आवडत या रूढी-परंपरा, मी बदलांना जास्त महत्व देते. मग तो बदल हा सकारात्मक असणारच याचीही खात्री वाटते.’
तिचे काही काही विचार खरंच बदल घडविणारे होते. तर काही विचार मात्र अगदीच मनाला न पटणारे वाटत. मध्यंतरी तिच्या वडिलांचे श्राद्ध होते. त्यावेळी पूजा अर्चा करत अन् बाकी विधी करत बसण्याऐवजी वृध्दाश्रमात जावून वृध्दांसाठी काही रक्कम मदत म्हणून तिने दिली. खरंच उपक्रम स्तुत्य होता. पण कमीत कमी त्या दिवशी काकांच्या प्रतिमेला हार घालून पूजा करू असे आम्हा सर्वांचं मत तिने धुडकावलं. ती वृद्धाश्रमाला मदत करतेय हे पाहून तिच्या वडिलांना स्वर्गातही आनंद होईल, असं तिचं मत. बाकी कोण काय म्हणतं? इतरांना काय वाटतं? किंवा तिच्या वागण्याचा इतरांवर काय परिणाम होईल, याचा विचार करत बसायला तिला वेळ नाही, असे तिचे मत. शेवटी तिने तिच्या मनासारखेच केले. मध्यंतरी तिच्या भावाचा वाढदिवसही तिने अनाथाश्रमात साजरा केला. यादिवशीची मजा समजते त्यांनाच ज्यांचे आई वडिल जिवंत नाहीत. तसं लीनाने आम्हाला समाजातील अनाथांच्या दुःखाची जाणीव तिच्या कर्तव्यातून करुन दिली. तशी ती करेल ती कृती वाईट नसतेही पण बऱ्याच वेळा समाजात होत जाणारे बदल हे हळूहळू होतात. असे बदल समाजाला थोड़े का होईना रुचतात, पटतात, पण अचानक झालेल्या बदलाने गोंधळच निर्माण होतो. माझी गावी जायची तयारी होत आली होती. गावाकडे न मिळणारे बरेचसे सामान मी सोबत घेतले होते. त्यामुळे भरपूर ओझं झालं होते. त्यातून दोन मुलांना घेवून पुढे मी एकटीच जाणार होते. मुलं थोडी मोठी झालीच होती म्हणा. लक्ष्म्याच्या समोर मांडायला खेळणी, सजावटीचे सामान, रांगोळ्यांचे प्रकार अन् बरंच काही. गावी जाऊबाई आणि सासूबाईंनी घराची स्वच्छता करून घेतलीच होती. काही एक दोन फराळाचे पदार्थही झाले होते. बाकी तू आल्यावर करु असं त्या म्हणाल्या. गावी गेल्यावर तर खूप छान वाटते. जिकडे तिकडे माणूसकीने ओतप्रोत भारावलेली नाती. मनाला समाधान देवून जातात. सगळ्यांच्याच घरी शहरात राहणारी मंडळी सणासाठी गावी आल्याने घरं, गल्ल्या आणि गाव कसे गजबजून जातात. कुणी कुणाला काही देत नसतं. पण आपुलकीचे चार शब्दही मनाला आधार देतात. लीनाचा मूड वेगळाच वाटला. सासूबाई जास्त तिच्या समोर बोलत नव्हत्या. पण ती काही कामानिमित्त बाहेर गेलेली पाहून मात्र त्यांनी त्यांच्या मनातली सल मला सांगून,

‘तूच बघ बाई काय ते. समजून सांग तिला जरा’ असंही म्हणाल्या. लीनाच्या मते सासूबाईंना नातू हवा ना मग मी फक्त एकच अपत्य होवू देणार आहे. परत नात झाली तर… त्यापेक्षा आपण अनाथाश्रमातून एक मुलगा दत्तक घेवू मग प्रश्नच नको. सासूबाईना मात्र हे पटत नव्हतं. मीच लीनाला समजावले.
‘तू एक संधी घे. मुलगी झाली तर पुन्हा मग मुलगा दत्तक घे.’
यावर तिचा गोंधळ सुरुच,
‘मी मुलगा-मुलगी समान मानते. दोन-दोन अपत्य असणे मला मान्य नाही.’ शेवटी जो निर्णय घ्यायचा तो तूच घे पण थोडे विचाराअंती अन् गोडीत घे. एकमेकांना नीट न बोलता समस्या सुटण्याऐवजी गुंतत जातात. असे बरेच काही सांगितल्यावर शेवटी दोघीही शांत झाल्या. निसर्ग नियमाप्रमाणे होईल ते मान्य असे मान्य केले. आजच्या काळात मुलींचे महत्त्व माहीत असताना मुलाचा अट्टाहास चुकीचाच. या माझ्या वाक्यावर आत्तींनी माझ्याकडे असं पाहिलं, जसं नजरेतून त्या म्हणत होत्या, स्वतःला मुलगा आहे म्हणून तत्त्वज्ञान सांगते. शेवटी जे आहे ते आहे. मी नौकरी करत होते. माझ्या वेळीही मी एकच अपत्य बास म्हणाल्यावर वंशाच्या दिव्याचा प्रश्न उपस्थित करून मला निर्णय बदलायला लावला. आता मात्र लीनाचा नाविण्यपूर्ण निर्णय जुन्या विचारांची काय टाकणारा होता. पण तो असा समज पचनी पडेल असं वाटतं नव्हते. सण लक्ष्युम्यांचा अन् घरातल्या मुलीचे लक्ष्युमीचे महात्म्य समजून सांगायची वेळ का यावी. असा प्रश्न मनात गोंधळ घालत होता.

2 Replies to “नाविन्य”

  1. महालक्ष्मी चे हार्दिक स्वागत करु या .

Comments are closed.

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Don`t copy text!