नेहमी खरे बोलावे

                  मी माझ्या पर्सचा एक ना एक कप्पा पुन्हा पुन्हा तपासत होते.खरंच माझ्याकडून असं कधीच होत नाही.मी माझ्या मनात पुन्हा पुन्हा सकाळपासून घडलेल्या क्षणांची क्षणचित्रे नजरेसमोरून कधी हळू-हळू तर कधी जोरात आठवून पाहली. असं होण म्हणजे गहाळपणाच होतं.माझी भिरभिरती नजर,तोंडाची बडबड हे सर्व पाहून माझी सहकारी शिक्षिका म्हणाल्या,”वरदे बाई,काय झालं ?” यावर मी सांगितलेला इतिवृत्तांत ऐकून त्या आश्चर्यचकित झाल्या.त्याही मला मदत करू लागल्या.त्यानंतर मात्र त्यांनी मला मुख्याध्यापकांच्या ऑफिसमध्ये नेले.
         मी गंभीर होऊन बोलू लागले,’सर, आज मी शाळेला यायच्या आधी माझ्या पैशाच्या पाकिटात चारशे रूपये मोजून ठेवले होते. मला ते हवे होते, आता मी पाकिट पाहिलं असता ते नाहीत हे माझ्या लक्षात आलं. आता मी काय करावं,हे मला सुचत नाही.’ सरांची परवानगी मिळायच्या आतच मी खुर्चीवर मटकन् बसले. सरांनी मला बरेच प्रश्न केले. मला जणू मी पोलिसचौकीत आहे, असे वाटले.हा हा म्हणता बातमी वा-यासारखी पसरली. वास्तविक पहाता एका विद्यार्थीनीच्या आईने सहलीसाठी म्हणून मला उसने पैसै मागितले होते. ते द्यावे या विचाराने मी आणलेल्या पैशांची खबर खरंतर कोणालाच नव्हती, पण काय झालं कळेना. शाळेच्या सहलीसाठी आणलेले पैसे अचानक गायब झाल्याने मी नाराज झाले. सरांची परवानगी घेवून सर्व शाळा तपासणी झाल्यावर, मग मी माझ्या तपासाची दिशा माझ्या घराकडे वळविली. कपाट,ड्रेसींग टेबल, दिवाण, डायनिंग टेबल आणि काय काय. पण माझ्या प्रयत्नांना अपयश आलं. मी दु:खी मनाने पुन्हा शाळेकडे परतले. आता मात्र माझं डोकं सुन्न झालं. प्रश्न चारशे रूपयांचा नव्हता. नेहमी सरळ मार्गाने जाणारे, खरे वागणा-या विद्यार्थांनी असं का वागावं? हा यक्ष प्रश्न माझ्यासमोर होता. मी पुन्हा पुन्हा बक्षिसाचं आमिष दाखवूनही काही उपयोग होईना. चोरीचं कारण स्पष्टं होतं. मिळालेले पैसे सहलीसाठी भरून चोरीच्या पैशावर ,चोरणारा जीव सहलीचा आनंद फुकट घेवू इच्छित होता.
               या सर्व गोंधळात दोन तास सहज निघून गेले. मी नाइलाजाने ऑफिसमध्ये जावून मुख्याध्यापक व इतर सहकार्यांसमोर  सांगितले. ‘गेलेले पैसे मिळायला हवे होते. आपण केलेल्या संस्कारांचं फळ हेच का ॽ तरीही या गोष्टीसाठी शालेय अध्यापनाचा कालावधी वाया घालविण्यापेक्षा आपण हा विषय बाजूला ठेवून अध्यापन करू या.’
लहान सुट्टीनंतर मी तास घेण्यासाठी दुस-या वर्गावर गेले. माझ्या वर्गावर मुख्याध्यापकांनी तास घेतला. तसा विशेष काही उपयोग होईल असं वाटत नव्हतं. शेवटचा प्रयत्न म्हणून सरांनी मुलांना पोलिसांची भिती दाखवली. कुत्र्याच्या पराक्रमाचे किस्से ऐकवले, त्याच्या कार्याचे कौतुक केले.पुन्हा एक तासाने मी माझ्या वर्गावर जावून बसले. माझे शाळेत मन लागेना. मी विचार करत खुर्चीवर बसले होते, एवढ्यात शालिनी उठली, ‘बाई, मी घरी जावून डबा आणते.’ मी विचारांची साखळी तुटल्यामुळे तिच्यावर रागावले. मी वड्याचं तेल वांग्यावर काढल्यासारखं झालं. सकाळी शाळेत येताना डबा का आणला नाही, म्हणून चिडले. शेवटी तिला घरी जाण्याची परवानगी देवून मी गप्प बसले. दहा मिनीटात ती परत आली.’बाई, मला देवाला जायचंय जावू?’ या तिच्या प्रश्नावर काय बोलावे ते सुचेना. मी तिला मुकाट्याने जागेवर जावून बसायला सांगितले. पण जागेवर जावून ती उभीच होती. तिने धिटाईने मला परत प्रश्न केला, ‘बाई , मी येणार नाही असं आईला सांगून येते.’ शेवटी मी तिला जाण्याची परवानगी दिली. मला मात्र काहीतरी वेगळंच घडतय असं जाणवत होतं. मी दोन विद्यार्थ्यांना शालिनीच्या मागावर पाठविले. मुलांनीही चिकाटीने तिचा पाठलाग केला.  थोड्या वेळाने तिन्ही मुले शाळेकडे पळत येताना दिसली. मुलांनी दिलेला इतिवृतांत धक्कादायक होता. मुलांनी जेव्हा तिचा पाठलाग केला, तेव्हा ती घरी जायचं सोडून दुस-याच मार्गाला वळली. त्या मार्गावर बाबळीची सलग पाच झाडे होती. त्या झाडाच्या खाली ती काहीतरी करत होती. मुलांनी तिला हाक मारून, ‘तुझं घर तिकडं आहे ना मग तू इकडे काय करतेस,’ असं विचारल्यावर बाईंच पाकिट शोधतेय, असं तिनं त्यांना सांगितलं. पोलिसांचा कुत्रा येणार या भितीने तिने शाळेतून निघून जाण्याचा प्रयत्न केला. पळण्याचा प्रयत्न फसल्यावर मग चोरी केलेले पैसे दुस-या ठिकाणी लपविण्याचा तिने प्रयत्न केला. पण तो फसतोय आणि शाळेत पोलिस आले तर आपले काही खरे नाही, या भितीने तिने शरणागती पत्करली. तिनं शोधाशोध करण्यात मागे आलेल्या मुलांनाही सामिल करून घेतले. प्रथम तिला मोकळ पाकिट मिळाल्याचं तिनं सांगितलं. पुन्हा थोडं पुढे सर्वांनी शोध सुरू केला. पुढच्याच क्षणाला बाभळीच्या झाडाखाली, काटेरी फांद्याखाली, तिला शंभर ची नोट दिसली, ती तिने सर्वांना दाखविली. दोघा-तिघांनी मिळून काटेरी फांद्या बाजूला सारल्या, तर काय नवल! आणखी तिन नोटा सापडल्या. अर्ध्या तासात शोध मोहिम यशस्वीपणे फत्ते.
           शाळेत ही बातमी सर्वांना कळली. खरंतर चोरी कोणी केली, ते आमच्या लक्षात आलं. पण तरीही आम्ही मुग गिळून गप्प बसलो. तिला तिच्या चुकीची शिक्षा द्यायची आम्ही ठरवलं. आम्ही चारच्या तासाला मैदानावर सर्वच मुलांना बोलाविलं. आज आपल्या शाळेत जी घटना घडली त्या संदर्भात बोलाविलंय,  असं सांगण्यात आलं. शालिनी घाबरली होती. तिला मनातल्या मनात कसेसेच वाटत होते. पण दुस-याच क्षणी तिचा तिच्या कानावर विश्वास बसला नसेल. ‘शालिनीने वरदे बाईंचे हरवलेले पाकिट शोधून आणल्याबद्दल आपण तिचा सत्कार करणार आहोत.’ या वाक्यासरशी विद्यार्थ्यांनी तिच्यासाठी आनंददायी पद्धतीने अभिनंदन केले. टाळ्यांच्या गजराने ती भारावून गेली.पण दुस-याच क्षणाला ती ओशाळल्यासारखी झाली.तिला मुख्याध्यापकांच्या हस्ते बक्षिस मिळाले पण तिच्या चेह-यावर आनंद दिसत नव्हता. सत्कार झाल्यावर तिने बोलण्याची इच्छा व्यक्त केली. पुढे उभारल्यावर मात्र ती रडू लागली. तिने मुसमुसतच आपल्या गुन्ह्याची कबुली सर्वासमक्ष दिली. आपण पुन्हा असं करणार नाही असे वचनही दिले.  आता मात्र खरं बोलण्याचं समाधान तिच्या चेह-यावर दिसत होतं.
               आज सर्व विद्यार्थ्यांना, शालिनीची चुक कळली तरी तिने कबुली दिल्यामुळे तिचे सर्वांना कौतुक वाटले. तिला आपली चूक कळली. तिच्यासह सर्वांनाच हा प्रसंग बरेच काही शिकवून गेला. दुस-या दिवशी परिपाठाच्या वेळी तिने स्वत: पुढे येवून सुविचार सांगितला, “नेहमी खरे बोलावे.”
                    सौ.आशा अरूण पाटील

3 Replies to “नेहमी खरे बोलावे”

Comments are closed.

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Don`t copy text!