निर्णय

                     निशा नेहमीप्रमाणे शाळेतून घरी आली. लीना, राजू सोबत होतेच. मुलं येण्यापूर्वी आई सगळा स्वयंपाक करून ठेवी. मुलं आली की हातपाय धूवून आईला कामात थोडी फार मदत करत. नंतर देवापुढे दिवा लावून थोडा अभ्यास करत. अन् जेवण करून लवकर झोपी जात. निशाची आई मुलांना लवकर निजा आणि लवकर उठा म्हणून सांगत असे. पहाटे केलेला अभ्यास लक्षात राहतो, हे ती नेहमी सांगे. तिने सांगितल्याप्रमाणे सर्व ऐकत. म्हणूनच वर्गात नेहमी पहिला नंबर पटकावत, निशाचे बाबा ऑफिसमध्ये क्लार्क म्हणून कामाला होते. आई घरी असे, ती सारा संसार चिकाटीने करीत होती. एवढ्या पगारात भागवायचे म्हणजे तिची तारेवरची कसरतच होत होती; पण आज निशाला घरात वेगळेच वातावरण वाटले. नेहमीप्रमाणे घर झाडून, सडा रांगोळी नाही की, स्वयंपाक नाही. आईची तब्येत बिघडली का? म्हणून तिने चौकशी केली; पण कारण वेगळेच होते. बाबांच्या ऑफिसमध्ये काही तरी झाले एवढेच कळाले. आई जास्त काही सांगेना.

‘बाळांनो तुम्ही लहान आहात तुम्हाला काही समजत नाही.’

अशी वाक्य जेव्हा मुलांनी आईकडून ऐकली, तेव्हा मात्र मुलांनी आम्हाला सर्व काही समजतं. तू आम्हाला सांग काय झाले ते. नाही तर आम्ही जेवणार नाही. हे ऐकून मुलांपुढे आई हतबल झाली, अन् तिने बाबांच्या ऑफिसमध्ये अफरातफर झाल्याचे सांगितले. या घटनेमुळेच बाबांच्या पायाखालची जमीन सरकली होती. आपण आजपर्यंत जगलेलं आयुष्य शुभ्र वस्त्रासारखे स्वच्छ होते; पण हा डाग आपल्याला सहन होईल का? असा डाग जो आपल्यावर मुद्दामहून लावण्यात आला. आयुष्याच्या वाटेवर चालताना अचानक कुणीतरी मार्गावर काटे पसरल्याचा भास त्यांना झाला. बाबांना तर काहीच सुचेना. बाबा म्हणजे एक सरळ साधे व्यक्तिमत्त्व. शांताराम नावाप्रमाणे शांत. शांतारामांनी आपल्या बॉसने सांगितलेल्या सूचनांचे पालन केले; परंतु आपल्या हातून काही तरी पाप होवू लागले आहे. याची त्यांना तसूभरही शंका आली नव्हती. मात्र जेव्हा अफरातफर उघडकीला आली, तेव्हा पुरावे सर्व शांतारामाच्या विरोधात सापडले. त्यावरून अफरातफर शांतारामांनी केली हे सिद्ध होत होते.

           ऐन वेळेस बॉसने पलटी मारल्यामुळे शांताराम हतबल झाले. ते आपल्या सफाईत बोलू शकणार होते का? आईने आजपर्यंत खूप नेटाने संसार केला होता; पण आज बाबांबरोबर झालेला गोंधळ पाहून तीही गोंधळली. आई-बाबांची स्थिती पाहून निशा, लीना आणि राजूही बावरले. हा हा म्हणता ही गोष्ट सर्व सोसायटीत पसरली. लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा रंगू लागल्या. कोणाच्या तोंडाला हात तर लावता येत नाही. शेवटी होणाऱ्या चौकशीला सामोरे जावंच लागणार होतं. कोर्ट, केस, खटला, चौकशी या सर्वांसाठी अवसान असनंही महत्वाचं. ‘कर नाही त्याला डर कशाला?’ या उक्तीप्रमाणे शांतारामांनी सर्व चौकशीला सामोरं जायचं ठरवलं, पण समाज त्यांना काही सुचू देईना. मुलांना आणि आईला शेजाऱ्यापाजाऱ्यांनी उलट सुलट चर्चा करून भंडावून टाकले. शेवटी शांतारामांना काही दिवस निलंबित करण्यात आलं. चौकशीचा निकाल जोपर्यंत समोर येत नाही; तोपर्यंत त्यांची स्थिती, ‘ना घर का ना घाटका’ अशी झाली होती. शांतारामांची आर्थिक स्थिती खूपच नाजूक झाली होती. शेवटी नाइलाजाने घर गावाकडे हलविण्यात आले. त्याआधी शांतारामांचा गावाकडचा पत्ता ऑफिसला देऊन  तुम्ही बोलावताल तेव्हा हजर होईन, असंही कबूल करून घेतलं. गावाकडून ऑफिसला चौकशीसाठी येणंजाणं परवडणारे नव्हते. खरेपणाने आणि सरळमार्गी जाणाऱ्या माणसाची साऱ्यांनाच अडचण होत असते. त्यामुळे जिथे तिथे शांतारामांना अडचणी येऊ लागल्या. गावाकडे खर्च कमी; पण हाताला काम नाही. चौकशीसाठी म्हणून ऑफिसमधले हेलपाटे. घरांमध्ये शिकणारी मुले त्यांच्या दररोजच्या वेगवेगळ्या गरजा. वाढती महागाई या सर्वाचा ताण शांतारामांना सहन होईना. अन् त्यांच्या मनात वेगळेच विचार येऊ लागले. आपण असलं जीणं जगण्यापेक्षा मेलेलं बरं. असं त्यांना वाटू लागलं. या सर्व गोष्टीतून मुक्तता सततचा संघर्ष तरी संपेल. आपल्या आयुष्याला लागलेला डाग घेऊन जगणे, आपल्याला शक्य नाही असे त्यांना वाटे. त्यांच्या चौकशी सत्रासाठी म्हणून ते शहरात आले होते. त्या दिवशी ओळखीची माणसे भेटली त्यात प्रत्येकजण त्यांना हटकत होते.
     ‘काय राव मग चांगलंच कमावलेलं दिसतंय.’
     ‘काय मग किती माल मिळाला?’
     ‘आतापर्यंत तुमच्याकडून ही अपेक्षा?’

शांतारामांचा नसलेला खोटेपणा सिद्ध झाला होता. जीवनात येऊन नाव कमावणं सोप नसतं. गमावण्यासाठी क्षणही पुरेसा असतो. विचारचक्रांत शांताराम पुलाच्या दिशेने निघाले. पुलाच्या आसपास म्हणावीशी गर्दी नव्हती. त्यांचा निश्चय ठाम झाला. त्यांनी पुलावरून खाली वाकून पाहिले. नदीत बऱ्यापैकी पाणी होते. आपण आता सरळ उडी मारायची अन् या सर्वामधून मुक्त. म्हणून ते कठड्यावर चढणार, एवढ्यात त्यांना नदीच्या पात्रात वाळू चाळताना दोन मुले दिसली. ती मुले जास्त मोठी नव्हती. त्या दोन मुलांना भेटण्याची त्यांना इच्छा झाली. ते वाट काढत मुलांपर्यंत गेले. मुलांनी वाळू चाळून एक दोन रुपयांची नाणी मिळविली होती. देवदर्शनासाठी आलेले लोक दर्शन घेऊन एक रुपया, दोन रुपये पात्रात टाकत. तीच नाणी ते शोधत होते. दुपारचा भाकर तुकडा खाण्यासाठी मुले बाजूला बसली होती. मुलांनी शांतारामांना पाहिलं अन् आपले पैसे हा माणूस हिसकावून घेईल, या भावनेनं ती मुले भेदरली होती. परंतु शांतारामांनी त्यांची आस्थेने चौकशी केल्यावर मात्र मुलं त्यांच्याशी व्यवस्थित बोलू लागली. दूधात साखर विरघळावी तशी ती मुलं शांतारामांना स्वतःची माहिती सांगू लागली. त्यांच्या घरात आई, वडील, बहीण आणि स्वतः ती. हे सर्वजण काम करत होते. आई वडील अपंग त्यामुळे नदीकाठी बसून पूजेचं सामान विकत. ही दोन मुलं त्यांना विक्रीसाठी लागणारे सामान आणून देत. घरात बहिण होती. ती शेजारच्या सोसायटीत दोन तीन घरी भांडी धुणं दोन्हीही करे. ही सर्व परिस्थिती कळल्यावर शांतारामांनी शिक्षणाची चौकशी केली. घराजवळच्या शाळेत ही दोन मुलं दररोज शाळेत जात. आज महिनाअखेर असल्यामुळे अर्धी शाळा करून ती नदीवर आली होती. शिकून पुढे काय करणार विचारल्यावर इन्स्पेक्टर, शिक्षक अशी उत्तरे त्यांनी दिली. त्यांची उत्तर ऐकून शांताराम विचार करू लागले. या मुलांना धड राहायचे ठिकाण नाही. उद्याचा दिवस कसा असेल हे माहीत नाही. घरातल्या प्रत्येकाच्या कमाईवर त्यांच्या आई बापाच्या संसाराची गाडी चालली होती. तरीही उराशी मोठी स्वप्न बाळगून त्या दिशेने वाटचाल करताहेत, हे काही कमी नाही. सरकारी वेगवेगळ्या योजनांमुळे शिक्षणास मदत आहेच, पण मनातनी जिद्द, चिकाटी ही काही कमी महत्वाचे नाही.
‘खूप शिका मोठे व्हा’
असं म्हणून शांतारामांनी खिशातून पाच रुपयांचे नाणे काढून दिले. त्या मुलांनी अशी मदत नाकारली. कारण जरी आई वडील अपंग होते. तरी ते कुटुंब स्वाभिमानी होते. आपल्या मुलांना वेगवेगळ्या सरकारी योजनांचा फायदा करून देत होते. अन् प्रत्येकाच्या जीवनात आशेच्या सूर्याच्या किरणांची अपेक्षा होती आणि ते मिळणार असा दृढ विश्वास होता. मुलांचे कथन ऐकत असताना शांतारामांना स्वतःच्या मुलांची आठवण झाली. आपण एवढे भावनांच्या आहारी जाऊन या नदीपर्यंत कशासाठी आलो, हे त्यांना आठवले.  अन् आपण करणार असलेल्या चुकीमुळे मुलांना घरच्यांना किती त्रास सोसावा लागेल, मुलांच्या भविष्यातील स्वप्नाचं काय हा सर्व विचार करून जगण्याच्या जिद्दीने शांतारामांनी नदीच्या पात्रातल्या मुलांचा निरोप घेऊन आपल्या घराकडे वाटचाल केली. आलेल्या परिस्थितीशी चार हात करून तिला चारी मुंड्या चीत करायचे ठरवले. एक वेगळीच जिद्द त्यांच्यात निर्माण झाली होती. अंतःप्रेरणा जागृत झाली होती. आपण गेल्याने प्रत्येकावर काय वेळ येईल अन् आपल्यावर आलेल्या कामातील घोळ त्याचं काय? तो न मिटता त्याचा गुंताच होणार. आपण निघून जाऊनही समाधान मनःशांती नसणार अन् मागच्यांच काय? त्यांना तर जगतानाही मरण यातना भोगाव्या लागतील. यापेक्षा परिस्थिती स्वीकारून तिच्यावर मात केली पाहिजे. हे ठरवून ते घरी परतले. आलेल्या परिस्थितीशी हिमतीने लढा देऊन आपला खरेपणा सिद्ध करणार. ही मनीषा त्यांनी मनी बाळगली.

सौ आशा अरुण पाटील

     

 

                  

                     

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Don`t copy text!