निसर्गमित्र
चिंटू आज बागेत फिरत असताना त्याची नजर सुंदर, मनमोहक अशा विविध फुलांवर पडली. ही फुले विविधरंगी होती. त्याला आज शाळेत भारतातल्या जाती, धर्माविषयी शिकविले होते. त्या फुलांना पाहून त्याला त्यांच्यातील एकता, समानता जाणवली. ज्याप्रमाणे आपल्या देशात सर्वजण एकोप्याने राहातात, एकच मनुष्यजात मानतात, त्याप्रमाणेच फुलंही कोणत्याही प्रकारची, कोणत्याही रंगाची असो शेवटी त्यांना आपण फुलंच म्हणतो…
चिंटूला थोड्या लांब अंतरावर सुगरण पक्ष्याची घरटी दिसली. त्या बागेमध्ये छोटसं तळं होतं आणि त्या तळ्याजवळच्या झाडावर सुंदर घरट्यांच्या ओळी दिसत होत्या. त्याने याआधी घरटी पाहिली होती. पण आज निरीक्षण केल्यावर त्याच्या असं लक्षात आलं की, या घरट्यात नुसती राहाण्याची सोय नाही तर खालच्या बाजूला झोका खेळण्याचीही छान सोय आहे. खरंच कुठं शिक्षण घेतलं या सुगरणींनी? ना घराचा आराखडा, ना परवानगी, ना सिमेंट ना वाळू. पुढच्या सात पिढ्या ते घर टिकेल की नाही याची चिंता नाही. चिंटूला सहजच एक प्रसंग आठवला. शेजारचे काका खूप मोठे इंजिनिअर आहेत. त्यांनी त्यांच्या देखरेखीखाली शहरामध्ये एक पूल बांधला होता. या पुलाचे उद्घाटन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री येणार होते. परंतु उद्घाटनाच्या आदल्या दिवशीच पुलाच्या एका बाजूचा सात फूट आडवा अन् सहा फूट उभा कठडा कोसळला. झालं, दात पडलेल्या लहान मुलासारखं दिसू लागलं. मुख्यमंत्र्यांचे पुढचे सर्व कार्यक्रम रद्द. ह्या सुगरण पक्ष्यांचा आदर्श काकांनी घ्यायला हवा. हाताने ओढूनही खोपा तुटणार नाही एवढी टिकाऊ, पक्की अशी वीण एवढ्याशा चोचीने अन् दोन पायांच्या साहाय्याने कशी बनवली जात असेल?
पुढे त्याला मुंग्यांची रांग दिसली. तो त्या रांगेचे निरीक्षण करत करत पुढे गेला. एक फुलपाखरू मरून पडले होते. अन् त्या साऱ्याजणी त्याचे अवशेष घेऊन चालल्या होत्या. एवढ्याशा मुंग्या पण भलत्याच हुशार. एकीचे बळ त्यांनी ओळखलेच, पण याठिकाणी फुलपाखरू पडले आहे हा शोध एका मुंगीकडून सर्वांना थोड्या कालावधीत कळतो कसा? लगेच तेथे मुंग्याची रांग दिसते. अन् त्यांचे प्रामाणिकपणे काम सुरू होते. खरंच पोलिसांनी चोरीचा, गुन्हेगारीचा तपास करताना मुंग्यांसारखी चिकाटी, जिद्द बाळगायला हवी. स्वयंपाकघरात कट्ट्यावर एखादा अन्नाचा कण किंवा पोळीचा तुकडा पडला की, लगेच थोड्यावेळाने मुंग्यांची रांग दिसते. गोड पदार्थाचा शोध तर त्या अचूक आणि अगदी पटकन् घेऊ शकतात. अनेक डब्यांमधून कोणत्या डब्यात साखर आहे, हे एखादी गृहिणी सहज सांगू शकणार नाही पण मुंगी मात्र अचूक शोध घेते.
पुढे चिंटूला फुलपाखरं आणि मधमाश्या या फुलावरून त्या फुलावर काही खेळ खेळतात असे वाटले. पण त्या एवढ्याशा फुलांमधून मध गोळा करत होत्या. खरंच एवढा एवढा मध गोळा करून पुढे मधाची पोळी किती छान तयार करतात. विद्यार्थ्यांनीही ज्ञानार्जन करताना मधमाश्यांचा आदर्श घ्यायला हवा. ज्याप्रमाणे माणूस धन-दौलतीचा संचय करतो. त्याप्रमाणेच ज्ञानाचाही संचय केला पाहिजे. संचय केलेल्या ज्ञानाचा स्वतःसाठी फायदा होतोच पण इतरांसाठीही होतो. धन वाटल्याने कमी होते पण ज्ञान कमी होत नाही..
आज चिंटू काहीवेळ निसर्गाच्या सान्निध्यात आला तर निसर्गाने त्याला खूप काही शिकवले. ना पुस्तक, ना वही, ना खाऊ, ना फळा. सूर्यास्त होऊ लागला मग एकदम त्याला आकाशात पक्ष्यांचे थवेच्या थवे दिसू लागले. हे सर्व पक्षी आपल्या घरट्याकडे परतू लागले. चिंटूच्या मनात उगीच विचार आला. ह्यांची शाळा सुटली असेल. नाहीतर ही सर्वजण चारा घेऊन परतत असतील. या सर्व विचारांबरोबरच त्याला आपल्या घराची आठवण झाली. चिंटू घराकडे जाण्यासाठी वळला. मात्र मनामध्ये त्याने अनोखा निश्चय केला होता. आजपासून जास्त टीव्ही पाहायचा नाही. तर जास्तीत जास्त पुस्तकं वाचायची अन् दिवसातला काही वेळ निसर्ग सानिध्यात घालवायचा.