पाखरं‘सानिका, सानिका… ‘
काहीच उत्तर येईना. रोल नं. १२, तरीही काहीच उत्तर नाही. हजेरीमधून माझी नजर सहज वर्गात पटकन् फिरली. सानिका वर्गात होती. परंतु काहीच न बोलता ती वर्गातील एका तक्त्याकडे पाहात होती. ती पाहाते म्हणून मीही पाहिलं. तक्त्यामध्ये एक मुलगी शाळेत चालली आहे आणि तिचे आई-बाबा तिला हात हलवून निरोप देतानाचे चित्र. मी तिला पुन्हा एकदा हाक मारली. त्यासरशी ती तंद्रीतून बाहेर येतच, ‘उपस्थित मॅडम’ म्हणाली. मी तिच्याकडे खूप आश्चर्याने पाहिले. मॅडम आपल्याकडे खूप वेळ पाहात होत्या, हे तिच्या लक्षात आले आणि ती खाली मान घालून उभी राहिली. मी तिला मधल्या सुट्टीत भेट असे सांगून बसवले व शिकवण्यास सरूवात केली.
                           नेहमीच अभ्यासात हुशार असणारी सानिका गेल्याचवर्षी आमच्या शाळेत आली होती. श्रीरामपूर येथे ती, तिचा भाऊ, बहिण, आई-वडील यांच्यासोबत राहात होती. गेल्याचवर्षी तिच्या बाबांचा एका अपघातात मृत्यू झाला अन् त्यांचं पूर्ण कुटुंब शहाबादला येऊन राहिलं. आईला आतापर्यंत आर्थिक व्यवहार माहिती नव्हते. बाबांनी तिला फक्त मुलांचे आणि घरातलं एवढेच तू बघत जा, असे सांगितले. बाहेरच्या जगाचा, जबाबदाऱ्यांचा अनुभव तिला नव्हता. बाबांच्या अपघाती मृत्यूमुळे तिला उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. अन् अजून काय कमी म्हणून मधुमेह असल्याचं कळालं. हे तर अनुवांशिकतेने प्राप्त झालेले श्रीमंत रोग होते. ते या गरिबांना कसे परवडणार? शिक्षण अवघे बारावीपर्यंत झालेल्या शितलला आपल्या दोन मुली व एक मुलगा माहेरच्या पंखाखाली घेऊन राहाण्याशिवाय पर्याय नव्हता. जीवनाच्या प्रवाहात तिच्या संसाराची नाव संकटाच्या वाऱ्यात हेळकांडत होती. तरीही माहेरच्या आधाराने आपल्या संसारवेलीला वाढवायचे तिने ठरवले. लहान मोठ्या संकटांना ती नेहमी पराभूत करत होती. पण मोठ्या संकटात तिचे पाय लटपटू लागत. त्यातच जीवनसाथी नाही. अन् भरीस भर दोन रोग संकटावर मोफत मिळाले होते. एक मुलगी बहिणीकडे, एक मुलगा मुंबईला भावाकडे. तिने सानिकाला मात्र स्वतःकडे ठेवले होते. मिळेल ते
काम करण्याची तिची तयारी असे. सानिकाचे शिक्षण, लग्न एवढी जबाबदारीही तिच्यासाठी भरपूर होती. अशातच एके दिवशी तिला ताप चढला. आज उद्या करत करत ती दहा-बारा दिवसांनी दवाखान्यात गेली. तापाने शरीरातील त्राण गेल्यासारखे वाटतच होते. परंतु तिला स्वतःलाच काय तरी होईल, असे वाटत होते. सरतेशेवटी आपले काय बरे-वाईट झाले तर? याचाही विचार करायला तिने सुरुवात केली. खरंतर मध्येच तिच्यावर झालेल्या अपघाताच्या जखमा आणखीनही मनावर ताज्या होत्या. त्यांना काळाच्या रुपाने मलमपट्टी होणारच होती पण, त्यातच तिच्या मनाची वाढलेली चलबिचल. आपली चिमणी पाखरं तिला नाईलाजाने वेगवेगळ्या दिशांना पाठवावी लागली होती. त्या सर्वांसोबत असतानाच्या क्षणाची आठव येऊन तिचे डोळे पाणावले. तिच्या पिलांना सोडून राहाणे म्हणजे तिच्यासाठी एक सजाच होती. पण तरीही अर्धपोटी तत्त्वज्ञान सुचतं  पण रिकाम्या पोटी काहीच सुचत नाही. सानिकाला मात्र आपल्यापासून क्षणासाठीही दूर करायचे नाही असे तिने ठरविले होते. तिची प्रकृती हळूहळू खालावत चालली होती. तिला जास्त श्रमाची काय पण साधी साधी कामेही जमेना. माहेरच्या लोकांनीच तिचं सर्व हवं नको पाहायचं ठरवलं होतं. सानिकाला नेहमीच आपल्या भावा-बहिणीची आठवण येत असे. बाबा तर नेहमी स्वप्नात दिसत. ते नेहमी तिला ‘तू शिक मोठी हो. तूच तुझ्या आईला आधार द्यायला हवा नाहीतर ती माझ्याशिवाय जगू शकणार नाही.’ असे सांगत. आजकाल तर सानिकाला आईची खालावत चाललेली प्रकृती बघता काळजी वाटे. घरात मामा, मामी, आजी, आजोबा या सर्व मोठ्या लोकात काहीतरी गुपचूप बोलले जातेय आणि ते आईविषयीच असते, याची खात्री होऊ लागली. म्हणूनच तिचे खाण्या-पिण्यात, खेळण्यात शिकण्यात नव्हे तर कशातच लक्ष लागेना. ती तंद्रीत असल्यासारखी वागू लागली. अन म्हणूनच आज मॅडमने हाका मारूनही तिला त्या ऐकूदेखील आल्या नाहीत. ती मधल्या सुटीत  मला भेटली. आपल्या मनाचं पाखरू वादळात अडकून रस्ता भरकटल्यामुळे पाचोळ्याप्रमाणे उडतंय आणि म्हणून आपल्याकडून बऱ्याच चुका घडतात हे तिच्या सांगण्यातून समजले. मॅडमकडून आपल्याला योग्य पथदर्शन होईल, अशी तिची खात्री होती. सर्व परिस्थिती ऐकल्यावर जीवनात सुख जवाएवढे दुःख पर्वताएवढे’ का म्हणतात ते जाणवले. पुन्हा पुन्हा मी तुझ्या पाठीशी आहे. तुला हवी ती मदत करेन. पण तू शिक. तुझ्या आईला औषधोपचारासाठी मी मदत करेन, असं सांगितल्यापासून तिच्या चेहऱ्यावर बरीच हुशारी जाणवू लागली. मी माझ्या ओळखीने शितलला चांगल्या दवाखान्यात नेले. खर्चासाठी मदतीचे आवाहन करून थोडाफार खर्च मिळाला. तिच्या आईचा ताप साधा नव्हता तर ती कावीळ होती. परंतू योग्यवेळी निदान झाल्यामुळे तिला जीवनदान मिळाले होते. सानिकाला मी पाचवीत नवोदयच्या सरकारी परीक्षेला बसविले. आपण आपल्या जीवनाची दिशा शोधायची असते. जीवनाचा मार्ग किती अंधःकारमय, खडकाळ जरी असला तरी प्रयत्नरूपी दिव्यांनी दिशा, मार्ग सापडतो. तो यशस्वीपणे आक्रमित राहाणे आपल्या हातात असते. त्याप्रमाणेच सानिकाने जीवनाची दिशा शोधली. तिची निवड झाल्याचे कळले. अन तिच्या आईचे डोळे पाणावले. आता काय झाले ते कळेना. ती म्हणाली, आज माझ्या नवऱ्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी सानिकाच्या रूपाने प्रयत्नाचे पाऊल पडते आहे.’ आणि त्यांचे स्वप्न पूर्ण होणारच ही खात्री तिला वाटल्याने दुःखाश्रू अन् आनंदाश्रू यांचा अनोखा मेळ साधला गेला होता. त्या अश्रूमध्ये दोघींचाही हसरा चेहरा अन् सोनेरी स्वप्न तरळू लागली. मी शिकून मोठी होईन आणि आमचं घरटं उभा करीन. या घरट्यात पुन्हा सारी पाखरं जमा होतील, या सानिकाच्या वाक्यावर शितलने तिला मिठीत घेतले.

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Follow by Email
Don`t copy text!