पांढरा पैसा

‘छबू, छबू….’

 हिला घरात शोधायचं म्हणजे तसं अवघड नाही. खरंतर स्वयंपाकघर नाहीतर….. साड्यांच्या कपाटाजवळ’

‘अगं छबू इथे काय करतेस आणि हे काय नेहमी तू साङ्यांच्या राड्यात दिसतेस? आज मात्र हे काय नोटांच्या घड्या घालून का ठेवतेस? या इतक्या नोटा आल्या कुठून?’

‘सोनाबाई, काय सांगायचं तुम्हाला? चोरीचा मामला अन् हळूहळू… अहो गेल्यावर्षी आमच्या भावानं शेत विकलं तर मग मी त्यावर नाहरकत सही केली. त्यावेळेस तुला काहीतरी घेच असे तो म्हणाला खरं, पण त्याला मनापासून काही द्यावं वाटतंच नव्हतं. भावानं काही रुपये दिले होते. त्यातली निम्मी रक्कम दिली यांना. पण बाकीची ठेवली माझ्याकडे. त्याचा हा सगळा राडा.’

गप्पा मारून फुकटचे सल्ले देवून चहा पिऊन सोनाबाई निघून गेल्या.
        छबू आता वेगळ्याच टेन्शनमध्ये होती. हातावेगळा ठेवलेला पैसा कधीतरी उपयोगी पडेल म्हणून तिने ठेवला होता बाजूला. पण ही तर डोकेदुखीच झाली. संपतरावांना काही म्हणायची सोय नव्हती. बिचारे….. तेही त्यांच्या जवळ असलेला पैसा कसा अन कधी बदलावा या विचारात होते. काळा पैसा असणाऱ्यांचे वेगळं. पण पांढरा पैसा असणाऱ्यांचे काय? छबुताईंनी तर  गेल्या दहा वर्षांचा हिशोब आठवून आठवून देणेकऱ्यांची  देणी देण्यासाठी फोन केले. प्रत्येकाचे एकच म्हणणे आले. आता इतके दिवस राहिले तर अजून दोन-चार महिन्यांनी काही फरक पडणार नाही. नवीन नोटा आल्यावरच द्या. छबूबाईंनी आता हे काम जबाबदार व्यक्तीवर सोपवायचं ठरवलं. त्याचदिवशी संपतराव त्यांच्याकडे त्यांच्या नोटा बदलून घेण्याविषयी विचारू लागले. त्यावर त्यांनी स्वतःच्या नोटा दाखविल्या आणि तुम्हीच जमलं तर मला नोटा बदलून द्या, असं सांगितलं. नोटा बदलून घेण्यासाठी कोणा कोणाची मदत होऊ शकेल, अशा लोकांची त्यांनी यादीच काढली. सोबत सध्या आपल्या ओळखीच्या दुकानदारांकडून आवश्यक गोष्टींची खरेदी केली. तरीपण हे मोठे दुकानदार कशाला जुने पैसे घेतील? उलट त्यांचाच पैसा कुणी बदलून दिला तर बरे. छबूने पैसा बदलून मिळविण्यासाठी माध्यम प्रायोजक म्हणून प्रथम भांडीवालीला गाठले. सखूबाईने बऱ्याचवेळा त्यांच्याकडून उचल घेतली होती. पण कधी कधी छबूताई टाळतही असत. आज मात्र सखूच्या मागे लागून, गोड बोलून त्यांनी तिच्या गळ्यात पन्नास हजार घातले. बिचारी सखू, हातावर पोट घेऊन जगणारी. ती कुठून बघणार एवढा पैसा एकदम? नाही.. हो… करत तिने पैसे बदलून द्यायचे कबूल केले. पण एक अट ठेवली, ती म्हणजे वर्षाचा पगार अॅडव्हान्स द्यावा लागेल आणि वर एक महिन्याचा पगार ज्यादा द्यावा लागंल. छबूची अवस्था म्हणजे ‘अडला हरी अन् गाढवाचे पाय धरी’ अशी झाली होती. नंतर छबूबाईनी इस्त्रीवाला गाठला, त्यालाही आपल्या गोड बोलण्याने गार करत सत्तर-ऐंशी हजार दिले. त्यालाही छबूबाईंची आज्ञा मोडता येणार नव्हतीच. तोही पडत्या फळाची आज्ञा म्हणून गप्प बसला. त्याने स्वतःचे पैसे बदलून घेतले होतेच. आता छबूबाईंचा मोर्चा वळला स्वयंपाकवाल्या मावशींकडे. तीही बिचारी हो नाही करत घाबरतच तयार झाली. तसं त्यांची छबूबाईंना नाही म्हणायची टापच नव्हती. कारण छबूबाईंनी त्यांना नवीन चार पाच घरं स्वयंपाकासाठी लावून दिली होती. तिनेही सत्तर-पंच्याहत्तर हजार घेतले. तिने मात्र अट घातली. ज्यादिवशी मी पैसे बदलायला जाईन त्यादिवशी कामाला सुटी घेईन. माझे घरबार जेवायला इकडंच येईल. अन् बँकेपर्यंत जायला तुम्हीच रिक्षा करून द्यायची. झालं एकदाशी बराच पैसा बदलून झाला. पण अजून बराच शिल्लक होता. एवढ्यात छबूला भिशीवाल्या टोणगेबाई आठवल्या. त्यांना फोन करून तिने बोलावून घेतले. एक महिन्याची भिशीचा हप्ता तुम्हाला असाच देते, पण तेवढी मला काही रक्कम बदलून घ्यायला मदत करा, अशी मागणी त्यांनी केली. भिशीवाल्या बाईंनी मात्र मुदतीत पैसा बदलून स्वतःच्या पैशाची योग्य विल्हेवाट लावली होती. त्यामुळे त्या तयार होईनात. छबूबाईंचा नाईलाज झाला. त्यांच्या दूरच्या बहिणीकडून कसं का होईना, काम करून देईन अशी हमी दिल्यावर छबूबाईंनी त्यांना सोडलं. अहो स्वतःचा पैसा आणि तोही सरळ मार्गाने कमावलेला. तरीही भिती किती? छबूबाई तर चांगल्या घामेघूम झाल्या होत्या. कुठून बुद्धी सुचली अन् संपतरावांना भावाकडून घेतलेली सर्व रक्कम न देता स्वतःकडे ठेवली. पण म्हणतात ना,

‘विनाशकाले विपरित बुद्धी’
आता एवढं करूनही अजून बरीच रक्कम शिल्लक होती. आता यादीमध्ये पुढचं नाव कोणाचे ते त्या शोधू लागल्या. शेजारच्या रमा कानडेच्या भावाला  पिठाची गिरणी घ्यायला पैसे पाहिजे होते. तिने छबूबाईना सांगितलेही होते. आर्थिक मदत करा. काही दिवसात घेतलेले पैसे परत देऊ असेही सांगितले. पण छबूताईनी माझीच अडचण सुरू आहे, असं सांगितलं होतं, पण आज मात्र त्या स्वतःहून चौकशीला गेल्या. रमाला प्रथम आश्चर्य वाटलं. मात्र पुन्हा खरी गोष्ट लक्षात आली. काहीच कळले नाही. असा आव आणून त्या पैसे घ्यायला तयार झाल्या. व्याज वगैरे द्यायला जमणार नाही, असे म्हणाल्या. त्यावर छबूबाई चिडल्या.
‘मी व्याजबट्टा करत नाही. फक्त मला तुम्हाला मदत करायची होती. मी दिलेली रक्कम मला बदलून द्यायची.’ रमाची परिस्थिती साधारण, त्यामुळे रक्कम बदलून घ्यायला तिच्याकडे रक्कमच शिल्लक नव्हती. म्हणून ती या गोष्टीला कशीबशी तयार झाली. तसं छबूबाईकडची रक्कम बऱ्याच अंशी बदलायला देऊन झाली होती. आता त्या स्वतः काही रक्कम बँकेच्या रांगेत ताटकळत उभं राहून बदलणार होत्या. राहिलेली रक्कम घेऊन छबूबाईंनी बँकेकडे कूच केली तर काय तिथे रांगेत संपतराव दिसले. त्यांना पाहाताच छबूबाईची कळी खुलली. कधी नव्हे ते  मदतीची आवश्यकता असताना योग्य वेळी नवरोबांचे दर्शन झाले. त्या धन्य धन्य झाल्या. त्या संपतरावांच्या दिशेने अशा काही उत्साहाने निघाल्या, जसं काही कॉलेजमध्ये मित्राला पाहून मैत्रीण त्याच्याकडे जावी. काही अंतरावर असतानाच संपतरावांबरोबर त्यांना कोणीतरी दिसले. बाई… बाई नव्हे मॅडम, मॅडम नव्हे मिस. तिच्या गळ्यात काहीच नव्हतं. खरं पण तिच्या ड्रेसचा गळा बया बया, तिचे केस गळ्यातच होते. रंग तर एकदम सुवर्णकांती. तिने जीन्स, टी शर्ट घातला होता. तिचे लालभडक ओठ अन् काळेभोर डोळे. हसल्यावर गालावर पडणारी खळी पाहून तर छबूबाईना क्षणभर आपण स्त्री कशाला झालो ? पुरुष असतो तर सहज पटवली असती तिला. असे त्यांना वाटू लागलं. शेवटी जवळ जाऊन आपण आलोत, हे दाखवून देण्यापेक्षा ती नक्की कोण आहे, हे पाहायचे त्यांनी ठरवले. तशी ती मुलगी संपतरावांपासून ठराविक अंतरावरच उभी होती म्हणा. तरीही छबूच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती. थोड्यावेळाने छबूला जाणवले, संपतराव त्या मुलीचे जणू बॉडीगार्डच आहेत असे वागत होते. आता मात्र त्यांना दम धरवेना. त्या धाडसाने त्यांच्यापर्यंत पोहोचल्या. छबूबाईंना वाटले, आता संपतरावांच्या चेहऱ्याचा रंग उडेल. ते त त प प करतील. परंतु संपतरावांनी छबूबाईना पाहिलं आणि सातमजली हसले. छबूबाई मनातल्या मनात विचार करत होत्या. काय बाई निर्लज्ज माणूस. आता ही तुझी सवत आहे असं म्हणतो की काय ? त्यांच्या पोटात गोळा आला. पाय थरथर कापू लागले, दरदरून घाम फुटला. एवढ्यात त्या मुलीनेच विचारले,

‘हे….. हू इज धिस पुअर लेडी?’

तशा स्थितीतही छबुबाई फणकारल्या,

‘ए म्हशे मला लेंडी म्हणती व्हय? अन् तू कोण गं? झापराबादी का जर्शी म्हस…. का गाय ?’

तिला जास्त काही कळलं नसावं. यावर संपतरावांनी सावरून घेत सांगितलं,

‘ती म्हणते, ‘ मॅडमला् आमच्या शेतात झापराबादी म्हशी, जर्शी गाया आहेत दाखवायला आणा.’

संपतरावांनी डोळ्यानेच छबूबाईंना गप्प बसण्याची खूण केली. पण सांगितल्या सांगितल्या ऐकायला ती काय मराठी सिनेमातली एखादी सोज्वळ नायिका नव्हती. लगेच छबूताई ओरडल्या,

‘गप्प बसा म्हणून काय खुणावता? तुमचं पितळ उघडं पडलंय ना? मग…. मग मी का गप्प बसू?’

यावर संपतरावांच्या लक्षात आले. छबूचा गैरसमज झालाय. तो पटकन् दूर केला तर बरे. नाहीतर साहेबांच्या बायकोच्या डोक्याची केसं काय वाचायचे नाहीत. संपतराव पटकन् म्हणाले,

‘अग छबू ह्या आमच्या  वहिनी.’

छबू त्यांना पाहून गालातल्या गालात खोचक हसली. पोरगी तर चिकनी दिसते, पण संपतराव त्यांना वहिनी म्हणतात म्हणजे लग्न झालेलं दिसतंय.  किती छान दिसतात त्या. संपतरावांनी छबूबाईच्या नजरेची भाषा ओळखली. गेले बावीस वर्षे संपतराव संसारात त्यांच्याच इशाऱ्यावर नाचत होते. मग काय, त्यांनी पटकन् सांगितले,

‘आमच्या शेजवाल साहेबांची बायको.’

छबूचा जीव साऱ्या स्पष्टीकरणानंतर भांड्यात पडला. सुटले बाई म्हणत त्यांनी सुस्कारा सोडला. तेवढ्यात पैसे बदलण्यासाठी शेजवालबाईंचा नंबर आला. छबूने आपली रक्कम नवऱ्याच्या हातात दिली अन् खुणावले, घ्या चटकन् बदलून. संपतराव बिचारे, लग्न झाल्यापासून छबूबाईच्या एका दगडात दोन पक्षी मारण्याच्या पद्धतीचे लग्न झाल्या झाल्या तर कौतुक करत पण आजकाल छबूबाई एका दगडात अनेक पक्षी मारायचा प्रयत्न करीत होत्या. ते त्यांना त्रासदायक वाटे. आताही तेच चालले होते. ते छबूबाईना नेहमी म्हणायचे,

‘तुम्ही एका दगडात दहा पक्षी मारता खरं, आम्हाला मात्र दहा दगडांनी एक पक्षी मरत नाही. साधा जखमीही होत नाही.’

एकूण काय, तर एका फेरीत अनेक कामं करण्याची छबूबाईची सवय नेहमी यशस्वी होई. तर संपतरावांची मात्र फसत असे. बिचारे संपतराव छबूचं नाही ऐकून काय करतील ? ते पैसे घेऊन पुढे सरकले. छबूबाई रांगेच्या बाजूला उभ्या राहिल्या. एवढ्यात त्या जिथे रांगेत उभ्या होत्या तेथून एक बाई त्यांना,

‘ओ बाई उभारा की, तुमच्या नंबरवर.’
असं म्हणाली.
‘माझं काम झालं.’
असं सांगून संपतरावांकडे आल्या होत्या ना. ‘नाही ओ ताई. झालं माझे काम.’ असं म्हणून विजयी मुद्रेने त्या वळल्या तर काय समोर मॅडमचा नवरा म्हणजेच शेजवाल साहेब उभे.

वहिनी एवढी रक्कम घरातच राहिली बघा. तेवढी तुम्ही घ्या बदलून. नाहीतरी तुम्ही रांगेतच उभ्या होता, असं संपतरावांनी आताच सांगितलं. त्या दोघांना दिले असते. पण त्यांचं काम झालं.’प्लीज.’ इतक्या आर्जवीनं सांगितल्यानं छबूबाईंना काहीच बोलता येईना. त्यांनी बॅग समोर केली. झालं काहीही न बोलता उसनं अवसान आणून लोकांचा ओरडा खात मघाच्या नंबरवर उभ्या राहिल्या. करतात काय न उभं राहून. शेवटी शेजवाल भावोजींनी ‘वहिनी प्लीज’ म्हटलं होतं ना!

आशा पाटील, सोलापूर

4 Replies to “पांढरा पैसा”

Comments are closed.

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Don`t copy text!