पत्र माझे मला

प्रिय सखी,
     मन:पूर्वक नमस्कार.
मी आज स्वत:लाच पत्र लिहीतेय गंमत वाटतेय मला. पण जेव्हा मी लहान होते, तेव्हा कधी मनातल्या मनात तर कधी मोठ्याने आत्मसंवाद साधायची सवय होती. हल्ली या गोष्टींपासून दुरावले. वेळच नाही ना आपल्याला. खरंच मी स्वत:वरच प्रेम करू लागले. जसं मला कळू लागलं तसं आरशात पाहून स्वत: शी संवाद साधण्याचा छंदच जडला. मी आशा आणि माझ्यातली  मी मनिषा. मनिषा, मी स्वत: वरच म्हणजे तुझ्यावर प्रेम केले. हे शिकवले मला माझ्या आईने. माझा गुरू लौकिक अर्थाने तीच होती. तिच्या हाताखाली मी शिकले बऱ्याच इयत्ता. तिची अध्यापनाची पद्धत, कामाची हातोटी अन् वागण्याची सचोटी वाखाणण्यासारखी होती. त्याचेच अनुकरण करत गेले मी. नोकरी करता करता स्वअस्तित्व, कौटुंबिक जबाबदाऱ्या ती ज्याप्रमाणे पेलवत होती. त्याप्रमाणेच तर चाललंय माझं कार्य. मनिषा जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपण भेटलोचं. पण सुख दुखा:च्या अनेक प्रसंगात एकमेकीला सावरत राहिलो. ज्याप्रमाणे बहिणाबाई चौधरी म्हणतात, जीवनात सुख जवाएवढे तर दु:ख पर्वताएवढं असतं याची अनुभूती येत होती. पण आपण एकमेकींची साथ नाही सोडली. मनातली घुसमट, मनातला कोलाहल सारं कसं दाटून आलेल्या नभासारखं. याला रितं करण्याचा एक मार्ग गवसला. तो राजमार्ग होता लिखाण करण्याचा. हळू-हळू आपल्या कथेतील पात्रांमध्ये मी एकरूप होवू लागले. मी त्या पात्रांद्वारे माझं मनच जणू रिकामं करत होते. कारण मन मोकळं करण्याच्या जागा देवाने माझ्याकडून अवघ्या काही वर्षात हिरावून घेतल्या होत्या. खूप मन भरून आले की रात्री आवाज न होवू देता उशी ओली होई. हे दु:खाचं मळभ अन् सुखाच्या कल्पनांचं गर्भारपण. मी हे सारं प्रस्तुत करत गेले अन् मी रिक्त होण्याच्या प्रयत्नात व्यक्त होतं गेले. मनातील भाव-भावनांच्या खेळात कथा, एकपात्री, नाटक, कविता यातील पात्रांना रंगरूप देत गेले. मी माझ्याचं गुणांवर प्रेम करत होते. स्वत: मध्ये गुंतून जात होते. अगं, मी माझ्या आठवणींचा पसारा कितीतरी वेळा तुझ्यापुढे मांडला. माहेरच्या आठवणीत तर मी आजही मायेनं, प्रेमानं चिंब चिंब होते. सखी, जीवनात यश अपयश मिळतं गेलं. अपयशामुळे यशाला किंमत असते. हे सांगणाऱ्या आई- वडिलांच्या छत्रछायेला तरुणपणीच पारखी झाले होते. पण जीवनात ठामपणे प्रत्येक प्रसंगाला सामोरे तर गेलेचं. आत्माभिमानाने प्रत्येक दु:खद प्रसंगानंतर फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा स्वयंम् प्रेरणेने आणि आत्मजागृतीने उंच भरारी घेत गेले. स्वअस्तित्वाची जाणीव मला जेव्हापासून झाली, तेव्हापासून जगण्याचे उत्सव साजरे करून सिद्धता केली. मी जीवनात शरीरासोबत मनाचंही आरोग्य जपण्याचा प्रयत्न केला. माझी किंवा माझ्या मनाची पर्वा कोण करतं वा कोण करत नाही यापेक्षा मी स्वत:ची पर्वा करतेय, हेच माझ्यासाठी महत्वाचं आहे. मी विचारांनी आपल्या वाटणाऱ्या व्यक्तींच्या मनावर राज्य करेन. तो दिवस माझ्यासाठी महत्वाचा असेल. आयुष्यात ते क्षण सोनेरी ठरतील,  हे अगदी खरं. 
   माझ्यातल्या मला म्हणजे मनिषा तुलाही कधी कधी शोधत रहाते मी, असो.
भेटू पुन्हा निवांत क्षणी
                                                     तुझीच
                                                     आशा

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Follow by Email
Don`t copy text!