प्रतिक३

तिने पाणी मागितले. म्हणून उठून पाणी आणण्यासाठी स्वयंपाकघरात पाणी घेऊन निघणार तेवढ्यात माझा फोन वाजला. आशिषने नागपूरमधल्या मीटिंगचा आढावा सांगण्यासाठी फोन केला असणार. फोनवर सर्व जुजबी चौकशी करून मी फोन ठेवू का? विचारल्यावर त्याला राग आला.
         ‘मुलं नाहीत आणि मीही नाही तरीही तुला काही महत्त्वाचं काम आहे का? सारखी फोन ठेवू का? म्हणून विचारतेस.’
        
यावर मी त्याला प्रतिभा आल्याचं सांगून, मी सांगायचं विसरले म्हणून माफीही मागितली. तसं तर त्याने प्रतिभाला फोटोतच पाहिलं होतं. तिनेही आशिषला मुलांना आता काही वेळापूर्वीच फोटोत पाहिलं होतं. आशिषला प्रतिभाशी बोलावे वाटत होते. पण मला ती बेडवर झोपल्याचं दिसलं. तशी तिची मानसिक स्थिती ठीक नव्हती. ती प्रवासाने दमल्याने आताच पडलीय असं सांगितल्यावर मग ठीक आहे म्हणून त्याने फोन ठेवला. मी दोघींसाठी म्हणून प्रतिभाच्या आवडीची मुगाची डाळ घालून भाताची मऊ खिचडी केली. दोघींचीही जास्त काही जेवायची इच्छा नव्हती. तूप, पापड, लोणचं असा छान बेत होता. जेवण करत असतानाच राही साकेतचा फोन आलाच. त्यांची सारी विचारपूस झाली. मग मी प्रतिभा मावशी आल्याचं सांगितलं. त्यांना आपण मावशीला भेटू शकत नाही म्हणून वाईट वाटले. थोड्याफार गप्पा त्यांनी मावशीबरोबरही मारल्या. अन् मग फोन ठेवला. प्रतिभाला मात्र कमाल वाटली. आपल्याला या घरातला प्रत्येक सदस्य ओळखतो याचे तिला आश्चर्य वाटले. यावर मी तिचे आणि माझे कॉलेजमधले फोटो दाखविले आणि अधूनमधून मी आपल्या कॉलेजमधल्या गमतीजमती, अभ्यासाच्या पद्धती, आपली मैत्री याविषयी सांगते हेही सांगितले. मी सहजच बोलत बोलत विचारले, राजेश सध्या कुठे असतात? आणि तुला मुलंबाळं? त्यासरशी तिने पर्समधला फोटो काढून दाखविला. त्यामध्ये एक स्मार्ट मुलगा होता. तो अगदी प्रतिभासारखाच होता. फोटोत प्रतिभा होती, पण राजेश नव्हता. त्याविषयी विचारल्यावर मात्र प्रतीक आणि मी दोघेच रहातो. तो रहात नाही आमच्याबरोबर. या वाक्यासरशी तिच्या डोळ्यात पाणी आलं. प्रतीक चांगला उंचापुरा होता. तो नववीला होता. परदेशात राहाणारा तो, खरंच स्वावलंबी होता. मी माझ्या लहान मुलांना सोडून परदेशीच काय पण परगावाला सुद्धा जाऊ शकले नसते. प्रतिभा आणि मी आता अंथरुणात बसून गप्पा मारू लागलो. तिच्या जीवनात नक्की काय झाले हे जाणून घेण्याची जिज्ञासा माझ्या मनात होतीच. तिला मुंबईत नोकरी मिळाली होती. तिच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे, प्रामाणिकपणा, हुशारीमुळे काही थोड्या वर्षात तिला प्रमोशन मिळत गेलं. लग्नाला एवढी वर्ष झाली तरी राजेश तिला परदेशी न्यायचं नावच काढत नव्हता. खरंतर नोकरीची गरज नसताना तो नोकरी करू देत होता. याचे घरातल्यांसह प्रतिभाला देखील नवल वाटत होतं. खरंतर शिक्षण देखील अर्धवट होईल अन् तो प्रतिभाला परदेशी घेऊन जाईल असं वाटत होतं. शिक्षण होऊन नोकरी लागली, पण त्याची कसलीच हालचाल नव्हती. फक्त वर्षा सहा महिन्याला येणं जाणं सुरू होतं.

आता मात्र कंपनीने प्रतिभाला परदेशात असणाऱ्या ऑफिसमध्ये नेमलं होतं. प्रतिभाला बरंच वाटलं. कारण आता तरी ती राजेशबरोबर राहू शकणार होती. तिने खूप आनंदाने त्याला फोन केला. मात्र प्रतिभाने सांगितलेली बातमी ऐकून तो तेवढा आनंदी झाला असे वाटत नव्हते. खरंच प्रतिभालाही नवल वाटले. तिची सर्व तयारी होऊन तिला जायला पाच सहा महिने लागले. व्हिसा, पासपोर्ट आणि बरंच काही. राजेश आलाच होता न्यायला. राजेश पहिल्यापेक्षा अबोल वाटला. प्रतिभाला आपल्या नवऱ्यामधला बदल जाणवला. खरंतर माहेरच्यांनीही तिचा कधी विचार केला नाही. पण राजेशने तिला तिच्या पायावर उभं राहाण्याची संधी दिली. सध्या तो वेगळंच वागत होता. पण काही समस्या असतील त्याच्याही कंपनीत, असे तिला वाटले. शेवटी एकदा ती परदेशी म्हणजे लंडनमध्ये आली होती. डोळ्यांची पारणं फेडणारी दृश्यं ती पाहात होतीच. खरंच किती मनोहर दृश्य होती. घरी म्हणजे फ्लॅटवर ते पोहोचले. तिथे गेल्यावर राजेशने तिला संगणकावर तिचं ऑफिस, फ्लॅट अन् राजेशचं नोकरीचं ठिकाण दाखवलं. खरंतर ती फ्लॅटवर राहू नये असं काहीसं त्याचं मत होतं. प्रतिभाला लग्नानंतर नवऱ्याबरोबर राहण्याची संधी सहा सात वर्षांनी मिळाली होती. म्हणून ती नवीन नवरीसारखी मोहरली होती. पण राजेश मात्र कावराबावराच वाटत होता. प्रतिभाच्या कंपनीने तिच्या कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये तिची सोय केली होती. पण आपलं घर सोडून तिथे खूप राहायची तिची इच्छा नव्हती. तिच्या उत्साहापुढे राजेश काही बोलू शकला नाही. कंपनी दूर असल्यामुळे तिला त्रास होत होता. तीन चार महिने उत्साहात, मजेत गेले. अगदी थंड हवेची झुळूक स्पर्शन जावी तसे गेले. तीन महिन्यातील जवळीकतेचा निर्णय लवकर मिळालाही. प्रतिभासाठी तर आभाळ ठेंगणं वाटू लागलं. कोणीतरी पाहुणा येणार या भावनेने ती भारावली. खरंतर सहा महिन्यांसाठी कंपनीने तिची लंडनमध्ये नेमणूक केली होती. नंतर पुन्हा तिला भारतात परतावं लागणार होतं आणि ते तिच्यासाठी योग्यच होतं. बघता बघता पाच सहा महिने संपत आले. तिला आता चौथा महिना सुरू होता. राजेश काहीसा खूश झाला पण काहीसा नाराज वाटत होता. नक्की काय समस्या आहे हे प्रतिभाला कळतच नव्हते. ती तिच्या बाळाला भारतातच जन्म देणार होती. अगदी एक महिन्यात ती परतणार होती. अलीकडे राजेश एक दोन रात्री कंपनीचं काम आहे असं सांगून घरीच येत नसे. असेच तो एकदा गेला होता. प्रतिभाला खरेदी करायची म्हणून ती मॉलमध्ये गेली होती. एवढ्यात पुढच्या एका परदेशी बाईबरोबर तिला राजेश दिसला. तिच्या हातात त्याचा हात होता अन् एक गोंडस छान मुलगा. बोट धरून त्यांची खरेदी चालली होती. ते दृश्य प्रतिभाला खरंच वाटेना. पण तो राजेशच होता. खरंच एवढी जवळीकता म्हणजे ते दुसरं तिसरं कोणी नसून ही परदेशातली राजेशची बायको होती. यामुळेच प्रतिभाच्या शिक्षणाला त्याने प्रोत्साहन दिले. तिला भारतातच ठेवले आणि बरंच काही काही. तिने पटकन् त्याच्यापुढे जात ‘“काय मिस्टर राजेश. इकडे कुठे?” असा प्रश्न केला. त्यासरशी ती बाई आणखी जवळ जात “राज ह्या कोण?” ती इंग्रजी टोनमध्ये मराठी बोलत होती. प्रतिभाला नवल वाटले. मुलगाही पप्पा पप्पा करत चिकटला. अरे बापरे! ती उडालीच. तिला सगळा मॉलच तिच्याभोवती फिरतोय असं वाटलं. कोणीतरी उंच टेकडीवरून खाली ढकलल्याचा भास झाला.
दरदरून घाम आला. त्या बाईनी तिला रुमाल दिला. काय त्रास होतो का? काही प्रॉब्लेम आहे का विचारले. एवढ्यात राजेश पुढं होत म्हणाला,


“रुसी तुला सांगितलं ना भारतातल्या माझ्या मित्राची बायको आलीय. तिला जरा इथं अनकम्फर्टेबल फिल होतंय. त्या ह्याच.”
  त्यासरशी प्रतिभा ओरडली, “राजेश खोटं बोलू नकोस. मी, मी तुमच्या लग्नाची बायको आहे. हे सांगायला लाज वाटते का? का अशी प्रतारणा केली माझ्याबरोबर? अन् हे करायचे होते तर माझ्याशी लग्नच का केलं?” सारं ऐकून ती स्त्री ही रागावली. तिला कसंतरी करून त्याने मॉलबाहेर काढलं अन् तो तिथून चालता झाला. खरंच प्रतिभाला काय करावे अन् काय नको झालं होतं. मॉलमधून कुठून बाहेर पडायचं हेही कळेना. तिची मानसिक अवस्था विचित्र झाली. तिच्या कंपनीतला जॉन पाहात होता. एवढा वेळ लांबूनच पाहाणारा तो जवळ आला. त्याने पाणी देऊन तिला शांत केलं. घरी पोहोचवलं. सगळं ठीक आहे ना? विचारलं. मग तो निघून गेला. तो गेल्यावर ती खूप रडली. तिला आभाळ फाटल्याचा भास झाला होता. काय विचार केला अन् काय झालं, याचा विचार तिच्या मनात आला. काकांनी तिला समजून घेतलं नाही आणि राजेशने स्वतःच्या स्वार्थासाठी समजून घेण्याचं नाटक केलं. शेवटी काय ती खेळणं बनली होती. तिनं आईला, सासूला फोन करून सारं सांगितलं. ती तिच्या बाळाला जन्म देणार नाही हेही सांगितलं. आई तिचा निर्णय ऐकून हादरली. पण सासूने मात्र तू भारतात ये, मग पुढील निर्णय घेऊ असेही सांगितले. घाईने निर्णय घेऊ नकोस, कारण घाईचा निर्णय चुकू शकतो हेही समजावले. चार पाच तासानंतर राजेश आला. राजेशचं तोंड पाहण्याचीही तिची इच्छा नव्हती. तिने त्याला “तुझा माझा संबंध संपला” या एका वाक्यात सारं काही सांगितलं. त्याने हरतऱ्हेने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. पण ती तिच्या निर्णयावर ठाम होती. त्याने तिला शिकवले, पायावर उभे केले. म्हणून काय झाले? “झाड लावणाऱ्याला झाड उपटण्याचा अधिकार कोण देतो?” तिने तिचं सामान आवरले आणि एक महिन्यासाठी का होईना ती कंपनीच्या गेस्ट हाऊसला राहायला गेली. राजेशने खूप वेळा भेटण्याचा प्रयत्न केला. पण तिने एकदाच त्याला भेटून तमाशा नको, माझा तुझा संबंध संपला.” असं सांगितलं. “मी माझ्या -जीवनात सवतीबरोबर राहू शकणार नाही,” हेही सांगितलं. राजेश मात्र आला नाही. त्याला तिच्या निर्णयातील ठामपणा माहीत होता. ती भारतात परतली. ती माहेरी जाईल, सासर सोडून देईल, असं साऱ्यांनाच वाटलं. पण ती मात्र सासू- सासऱ्यांकडेच गेली. झालेल्या सर्व घटनांचा वृत्तांत घरच्यांना सांगितला. प्रथम त्यांचा त्यांच्या मुलावर पक्का विश्वास होता. म्हणून ती खोटी वाटत होती. पण नंतर तिच्या आग्रहाखातर त्यांनी राजेशला फोन केला. त्याने मात्र सर्व खरे खरे सांगितले. त्यामुळे तिला वागणे सोपे झाले. सासू सासऱ्यांनी खूप समजून सांगून बाळाला जन्म देण्यासाठी विनवले. त्या निष्पाप जीवाचे काय चुकले? तो तुझ्या पोटी जन्म घेणार हेच का? यावर राजेशवरचा राग ठीक आहे. पण त्याची सजा याला का? म्हणून तिने होणाऱ्या बाळाला मुलगा असो की मुलगी जन्म देण्याचे ठरविले. त्या चार पाच महिन्यात त्यांनी तिची खूप काळजी घेतली. पहिल्या बाळंतपणाला माहेरी पाठवले नाही. तिने मात्र सारं काही देवाने ठरवल्याप्रमाणे होते हे मानले होते. पुढे प्रतीक झाला, तिचं आयुष्यच बदललं. त्याच्यासाठी सारं काही मानून तिने आपले आयुष्य वेचलं. राजेशला सोडलं तरी सासर नाही सोडलं आणि काही वर्षांनी परदेशातच नोकरीसाठी राहिली. तिने तिच्या जीवनात राजेशशिवाय प्रतीकला कसे वाढवले, त्याचे बालपण, जिव्हारी लागणारे प्रश्न सारं सारं खूप हुशारीने पेलवलं. तो मोठा झाल्यावर त्याला सारं सांगितलं. आता मात्र तो आणि ती एवढेच त्यांचं विश्व. दोघही अधूनमधून सुटीला सासू सासऱ्यांकडे येतात. आई-बाबांकडे कधीतरी जातात. प्रतीकमुळे एक गारवा एक आशेचा किरण तिच्या आयुष्यात आला आणि त्या किरणाच्या प्रकाशातच तिचं आयुष्य ती उजळवतेय. तिचा निर्धार पाहून तिचे कथन मला खूपच ठाम निर्णयाचं वाटलं. एवढा वेळ बोलून ती आता चांगलीच दमली होती. एवढ्यात प्रतीकचा फोन आला. थोड्यावेळापूर्वी रडली होती हेही विसरून गेली होती. कारण माय
लेकराच्या दिलखुलास गप्पा सुरू होत्या. तिने मोबईलचा लाऊडस्पीकर ऑन केला होता. तिकडून प्रतीकचा बालीश आणि लाडेलाडे बोलण्याचा, आईची चौकशी करण्याचा, आवाज ऐकला अन् नकळत आनंदानी डोळे पाणावले. खरंच प्रतिभाच्या हुशारीचे, सौंदर्याचे प्रतीक किती पवित्र होते, तिच्या मातृछायेमध्ये तिचा प्रतीक चांगलाच बहरला होता. राजेश शिवाय प्रतीक आणि ती स्वाभिमानाने जगत होते. एकमेकांना सावरत दुनियेच्या पटावर डाव व्यवस्थित मांडत होते. एवढ्या समस्यांवर तिने जीवनात तोंड दिले होते. आता मात्र तिचे सारे विश्व म्हणजे प्रतीक होता. दोघंही बराच वेळ एकमेकांशी बोलत होती. तिच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहिले अन् मन भरून आले. आभाळ पावसाआधी भरावे तसे.

समाप्त

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Don`t copy text!