प्रतिक २

पण तीही प्रतिभाच्या घरच्यांना चांगलंच ओळखून होती. त्यामुळे झालं गेलं विसरून जा अन् पुढे चल. राजेश आता जरी नाही म्हणत असला तरी पुढे जाऊन तुला नक्की शिक्षण पूर्ण करण्याची संधी देईल. तुझ्या व्यक्तिमत्वाची कदर करेल, असं बरचसं सांगून तिने प्रतिभाची समजूत काढली. शेवटी प्रतिभाच्या हातात आहे ती परिस्थिती स्वीकारणे एवढंच होतं.
पण तीही प्रतिभाच्या घरच्यांना चांगलंच ओळखून होती. त्यामुळे झालं गेलं विसरून जा अन् पुढे चल. राजेश आता जरी नाही म्हणत असला तरी पुढे जाऊन तुला नक्की शिक्षण पूर्ण करण्याची संधी देईल. तुझ्या व्यक्तिमत्वाची कदर करेल, असं बरचसं सांगून तिने प्रतिभाची समजूत काढली. शेवटी प्रतिभाच्या हातात आहे ती परिस्थिती स्वीकारणे एवढंच होतं.

लग्नाची तारीख पंधरा दिवसांवर आली. मला मात्र पत्रिका नव्हती. आज येईल उद्या येईल याच आशेवर मी होते. बघता बघता फक्त चार दिवस राहिले. खरंच मी काय चूक केली? असं काकांना जाऊन विचारावं वाटत होतं. पण त्यांना बोलण्याची हिंमत माझ्यात नव्हती. त्यांच्या कामवाल्या मावशीकडून कळलं, लग्न मुंबईत एका मोठ्या हॉलमध्ये आहे. पण काय कॉलेजमधल्या कुठल्याच सर, मॅडमच काय पण मित्र मैत्रिणींनाही पत्रिका नव्हती. बघता बघता लग्नाचा दिवस उद्यावर आला. एका मनाने असेही वाटले की, जावे लग्नाला पत्रिका नसतानाही. पण दुसरे मन म्हणाले की, तिथं जाऊन या श्रीमंत लोकांकडून आपला अपमान करून न घेणे बरे. प्रतिभासाठी जीव तुटत होता. पण… लग्न खूप धामधुमीत पार पडले. प्रतिभाचे लग्नात सासरच्यांनी कोडकौतुक केले. सासरची माणसं खूप चांगली होती. प्रतिभा मात्र आता मिटलेल्या, सुकलेल्या कळीप्रमाणेच झाली. जास्त कुणाशी बोलत नसे, कामापुरते हसणे. एक हसरं खेळतं व्यक्तिमत्त्व हरवलंच जणू. लग्न होऊन पंधरा दिवस झाले आणि प्रतिभा माहेरी आली. तिने कामवाल्या मावशीजवळ निरोप दिला. मी मैत्रीसाठी का होईना तिला चोरून भेटायला गेले. तिला पाहिल्यानंतर काही क्षण स्तब्ध उभी राहिले. तिच्या चेहऱ्यावरचं तेज तिचं खळखळून हसणं, ताजतवानं दिसणं यात थोडाफार बदल जाणवला. खरंच मला काय बोलावे काय म्हणावे, हसावे की रडावे, काही सुचत नव्हते. फक्त मी तिला पळत जाऊन मिठी मारली. जणू अनेक वर्षे झाली होती तिला भेटून. माझ्याच काय पण तिच्याही डोळ्यातून अखंड गंगा, यमुना वाहात होत्या. बराच वेळ झाला मनमोकळेपणाने रडून घेतलं आणि मग लक्षात आलं, अरेच्या बराच वेळ झाला. आपण फक्त रडतच आहोत. शेवटी मी स्वतःला तिच्यापासून वेगळं करत तिला शांत केलं. त्यावेळेस आमच्या सभोवतालची सृष्टीदेखील आमच्या दुःखात सहभागी झाली आहे, असा भास मला होत होता. अचानक आमच्या सभोवतालची झाडंदेखील स्तब्ध झाली होती. प्रतिभाने पहिल्यांदा लग्नाला न बोलविल्याबद्दल माफी मागितली. खरंच माझी आणि तिची मैत्री झाल्यावर असा विचार स्वप्नातही आम्ही कधी केला नव्हता की, मी तिच्या किंवा ती माझ्या लग्नाला हजर नसणार. प्रतिभाच्या हातातली ही गोष्ट नव्हती. त्यामुळे तिच्यावर रागावून काय फायदा? तिला तू बरी आहेस ना? एवढं विचारायलाही माझं धाडस होईना. कारण तिच्या मनाच्या विरुद्धच सारं घडलं होतं हे मला माहीतच होतं. तरीपण तिला आहे त्या परिस्थितीशी मिळतं जुळतं घ्यावं लागणार होतं. राजेशनं तिचं मन वळवण्याचा, तिला समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. हे तिच्या बोलण्यातून उघडच दिसत होतं. प्रतिभाला फक्त लग्न इतक्या लवकर करायचं नव्हतं. स्वतःच्या पायावर उभ राहायचं होतं. पण बाकी तिला खडके सरांविषयी काही वाटत नव्हतं. तिला सरांना काय वाटत होतं किंवा वाटत आहे याविषयी काही देणघेणं नव्हतं. पण स्वतःचं शिक्षण अर्धवट राहणार याचंच वाईट वाटत होतं. पण तोही प्रश्न राजेशने सोडवला होता. बारावीची परीक्षा देण्याची परवानगी दिली होती आणि परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी आणि प्रॅक्टिकलसाठीच ती माहेरी इकडेच राहाणार होती. राजेश आता सहा महिन्यांसाठी कंपनीसाठी अभ्यासदौरा म्हणून परदेशी जाणार होता. कंपनीच्या म्हणण्यानुसार तर त्याची योग्यता वाटली तर परदेशी असलेल्या त्यांच्या कंपनीचे ते परदेशात मॅनेजर होणार होते. राजेश प्रतिभाला एवढ्या लवकर घेऊन जाऊ शकत नव्हते. कारण कंपनीतर्फे ते स्वतः अभ्यास दौरा पूर्ण करून पुन्हा पुढचा निर्णय घेणार होते. प्रतिभाने राजेशच्या स्वभावाचे वर्णन केले. त्यावरून राजेशचा स्वभाव एकंदरीत चांगला आहे हे लक्षात आले. शेवटी काय मला तर वाटले होते, प्रतिभाच्या घरच्यांनी तिच्या मनाविरुद्ध असे लग्न केले. त्यामुळे तिच्या आयुष्यात आता काही रामच उरणार नाही पण आता सर्व पाहाता मला खूप बरे वाटले. प्रतिभाच्या चेहऱ्यावर आता मला वेगळाच ताजेपणा जाणवू लागला. ती आता राजेशच्या प्रेमात चांगलीच फुलली होती. खरंच मी अगदी वेडी आहे. काहीतरी विचार केला मी तिच्या जीवनाच्या बाबतीत. त्यानंतर मात्र आम्ही परीक्षेला भेटलो. कारण प्रतिभाने दररोज कॉलेजला जाणे तिच्या वडिलांना मान्य नव्हते. अधून मधून प्रॅक्टिकलला व महत्त्वाच्या दिवशीच ती येई. माझ्याशी न बोलण्याचा सल्ला तिच्या घरच्यांनी दिला होता आणि तिला तो मान्य करावा लागला होता. तरी कॉलेजमध्ये आल्यावर ती बोलतच असे.

परीक्षा होऊनही तीन महिने होऊन गेले. लग्न होऊनही प्रतिभाने कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता. मला ही डिस्टिंग्शन मिळालं होतं. तिचं अभिनंदन करायला आम्ही साऱ्याजणी गेलो. पण ती सासरी मुंबईला गेल्याचं कळलं. तिची भेट होऊ शकली नाही म्हणून वाईट वाटले. पण वाईट जास्त या गोष्टीचे वाटले, तिने कामवाल्या मावशीकडून निरोप देऊन जायच्या आधी भेट तरी घ्यायची. एवढी जिवाभावाची मैत्रीण अशी का वागली? राजेशच्या प्रेमात ती आपल्याला विसरून गेली. मी घरी गेल्यावर मावशींना विचारलंही. पण मावशींनी सांगितलेली माहिती ऐकून तर मी आश्चर्यचकित झाले. प्रतिभाने भेट घेण्यासाठी त्यांच्याकडून मला निरोप दिलाही. परंतु काकांनी तो निरोप देऊ नका म्हणून मावशींना बजावले. निरोपाबद्दल मला आणि प्रतिभाला काहीच कळता कामा नये हेही सांगितलं. नाहीतर नोकरीचं काही खरं नाही असंही धमकावलं. त्यामुळे बिचाऱ्या मावशी गप्प बसल्या. तिकडे प्रतिभा मी येण्याची वाट पाहून शेवटी नाईलाजाने निघून गेली. अन् इकडे मला तर काहीच माहीत नव्हते. बघता बघता दिवस पटापट जात होते. मावशींकडून प्रतिभाची एखाद दुसरी बातमी कळत होती. प्रतिभाला राजेशने बारावीतल्या यशामुळे इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं होतं. मला तर एक क्षण तिच्या नशिबाचा हेवा वाटला. खरंच सासर माहेर दोन्हीकडे श्रीमंती अन् माहेरच्यांची इच्छा नसतानाही सासरच्यांनी म्हणण्यापेक्षा राजेशने तिला शिकवायचं जास्त मनावर घेतलं होतं. तसं तो काही गरज नाही शिकण्याची म्हणून शिक्षण सोडवू शकला असता. पण त्याच्या मनाचा मोठेपणा पाहाता खरंच किती समंजस होता राजेश हे जाणवत होते. मी मात्र घरच्या परिस्थितीमुळे बीएस्सी करायचं ठरवलं होतं. मी काय करते हे तिला माहीत नव्हतं. ती काय करते मला माहीत नव्हतं. भेट अशी झालीच नाही, विचारांच्या तंद्रीतच मी चालत लिफ्टमध्ये गेले.

मी लिफ्टने उतरून खाली आले खरी पण पंधरा मिनिटे झाली तरी परदेशी पाहुणे आले कसे नाहीत म्हणून मी बॉसला फोन केला. ते ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे अर्ध्या तासाने येतील असा आताच फोन आला असं बॉसने सांगितले. हे एक बरं झालं आपण अचानक पर्समधला प्रतिभाचा फोटो पाहून कितीतरी वर्षे मागे भूतकाळात फिरून आलोत. पण त्यामुळे खाली येऊन पंधरा मिनिटे झाली तरी आपल्याला कळले नाही. मी तिथेच वीस पंचवीस मिनिटं टाईमपास केला. एवढ्यात गेटमधून एक गाडी आत आली. गाडी पार्किंग करून त्यातल्या व्यक्ती माझ्याच दिशेने येऊ लागल्या. आमच्या कंपनीचा ड्रेसकोड माझ्या अंगावर होता आणि येणाऱ्या पाच व्यक्तींमधल्या दोन व्यक्ती गेल्या वर्षी येऊन गेल्या होत्या. त्या ग्रुपमधल्या फक्त तीन व्यक्ती लांबूनच ओळखीच्या नाहीत हे लक्षात आले आणि त्यातल्या दोन व्यक्ती भारतातल्या आहेत हेही जाणवले. शेवटी काय कुठेही विश्वात फिरा पण आपल्या देशाचा माणूस पाहिला की, आपलं हृदय आपुलकीनं भरून येतं. मी कुतूहलाने साऱ्यांकडे पाहात होते. बोलता बोलता ते माझ्याजवळ येऊन पोहोचले. मिस्टर जॉन पुढे आले. मिस मॅगी ही हस्तांदोलन करण्यासाठी पुढे आल्या आणि त्यांनी बाकीच्या तिघांची ओळख करून दिली.
‘या मिसेस कॅण्डी, हे मिस्टर कुलकर्णी आणि या प्रॅति.’
मी प्रॅतिच्या चेहऱ्याला पाहिलं अन् क्षणभर मी स्वप्न पाहात असल्याचा भास झाला. आपण खरंच स्वप्नात तर नाही ना? म्हणून मी स्वतःच स्वतः चिमटा घेतला. प्रॅति, प्रॅति दुसरी तिसरी कोणी नसून ती प्रतिभा होती. बापरे मी स्वतःला आवरू शकले नाही. कोण बरोबर आहे, आपण कोठे आहोत? याचंही भान राहिलं नाही आणि मी प्रतिभा म्हणून ओरडले. एव्हाना तिनेही मला ओळखले होते. ती चक्क माझ्या गळ्यात पडली. लग्नानंतर झालेली गळाभेट त्यावर ती आज झालेली गळाभेट. आमच्या दोघींच्या गळाभेटीचा कार्यक्रम पाहून  एव्हाना सर्वांनी ओळखलं, या दोघींची पूर्वीची ओळख दिसते. ते आमच्याकडे कौतुकाने पाहात होते. मग प्रतिभाने पटकन पुन्हा नव्याने माझी ही खास मैत्रीण नेत्रा म्हणून ओळख करून दिली. आम्हा दोघींना खूप खूप बोलायचे होते. तिने जॉब कसा काय स्वीकारला? किंवा तिलाही माझं सध्या काय चाललंय अशा बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या. पण सध्या कंपनीची मीटिंग महत्त्वाची होती. आम्ही दोघींनी आमचा कार्यक्रम आटोपता घेतला. आज फक्त साधी मीटिंग. उद्याच फायनल मीटिंग होणार होती. आज या सर्वांची सोय बॉसने बड्या हॉटेलमध्ये केली असणार. आज आपण आपल्याच घरी हिला घेऊन जायचं, हे मी आताच ठरवलं. खरंतर आज केवढा मोठा योगायोग की दैवयोग म्हणायचा? तिचा फोटो पर्समध्ये नेहमीच असतो म्हणजे सर्वांचेच असतात. आई, बाबा, दादा, आशिष, साकेत, राही. पण त्यातल्या त्यात हिचा फोटा हाताला लागला. काही वेळासाठी का होईना आपण भूतकाळात गेलो. अन् तोच भूतकाळ काही का होईना वर्तमान बनून माझ्यासमोर उभा राहिला. खरंच नियतीला जसं हवं तसंच घडतं. आपण या जीवनपटावर कळसूत्री बाहुल्या असतो. देव कोणती दोरी कोणत्या दिशेने ताणतो त्या दिशेने आपण मार्गक्रमण करतो.

                सर्वांना घेऊन मी वरती ऑफिसमध्ये गेले. सर्वांचा व्यवस्थित पाहुणचार झाला. मी आजच्या मीटिंगची तयारी केलीच होती. त्याप्रमाणे मीटिंगही व्यवस्थित पार पडली. बाकी फायनल डिसिजन उद्याच्या मीटिंगमध्ये होणार होतं. त्या सर्व पाहुण्यांना ताज हॉटेलमध्ये सोडण्याची सूचना बॉसने शिर्के सरांना दिली. पण मी लगेचच प्रतिभाला माझ्या घरी येण्याचा प्रस्ताव मांडला. तो काही विचार करून तिने मान्यही केला. जणू ती मी चल म्हणण्याची वाट पाहात होती. सोने पे सुहागा या गोष्टीचा वाटला, बॉसने ऑफिस टाईमच्या एक तास आधीच घरी जाण्याची परवानगी दिली. स्वतःची गाडी आम्हाला दिला. त्यातून महत्त्वाचं म्हणजे आम्हा दोघींना कित्येक वर्षानंतर भरपूर मनसोक्त गप्पा मारण्याची संधी मिळणार होती. एकतर आशिष आजच नागपूरला गेले होते आणि दोन्ही मुलं सहलीला गेली होती. खरंच संधी मागून मिळत नाही पण कधीकधी ती आपोआप मिळते. अन् आलेल्या संधीचं सोनं आम्ही दोघी आज करणार होतो. आम्ही दोघी बॉसची परवानगी मिळाल्या मिळाल्याच घरी निघालो. गाडी असल्यामुळे दररोजपेक्षा आज घरी लवकर पोहोचलो होतो. प्रतिभालाही स्वर्गसुख मिळाल्याचा भास होत होता. तिला प्रथम सारं घर फिरून दाखवलं. घराची सजावट, टापटीपपणा तिला फार आवडला. घर पाहाता पाहाताच राही, साकेत आशिष यांच्याविषयी सांगून झाले. कॉफी पण झाली. आता मात्र मला प्रतिभाविषयी जाणून घ्यायचे होते. प्रतिभा राजेश कुठे असतात? मुलं-बाळं किती? ती कुठं असते? काय करतो? तू कंपनीत कशी काय? अन् तुझी प्रकृती, राहाणीमान यात जास्त फरक जाणवत नाही. तू परदेशात रहातेस तरीही किती साधी सिंपल रहातेस? हा सगळा प्रश्नांचा भडिमार ऐकून की काय प्रतिभाच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागल्या. माझं काही चुकलं की काय? मी जास्तच बोलले बहुतेक. मी तिची माफी मागितली. तशी ती गळ्यात पडून रडू लागली. मी तिला एकदा मन मोकळं होईपर्यंत रडू दिले. अन् नंतर तिला शांत केले. तिला चूळ भरून पाण्याचा सपकारा तोंडावर मारायला लावला. भरून आलेलं आभाळ रितं झाल्यावर जसं वाटतं तसं वाटू लागलं. तिच्या तोंडावर बरीच हुशारी जाणवू लागली. ती आता सोफ्यावर माझ्याशेजारी माझा हात हातात घेऊन बसली. ती जेव्हा बोलू लागली तेव्हा तिचा कंप पावणारा हात, स्वरातील थरथर, जोरात होणारा श्वासोच्छ्वास मला स्पष्ट जाणवत होता. खरंच लग्नानंतर ती भेटली तेव्हा तर मला जे झालं ते चांगलंच असं वाटलं होतं. राजेश श्रीमंत होताच पण हौशीही होता. खास प्रतिभाच्या इच्छेखातर त्यानं तिला शिकण्याची परवानगी दिली होती. आणि तिनेही स्वतःच्या हुशारीने यशाचे शिखर गाठले होतं. बघता बघता चौथं वर्ष संपलं अन् तिला कंपनीत अनुभवच काय पण पेमेंटही चांगलंच मिळू लागलं. हे सर्व सांगत असताना तिच्या घशाला कोरड पडू लागली.

2 Replies to “प्रतिक २”

  1. खुपच छान आणि पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहे.

Comments are closed.

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Don`t copy text!