प्रेरक

साहिल पळतच येऊन आईला हाका मारू लागला. “ममा, ए ममा” पण ती कसल्या तरी विचारात गुंतली होती. आज तिला शेजारणीने बोललेले शब्द जिव्हारी लागले होते, मनाला बोचले होते. तिला खूप वाईट वाटलं.

सीमा एकटीच बसली होती. घरात लाईट लावायचीही तिच्या डोक्यात आलं नव्हतं. साहिल तिला “ममा ममा” म्हणून हाका मारू लागल्यावरच ती भानावर आली. “काय रे बेटा” हे तिचे वाक्य पूर्ण होण्याअगोदर साहिल तिला बिलगला. तिची ममता दाटून आली. तिने साहिलच्या तोंडावरून मायेने हात फिरवला. अन् त्याची गोड पापी घेतली. काय झाले म्हणून विचारले असता “भूक लागली काही तरी दे ना!” या वाक्यावर तिने पटकन् स्वतःचा मूड बदलला. अन् त्याला त्याच्या आवडीचा गरम शिरा करून दिला.

साहिलची तब्येत चांगली होती. त्यामुळे त्याला सर्वजण ‘गोलू’ म्हणत. गोलू दिसायला एकदम गोंडस. कापसासारखा पांढरा वर्ण, गोल गोल डोळे, रेखीव भुवया अन् कुरळे केस, वयाच्या मानाने उंचीही भरपूर. सीमा अन् सुरेशमधले कोणतेच गुण त्याच्यात दिसत नव्हते.
सुरेश काळासावळा, साधारण उंचीचा तर सीमाचा गहूवर्ण, केसही सरळ. साहिल अगदी पंधरा दिवसाचा असतानाच सीमा अन् सुरेशने त्याला ‘मातृत्व’ या संस्थेतून दत्तक घेतलं होतं. काही वर्षापूर्वी सीमा स्वतः आई होणारच होती, पण काळाने तिच्या गर्भात असताना बाळावर एका अपघाताच्या रूपाने झडप घातली. एवढेच नव्हे तर सीमा या अपघातानंतर पुन्हा आई होऊ शकणार नव्हती, या गोष्टीचा सीमाला खूपच त्रास होऊ लागला. तिला आता जीवनात रसच वाटेना. एरवी दररोज नीटनेटकी आवरून राहाणारी सीमा, दोन दिवस गेले तरी केस आवरेना. कोणत्याच गोष्टीचं भान तिला राहिना. एखाद्या फुलाचा सुगंध अचानक गायब व्हावा तसाच काहीसा प्रकार सीमाच्या बाबतीत झाला. तिला आता कोणतीच गोष्ट आवडेना, रुचेना, पटेना.

शेजारीपाजारी, एखाद्याच्या घरी गेलं आणि बोलण्या बोलण्यातून एखादा शब्द तिच्याविषयी नसला तरी तिला तो जिव्हारी लागे. एखाद्या शस्त्राने व्यक्ती जखमी होते त्याप्रमाणेच ती शब्दाने घायाळ होई. आपल्या जीवनाचे ध्येय काय? हा प्रश्न पुन्हा पुन्हा स्वतःच्या मनाला विचारत असे. सुरेश मात्र नेहमी तिला खूप समजून सांगे. फक्त मूल होणं ही एकच गोष्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे असं तो मानत नाही हे तिला समजून सांगे. सीमाने तर सुरेशपुढे दुसरं लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला होता. सुरेशचे मात्र सीमावर जीवापाड प्रेम होतं. त्याला सीमाशिवाय त्याच्या जीवनात कोणतीच स्त्री येणं मान्य नव्हतं. सुरेशच्या जीवनात दोनच स्त्रिया खूप महत्त्वाच्या होत्या. पहिली म्हणजे आई अन् दुसरी त्याची सहचारिणी सीमा. त्याला त्याच्या घराण्याची वंशपरंपरा, वंशवेल अशा गोष्टीत जास्त स्वारस्य नव्हते. मात्र आई आणि सीमा या दोघींच्या हट्टापुढे मात्र त्याने हात टेकले. बघता बघता सुरेशसाठी म्हणून सीमा आणि आईने मुलगी पाहायला सुरुवात केली. सुरेशला मात्र हे कोणत्याही परिस्थितीत मान्य नसल्याने त्याने वेगळा काही मार्ग निघतो का? ते पाहायला सुरुवात केली. विचाराअंती त्याला मूल दत्तक घेण्याचा सन्मार्ग दिसला.

क्रमशः

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Don`t copy text!