प्रेरक२


सीमावर त्याचे जीवापाड प्रेम होते आणि मूल होत नाही म्हणून दुसरं लग्न हे त्याला मान्य नव्हतं. सीमाला हा विचार पटायला दहा पंधरा दिवस गेले. त्यानंतर हळूहळू घरातील सदस्यांना पटवून सांगण्याची जबाबदारी सुरेशने घेतली. बघता बघता सुरेशचे बाबा, भाऊ, बहिणी, वहिनी सर्व तयार झाले. पण आई काही तयार होईना. तुम्ही कोणाचे मूल आणणार? ते कोणाच्या पोटचे असणार? त्यामध्ये आनुवंशिक गुण कसले असणार? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो वंशाचा दिवा अनाथाश्रमातून आणायचा. त्याला अनाथ करणारे आई-बाबा कसे असतील? का त्यांनी त्याला अनाथाश्रमात सोडले असेल? कधीकाळी पुन्हा ते आमचं बाळ म्हणून आपल्या दाराशी येतील?

आईला समजून सांगता सांगता सुरेशला नाकीनऊ आले. सुरेश सीमाच्या मते फूल कोणत्या वेलीवर किंवा कोणत्या जमिनीत उगवणार हे त्याच्या हातात नसतं. पण कोवळ्या जीवाला आपलंसं करून आपल्या वंशाचं नाव आपण दिलं तर त्याच्या जीवनाचा उद्धार तर होईलच, पण आपल्याही जीवनाचा उद्धार होईल. कोवळ्या मनावर केलेले संस्कार खोलवर रुजतात, आणि हेच संस्कार जीवनाच्या वाटेवर घट्ट मुळं रोवून ताठ उभे राहतात. आईने सुरेशच्या हट्टापुढे हात टेकले. शेवटी एके दिवशी सर्व सोपस्कार पूर्ण करून तो कोवळा जीव घरात आणला. त्याचे नामकरण करण्यात आले. त्याच्या बाललीला आणि मोहक दिसण्याने अवघ्या काही दिवसात तो, घरात सर्वांचा जीव की प्राण झाला. त्याला काय हवं, काय नको हे बघण्यात, त्याचे संगोपन करण्यात सीमा- सुरेशच काय पण पूर्ण परिवाराचा वेळ कसा भुर्रकन् उडून जाई ते कळतच नव्हते. सुरेशच्या आईच्या मनातला किंतूही हळूहळू निघून गेला. साहिल चंद्राच्या कलेप्रमाणे मोठा होऊ लागला. त्याचे रूप अन् गुणांचे कौतुक करण्यात घरात कोणीच कमी पडत नव्हते. हळूहळू साहिल जसा वाढू लागला, मोठा होऊ लागला तसे त्याचे विश्व मोठे होऊ लागले. घरातून बाहेर मित्रांबरोबर खेळायला जायला त्याला आवडू लागले. तो शेजारच्या बाल दोस्तांमध्ये चांगलाच रमू लागला. शेजारच्या काकूंनी एके दिवशी त्याला खेळत असताना

‘तू कोणाचा?’
असा प्रश्न विचारल्यावर तो साडेपाच वर्षांचा कोवळा जीव आनंदाने पटकन् म्हणाला,
‘आईचा, बाबांचा मम्मीचा-पप्पांचा, काकाचा काकूचा, आत्याचा अन् तुमचाही.’
  या वाक्यासरस काकू त्याला लगेच म्हणाल्या,
  ‘तू या कोणाचाच नाही. तुला विकत आणलंय. तू कोणाचा नाहीस, तुझं कोणी नाही.’
   या वाक्यासरशी तो बावरला, रडू लागला. आपल्याला कोणीच नाही ही भावना त्याला अनावर झाली. अन् तो मोठ्याने रडू लागला. त्या आवाजासरशी सीमा पळतच बाहेर आली. अन् आपल्या कोकराला तिने अलगद उचलून कडेवर घेतले. साहिलने त्याचे रडणे थांबल्यावर शेजारच्या काकू काय म्हणाल्या ते सांगितलं. तोपर्यंत काकू निघून गेल्या होत्या. सीमाला एकीकडे रागाने संताप अनावर झाला. तर दुसरीकडे रडू कोसळले. साहिलपुढे मात्र ती शांत राहिली. घरात नेऊन त्याला नाना युक्त्या करून तिने त्याला शांत केले. अन् सर्वच बाळं दवाखान्यातून  आणतात. त्याप्रमाणे तुलाही आणलं. काही का होईना सांगून त्याचं मन शांत केलं. काही वेळातच तो झाला प्रकार विसरून गेला. रात्री जेवण करून साहिल शांत झोपल्यावर मात्र सीमाने घरातील सदस्यांसमोर हा विषय काढला. खरंतर सर्वांनाच शेजारच्या काकूंचा राग आला होता. पण आज काकू बोलल्या उद्या आणखी कोणी बोलेल. जशी समाजात चांगली माणसं असतात तशी वाईटही असतातच. कोणाकोणाला समजावणार? या सर्वातून विचाराअंती एक तोडगा काढला गेला. हे गाव सोडून पुण्याला राहायला जाणं. सुरेशला काय पण घरातील सर्वांनाच हे जड जाणार होतं. पण साहिलच्या कोवळ्या वयाचा विचार करता हा निर्णय घ्यावाच लागणार होता. साहिलच्या कोवळ्या वयात समाजाकडून त्याला तू यांचा नाहीस असे बिंबवले आणि त्याच्या मनात हे पक्के बसले, तर मग त्याचे पुढचे जीवनच उद्ध्वस्त होईल. शांत पाण्यात कोणीतरी दगड मारून ते पाणी गढूळ करावं तशी काहीशी स्थिती सुरेश-सीमाची होती. लातूर सोडून पुण्याला जाणे तेथे नव्याने जीवन सुरू करणे सोपे नव्हते. अनेक संकटांना सामोरे जावं लागणार होतं. परंतु तरीही आपल्या साहिलसाठी त्या छोट्या कोवळ्या जीवासाठी ते काहीही करायला तयार होते. कारण साहिल, सुरेश-सीमाचं काय पण घरातील सर्वांचाच जीव की प्राण होता. सुरेशने पुण्यामध्ये एका मित्राला सांगून नोकरी शोधली अन् भाड्याने फ्लॅट घेतला. अवघ्या दोन-तीन महिन्यात ते पुण्यात छान रुळले. सुरेश एका मोठ्या कंपनीत कामाला लागला.

बघता बघता अनेक अडचणींवर मात करत त्याने आपल्या कुटुंबाची घडी पुन्हा व्यवस्थित बसवली. काही महिन्यांनी पुण्यात एक फ्लॅट विकत घेतला. साहिलला एका मोठ्या शाळेत एडमिशन घेतली. भावाची बदली पुण्याच्या आसपासच करून घेतली. सुरेशचे आई-बाबाही जरा उशिरा का होईना पण पुण्याच्या वातावरणात रमले. काही महिन्यांनी तो कंपनीत एका विभागाचा प्रमुख झाला. कंपनीने त्याला कार, फ्लॅट राहायला दिले. सुरेश स्वतःच्याच फ्लॅटमध्येच राहिला. गाडी तेवढी कंपनीची.  यावेळी सर्वांच्याच लक्षात आले की, साहिलच्या आगमनाने घरातील सर्वांचीच प्रगती झाली होती. साहिल म्हणजे सर्वांसाठी यश, प्रगती देणारा प्रेरक ठरला. साहिलने आपले अस्तित्व घरातील प्रत्येकाच्या मनात निर्माण केले होते. एवढासा वेल छान स्थिरावला होता.

समाप्त

प्रेरक

प्रेरणा पहिला भाग

2 Replies to “प्रेरक२”

Comments are closed.

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Don`t copy text!