रकमा

आज नात मामलेदार झाली तसं फर्मानच निघालं हाय. पर तुमाला सांगती, या एका दिसापायी माझ्या सुनंनं, नातीनं अन् ह्या लय कष्ट केलं. पर या कष्टाचं चीज केलं बघा कमलानं. कमला मंजी माझ्या पोराची पोरगी. अवं एकादयाच्या नशीबात कष्ट अन् कष्टच असतंया. सूखाचं चार क्षण मिळत्याल अशी येडी आशा असती मनाची. अवं माझ्या पोरांचा बाप दिसन् रात दारु प्यायचा. खरं तर ह्या लय समजून सांगितलं पर मुक्या प्राण्याला बी समजतंय पर ही माणूस, यांची जात लय वंगाळ. म्या आपलं आला दिस कसा तरी ढकलत व्हते, पर नशिबाच्या पुढं कुणाचं काय चालतंय व्हय. अवं वायटाचा नाद मातीत नेल्याशिवाय राहत नाही. एक दिशी माझं कुकू पुसलं. अवं ही हुणारच व्हतं पण माहित असून बी झाल्यावर मातूर लई वाईट वाटलं. पर दुसऱ्याच क्षणाला इचार केला आपण आता जिद्दीनं आपल्या पोरावास्नी वाढवायचं. त्यांना त्यांच्या पायावर हुभं करायचं. एक पोरगा अन् एक पोरगी. कसंतरी चार घरची धुणी-भांडी करून दहावी पतूर शिकवलं अन् कारखान्यात कामाला लावलं. तसं त्याला लई शिकवावं, साहिब करावं असे लई वाटायचं पर म्हणत्यात नव्हं रिकाम्या पोटानं लई मोठ्ठं सपान बगू नी. पोटापुरतं काम करून कमवलं तरी लई झालं. त्याच्या संगतीनच त्याची बहिण बी अंगणवाडीत लागली. चांगला दिस बगुन एकदिस भनीचं अन् भावाचं लगीन लावून दिलं. पोरगं त्याच्या नवीन संसारात रमलं. तसे पोरगीबी दिल्या घरी खूश व्हती. पर जीवनात कधी लय आनंदात कोण हसायला लागलं तर लगीच मनात शंका येती. काहीबाही दुःखाचं ऐकायला मिळतंय असं वाटतंय. तसंच झालं बगा. लग्नाला अजून पूरतं एक वरिस बी झालं नव्हतं. बापासारखं व्यसन लागू नी म्हूण मी प्रयत्न केलं अन् त्यानंबी त्याचा सबूद पाळला. नियतीने मातूर येगळंच योजलं व्हत मनात. एक दिस गरोदर सुनंला माझ्या पदरात टाकून त्यानं जगाया निरोप घेतला. अपघातानं त्याला नेलं खरं परं मला तर आभाळ फाटल्यासारखं बाटलं. पाठीचा आधार आदीच गेलता आता पोटाचा बी गेला. मोठ्या हिमतीनं नवऱ्यामागं संसाराचं झोपडं हुभारलं. पर क्षणात हुत्याचं नव्हतं झालतं, पर म्याच खचले तर ही कवळी पोरं कुणाकडे पाहिलं. तीच्या पोटात वाढणारा आपल्या लेकाचा अंश आपल्याला साथ दिल. पर शेजारपाजारणी काय कमी व्हत्या व्हय. मला लयवेळा म्हणायच्या कशाला डोक्याला तरास करून घेतली. त्यापरास खाली करून आण. उगं इषाची परिक्षा कशाला? पर म्याच इचार करूनशान उत्तर दिलं. अवं माझ्या सुनंच्या पोटात माझ्या पोराचाच अंश हाय. मग ती पोरगा असला काय अन् पोरगी असली काय ? अन् आज असं काम करताना आपण इचार केला पाहिजे. आज माझी पोरगीबी कुणाची तरी सून हायच की. त्यांनी असा इचार केला तर? म्या तर जिद्दीनं ठरवलं. पोरगं असू नायतर पोरगी, म्या यवस्थित सांभाळणार, शिकवणार, पायावर हुभं करणार. काही दिसातच पोरगी झाली. मला तर माझ्या पोराचा अंश बगून तीच परत आल्यासारखं वाटलं.
आतामातूर आमी सासू-सूनांनी तिला शिकवून लय मोठं करायचं ठरवलं. त्यासाठी आम्ही रातीचा दिस केला. आमच्या इच्छंला तिनीबी साथ दिली. ती रात दिन अभ्यास करत हुती. एवढी वंगाळ येळ व्हती पर परत्येक वर्गात ती पयला नंबर मिळवत व्हती. माझी कमला, लय लय माया याची तिच्यावर. बगता बगता आज ती मामलेदार झालती. मला तर पख फुटल्यागत वाटत हुतं. आमी गरीब माणसं. कष्टात जलम होतो अन् कष्टातच मरतो. पर आज कमलामुळे चांगलं दिस बगाया मिळणार व्हते. म्या अन् सुननं तिला घडवलं अन् तीबी घडली. नायतर शेजारणींच ऐकून मागंच सत्यानास करून घेतला असता मी. मला मास्तरीण बाईंनी बी लय साथ दिली. त्यांनी अडी-नडीची वेळ भागवली. आज आता त्यांना पेडं दयायला कमलालाच घेवून जाती. लोक दगडात देव शोधत्याती. मला तर माणसात देव दिसतू बगा. माझ्या कमलालाबी मी माणसातला देव वळकायला शिकवलंय. गुणाची गं माझी माय. अव दुधापराय दूधाची सायं लय महत्वाची असती नव्हं का?

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Don`t copy text!