रक्षाबंधन

आज मला कसं तरीच वाटत होतं. तसं माझ्या घरात लक्ष्मी पाणी भरत होती. सर्व नाती होती. मी समाधानी होते. थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने सुबत्ता होती पण कमी होती ती बाबांची. असं म्हणतात की मुलगी आणि बाबा यांचे नातं काही वेगळच असतं. लग्न होईपर्यंत मी आणि बाबा मित्राप्रमाणे वागत होतो. मी अनेक गोष्टी आई पेक्षा त्यांच्याकडे व्यक्त झाले होते. ‘माझे बाबा आणि आईचा दादा’ असं मी नेहमी म्हणत असे. परवाच मी आईला फोन केला. मी पाठवलेल्या राख्या मिळाल्या का? म्हणून विचारले. तेव्हा आईने मिळाल्या म्हणून सांगितले पण तिच्या स्वरात उदासीपणा जाणवत होता. सायली यावर्षी पहिल्यांदा तुझे बाबा नाहीत गं! असं म्हणून ती रडू लागली. मलाही काही सुचेना. भावनांचे तुडुंब भरलेले आभाळ नेत्रांमधून प्रवाहित होत होते. त्याला नियमांचा बांध घालणं तिलाच काय पण मलाही शक्य नव्हतं. मला आठवतं, माझा जन्म होऊन मी थोडी कळती झाले. तेव्हापासून बाबांना आत्याने पाठवलेली राखी मीच बांधत होते. नुसती बांधत नव्हते तर हक्काने ओवाळणी घेत होते. कधी कधी रुसतही होते. हवी ती ओवाळणी का नाही म्हणून अबोला धरत होते पण जसं जसे मला समजू लागले. तसा माझ्यामध्ये आलेला समंसपणा बाबांना उलट त्रासदायक वाटत होता.
‘बच्चा! काय हवं तुला यावर्षी राखी पौर्णिमेला!’
या वाक्यावर मी,
‘काहीच नको बाबा, सगळं तर आहे माझ्याकडे.’
या समंजसपणाने दिलेल्या उत्तरावर बाबा खुश होण्याऐवजी शांत होत असत. माझ्यामध्ये येणाऱ्या समंजसपणाची चाहूल त्यांना वेगळेच काहीतरी सुचवत होती. त्यांना माझे या घरात राहण्याचे दिवस, वेळ कमी होत चालली आहे हे जाणवत होतं. शिक्षण पूर्ण झालं आणि काही दिवसातच माझे दोनाचे चार हात झाले. मी माझ्या संसारात नव्याने बऱ्याच गोष्टी शिकत गेले. बऱ्याच वेळा काही गोष्टी शिकताना त्रासदायक वाटल्या तरी पण त्या मी शिकले. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे सासरी आल्यावर सून म्हणून घ्यावयाची जबाबदारी. पाहता पाहता माझ्या अस्तित्वाने सासर भरून गेले आणि माहेर माझ्या अस्तित्वाला पारखं झालं. आई, बाबा, दादा, वहिनी, त्यांची लेकरं. सारे माझ्या येण्यासाठी आतुरलेली असत पण मी सासरी नव्याने साऱ्या गोष्टी जबाबदारी घेऊन शिकत असल्याने आता सासरमय झाले होते. लग्नाच्या पहिल्या वर्षात सणासाठी चार दिवस जाणारी मी पुन्हा दोन दिवस आणि पुन्हा पुन्हा पाच-सात तासासाठी जाऊ लागले. हळूहळू बाबांनाही गोष्ट मनाला सतावत होती. ते दर वेळेस गेले की आग्रहाने राहण्याविषयी बोलत पण माझे मात्र दरवर्षी वेगळं काहीतरी कारण असेच न राहण्याचे. लग्नाच्या पहिल्या वर्षात माहेरी जाण्यासाठी कारणे शोधणारी मी लग्नाला आता पाच- सात वर्षे झाल्याने, वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे माहेरी कमी जात होते. बाबा मात्र दर वेळेस,
‘सायली, अगं दोन दिवसाचा वेळ काढून येत जा!’
म्हणून सांगत पण नवीन संसारात कधी मी पत्नी, सून, मामी, काकू आणि काही वर्षातच आई होण्याचं कर्तव्य बजावत होते. पहिलं बाळांतपण म्हणून सव्वा महिना मी राहून गेले तेव्हा घरातलं वातावरणात एक उत्साह होता. असं बाबांना जाणवत होतं. कारण इतर वेळेस मी नसले तरी बाकी सर्वजण होतेच पण माझ्या असण्याचा फरक साऱ्यांनाच जाणवे. शुभमच्या वेळी मी बाळंतपणाला गेले पण अनघाच्या वेळी सासूबाईंनी इकडेच बाळंतपण करू म्हणून सांगितले. हळूहळू मुलं मोठी होत असतात असं आईसह घरातल्यांना वाटत असतं. मात्र शेजारी आणि कधीतरी पाहणाऱ्यांना ती किती पटकन मोठी झाली, असंच वाटत राहतं. मुलं लहान होती तेव्हा त्यांचा ठरलेला दवाखाना असला तरच ती पटकन बरी होतात नाहीतर… या सबबीखाली मी माहेरी रहायचे टाळत असे. गेल्यावर्षी शुभमला सुट्टी नव्हती त्यामुळे मी फक्त अनघाला घेऊन माहेरी जाऊन आले. दरवेळेस माहेरी सर्वजण, राहत जा निवांत. अधून मधून येत जा! म्हणून सांगत. पण दरवेळेस माझी कारणं वेगळी. कधी मुलं, तर कधी यजमान यांच्यामुळे मी राहू शकले नाही. बाबा मात्र मला आग्रह करत राहिले. आज मात्र राखीपौर्णिमेला दादाला राखी बांधायला माहेरी जायचं म्हणून मी किती ठरवलं पण तो माहेरचा वटवृक्ष जो मला मायेची सावली देत होता. ज्याच्या सावलीत मी विसावत होते. त्याच्या पारंब्यांना धरून मी सुखाचे झोके आनंदाने घेत होते. तो वटवृक्ष नव्हता. मला मी केलेली चूक लक्षात आली. माझे गाल आसवानी ओले झाले. एवढ्यात कुणीतरी माझ्या पाठीवर हात ठेवलेला जाणवले.
‘सुनबाई, बाबा नसले तरी आई, दादा, वहिनी आणि भाच्चे आहेत ना! बाबांनंतर दादा आता बाबांच्या ठिकाणी आहे. आई पण तुझी वाट पाहिल. सर्वात महत्वाचे म्हणजे तू गेल्याने बाबांच्या आत्म्याला समाधान वाटेल.’
मला एक आश्वासक दिलासा मिळाला, मी आवरायला घेतलं.

2 Replies to “रक्षाबंधन”

Comments are closed.

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Don`t copy text!