रिटायरमेंट

भारतीय परंपरांमध्ये खूप काही गोष्टी आदरणीय, वैचारिकदृष्टीने आलेल्या महत्वपूर्ण आहेत. त्यातील एक भाग म्हणजे नाती . आता नात्यांचेही खूप प्रकार पण त्यातल्या त्यात वाईट मानले जाणारे अन् सर्वांच्याच दृष्टीने महत्वाचे पण दुर्लक्षित करावे असं एक नातं ते म्हणजे ‘सासू’. सासू या शब्दाची फोडही खूप मजेदार पद्धतीने केली गेलीय. स+ आसू जिच्यामुळे डोळ्यात नेहमी पाणी येते अशी सासू. मी सुनेला तू मला आई न म्हणता आत्या म्हण असं सांगितलं. खरंच आहे ना! आई या शब्दामागील प्रेमाचा अथांग सागर, ममतेचा खोल डोह, भावनांनी दाटलेलं आभाळ अन् चुकांना माफ करणारं मन माझ्यामध्ये मी प्रयत्नपूर्वक आनेन पण त्या शब्दाला मी संपूर्ण न्याय देवू शकणार नाही. म्हणूनच मी सरिताला सांगितलं. आई हा शब्द फक्त तुझ्या आईसाठीच योग्य आहे. तू मला आत्ती म्हण. अहो मी सुनेला मुलगी मानून वागवते. ती ही मुलगी बनूनच राहते. पण नात्यांमध्ये किंतू परंतू असतोच. सरिताने शिक्षणातच कौशल्य प्राप्त केल्याने स्वयंपाकघरात मात्र ती पारंगत नव्हती. तिला काही जमत नव्हते. अशा वेळी मी चिडचिड, रागराग करून तिला आईने काहीच कसे शिकवलं नाही, असा बोल लावून धुसफूस करण्यापेक्षा तिला प्रेमाने गोड बोलून तिच्या कलाने, तर कधी मी म्हणते तसंच या भुमिकेतून तिला स्वयंपाक घरात परिपूर्ण केले. तीही ज्यादिवशी तिला ऑफिस कामातून सुट्टी मिळते. त्यादिवशी वेळ देते. सर्व पदार्थ चुकत का होईना पण ती शिकली. तिच्याही मनामध्ये नवीन शिकण्याची जिद्द, आवड होतीच. तिनेही कधी आपला अहंम् पणा दाखवला नाही. उलट आपण संसाररूपी शाळेत सध्या बालवाडीत आहोत आणि सासूबाई आपल्या गुरु आहेत असं मानल्याने बरेच प्रश्न, समस्या उभारण्या आधीच विरून गेल्या होत्या. मला तुम्ही सांगायची गरज नाही ही भावना नर कधीच तिने दाखवली नाही. नवं शिकण्याची जिद्द तिला घरातच नव्हे तर ऑफिसमध्येही असल्याने तिला प्रमोशन मिळालं. घरातील रीती-परंपराही तिला व्यवस्थित समजून सांगितल्या. हे असेच का? अन् ते तसेच का? प्रश्न उभा केलाच तर मी ही व्यवस्थित समजून सांगितलं. मला जसा माझा मुलगा तशी ही मानसकन्या होती. मला मुलगी नसल्याने मला मुलीविषयी वाटणारं प्रेम मी देतच गेले. त्यांना दोन मुले झाल्यावर तिला योग्य असे संसाराचं नियोजन कसं केलं पाहिजे हे समजून सांगितले. माझं दुधापेक्षा दुधावरच्या सायीवर जास्त प्रेम असणारच. त्यांनाही मी योग्य संस्काराची रुजवणूक करण्यात तिला सहकार्य केलं. आई म्हणून तिने करायचे संस्कार करताना मी हस्तक्षेप केला नाही. तीच्या मतानुसार दोन्ही मुलांना वाढवू दिले. तिचे कधी चुकत असेल तर मी योग्य ठिकाणी मार्गदर्शनही केले. हे सर्व करत असताना मी माझं स्वअस्तित्व स्वाभिमानाने जपलं. काम करून मोलकरीण न होता, मी माझ्या सासूपणाला न्याय देत सहकार्य करत होते. समाजसेवा हा पूर्वीपासून माझा आवडता विषय. मी घरातले पहात, तेही करत होतेच. आमच्या घरातील सर्वांचे वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, घराचा वाढदिवस अत्यंत आवडीने आणि आठवणीने करण्याची परंपरा मी सुरु केली आणि ती परंपरा माझ्या मुलाने अन् सुनने खूप व्यवस्थित जपली. आता मात्र मी संसारातून रिटायर व्हायचं ठरवलं. म्हणजे मी आता सहजपणे माझा संसार तिच्यावर सोपवला. तसंच अगदी सहज या संसारातून बाजूला म्हणजेच वृद्धाश्रमात जाण्याचा महत्वपूर्ण निर्णय मी घेतला. खरंतर या गोष्टीवरून घरात वैचारिक गोंधळ झाला. भावनांचा गुंता होत असतानाच वेळीच मी त्यांना माझ्या आयुष्यात सध्या काय गरजेचे आहे सांगितलेच पण सोबत मी प्रत्येक सणाला, वाढदिवसाला, लग्नकार्याला येतच रहाणार हेही स्पष्ट केलं. खरंतर घरात हे कोणालाच मान्य होईना पण शेवटी त्यांनी माझं म्हणणं मान्य केलं. मी संसाराचे सर्व मोहपाश बाजूला सारत माझी आवड जपत वानप्रस्थाश्रम स्विकारला. वेळीच योग्य निर्णय लाखमोलाचा ठरतो. मी संसारातून काढता पाय घेतला नव्हता तर योग्य ठिकाणी कसं आणि कुठे थांबावे हे जाणून निर्णय घेतला होता, वृद्धाश्रमात ही खूप छान वाटत होतं. आपल्या बरोबरीच्या व्यक्तीं सोबत गप्पा, काम आणि वेगवेगळे छंद जपून छान वेळ जात होता. आज मी रॉनीचा वाढदिवस आहे म्हणून निघाले आहे. तू नाही आलीस तर मी केक कापणार नाही, असा त्याचा हट्ट होता. त्याचे लाडे लाडे बोलनं मला घेवून येणारच होते. खरंतर दोन्हीही नातवं मला घरात रहा म्हणून हट्ट करत होती. पण मग वृद्धाश्रमातील साऱ्यांनाही माझी गरज आहे हे समजून सांगितल्यावर गप्प बसली. तसं पहाता समंजसपणात ती माझ्यावरच गेलीत म्हणा. वेळीच संसारातून रिटायर होण्याचा माझा निर्णय अगदी योग्यच आणि अभिनंदनीय होता.

3 Replies to “रिटायरमेंट”

  1. योग्य वेळी योग्य निर्णय,खूप छान.

Comments are closed.

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Don`t copy text!