ऋणानुबंध

नित्याने घाईघाईत माझ्या मागे पळतच डबा आणून दिला. मी तिला हसूनच कृतज्ञता व्यक्त केली. तेवढ्यातही तिची बडबड सुरु होती. कामाला सरू आली नाही. वॉशिंग मशीनही बंद पडलंय आज निनादची ऑनलाईन परीक्षा आहे. आत्तींना दवाखान्यात न्यायचं. तुम्ही तुमचं पाकिट, रुमाल, सॅनिटायर आणि मास्क घेतला ना! शेवटचं वाक्य मी लिफ्ट मध्ये जात असताना कसंबसं कानावर पडलं. मी हो म्हणालो आणि मशीन दुरूस्ती वाल्याला फोन करतो चल येतो म्हणून निघालो. मी सकाळी ऑफिसचंच काम करत बसलो होतो. ते पूर्ण झालं म्हणून तर समाधानानं बाहेर पडलो. अलीकडे माझी तत्परता, अचूकपणा यामुळेच तर मला ऑफिसमध्ये प्रमोशन मिळत होतं. हळूहळू पगारवाढ होत होती. नित्या तोच मुद्दा घेवून चारचाकी घ्या. म्हणून मागे लागली होती. दररोज सिटीबस पकडण्यासाठी होणारी धावपळ आणि त्यात जाणारा वेळ आणि कार्यक्षमता याचा विचार करता बरोबरच होतं. कारण माझा बराच वेळ बाहेर जात असल्यामुळे नित्याला घरातल्या सर्वच जबाबदाऱ्या उचलाव्या लागत होत्या. आई-वडिल, निनाद आणि रहाता राहिलो मी. या सर्वांचं जिथल्या तिथं करत होती ती. मी या विचारातच बसमध्ये चढून बसलो. बसचं माझ्या घराजवळ थांबण्याचे ठिकाण होते. त्यामुळे ते एक बरे होते. उतरण्याचं ठिकान मात्र ऑफिसपासून थोडं दूर होते तेवढं तरी होणारच. माझ्या शेजारील व्यक्ती पुढच्या स्टॉपला उतरली अन् एक वयस्कर व्यक्ती बसली. साधारण बाबांपेक्षा एक दोन वर्षाने मोठी असावी. त्यांचा हात थरथर कापत होता. त्यांची स्थिती पाहून मला कुठेतरी मनात असे वाटले, देवा एवढ्या वयापर्यंत मला नाही जगायचं. एवढयात माझ्या कानावर काही शब्द पडले.
‘बेटा तूझे आई वडील गेले म्हणून काय झालं. लहानपणापासून मी आई बापाची भूमिका पार पाडली आणि आताही पाडणार.’

मी त्यांच्याकडे पाहिले. ते फोनवर बोलत होते. काय झालं म्हणून विचारावं वाटलं पण पुन्हा मनात आलं, आजकाल शेजारी कोण रहातो माहित नसतं आणि हे तर कोणाचे कोण? अचानक त्यांना ठसका लागला आणि मी माझी पाण्याची बाटली समोर केली.  पाणी पिल्यावर त्यांना थोडं शांत वाटलं.  पाणी दिल्याबद्दल  त्यांनी धन्यवाद मानले. माझी उत्सुकता मात्र कायम होती. ते फोनवर कोणाशी आणि कशासंदर्भाात बोलत  होते. मी न राहवून विचारलं,
‘काही नाही बाळा माझी नात दवाखान्यात आहे.’
मी उत्सुकतेने विचारलं,’आजारी आहे का?’
‘नाही तिचा परवा अपघात झाला आहे.’
‘तिचे आई- वडिल’ असं मी चाचरतच विचारलं. कारण संघाचं त्यांचं वाक्य.
‘ती लहान असतानाचा तिचे आई बाबा अपघातात वारले.या छकुलीला मी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. आत्ता तिचे शिक्षण पूर्ण झाले, ती एका कंपनीच्या मुलाखतीसाठी गेली होती. खरंतर तीचे शिक्षण तिचं पालनपोषण करण्यासाठी मी यथाशक्ती प्रयत्न केले. मला रिटायर होवूनही पाच वर्षे होत आली. पेन्शनवर घरखर्च आणि शिक्षणखर्च भागवताना  थोडी तारांबळ होते. पण माझी  नात समंजस आहे. आज्जीला घरकामात तर मदत करतेच पण माझीही बरीच बाहेरची कामे तिच करते. पण परवा अपघात झाला आणि तिच्या एका पायाचे ऑपरेशन करायचेय असे डॉक्टरांनी सांगितलंय. आजपर्यंत म्हणजे गेल्या पाच-सात दिवसापासून दवाखान्याचा खर्च अफाट होतोय. तिच्या पायाच्या ऑपरेशनसाठी  पाच सहा दिवसांत पैसे भरायचेत. आतापर्यंत  बँकेतून शिल्लक काढून खर्च केले पण आता शेत विकण्याशिवाय पर्याय नाही.’
  असं वाटलं जणू पुन्हापुन्हा प्रश्न नको किंवा कोणाला तरी सांगून मन मोकळं करावं. याचीच ते वाट  पहात होते. शेत विकण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही का म्हणून विचारले असता,
   ‘बऱ्याच नातेवाईक आणि ओळखीच्यांना विचारले पण मी पेन्शनवर परत करू शकणार नाही असे त्यांना वाटलं असावं. त्यामुळे काही ना काही कारणं प्रत्येकाने सांगितली.’
  
त्यांनी स्वतः पेन्शनचं पासबुक दाखवलं. ते रिटायर शिक्षक होते. गावाकडेच नोकरी केलेला माणूस नातीसाठी शहरात रहायला आला होता. शहरात तिचे व्यवस्थित शिक्षण होवून ती घरचे चार घास खावून व्यवस्थित राहिल एवढीच त्यांची अपेक्षा. खरंतर मला आतून कुठेतरी साद येत होती की मदत करायला हवी पण मन मानत नव्हतं. तसा माझा स्वभाव मदत करणाराच. पण शक्यतो एवढ्या जास्त पैशांची मदत आपण ओळखीच्या लोकांनाच करणार. तरी पण का कुणास ठाऊक. काही ऋणानुबंध असावेत त्यांच्याशी असेच माझे मला वाटत होते. कमीत कमी पाणी तरी देऊ का म्हणून मी विचार केला. तशी तर नित्या मला ओरडणारच आहे पण पर्याय नाही. साधी बाटली नव्हतीच माझ्याजवळ आणि मला मदत तर करायची होती.

बोलत बोलत माझं उतरण्याचे ठिकाण जवळ आले म्हणून मी उठलो. माझी पाण्याची बाटली त्यांच्या समोर धरली. ठसका लागला तर असू दे म्हणून निघालो. ते नकोच म्हणत होते. पण माझ्या कडे पाहून कुठेतरी त्यांच्या मुलाची आठवण आली असावी. माझ्या वयाचाच असला असता त्यांचा मुलगा. मी निघालो एवढ्यात त्यांनीच मला हाक मारली. तुमचे कार्ड असेल तर दयाल का? काही नाही पण ही बाटली दिली असती.  ती  स्टिलची बाटली असल्याने त्यांना वाटलं असणार.
‘अहो राहू दया. एवढे काय?’
म्हटलं तरी आग्रहाने त्यांनी माझे कार्ड घेतलंच. मनात एकीकडे वाटत होतं. बाकी…अनोळखी व्यक्तिला पैशाची मदत करायला आपण काही कर्ण नाही. दुधाची तहान ताकावर भागवावी म्हणजे मनाला थोडं तरी समाधान. पैशांची नाही मदत करता आली तरी वेळेला पाणी देवून, त्यांचं बोलणं ऐकून घेणे हेही नसे थोडके.

दोन दिवसांनी दारावरची बेल वाजली. सुट्टीचा दिवस  असल्याने दार उघडण्याचे काम माझ्याकडे.  काकांना पाहिलं आणि आश्चर्यचकित झालो. ते जरी बाटली देतो म्हणाले तरी घर शोधत येतील असे वाटलं नव्हतं, कर्तव्य म्हणून मी या म्हणालो पण नाही नको म्हणून ते वळले. एवढयात आमचे बाबा एकदम आनंदाने ओरडले,
‘दिन्या तू, लेका कुठे गायब होतास बेटया’
  त्या दोघांचे मैत्रीपूर्णनाट्य मी आश्चर्यचकित होवून पहात होतो. थोड्या वेळाने चहा घेत घेत त्या तिघांच्या म्हणजेच आई- बाबा आणि दिनू काका यांच्या गप्पा रंगल्या. मात्र अर्ध्या तासाने लगेचच मी निघतो मला दवाखान्यात जायचंय म्हणून ते निघाले. मला सारी परिस्थिती माहिती होती. पण ती गप्पांमधून काकांनी
बाबांसमोर मुद्दामहून उलघडू दिली नसावी. बाबांच्या बरोबर ते वर्गात शिकत होते. शिकताना ते मामाकडे रहात होते. पुन्हा मध्येच म्हणजे दहावी नंतर स्वतःच्या आईबाबांकडे शिकायला गेले पण शालेय जीवनात ते एकमेकांचे जिगरी दोस्त होते. पुढे  मामा वारल्याने  दिनू काकांचे मामाच्या गावाला येणे जाणे बंद झाले आणि बाबांशी भेट होणेही बंद. बाबांना मात्र याच्या त्याच्याकडून त्यांची ख्याली खुशाली कळत राहिली, मात्र दिनू काकांना भेटणे कधी शक्य झाले नाही. मध्यंतरी चार- साडेचार वर्षांपूर्वी बाबा शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी गेले होते तेव्हाच काकांची भेट झाली होती. त्यावेळी ही त्यांच्या वर्गातील निम्म्याहून कमीच मुलं आली होती. शाळेच्या कार्यक्रमामुळे या सर्वांची अनपेक्षितपणे भेट झाली. विरत चाललेली नाती पुन्हा नव्याने बहरली होती. त्यांनी त्यावेळेस एकमेकांचे फोन नंबर दिले घेतले होते पण मध्यंतरी बाबांचा नंबर बदलला आणि आम्ही नवीन घरीही राहायला आलो. त्यामुळेच कदाचित त्यांना बाबांची संपर्क साधता आला नसावा. घरात बोलताना ते त्यांच्याविषयी बोलतही पण कधी पुन्हा भेट होईल असे वाटले नव्हते.

मी त्यांना मुद्दाम खाली सोडायला गेलो. आई बाबांचे पाय दुखत असल्याने त्यांनी त्यांचा दारातूनच निरोप घेतला आणि पुन्हा नक्की ये म्हणून आग्रह करकरून सांगितले. मी पायऱ्या उतरतानाच काकांशी दवाखान्याविषयी बोललो. पैशांचा प्रश्न सुटला का म्हणून विचारलं. यावर त्यांनी

‘ होईल रे, बघू उदया- परवा वेळ मिळाला की गावाकडे जाणार आहे.’

असं सांगितलं, मी  हळूच माझ्या खिशातून पैशाचं पाकिट काढून त्यांच्या खिशात घातलं,
‘अरे बाळा, नको रे होईल काही तरी सोय, तू कशाला उगीच त्रास करून घेतोस.’
  असंही ते  म्हणाले. पण मी म्हणालो,
  ‘काका, मला तुम्ही मुलगाच समजा. तुमचा मुलगा असता तर….. तुमची एवढी धावपळ झाली असती का ? बाबांना तुम्ही कळू दिलं नाही. नाहीतर त्यांनीही तुमचं काही न ऐकता जबरदस्तीने मदत केली असती.’
  नाही हो म्हणत काकांनी पाकिट स्विकारलं पण एक वचन मागितले,
  ‘हे पैसे तू परत घ्यायचे आणि तुझ्या बाबांना पैशाविषयी  किंवा माझा मुलगा-सून याविषयी इतक्यात काही कळायला नको. निवांत बोलेन. तुझा स्वभाव अगदी बापावर गेलाय बरं. त्यालाही दुसऱ्याला मदत करणं हे आपलं आद्य कर्तव्य असंच वाटतं.’

कारण तसेतर मी बसमध्ये याचं बोलणं ऐकल्या  ऐकल्याच यांना आपण मदत केली पाहिजे असे मला मनातून का वाटले? याचाच विचार  मी करत होतो. मी त्या व्यक्तिचे बोलणे का एवढे लक्षपूर्वक ऐकत होतो. आपल्याला त्या व्यक्तिविषयी का ओढ वाटतेय. अशाच बऱ्याचशा प्रश्नांचे काहुर मनात उठत होते पण ते त्या दिवसापुरते. दुसऱ्या दिवशी मी विसरून गेलो. आज जेव्हा दिनूकाका अचानक बाटली घेवून आले तेहा माझ्या मनात पुन्हा मदतीचे विचार घोंगावू लागले. शेवटी मी माझ्या चारचाकीसाठी बाजूला ठेवलेले पैसे काकांना पाकिटात घालून दयायचे ठरवले. बाबांशी ते निवांतपणे हॉलमध्ये बोलातानाच बाबांच्या हातून दयावे असेही वाटले. पण बाबांशी ते याविषयावर दवाखान्यातील खर्चाविषयी बोलत नाहीत. हे लक्षात घेवून मी योग्य निर्णय घेतला. आज मला एक वेगळेच समाधान वाटत होते. पैसे परत येतील किंवा न येतील पण कोणाला तरी वेळेला मदत करण्याचे आत्मसमाधान मला लाभले होते. बाबांचा परोपकाराय परधर्माय या कार्याचा वसा जमेल तसा पुढे नेत होतो.

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Don`t copy text!