सखी

                    ‘उषा, उषा…. बाई आवर पटपट मला ऑफिसला जायचे.’
मी उषाला बोलत बोलतच माझं आवरत होते. सकाळी आठलाच हरीश ऑफिसला गेला होता. परदेशी पाहुणे कंपनीत येणार म्हणून तो थोडा घाईत होता. मुलगी सकाळी साडेआठ वाजता शाळेला गेली होती. माझं ऑफिस दहा वाजताच. उषा येऊन एक दीड तास झाला असेल. धुणं-भांडी, फरशी, बागेतल्या झाडांना पाणी. कपड्याच्या घड्या, किचन कट्टा आवरणं सारं सारं. खरंच ती माझ्या मदतीला नसते तर असा विचार केला तरी माझ्या अंगावर सरसरून काटा येतो. माझ्या लग्नाच्या आधीपासून या घरात ती कामाला होती. आईंना मदतीला सहर्ष हजर असे नेहमीच. त्यांच्या संसारात हि नातेवाईकांची चांगलीच रेलचेल होती. आई- तात्या त्यांची दोन मुलं,त्यांची ननंद आणि त्यांचे छोटे दिर. या सर्वांच करता करता आईंची खूप धावपळ होई पण त्यांच्या तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ असा स्वभाव तो कायमचाच. माझ्या लग्नाआधी आईंच्या मागच्या जबाबदाऱ्या काही प्रमाणात कमी झाल्या तरी संपल्या नव्हत्या. त्यांच्या ननंदेचं, छोट्या दिराचं लग्न झालं होतं. तात्या रिटायर झाले. त्यामुळे त्यांची कामावर जायची लगबग संपली होती. दोन्ही मुलं नोकरीला लागल्याने  त्यांच्या ऑफिसच्या दुसऱ्या गावी कामानिमित्त जाण्याच्या वेळा हे सारं सोपच होतं पण वयाच्या मानाने अवघड जात होतं आणि म्हणूनच त्यांनी छानसा उपाय शोधून काढला. त्यांनी कामाला मदतीला म्हणून उषाला ठेवले. उषापण चांगलीच विश्वासू होती. बऱ्याच वेळा भरपूर काम पडले तरी कुरकुर नसे. फक्त अपेक्षा एवढीच असे की तिची मुलं आजारी पडल्यावर तेवढी सुट्टी मिळावी. बाकी ती स्वतः आजारी असल्यावर ही कधी सुट्टी घेत नसे.
                           आईंच्या म्हणण्यामुळे तीनं मुलांना शिक्षण देण्याचं ठरवलं आणि शिकत शिकत मुलं ही नोकरी करू लागली. उषा आमच्याकडे कामाला असूनही चांगली पंधरा- सोळा वर्ष झाली होती. या घरात मी आल्यापासून ती जणू कुटुंबातील एक सदस्य बनून मला भेटली होती. तसं तर माझं लग्न झाल्यावर कामाला बाई कशाला? असं मी सुचवलं. पण आईने मला समजून सांगत उषाची ओळख करून दिली. ती फक्त कामवाली म्हणून तिच्याकडे पाहू नकोस, तर ती आपल्या घराचा घटक बनून राहते. घरात आजपर्यंत कोणतीच महत्त्वाची गोष्ट इकडची तिकडे झाली नाही. कधी  गरज नसताना  तिने सुट्टी घेतली नाही. अवास्तव पगाराची किंवा इतर कुठलीही अपेक्षा ठेवत नाही. आपण दोघी घरात आहोत म्हणून तुला कामाला बाई ची गरज काय? असे वाटत असेल आणि ते बरोबर पण आहे. उषाच्या प्रामाणिकपणामुळे तिला भरपूर घरं मिळाली आहेत. आपलं एक काम सुटलं तरी तिला तसा काही फरक पडणार नाही. आपल्याला आपल्या कामाला ती मान देते.  ती आमच्यात कामाला येणे आणि कामाला महत्त्व देणे या गोष्टी खूप आवर्जून करत होती. सासरी आल्यावर कामाची सुरुवात तिने आमच्या घरापासून केली होती. आज तिच्या घरी ती आल्यावर खरी प्रगती झाली असं तिची सासू मानते तर तुमच्या घरी काम मिळालं. शहाणपणाच्या आणि जगरहाटीच्या चांगल्या गोष्टी कळल्या. यामुळेच माझे चांगले झाले असे तिचे मत आहे. अशात आपण तिला कामावरून काढून टाकलं तर तिला वाईट वाटेल. आज तू घरी आहेस पण उद्या तू नोकरी निमित्ताने बाहेर पडशील. आताशा मलाही थोडं काम केलं की दमल्याल्यासारखं वाटतं. त्यामुळे तिला राहूच दे. समजून सांगितल्यावर मलाही ते पटलं.
                               अलीकडे तात्या गेल्यापासून सासूबाईंना एकटं वाटतं. पहिल्यासारखी कामं होत नाहीत. त्याही जागेवर बसून होईल तेवढी मदत करतातच पण पक्षाघात झाल्यामुळे उठायला बसायला वेळ लागतो. त्यामुळे मी एकदा ऑफिसला गेले की मग दार  लावायला उघडायला जास्त त्रास नको म्हणुन सगळी कामं आटोपून मी बाहेर पडते. मधेच काही लागलं तर उषा आहेच. तिचा फोन नंबर आईंच्या  मोबाईलमध्ये एक नंबरला नोंद केल्याने अगदीच गरज पडली तर आई तिला बोलावून घेतात. ती होती म्हणून आईंना १-२ वेळा दवाखान्यात तिनेच नेलं. माझी गैरसोय होऊ नये म्हणून ती बऱ्याच वेळा खूप काळजी घेते. तिच्या असण्याने कधी अडचण झाली नाही पण नसण्याने खोळंबल्या सारखं होई.
                               दोन महिन्यांखाली आईंना अस्वस्थ वाटत होतं. म्हणून त्यांनी तिला बोलावून घेतलं होतं. तिने मला फोन करून बोलावलं. मला ट्रॅफिकमुळे यायला वेळ झाला तर सोसायटीतील सानें काकांच्या मदतीने तिने आईला दवाखान्यात पोहोचवले. खरं तर ती होती म्हणून…… नाही तर विचारांचं चक्र चालू होतं आणि हाताने कामही सुरू होतं. तेवढ्यात उषा बागेतलं फुल घेऊन माझ्याकडे आली. मला प्रश्न पडला कधीही न विचारता कोणत्याही गोष्टीला हात न लावणारे हिने आज फुल तोडण्याचे धाडस का केलं असेल बरं? माझ्या मनात चाललेले विचार जणू तिने माझ्या चेहऱ्यावर वाचले होते.
     ‘मॅडम, आज तुमचा वाढदिवस आहे. असं काल बाई साहेब म्हणत होत्या. मी घरून येताना तुम्हाला काही घेऊन यावं म्हटलं तर विसरलेच बघा. म्हणून बाई साहेबांना विचारून फुल तोडले बघा. तुम्हाला वाढदिवसाच्या लई शुभेच्छा.’
    
असं म्हणताच  मी तोंडाकडे बघितल्यावर, तिने जीभ चावली.
‘ लई नाही खूप शुभेच्या.’
‘शुभेच्या नाही गं शुभेच्छा.’
‘तुमच्या मुळेच मी शुद्ध बोलायला शिकले. खरं मी दरवर्षी दिलेली भेटवस्तू तुम्ही वापरता. हे बघून मला खूप समाधान वाटतं. आमच्या गल्लीतल्या बायका तर म्हणतात.  बाईसाहेब आणि ताईसाहेबांन मुळेच तुझ्या मध्ये खूप सुधारणा झाली.’
मला तिच्या साधेपणा, सरळवृत्ती, प्रामाणिकपणा, निरागसता खूपच आवडत होती आणि आजही मनात भावली. मी हसूनच म्हटलं,
‘ अगं माझ्या बागेतलं  फुल असलं तरी तूच वाढवतेस म्हणजे तुझाही  हक्क आहेच की. ‘
  माझं बोलणं ऐकून ती समाधानाने हसली. तिच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता पाहून मलाही छान वाटले. मी देवासमोर वाढदिवसानिमित्त ठेवलेले पेढे आईंना व तिला दिले. संध्याकाळी वाढदिवसानिमित्त जेवायला ये. असं म्हणून मी ऑफिसला जायला वळले. तेवढ्यात तिचे शब्द कानी आले.
  ‘जेवायला तर येईनच मी नेहमीप्रमाणे. काही मदत करायची असली तर लवकरच येईन. बाजारातून काही आणायचं असेल तर सांगा.’
  मला तिचा एखाद्या मैत्रिणीप्रमाणे आधार वाटला.
  ‘नको गं आज आपण हॉटेलमध्ये जाऊ या जेवायला. तुला पण आयतं खाऊ घालू या की आज.’
  असं म्हटल्यावर आईनेही मान हलवून दुजोरा दिला आणि आम्ही तिघीही हसलो.
          ऑफिसला जाताना प्रसन्न मनाने आणि मुद्रेने घराच्या बाहेर पडलं की दिवसही चांगला जातो. याचा अनुभव वर्षानुवर्षे मी घेत होते आणि….. आणि आजही माझा दिवस चांगला जाणार होताच कारण…….. माणसाने माणसाशी माणसासम वागणे ही विश्व प्रार्थना मी स्वतः अनुकरण करत होतेच आणि अनुभवतही होते. प्रसन्न मनाने मी अॉफिससाठी बाहेर पडले .

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Don`t copy text!