शांता अन् कोरोना – मराठी कथा

शांताबाई घाईघाईनं भाजीपाला विकायला निघाली होती एवढ्यात हिम्मतरावांनी त्यांना हटकलंच.
‘काय लय घाईत हायेस का? मागं वाघ लागल्यात पळाय लागलीस?’
तशी शांता दोन मिनिटं शांत उभी राहिली. तिनं तिच्या घाई करण्याचा खुलासा दिला. आज कोरोनामुळं भाजीपाला विकायला सकाळी सात ते नऊ अशी वेळ दिली आहे. भाजीपाला विकताना गर्दी करु नये म्हणून तिने सोबत घेतलेली शाडूमाती हिम्मतरावांना दाखवली. पहिलं तर हिम्मतरावांना पांढऱ्या मातीचा उपयोग काही लक्षात आलाच नाही. ते सरळ शांताबाईला म्हणाले,
‘तू आता माती बी विकायला सुरुवात केली की काय!?’

शांताबाईच्या चेहऱ्यावरचे भाव बघण्यासारखे झाले होते. हे आमचं खुळं, त वरनं ताक कधी त्याला कळलंच नाही बाई. नेहमी प्रत्येक गोष्टीचा खुलासा करावा लागतो. आता सध्या वातावरण किती बेकार आहे. परिस्थिती किती वाईट आहे आणि परिस्थितीचं गांभीर्य या माणसाला जरा सुद्धा नाही. “काय बाई माणूस?”
असंच काहीसं त्यांच्या नजरेतून दिसत होतं. हिम्मतरावांनी एवढ्या घाईत शांताबाईंना एक महत्त्वाचा प्रश्न विचारलाच. ‘शांते, कोरोनाचा तरास नवानंतर सुरु होतो व्हय?.’
तसं शांताबाईंनी प्रश्नार्थक नजर करून भुवया उंचावल्या आणि आश्चर्याने हनुवटीला हात लावला.
‘या बया, नक्की तुम्हाला काय म्हणायचं?’
तसं हिम्मतराव बोललेच, ‘अगं नंतर भाजीपाला बंद, दुकान बंद, रस्त्यावर संचारबंदी लागू होती. नऊ वाजायच्या आधीच लोकं जी जी पाहिजे ती सगळं आणून ठिवत्यात. नंतर जर कोण बाहेर आलं. तर मात्र पोलीस मामा दंडुक्याचा परसाद देत्यात. म्हणजे नवानंतर कोरूना झोपेतून उठतो का काय?’
तसं शांता त्यांना समजून सांगू लागली.
‘ लोकांना जीवनावश्यक गोष्टी तर घेतल्या पाहिजेत की. ज्यांचं पोट हातावर आहे. त्यांनी आपला कामधंदा केला तरच पोट भरल, नाही तर काय खायचं? ‘
तसं हिम्मतराव म्हणलं,’ मला तुझं म्हणणं अक्क्षी पटतंय पर लोकांनी भाजीपाला आणि इतर सामान घेताना गर्दी करून चालंल का? सुरक्षित अंतर ठेवायला हवं की नाही. पण लोकांना स्वतःच्या जीवाची पर्वा नाही. स्वतःच्या नसंना का हो. पण दुसऱ्याच्या जीवाशी खेळायचा अधिकार कोणी दिला यांना?’
शांताबाईंना हिंमतरावांचं बोलणं पटलं होतं आणि मान्य पण होतं. पण लोकांना समजवायचं काही सोपं नव्हतं ना! शांताबाईंनी त्यांना आठ दिवसांपूर्वी घडलेली गोष्ट सांगितली. त्या म्हणाल्या आपल्या पंतप्रधानांनी डॉक्टर, पोलीस, सफाई कामगार, नर्स, समाजसेवक या सर्वांचे आभार मानण्यासाठी फक्त टाळ्या वाजवा म्हणून सांगितलं होतं. तर काय नवल सांगायचं या लोकांचं. यांनी रस्त्यावर एकत्र येऊन टाळ्याच काय पण डिमड्याही वाजवल्या. नाच काय केला? जसे की त्यांच्या एकत्र येण्याने आभार मानण्याने डॉक्टर, नर्स, पोलीस आणि समाजासाठी काम करणार्‍यांना काही मोठा फायदा करून देत आहेत. उलट अशा पद्धतीने एकत्र येणे म्हणजे कोरोनाचा प्रसार होईल. हे या लोकांच्या का लक्षात येत नसेल? तीच गोष्ट रस्त्यावरून उगाचच उनाडक्या करत हिंडणाऱ्या टवाळखोर पोरांची. घरात बसून कंटाळा आला म्हणून सहज फेरफटका म्हणून आई बापाच्या जीवावर गाड्या उडवणारे तरी काही कमी होते का? पाय मोकळे करायचे म्हणून सकाळ-संध्याकाळ फिरणारे. मज्जा म्हणून टोळकं करून गप्पा मारणारे. का त्यांच्या लक्षात येत नसेल. काही थोडे दिवस आपण त्रास सहन केला तर पुन्हा या सर्व गोष्टी आहेतच की. यावर हिम्मतरावांनीही साठेबाजीचे त्यांच्या मित्रांनी केलेला गोंधळ सांगितलाच. खरंच माणूस हा एकमेव प्राणी असा असेल जो पुढील अनेक पिढ्यांचा विचार करतो. कधी चिमणी, कावळा, गाय किंवा इतर पशुपक्षी अन्न पाणी साठवतात का? माणूस मात्र खूप लांबचा नव्हे नको तितक्या लांबचा विचार करतो. आता लॉकडाऊन झालं, पहिलं काही दिवसासाठी होणार होतं. तर लोकांनी काय काय सामानाने घरं भरुन ठेवली. पण ज्याची परिस्थिती आहे तो साठेबाजी करेल बाकीच्यांचं काय? असा साधा सरळ विचार कोणी केलाच नाही. तसं शांताबाई म्हणाल्याच,
‘माणूस हा विचारशील प्राणी आहे पण तो नको तितका विचार करत असतो, हेही तितकच खरं. परवा आपल्या पंतप्रधानांनी रात्री लाईट बंद करून दिवा लावायला सांगितले होते, पण या लोकांनी काय विचार केला कोणास ठाऊक? नऊ वाजता सगळ्या लाईट बंद झाल्या खरं. इतर वेळेस आपण लाईट गेल्यावर गडबडतो, धास्तावतो. पण या नऊ मिनिटाच्या वेळेत शांत वाटत होतं. मनात एक आत्मविश्वास वाटत होता. सगळ्यांच्या एकसारख्या कृतीमुळे संघटितपणा लक्षात येत होता. पण ९वाजून ९हमिनीटं आणि काही सेकंदच झाली असतील. आपल्याकडील विचारवंतांनी फटाके उडवले. जसं काही एखादा उत्सव साजरा करावा. आपण काय कृती करतो? आपल्या कृतीने कोणाला त्रास होत नाही ना? असा विचार करायचा ही त्यांच्या मनाला शिवत नाही.
शांताबाई ने स्वतःच्या बाबतीतला सकाळी घडलेला प्रसंग सांगितला! सकाळी अंघोळ झाल्यावर सूर्याला अर्ध्यदेण्याची त्यांची लहानपणापासूनची सवय आहे. दररोजच्या कामाच्या घाईत गच्चीवर जावून अर्ध्य द्यावे हे काही जमतच नव्हतं. मुलांच्या शाळा आणि इतर कामं. म्हणून त्या सहज पूजेचा तांब्या, हळद-कुंकू, अक्षता घेऊन गेल्या. त्यांनी डोळे झाकून प्रार्थना म्हटली आणि सूर्याकडे पाहत अर्ध्य दिलं. सर्व होईपर्यंत त्यांच्या कानावर काही आवाज येत होते पण त्यांनी सगळ्या आवाजाकडे दुर्लक्ष करत, आपली प्रार्थना, पूजा पूर्ण केली आणि मगच डोळे उघडले. तर काय त्यांची शेजारीन त्यांच्यासारखंच अर्ध्य देत होती. तिने नुसते अर्ध्य दिलं नाही तर शांताबाई आणि स्वतःचा फोटो काढून व्हाट्सअप ला टाकला. खरं पाहता हे काही अनुकरण करू नये असं नव्हतं पण त्या शेजारणीला वाटलं, सूर्याला अर्ध्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ती फोटो काढून गप्प बसली नाही तर ते सोशल मीडियावर पाठवले. अन गंमत सांगायची, उठल्यावर सूर्याचं दर्शन घ्यायचं असतं हे लक्षात न येणारे ६/७ मजले वर चढून सूर्याची पूजा करून त्याला अर्ध्य देऊ लागले. तसं हिम्मतराव म्हणाले,
‘चांगलंच आहे की, त्या निमित्ताने सूर्याच्या कोवळ्या रूपाकडे बघून यांची दृष्टी तरी चांगली होईल.’
पण कुठलं काय? ते फक्त एक दिवसाचं कर्म होतं. बाकी वेळेस कोण लक्षात घेतंय. त्यावर हिम्मतरावांनी त्यांना आलेला अनुभव सांगितला. गॅलरीत उभा राहुन सहज कंटाळा आला म्हणून गोल मान फिरवून जरा हाताने खाली जमिनीला स्पर्श करत होते. तर शेजारचे चिमणराव तसेच करू लागले. हिम्मतरावांना ते चिडवतात असं वाटून ते म्हणाले,
‘काय चिमणराव, का म्हणून आमच्यासारखे करताय?’ तसं चिमनरावांनी सांगितलं,
‘मला वाटलं आज अशी कृती करायला सांगितली आहे.’ लोकांची रस्त्यावर पचापच थुंकायची सवय अजूनही जात नाही. लोकांच्या कितीही कानीकपाळी ओरडलं तरी चुकीची कृती सोडत नाहीत. शांताबाई मोठमोठ्याने हसायला लागली तसे हिम्मतराव म्हणाले,
‘ शेजारच्या रघुदादांचं वजन चांगलेच वाढले आहे. उठायचं, खायचं, प्यायचं, टीव्ही, मोबाईल निवांत. मग काय बघायचं, किलो किलोनं वाढणारच. व्यायामाचं नाव नाही. मोदी साहेब कोरोना संपल्यावर आभार मानण्यासाठी जेव्हा’ मन की बात, करतील तेव्हा ते म्हणतील,
‘मेरे प्यारे हाथीयो.’
शांताला सगळ्या गोष्टींची खूप गंमत वाटली. तिने आजचं तिचे नियोजन हिम्मतरावांना सांगितलं. आज घरातली सगळी कामं आटोपली की, मग ती पुस्तक वाचणार होती. तिनं काही पुस्तकं काढून ठेवली होती. शाळेत असताना वाचायची राहिली. शिक्षण थांबलं आणि संसाराच्या रगाड्यात सगळं विसरलं. आता पोरं मात्र चांगली शिकली. त्यांच्या निमित्ताने घरात पुस्तक होती. जुने राहिलेले छंद आता ती पूर्ण करणार होती. हिंमतरावांनीही आपण परसबागेत काही झाडं लागवडीचे प्रयोग करणार असल्याचं सांगितलं. बोलत बसल्यानं शांताबाईचे चांगले वीस-पंचवीस मिनिटे गेली होती. ती म्हणाली,
‘तुम्हाला सगळा दिवस पडला गप्पा मारायला. मला आता जाऊ दे.’
तसे हिम्मतराव म्हणाले,
‘अगं थांब, मास्क लाव, सॅनिटायजर घेऊन जा. आपण आपली काळजी घेतलेली बरी. एकदा कोरोनावर वॅक्सिन निघालं म्हंजी काही काळजी रहायची नाही.’
बरं येते म्हणून शांता गेली. ती रस्त्याने जात जात म्हणत होती.
‘ घ्या बटाटं, वांग, टमाटं, काकडीsssss’

सौ. आशा अरुण पाटील

मराठी लेखिका , मराठी साहित्य , मराठी कथा, मराठी कथाकार , मराठी कविता , मराठी लेखक, मराठी , मराठीगाणी ,मराठी चित्रपट, मराठी भाषा , मराठी गद्य , मराठी वाड्यमय , माय मराठी, मराठी साहित्यिका , मराठी साहित्यिक , साहित्य , साहित्य संमेलन , भाषा , मराठी शब्द , मराठी गोष्टी , मराठी सिरीज , मराठी कलाकार, मराठी नाटक

6 Replies to “शांता अन् कोरोना – मराठी कथा”

Comments are closed.

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Follow by Email
Don`t copy text!