सुगरण

वीरेंद्र सकाळपासून अस्वस्थ होता. काल रात्री घडलेल्या घरातल्या गोष्टींचा ताण त्याला आजही मनावर जाणवत होता. त्यामुळेच त्याने आज हॉटेलमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला. तो सुगरण नावाचे हॉटेल चालवत होता. या कामात त्याला घरातील सर्वजण म्हणजेच हॉटेल मॅनेजमेंट केलेली त्याची वहिनी (सीमा), आई, भाऊ, बायको (दीपिका) मदत करत होते. प्रत्येकावर वेगवेगळ्या कामाची जबाबदारी दिलेली होती. दर आठ दिवसांनी म्हणजेच दर शनिवारी त्यांची घरात मीटिंग होई. आठवड्यात झालेला नफा-तोटा याचा हिशेब आणि त्याचबरोबर हॉटेलमध्ये लागणाऱ्या वस्तूंची खरेदी यांचा आढावा घेतला जाई. नियोजनबद्ध कामामुळे हॉटेल चांगलेच नावारूपाला आले होते. वीरेंद्रची मुलगी रूद्राक्षी झाल्यापासून धंद्याला चांगलीच बरकत आली होती. हे सर्व सुरळीत चाललेले असतानाच काल घरातील स्त्रियांच्या कलहामुळे घरातील वातावरण चिघळले आणि वीरेंद्रचा छोटा भाऊ व्यंकटेश आणि सीमा दुसरीकडे राहायला गेले. एवढ्या दिवसांची साथ अर्ध्यावरच सुटल्यामुळे सर्वजण नाराज झाले होते.

बऱ्याच वर्षापूर्वी व्यंकटेश जेव्हा चार वर्षांचा होता तेव्हा बाबांचा
अपघात झाला होता. खरंतर त्यावेळेस त्यांच्या घरात अवघी चारच माणसे म्हणजे वीरेंद्र, व्यंकटेश आणि आई- बाबा होते. बाबा घरात असताना बाबा सोडले तर कोणाचीच कमाई नव्हती. एके दिवशी कामावरून परतत असताना अपघात झाला. त्यामुळे सर्व होत्याचे नव्हते झाले. वीरेंद्र नुकताच दहावीला गेला होता, तर व्यंकटेश चौथीला. त्याही स्थितीत वीरूच्या आईने धाडसाने परिस्थिती हाताळली. अपघात झाल्याचे कळताच वीरूच्या आजोबांना फोन केला. त्यांची मदत येईपर्यंत स्वतःचे दागिने आणि थोडीफार शिल्लक यावर दवाखाना भागविला. वीरेंद्रच्या आजोळी दोन मामा, मामी, आजी, आजोबा होतेच. ते सर्वजण मुंबईला रहात आणि वीरेंद्र पुण्याला. तरीही होता होईल तेवढ्या लवकर सर्वजण पुण्यामध्ये दाखल झाले. डॉक्टरांनी वीरूच्या बाबांचे पाय कामातून गेल्याचे सांगितले. पाय जरी गेले तरी बाबा वाचले यावर सर्वांनी समाधान मानले. वीरूच्या मामांनी होता होईल तेवढी मदत केली. पण त्यांच्याही घरात भरपूर माणसे. मामांचे शिक्षण जास्त न झाल्यामुळे ते खाजगी कंपनीत कामाला होते. मुंबईसारख्या महानगरात खाणार किती अन् वाचवणार किती? आईसह वीरू, व्यंकटेश, बाबा पुण्यातच राहिले. बाबांचे काम गेले तरी पुण्यातच राहून कुटुंबाची गुजराण करण्याचा निर्णय आईने घेतला. कामासाठी म्हणून कधीही बाहेर न पडणारी आई आता कंपनीत कामाला जाऊ लागली. राहिलेल्या वेळेत घरगुती उद्योग पापड, लोणची करू लागली. घर चालविण्यासाठी ती प्रयत्नांची पराकाष्ठा करत होती. व्यंकटेशला आईची ओढाताण जाणवत होती. वीरू शिक्षण सोडून कामाला जाणार होता. परंतु आई आणि शाळेतल्या शिक्षकांच्या आग्रहावरून, वीरूने रात्रशाळेमधून शिक्षण चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. आईसह तोही कामाला चालला. त्यामुळेच बाबांचे औषधोपचार, व्यंकटेशच्या शाळेचा खर्च आणि घर कसेबसे भागत होते. वाढत्या जबाबदाऱ्यामुळे वीरूला शिक्षण घेण्याची इच्छा असतानाही अभ्यासासाठी वेळ मिळत नव्हता. कशीतरी दहावी करून त्याने नाइलाजाने शिक्षणाला रामराम ठोकला. आपल्याला शिकता आले नाही, पण व्यंकटेशला खूप शिकवायचे असे त्याने मनाशी ठरवून व्यंकटेशला योग्य मार्गदर्शन केले. व्यंकटेशही मन लावून शिकत होता. प्रत्येक इयत्तेत प्रथम येत होता. घराची गाडी बऱ्यापैकी चालली होती. परंतु अचानक बाबांना एके दिवशी ताप आला. औषधपचाराने ताप कमी-जास्त होऊ लागला. वीरू आणि आईने पैशांची जमवाजमव करून रोगाचे  निदान करण्यासाठी सर्व चाचण्या केल्या. हे सर्व होईपर्यंत बराच उशीर  झाला आणि बाबांनी या जगाचा निरोप घेतला. बाबांचा अपघात झाल्यापासून त्यांना बायको-मुलांवर पडलेल्या जबाबदारीमुळे ते मानसिकरित्या खचले होते. त्यामुळेच की काय मोठ्या अपघातातून सावरलेले बाबा, तापातून बाहेर पडू शकले नाहीत.

अपघात झाल्यावरही खंबीरपणे काम करून आपला संसार भागविण्यासाठी बाहेर पडलेली त्याची आई, आता मात्र खचून गेली. माहेरच्यांनी तिला चार दिवस नेऊन, कडू घास काढला. मुलं म्हणजेच आता सर्वस्व हे समजावून सांगितले. वाटल्यास तुम्ही मुंबईत येऊन राहा, असा आग्रह केला. परंतु वीरेंद्रने पुण्यातच राहायचे ठरविले. त्या दोघांवर जणू आभाळच कोसळले होते. आईतर अचानक येत गेलेल्या संकटांमुळे, लहान वयातच वयस्कर दिसू लागली. तिची सर्व स्थिती पाहाता तिचा थोडा ताण कमी करण्याच्या उद्देशाने मामांनी स्वतःच्या मुलीचे लग्न वीरूबरोबर लावून दिले. सुनेच्या येण्याने घरामध्ये आनंद, उत्साह याची थोडी का होईना झुळूक वाऱ्यासारखी पसरली. आणि नव्या सूनबाईंनी घराचा कायापालट केला. मामांचे वरचेवर येणं जाणं वाढलं. वीरूने आता व्यंकटेशच्या शिक्षणाकडे लक्ष वळवलेच होते. व्यंकटेश ही मन लावून जिद्दीने शिक्षण घेत होता. बघता बघता तो पदवी घेऊन बाहेर पडला. आता यापुढे काय करायचे याचा विचार करत असताना, त्याने नोकरी करत करत स्पर्धापरीक्षा देण्याचे ठरविले. इकडे वीरूचा संसार फुलू लागला. वीरूला रूद्राक्षी नावाची गोड मुलगी झाली. घरामधील लहान बाळाच्या हुंकारांनी घर आनंदात न्हाऊन गेलं होतं.

व्यंकटेशने आता पदवी मिळविल्यावर, कोणते तरी व्यावसायिक शिक्षण घ्यावे आणि कुटुंबाला हातभार लावावा असे वीरू व त्याच्या बायकोचे म्हणणे होते. पण कोणतेही व्यावसायिक शिक्षण घेण्यापेक्षा स्पर्धा परीक्षेचा सराव करावा, असे वाटत होते. दिवसातील दहा-बारा तास त्याला सराव करावा लागणार असल्याने दिवसातील दहा बारा तास त्याला अभ्यासाला द्यावे लागणार होते. घरामध्ये आई सोडून सर्वजण नाराज झाले. त्याला किती दिवस आयतं खाऊ घालायचं, व्यंकटेशनेही घरात थोडीफार मदत करावी या उद्देशाने मित्रांशी सल्ला मसलत करून कॉलेजबाहेर कॅन्टिन काढले. त्याचा चांगला जम बसलेला पाहून आई आणि वहिनी दोघींनीही त्याला त्याच्या व्यवसायात साथ दिली. नाष्ट्याला पुरी-भाजी, उप्पीट, शिरा, बटाटे वडा मिळू लागल्याने गर्दी वाढली. कॅन्टिन नफ्यात होते. वाढता व्याप पाहाता घरातल पटपट आटोपून आई गल्ल्यावर येऊन बसे तर वहिनी रूद्राक्षीला सासुबाईकडे देऊन हॉटेलचे खाद्यपदार्थ बनवण्यात मदत करे. हॉटेलची कमाई पाहाता वीरूनेही यातच लक्ष घालावं असं सर्वानुमते ठरलं. अन् वीरुने कंपनीला रामराम ठोकला. कॅन्टिनचे रूपांतर हळूहळू मिनी हॉटेलमध्ये झाले. व्यंकटेशने आता आपले लक्ष अभ्यासावर केंद्रित केले. इकडे हॉटेलही व्यवस्थित चालू होतेच. आजपर्यंत चारजण हाताखाली कामाला होते. पण आता त्यांची संख्या वाढवावी लागली. कमीत कमी दहा-बारा माणसांमुळे हॉटेलचा कारभार सुरळीत चालला होता. प्रत्येकाला काम विभागून दिलं होतं. आठवड्यातून एकदा हॉटेलला सुट्टी असे. सुटीच्या आदल्या दिवशी सर्वजण एकत्र बसून सर्व हिशेब लावत. गडी माणसाला त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळे. त्यामुळे तेही मन लावून काम करत. व्यंकटेश अधून मधून हॉटेलमध्ये येत असे.

व्यंकटेश दुसऱ्या प्रयत्नात स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाला. घरातील सर्वांचा आनंद गगनात मावेना. आई, भाऊ, वहिनी यांच्या कष्टाचं चीज झालं. थोड्याच दिवसात त्याचं ट्रेनिंग सुरू झालं. साहेब म्हणून तो वावरू लागला. त्याला त्याच्या शैक्षणिक कालावधीत एक तत्वज्ञान माहीत झाले ते म्हणजे. ‘पोट भरलं तरच तत्त्वज्ञान सुचतं.’ म्हणून गरजू, होतकरू पाच जनांना तो मेसचे जेवण फुकट देत असे. त्याने आपल्या हॉटेलसाठी आणखी जागा वाढवून घेतली. त्यामध्ये सर्व सोयी-सुविधा केल्या.

हॉटेलचे नामकरण तर आधीच केलेले होते, ‘सुगरण हॉटेल.’ नावाप्रमाणेच हॉटेलमध्ये स्वयंपाक मिळे. आता व्यंकटेशच्या जीवनातही एका सुगरणीची आवश्यकता होता. त्याचा रुबाब, नोकरी पाहून, खूप मुलींची स्थळे येऊ लागली. मात्र मामा, माझीच छोटी मुलगी कर म्हणून मागे लागला. वीरूलाही मेहुणीच आपल्या घरात जमवून घेईल, असं वाटत होतं. मामाची मुलगी फक्त १० वी पास होती. पडत्या काळात आपण साथ दिली मग माझी मुलगी केली तर काय ? असा व्यावहारिक हिशेब मामाच्या मनात होता. परंतु व्यंकटेशला स्वतःचं कुटुंब सुशिक्षित असावं, आपल्या तोलामोलाचे स्थळ असावे. शोभणारी मुलगी असावी असे वाटत होते. पुण्यातच एका पाहुण्याची मुलगी होती. तिने हॉटेल मॅनेजमेंटची पदवी परदेशी जाऊन मिळविली होती. ती या घरात लक्ष्मी म्हणून आली तर, घराचेच काय पण हॉटेलचेही रूप पालटेल, याची त्याला खात्री होती. त्याने हा प्रस्ताव घरच्यांसमोर ठेवला. वीरू व त्याच्या बायकोला हे पटेना. कारण एवढ्या श्रीमंतीत राहिलेली मुलगी आपल्या घरात जमवून घेईल का? असा प्रश्न त्यांना सतावत होता. आईला मात्र पटवण्यात व्यंकटेश यशस्वी झाला. लग्नाला हो-नाही म्हणता म्हणता एकदाशी लग्न धामधुमीत पार पडलं. घरामध्ये नव्या लक्ष्मीने पाऊल ठेवले, अन् घर आणि हॉटेलचे रंगरूप बदललं. हळूहळू हॉटेलची बरीच सूत्र नव्या लक्ष्मीने म्हणजे सीमाने हातात घेतली. याचे वीरूला काही वाटले नाही. पण त्याच्या बायकोला हे आवडले नाही. कारण आपल्या माहेरच्यांनी या सर्वांना पहिल्यापासून आधार दिला आणि आता…हे शल्य तिच्या मनात बोचत होतं. त्यातच दोघींच्या शिक्षणातला, राहण्यातला फरक. यामुळे त्या दोघी एकमेकींपासून दुरावत गेल्या.

मामाच्या घरच्यांना वाईट वाटले. त्यांनी स्वतःच्या मुलीचे चांगले स्थळ बघून लग्न करून दिले. स्वतःच्या गाडीतून मुंबईला सर्वजण लग्नाला गेले. त्यांचं वैभव दिसत होतच. मामाने मात्र बहीण, जावई, लेक, नात यांना काही कमी पडू दिलं नाही. परंतु व्यंकटेश व त्याच्या बायकोला कामापुरतंच बोलला. ही गोष्ट व्यंकटेशला खटकली. लग्नावरून आल्यावर या गोष्टीवरून वाद झाला. अन् घरातलं वातावरण तापलं. कधी न बोलणारी वहिनी, आज सर्व विषय काढून बोलली. आम्ही तुमच्या आधाराशिवाय जगू, असे तिने व्यंकटेश व त्यांच्या बायकोला ठणकावून सांगितले. व्यंकटेश काहीच बोलला नाही. व्यंकटेशच्या बायकोने मात्र पन्नास टक्के वाटा मागितला. झाडाचे बी लावून संगोपन करून रोपाचे झाड करणारा मालक असतो. तयार झाडाला पाणी घातले काय अन् नाही काय काही फरक पडत नाही. असं दोघींचही म्हणणं होतं. दोघीही स्वतःला मालकीण समजत होत्या.

सुगरण चालू केल्यावर घाम गाळून त्याचे मोठ्या हॉटेलमध्ये रूपांतर होताना येणाऱ्या संकटांना सामोरं जायला सुना नव्हत्याच. म्हणून त्या पटकन् असा वाटा मागत होत्या. पण पूर्वीच व्यंकटेशने सर्व, आई व भावाच्या नावावर केले होते. अन् त्याला मिळालेल्या क्वार्टरमध्ये तो रहायला गेला. बोलून चालून तो क्लासवन ऑफिसर होता. जाताना तो आईला चल म्हणून आग्रह करत होता, पण आई गेली नाही.

ती दोघं गेली. अन् रूद्राक्षी, वीरू, आई यांना करमेना. घरातल्या वादामुळे सर्वांचीच मनःस्थिती विचित्र झाली होती. वीरूच्या डोळ्यासमोरून बाबा गेल्यापासून आतापर्यंतचा जीवनपट सरकत होता. तो आईजवळ बसून पोटभर रडला. बाबा गेल्यावर आईचा आधार बनलेला वीरू एखाद्या वादळातल्या वृक्षाप्रमाणे उन्मळून पडल्यासारखा भासू लागला. त्याच्या बोलण्या व रडण्यामुळे त्याचे मन जरातरी हलके झाले. पण आईचं काय? वीरूच्या आईने सौभाग्य गेल्यानंतर, मुलांच्या आधारानेच संसार केला होता. माहेरची साथ, मुलांचा समजुतदारपणा या सर्वामुळे तिने आलेल्या संकटावर मात केली होती, पण नवीन आलेल्या सुगरणीने सर्व पालटले. आईला कसेतरी वाटत होते. पण शेवटी मुलांपुढे काहीच चालत नव्हते, म्हणून ती शांत होती.

वीरूने मात्र सर्व परिस्थितीतून स्वतःला सावरले. त्याची लेक रूद्राक्षी आता दहावी झाली होती. तिच्या जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी काकासारखं मोठ्ठे होण्यासाठी, सर्व शिक्षण पार पाडण्यासाठी सर्वानीच कंबर कसली. अन् सुगरण पुन्हा एकदा फुलून गेली.

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Don`t copy text!