सुंदर हात

                 शालिनी सकाळपासून घरात आईला पटापट कामं करू लागत होती. खरंतर आज नेहमीप्रमाणेच तिची शाळा होती. मग तिला एवढी घाई कशाची झाली ते घरात कुणाला कळलेच नाही. तिचे बाबा दुसऱ्याच्या शेतात रोजाने कामाला जात. आई पण जवळच्याच गोळ्या-बिस्किटांच्या कारखान्यात कामाला जात होती. त्यांचं घर जास्त मोठं नव्हतं. गरिबाचं घर म्हटल्यावर कसं असणार ? दोन खोल्यातला संसार. ते छोटंसं घर ऋतूमानानुसार वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव देत होते. पावसाळ्यात ते गळत असे तर थंडीत थंड पडत असे. उन्हाळ्यात घरात गरम वाटत असे. तरीही अशा घरात राहताना त्या साऱ्यांना आपलेपणाची, आनंदाची अनुभूती मिळत होती. एकमेकांमध्ये एक वेगळाच ओलावा जाणवे त्या घरात. प्रेम जणू ओसंडून वाहात होते. शालिनी, शालिनीचे आजी, आजोबा, छोटा भाऊ नागेश अन् आई-बाबा. दोन खोलीत वावरताना त्यांना कधी अडचण जाणवलीच नाही. घरात शालिनी, आई आणि आजीला कामात मदत करत असे. कधीही चिडचिड किंवा त्रासिकता दाखवत नसे. आता ती पाचवीत गेली होती.

                 शालिनीला सारेजण घरात लाडाने ‘शालू’ म्हणून हाका मारत. शालू स्वभावाने समाधानी, शांत अन् मनमिळावू होती. अभ्यासात हुशार होती. तिला कामापुरतंच शिकवावं असे मत आजोबांचे होते पण; नातीला खूप शिकवून तिच्या पायावर उभं करायचं हा मानस आजीचा होता. याला आईचा दुजोरा होता. आजोबांना मात्र मुलगी म्हणजे चिंता, घोर वाटे. उगीच मुलींना शिकवून डोकेदुखी का करून घ्यावी हा विचार ते करत होते. तरीही या साऱ्या विचारांना प्रथम गोडीने अन् नंतर खंबीरपणे शालूच्या आईने विरोध केला. यामध्ये शालूला शिकवण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी शालू प्रयत्नांची जोड देत होती. आतापर्यंत प्रत्येक इयत्तेत तिने पहिल्या तीनात नंबर मिळविला होता. तिच्या वर्गातील बऱ्याच मुली वेगवेगळ्या छंदवर्गाला जात होत्या. बरेच पालक आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून प्रयत्नशील होते. शालूच्या आई-वडिलांना दररोज आपल्या कुटुंबाची चिंता सतावत असे. आला दिवस ढकलणे, कुटुंबाचा खर्च भागवणे महागाईच्या काळात अवघड जात होते. मग बाकी गोष्टींचा विचार मनात येणे शक्यच नव्हते. शाळेमध्ये येणाऱ्या बऱ्याच स्पर्धांपैकी काहीच स्पर्धांत ती सहभागी होत असे. सगळ्या स्पर्धाचा खर्च तिला परवडणारा नव्हता. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तिचा शाळेत प्रथम क्रमांक आला होता. तिचा गुणवत्ता यादीत नंबर आल्यामुळे तिला शिष्यवृत्तीही मिळू लागली होती. तिच्या हुशारीमुळे तिला सारेच शिक्षक अभ्यासाकरिता प्रोत्साहित करत.

                        शाळेमध्ये काही स्पर्धा बालदिनानिमित्त घेण्यात येणार होत्या. त्यामध्ये वक्तृत्व, सुंदर हस्ताक्षर, सुंदर स्वच्छ वर्ग आणि सुंदर हात या स्पर्धा होणार होत्या. प्रत्येक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थी तयारी करू लागले. प्रत्येकजण स्पर्धेसाठी आपापले नाव नोंदवत होता. शालूने सुंदर हस्ताक्षर या स्पर्धेत नाव नोंदविले होते. घरी तिने शाळेत होणाऱ्या स्पर्धांची माहिती दिली होती. शालूला आईने ‘सुंदर हात’ या स्पर्धेतही सहभागी होण्याविषयी सुचविले पण; शालू प्रथम तयार झाली नाही. नंतर तिच्या आईने समजून सांगितल्यावर मात्र तिने या स्पर्धेत आपले नाव नोंदविले. शालूच्या वर्गातील मुली या स्पर्धेसाठी जय्यत तयारी करत होत्या, सुंदर हात स्पर्धेसाठी मुलींनी बाजारातून मेंदीचे कोन, टिकल्या, चमकणारे नेलपेंट, खड्यांच्या बांगड्या, वेगवेगळी क्रीम खरेदी करून आणले होते. शालूच्या घरी मात्र आई कामाला जात असल्यामुळे शालूला घरकाम करावे लागे. नेहमी घरात धुणी-भांडी करून तिचे हात खरमूडे झाले होते. तिने हाताला सजविण्यासाठी म्हणून फक्त झाडाची मेंदी (पाने) आणली होती. तिच्या मैत्रिणींनी मात्र या स्पर्धेसाठी आणखी वेगळीच तयारी केली होती. त्यांचा हात मऊ वाटावा म्हणून हाताला साय लावली होती. तळहातावर लोणी, लिंबूही लावले होते. त्यांनी फक्त तळहातावरच नव्हे तर हाताच्या कोपऱ्यापर्यंत मेंदीने, हातावर डिझाईन काढले होते. शालूने त्यांचे मऊ हात पाहिले. त्यांनी केलेल्या पूर्वतयारीचे वर्णन ऐकले व कुठेतरी मनात ती नाराज झाली. मैत्रिणी गेल्यावर तिने आईला सारा वृत्तांत सांगितला. तिच्या आईने मात्र तिला आत्मविश्वासाने स्पर्धेत भाग घेण्यास सांगितले. तिने तळहातावर मधोमध मेंदीने गोल ठिपका दिला आणि हाताच्या बोटांचा निम्मा भाग रंगविला. दुसऱ्या दिवशी ती शाळेमध्ये पोहोचली. स्पर्धेकरिता म्हणून प्रत्येकाने जय्यत तयारी केली होती. त्या साऱ्यांची तयारी पाहून तिला दडपल्यासारखे होऊ लागले. तिच्या मैत्रिणींनी हात भरून चमकीच्या बांगड्या, नखांना नेलपेंट, तळहातावर मेंदीने सुंदर सुंदर डिझाईन काढले होते. बोटांवर मागच्या अन् पुढच्या बाजूने बोटांना रंगवले होते. बोटांमध्ये वेगवेगळ्या डिझाईनच्या अंगठ्या घातल्या होत्या. शालूने स्वच्छ हात धुतला, अन् ती स्पर्धेत सहभागी झाली. या स्पर्धेच्या परीक्षणासाठी केंद्रप्रमुख बाई आल्या होत्या. त्या एकेका मुलीचा हात पाहून पुढे चालल्या होत्या. स्पर्धकांनी एकापेक्षा एक सुंदररीतीने हात सजवले होते. नखांवर वेगवेगळ्या डिझाईन काढल्या होत्या. मेंदीचे नक्षीकामही पाहून बाईंचे मन मोहून गेले होते. त्या प्रसन्न चेहऱ्याने पुढील स्पर्धक मुलीकडे गेल्या. तळहातावर फक्त गोल ठिपका अन् बोटं अर्धीच रंगविलेली. बाकी काहीच सजावट नाही. हे पाहून त्यांनी आश्चयनि स्पर्धक कोण आहे म्हणून शालूच्या चेहऱ्याकडे पाहिले. शालू मनातून जरी घाबरली होती तरीही तिने बाईंकडे प्रसन्न मुद्रेने पाहिले अन् चेहरा थोडा पुढे झुकवून नम्र अभिवादन केले. केंद्रप्रमुख बाईंनी तिचा हात हातात घेतला. तो थोडासा खरमूड लागला पण; तो स्वच्छ वाटत होता. नखांची व्यवस्थित निगा राखली होती. उगाचच नखे वाढवली नव्हती. मुद्दाम शालूला बाईंनी प्रश्न केला,
                       
‘बेटा,तू हाताला सजवले नाहीस?’
मात्र यावर शालूचे उत्तर ऐकून त्यांना गहिवरून आले.
‘बाई घरी मी आईला कामात मदत करते. आई-बाबा दोघेही कामाला जातात. रात्री ते कामावरून परतल्यावर त्यांचे डोके पाय दाबून देते. मला जेवढी मदत करणे जमेल तेवढी मदत मी करते. माझ्याकडे हात सजविण्यासाठी साहित्य आणावयास पैसे नव्हते. काल घरात खूप कामही होते. त्यामुळे बाकी काही करण्यासाठी वेळ मिळाला नाही.’

केंद्रप्रमुख बाईंनी तिच्याकडे हसून पाहिले. खरंतर प्रत्येक स्पर्धकाला त्यांनी काही ना काही प्रश्न विचारला होता. मुलींनी हात सजविण्यासाठी काय काय प्रयत्न केले ते सविस्तर सांगितले होते. एकंदरीत साऱ्या संवादातून त्यांच्या असे लक्षात आले की, हाताला फक्त सजविणे एवढाच उपयोग मुलींनी लक्षात घेतला आहे. परंतु त्या हाताने बरीच कर्तव्ये पार पाडायची असतात हे मात्र लक्षात घेतले नाही. म्हणूनच त्यांना शालूचे हात सुंदर वाटले. जे सर्व बाजूंनी स्पर्धात्मक गुण मिळवून जात होते. केंद्रप्रमुख बाई ऑफिसमध्ये गेल्या. त्यांचे चहापाणी होईपर्यंत हस्ताक्षराचे कागद परीक्षणासाठी त्यांच्याकडे आले. खरंतर एकाहून एक अक्षरं होती, पण एका कागदावर त्यांचं लक्ष गेलं अन् तिथे काहीवेळ त्यांचे मनही रेंगाळले. तेथे आईच्या महतीचे वर्णन लिहिले होते. अक्षरात योग्य अंतर, शुद्धलेखन, अक्षरात सारखेपणा, अक्षरांवर रेषा अन् योग्य ठिकाणी स्वल्पविराम, विरामचिन्हे यांचा वापर. या साऱ्या गोष्टी त्या पानावर आढळल्या. हस्ताक्षरांच्या कागदांवर स्पर्धकांची नावे न घालता फक्त नंबर घालण्यात आले होते. ज्यामुळे परीक्षकांनी स्पर्धकांची नावे पाहून नंबर काढले असं होऊ नये, हा उद्देश त्यामागे होता. अनुक्रमे तीन क्रमांक काढण्यात आले. त्यानंतर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी खूप परिश्रमपूर्वक तयारी केली होती. एका विद्यार्थ्याला पाच मिनिटे वेळ देण्यात आला होता. एकापेक्षा एक अशी भाषणे झाली. यामध्येही परीक्षकांनी आवाज, उच्चारातील स्पष्टपणा, आरोह-अवरोह, हावभाव, हातवारे, धाडस, आत्मविश्वास या बाबी लक्षात घेऊन परीक्षण करून तीन क्रमांक काढले. यानंतर ‘सुंदर वर्ग ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत इयत्ता सातवी या वर्गाचा क्रमांक आला. त्यांनी वर्गामध्ये महापुरुषांची रेखाचित्रे स्वतः रेखाटून लावली होती. वर्गात पताकांसह तरंगचित्रे अन् शैक्षणिक तक्तेही लावले होते. सुविचारांच्या पट्ट्या, स्वहस्ताक्षरात लिहिल्या होत्या. वर्गात मागच्या कोपऱ्यात कचऱ्याची छोटी बादली ठेवण्यात आली होती. वर्गात साऱ्यांचे डबे अन् बाटल्या फळ्याच्या बाजूच्या कप्प्यात रांगेत व्यवस्थित लावून ठेवण्यात आल्या होत्या. वर्गाच्या बाहेर रांगेत साऱ्यांनी चप्पल सोडल्या होत्या. वर्गामध्ये एक वेगळाच उत्साह, प्रसन्नता जाणवत होती. बाकीच्याही वर्गांनी चांगली तयारी केली होती. बाईंना मात्र साऱ्यांपेक्षा हा वर्ग जास्त आवडला. याही स्पर्धेत बाईंनी तीन क्रमांक काढले.

              केंद्रप्रमुखबाई शाळेमध्ये जेव्हा जेव्हा येत तेव्हा त्यांना शाळेची शिस्त, टापटीपपणा अन् शाळेचा परिसर खूप आवडत असे. म्हणूनच त्यांनी मागील वर्षात केंद्रातील आदर्श शाळा म्हणून शिक्षकांचा शिक्षण परिषदेमध्ये गौरव केला होता. केंद्रप्रमुख बाईंनी यावेळेस शिक्षकांचाच नाही तर विद्यार्थ्यांचाही कौतुकसोहळा केला होता. आज त्या शाळेमध्ये स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आल्या होत्या. दुपारी ठीक चार वाजता शाळेच्या मैदानावर बक्षीस समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाकरिता पालकांनाही आमंत्रित करण्यात आले होते. प्रत्येकाला उत्सुकता होती ती बक्षिससभारंभाची. शाळेच्या मैदानावर सारे वर्ग रांगेत बसवून घेण्यात आले होते.

शाळेच्या प्रांगणात पालकही जमले होते. प्रतिमापूजन, दीप प्रज्ज्वलन अन् बालदिनाचे औचित्य साधून दोन विद्यार्थ्यांची भाषणे झाली. त्यांनी पंडित नेहरूंच्या कार्याचा आढावा घेतलाच, त्याचबरोबर बालदिनाचे महत्त्व समजून सांगितले. शाळेतील शरद  तालेवार आणि विद्या जमदाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. पाहुण्यांचे स्वागत स्वागतगीताने करण्यात आले. त्यानंतर स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. यासाठी विद्यार्थी उत्सुक होते. प्रथम क्रमांक जाहीर करण्यात आले. इयत्ता सातवीच्या वर्गाला ‘सुंदर वर्गा’चे बक्षीस मिळाले. शालूला या स्पर्धेमध्ये चांगले यश मिळाले होते. हस्ताक्षरात तिचा प्रथम क्रमांक तर आलाच होता पण; सोबत ‘सुंदर हात’ या स्पर्धेतही प्रथम क्रमांक आला होता. वक्तृत्व स्पर्धेत शैलजा शिवाजी पवार हिचा प्रथम क्रमांक आला. साऱ्याच यशस्वी विद्यार्थ्यांचे केंद्रप्रमुख बाईनी कौतुक केलेच, सोबत जे या स्पर्धेत सहभागी झाले त्यांचेही कौतुक केले. विशेष कौतुक केले ते शालूचे. शालूचे हात त्यांना का सुंदर वाटले तेही त्यांनी साऱ्यांना सांगितले. शालूच्या नयनांमधून आनंदाश्रू वाहात होते. तिचा हस्ताक्षर स्पर्धेत क्रमांक येणार हा आत्मविश्वास तिला होता. परंतु ‘सुंदर हात’ या स्पर्धेमध्ये एवढे सुंदर सजवलेले मऊ मऊ हात सोडून आपला नंबर येणे शक्य नाही, असे तिला वाटत होते. परंतु हातांचे परीक्षण कोणत्या गुणांवरून करण्यात आले ते केंद्रप्रमुख बाईंनी सर्वांना सांगितले.
‘सुंदर हात दिसण्याबरोबरच त्या हातांच्या कार्याला दुर्लक्षित न करता, ते सुंदर दिसणे महत्त्वाचे.’
हाही महत्त्वाचा विचार सांगितला. सुंदर हस्ताक्षर, वक्तृत्व, सुंदर वर्ग याविषयीही त्या बोलल्या. केंद्रप्रमुख बाईंनी प्रत्येक स्पर्धेचे परीक्षण निःपक्षपातीपणे केले होते. शालू मात्र आजच्या स्पर्धेमुळे आनंदी झालीच होती. परंतु एक वेगळाच आत्मविश्वास तिला जाणवू लागला. आपल्या साऱ्या अडचणींवर मात करतच आपण पुढेही जीवनात यशस्वी होणारच हा विचार तिच्या मनात रुजला होता. कार्यक्रमानंतर तिने प्रथम आईला, मग पाहुणे म्हणजेच केंद्रप्रमुख बाईंना, नंतर त्यांच्या वर्गशिक्षकांना वंदन केले. मी याच सुंदर हातांनी जीवनात खूप खूप यश मिळवणारच. या हातानं मला शक्य तेवढी मदत मी साऱ्यांनाच करेन ही आकांक्षा केंद्रप्रमुख बाईंना सांगितली. बाईंनी तिला शाबासकी तर दिलीच, सोबत पुढच्या कार्यासाठी शुभेच्छाही दिल्या. आज तिला खूप काही मिळाल्याचं समाधान लाभलं होतं.

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Follow by Email
Don`t copy text!