उणीव

               नजरेची भरारी जिकडे जाईल तिकडे आनंदी आनंद जाणवत होता. सारी सृष्टीच आनंदी झाली होती. माणसाच्या मनात सुख असेल, आनंद असेल तर त्याला चराचरात समाधान, आनंदच जाणवतो. याचप्रमाणे निर्मलाला वाटत होतं. तिला आज आभाळ ठेंगणं वाटू लागलं होतं. एवढ्या वर्षाच्या खडतर परिश्रमाचे फळ आज त्यांना मिळाले होते. निर्मलाच्या मोठ्या मुलीला म्हणजेच नमिताला आज पहिला पगार मिळाला होता. नमिताने सूर्यभान प्रशालेमध्ये गेली चार वर्षे बिनपगारी काम केले होते. काही वर्षापूर्वी संस्थेने डोनेशनची मागणी केली होती. पण त्यांची पूर्तता ती करू शकली नव्हती. म्हणूनच संस्थेने मनावर घेऊन तिचे नोकरीत कायम करण्याचे काम केले नव्हते. विचारल्यावर एकतर टाळाटाळ होत असे किंवा बघू पुढच्या महिन्यात प्रस्ताव पाठवू अशी काहीशी उत्तर ऐकायला मिळत. नमिताच्या घरची परिस्थिती खूप बेताची होती. घरी आई, बहीण, भाऊ अन् आज्जी-आजोबा. भावंडामध्ये ती सर्वात मोठी. ती लहानपणापासूनच समंजस होती. तसं तर मोठी मुले समंजस असतातच. त्यांच्यावर मोठेपणाचं ओझं सारेजणच टाकत असतात. नमिता, नलिनी अन् निखिल. नमिता खूप हुशार, चुणूकदार अन् चाणाक्ष होती. म्हणूनच पूर्वप्राथमिक शिष्यवृत्तीला तिचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला होता. नमिताचे बाबा (राजेश) बँकेत नोकरीला होते. ती पाचवीत असतानाच ते एका अपघातात बेपत्ता झाले होते. नमिताचे बाबा जोपर्यंत होते, तोपर्यंत निर्मलाला संसारात कोणत्याच गोष्टीची उणीव भासली नाही. तिची तिन्ही मुले हुशार होती. तसा निर्मलाचा स्वभाव पहिल्या पासून काटकसरी होता. तिला राजेशने महिना भागवण्यासाठी दिलेले पैसे त्यातूनही ती सारं व्यवस्थित करून काही बचत करत असे. तिला बाहेरचे व्यवहार जास्त कळत नव्हते. कारण कधी तिच्यावर ती जबाबदारी पडलीच नव्हती. बाहेरच्या जगाशी, त्याच्या व्यवहाराशी तिचा जास्त संपर्क आजपर्यंत आलाच नव्हता. निर्मला नावाप्रमाणेच निर्मळ होती. तिचे शिक्षण आठवीपर्यंतच झाले होते. निर्मलाला शिकण्याची हौस होती. पण तिच्या आई-बाबांनी मात्र तिचे लग्न तिच्या आतेभावाबरोबर आधीच ठरवले होते. राजेश निर्मलाचे लग्न ठरले. अन् निर्मलाचे शिक्षण बंद पडले. निर्मलाने शिकण्यासाठी हट्ट केला पण काहीच उपयोग झाला नाही. घरची परिस्थिती बेताची. आता पर्यंत सरकारकडून मोफत पुस्तके, खाणं यांचा भार उचलला गेला. पण यापुढे शिकविणे त्यांच्या घरच्यांना शक्य नव्हते. निर्मलाला चार बहिणी होत्या. घरातील पाच-पाच पोरींना शिकविणे, त्यांच्या दररोजच्या गरजा भागविणे हे तिच्या आई-बाबांना शक्य नव्हते. एकतर जिराईत शेती. शेतीतून जे उत्पन्न येई त्यावर कुटुंबाचा खाण्यापिण्याचा अन् कपडालत्त्याचा प्रश्न भागे. पाऊसकाळात देवाची कृपा झाली तर शेतीमध्ये नांगरणी, पेरणी ही सारी ठरवलेली कामे व्यवस्थित पार पडत. हे सर्व जरी व्यवस्थित पार पडले तरी पिक हातात येईपर्यंत काय काय संकटे येतील ती काही सांगता येत नव्हती. झाली तर दिवाळी नाही तर शिमगा. गेल्या चार वर्षापासून तर एकही पिक धड हाती लागलं नव्हतं. त्यामुळे नमिताच्या आजोबांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला होता. त्यातच वंशाच्या दिव्याच्या आशेने घरात पणत्यांची संख्या वाढली होती. या साऱ्यांचं करता करता नमिताच्या आजी-आजोबांच्या नाकीनऊ येऊ लागलं. खरंतर आजींना हा एवढा पसारा वाढवायचाच नव्हता. पण आजोबांपुढे आजीचा एकही निर्णय चालत नसे. म्हणूनच निर्मलाचं लग्न तिच्या आतेभावाबरोबर •ठरवताना त्यांना हेतूपुरस्कर निर्णयापासून लांब ठेवण्यात आलं होतं. इकडे निर्मलाचं लग्न ठरवलं अन् चारच महिन्यात निर्मलाच्या बाबांच्या घरावर जप्ती आली. त्यांनी घर गहाण ठेवून पिकासाठी कर्ज उचललं होतं. आता खूप मोठी पंचाईत झाली होती. जरी निर्मलाला आत्याच्याच घरात दिले तरीही पाहुणे माणसांसमोर आपली नाचक्की झाली असे साऱ्यांनाच वाटू लागले. घरावर जप्ती आली ती आत्याच्या नवऱ्याने थोडीफार रक्कम भरून थांबविली पण पाहुणे माणसाचा उपकार निर्मलाच्या वडिलांना सहन झाला नाही. आतापर्यंत स्वाभिमानाने आयुष्य घालवलेल्या त्यांना हे दुःख पचविता आले नाही. अन् शेतावर जातो असं सांगून ते सकाळी नऊ-साडेनऊच्या सुमाराला घरातून निघून गेले. निर्मलाच्या आईला आज सकाळपासूनच उदास वाटत होते. पण काय होते ते कळत नव्हते. कसंतरी होत होते, एवढे खरे. जेवणाच्या वेळी सारे जण जेवणासाठी त्यांची वाट पहात होते. शेवटी कंटाळून निर्मलाला गावात व शेतावर पहाण्यासाठी तिच्या आईने पाठविले. तासभर फिरूनही निर्मला मात्र एकटीच परतली. तिचा निराश चेहरा पाहून घरात साऱ्यांना आता चिंता वाटू लागली. अचानक हे काय झाले? घरातील प्रत्येकानेच आपापल्या परीने गावात शोधाशोध सुरू केली, पण काहीच उपयोग झाला नाही. निर्मलाच्या बाबांना शेताकडे जाताना गावातल्या कोणीच पाहिले नव्हते. परंतु कोणीतरी तालुक्याच्या गावाला जाताना पाहिले होतं. घरात न सांगता कुठेही अचानक जाण्याची सवय त्यांना नव्हती. मग आज त्यांनी असे का केले हा प्रश्न घरातील साऱ्यांना सतावत होता. तालुक्याला एक दोन पाहुणे होते. त्यांच्याकडे काही निमित्ताने गेले असतील अशी साऱ्यांनीच स्वतःची समजूत काढून घेतली. त्या दिवशी त्या घरात कोणीच जेवले नाही. बघता बघता सहा दिवस झाले. तरी बाबा आले नाही. निर्मलाच्या आईने शेजारच्या हरीला तालुक्याला जायचे यायचे पैसे देऊन घरच्यांचा शोध घेण्यासाठी पाठविले. परंतु पदरी घोर निराशाच पडली. घरात सारेच घाबरले. कर्जाचा डोंगर, घरावर जप्ती अन् निर्मलाच्या बाबांचे बेपत्ता होणं हा फार मोठा आघात घरात साऱ्यांवरच झाला होता. निर्मलाचे बाबा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिलीच होती. आता ही वस्तुस्थिती साऱ्यांनीच मान्य केली होती. निर्मलाच्या आईने आता सारीच जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. घरात चार पोरी अन् स्वतः त्या. त्यांनी कंबर कसली कष्टासाठी अन् येणाऱ्या प्रत्येक संकटाला झेलण्यासाठी. परिस्थितीचा प्रत्येक वार त्या सहन करणार होत्या. चिमण्यांसाठी आपल्या भावाच्या मदतीने मनावर दगड ठेवून शेती विकून कर्ज फेडले. अन् घर पण कर्जमुक्त केले. निर्मलाच्या आईपुढे संकटे दोन हात पसरून स्वागतासाठी उभी होती. जणू कवेत घेण्यासाठी आतुरली होती. त्या व्यवहाराने हुशार होत्या पण आता करण्यासारखे काही उरले नव्हते म्हणून भावाच्या मदतीने त्या जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन राहिल्या. निर्मलाचा मामा, बहिणीला म्हणजेच निर्मलाच्या आईला आधार द्यायला तयार होता पण मामीचा याला विरोध होता. म्हणूनच निर्मलाच्या आईने जिल्ह्याच्या ठिकाणी दहा बाय दहाची खोली घेतली. जिचे भाडे त्यांना परवडणारे होते. त्यात सारे जण राहू लागले. निर्मलाच्या बहिणी अन् आई सारे मिळून घरचं काम उरकत. शेतात काम करणाऱ्या निर्मलाच्या आईला हे सारं जड जात होतं, पण परिस्थितीमुळे पर्यायच नव्हता त्यांच्यापुढे दुसरा. तरीही त्यातल्या त्यात आपल्यासोबत मुलींना कामाला न्यायला त्यांना नको वाटे. आज ना उद्या मुलींची लग्न करावी लागतील. मग अशा मुली कामावर घेऊन जाणे योग्य आहे का? त्यापेक्षा सरळ निर्मलाचे लग्न तरी करून एका जबाबदारीतून मोकळे व्हावे असे त्यांना वाटू लागले. निर्मलाच्या सासरी म्हणजे नणंदेच्या घरी सोयरिकीचं विचारायला त्या गेल्या. नणंदेच्या अजिबात मनात नव्हतं, पण नणंदेचा नवरा अन् मुलगा यांच्या हट्टापुढे नणंदेच्या निर्णयाचे काही चालले नाही. म्हणूनच शेवटी कुरबुरत का होईना नणंदेने मान्य केलं. तिने स्वतःच्या अटी मांडल्या. नुसत्या मांडल्याच नाही तर मान्यही करून घेतल्या. लग्नानंतर माहेरी कसलाही संबंध ठेवायचा नाही. निर्मलाने कधीच माहेरी जायचे नाही अन् माहेरच्यांनीही इकडे पाय ठेवायचा नाही.

क्रमशः

2 Replies to “उणीव”

Comments are closed.

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Don`t copy text!